कादंबरी - अद्-भूत (संपूर्ण) Horror, Suspense, Thriller [Email this] English Version-> [Aghast]
कादंबरी - शून्य (संपूर्ण) Suspense, Thriller [Email it] English Version->[Zero]
कादंबरी - ब्लैकहोल (संपूर्ण) Mystery, Suspense [Email it] English Version->[Black Hole]
कादंबरी - ई लव्ह (संपूर्ण) Romantic, Suspense [Email it] English Version->[eLove]
कादंबरी - मधुराणी (संपूर्ण) Story of a femine power [Email it] English Version->[Honey]
कादंबरी - मृगजळ (संपूर्ण) Romantic, Drama, Psy Thriller[Email it] English Version->[Illusion]
Mrityunjay - Immortal(Next Novel)
- Political Suspense Thriller -
A translator to translate ‘Mrugjal & Madhurani’ from English/Marathi to Hindi is required on volunteer basis Interested may contact -> marathinovel at gmail.com. Due credit as ‘Hindi version by ---XYZ---‘ will be given on the blog ‘HindiNovels.net’.

Ch-11: विश्वासघात ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Happy New Year! Celebrating 2500 hits within 27 days!! Next post 'Chapter - 11' will be posted on 1 Jan 2008

मध्यरात्रीनंतरची वेळ होती. अंगाला झोंबणारी थंडी. पुलावरून तुरळक गाड्यांची रहदारी चालू होती. एक गाडी पुलाच्या बाजूला येऊन थांबली. त्यातून एक आकृती बाहेर आली. अंगात जाड थंडीचा कोट. थंडीमुळे किंवा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून डोक्यात पण लोकरीचे काहीतरी घातलेले होते. ती आकृती हळू हळू पुलाच्या खाली उतरायला लागली. पुलाच्या खाली एका जागी थांबून त्या आकृतीने पुन्हा एकदा इकडे तिकडे आपली नजर फिरविली. मग जमिनीवर खाली वाकून ती आकृती जमिनीवरचे दगड बाजूला करून काहीतरी शोधत होती. एक मोठा दगड बाजूला सारल्यावर ती आकृती स्तब्ध झाली . दगडाखाली तिला काहीतरी दिसले असावे. त्या आकृतीने ते काय आहे ते चाचपडून पाहिले. तिने ती वस्तू उचलली. मग उभे राहून आपल्या कोटाच्या खिशातून कापडात गुंडाळलेले काहीतरी काढले. त्या आकृतीने जी वस्तू उचलली होती ती आपल्या कोटाच्या खिशात ठेवली आणि जी वस्तू आपल्या खिशातून काढली होती ती तिथेे ठेऊन त्याच्यावर दगड ठेवला. पुन्हा ती आकृती इकडे तिकडे बघत आपल्या गाडीजवळ जायला लागली. ती आकृती आपल्या गाडीजवळ येऊन पोहोचते, तोच समोरून एक गाडी भरधाव वेगाने पुलाकडे जाऊ लागली. त्या गाडीच्या हेडलाईटस्चा लख्ख प्रकाश आकृतीच्या चेहऱ्यावर पडला. ती आकृती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून जॉनचा जवळचा साथीदार डॅन होता.


आज सकाळी आल्याबरोबर ऑफीसच्या लोकांना हॉलमध्ये ताबडतोब जमण्याचा आदेश मिळाला. असं फार क्वचितच होत असे. असं काय झालं असावं की जॉनने त्याच्या साथीदारांना हॉलमध्ये जमण्यास सांगितले. आता सुरू असलेल्या सिरीयल किलरच्या केससंदर्भातच काहीतरी महत्वाचे असावे; सॅम ने विचार केला. सॅम जॉनच्या अगदी जवळचा मानला जात होता. असं काही जरी असलं तरी त्याला त्याची पूर्वकल्पना जॉन देत असे. पण आज असं काहीच झालं नव्हतं. सॅमला पण काहीही कल्पना नव्हती की कशाची मिटींग आहे.

सॅम जेव्हा हॉलमध्ये आला तेव्हा तो तिथेे एकटाच होता. हळू हळू सर्वजण कुजबूज करीत येऊ लागले. बऱ्याच जणांनी सॅमला विचारलंसुध्दा. सॅमला पण माहित नसल्याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं. अजून जॉन हॉलमध्ये आला नव्हता. सगळ्यात शेवटी डॅन चोरट्या पावलांनी हॉलमध्ये शिरला आणि एका कोपऱ्यात जाऊन बसला. त्याचा चेहरा चिंतित दिसत होता. जॉनला कळलं तर नसेल आपण काय कारस्थान केलं ते. पण माहित होण्याचा काही प्रश्नच नव्हता. तो स्वत:ची समजूत घालू लागला. आपण कुणाचं काम केलं हे आपल्यालाच जर माहित नव्हतं तर जॉनला माहित होण्याचा प्रश्नच नव्हता. आपल्याला कुणीतरी अज्ञात इसमाचा फोन आला. त्याने आपल्याला एक काम सांगितलं आणि त्याच्या मोबदल्यात भरपूर पैसे दिले. पैसे पण आपण परस्पर एका जागी ठेवले होते तिथून उचलले. डॅन आता थोडा रिलॅक्स झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव आता दिसेनासे झाले. एवढ्यात भराभर मोठी मोठी पावलं टाकीत जॉन हॉलमध्ये आला. सरळ पोडीयमवर जाऊन त्याने त्याच्या हातातली फाईल टेबलवर ठेवली. साधारणत: नेहमी त्याची फाईल त्याच्या मागोमाग कुणीतरी आणत असे. पण आज त्याच्या मागे तर कुणीच नव्हते. त्याची फाईल त्याने स्वत:च आणली होती.

" आज एक वाईट आणि तेवढीच धक्कादायक बातमी देण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलाविले आहे" जॉन म्हणाला.

इकडे डॅनच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. जॉनने आपली नजर सर्वत्र हॉलमध्ये फिरविली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव जणू तो टिपत होता.

त्याने त्याच्या फाईलमधील दोन फोटो काढले आणि समोरच्या त्याच्या साथीदारांजवळ देऊन पूर्ण हॉलमध्ये फिरविण्यास सांगितले. फोटो एकाजवळून दुसऱ्याजवळ जायला लागले. कुणाच्या चेहऱ्यावर असंमजस आणि गोंधळलेले भाव होते. तर कुणाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.

"दोन्हीही फोटो लक्ष देऊन बघा.." जॉन म्हणाला.

हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली.

"व्यवस्थित बघा... दोन्हीही फोटोत एक टी पॉय आहे... एका फोटोत टीपॉयवर पेपरवेट ठेवलेला आहे तर ... दुसऱ्या फोटोत तो तिथून गायब झालेला आहे... आपल्याला सर्वांना घटनेच्या जागी कोणत्याही वस्तूला हलविण्याचे आदेश नसतात..." जॉनने एकदा पुन्हा आपली तीक्ष्ण नजर हॉलमध्ये फिरविली.

" मग तो पेपरवेट गेला कुठे.... पेपरवेट नाहीसा होतो याचा अर्थ काय?... की त्या पेपरवेटमध्ये अशी काही गोष्ट होती की ज्यामुळे खुनी पकडला जाण्याची शक्यता होती ... जसे हाताचे ठसे .. रक्ताचा अंश इत्यादि ..."

इकडे डॅन आपल्या भावना लपविण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागला.

" मग पेपरवेट नाहीसा होतो याचा अर्थ काय?...की आपल्यातलाच कुणीतरी ... विश्वासघातकी आहे आणि तो खुन्याला फितूर झालेला आहे.." जॉन म्हणाला.

हॉलमध्ये स्मशानवत शांतता पसरली. डॅनच्या डोळ्यात विश्वासघाताचे भाव तरळले. पण ते जॉनने हेरले होते का?

(क्रमशः ...)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-10: माय गॉड ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Celebrating 2000 hits within 25 days!! Next post 'Chapter - 11' will be posted on 31 Dec 2007
हयूयानाच्या शवाभोवती तपास करणाऱ्या टेक्नीकल लोकांची गर्दी झाली होती. त्यांना अडचण होवू नये म्हणून जॉन आणि सॅम बेडरूममधून बाहेर आले. बाहेर हॉलमध्येसुध्दा जॉनचे काही साथीदार होते. त्या साथीदारांपैकी डॅन बाकीच्या रूम्समध्ये काही पुरावा मिळतो का ते शोधत होता. एवढ्यात डॅनचा व्हायब्रेशन मोडमध्ये ठेवलेला मोबाईल व्हायब्रेट झाला. डॅनने फोन काढून नंबर बघितला. नंबर तर ओळखीचा वाटत नव्हता. डॅनने मोबाईल बंद करून खिशात ठेऊन दिला आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाला.

थोड्या वेळाने डॅनच्या फोनवर एस. एम. एस. आला. एस. एम. एस. त्याच फोन नंबरवरुन आला होता. त्याने मेसेज ओपन करुन बघितला-

'डॅन फोन उचल... ते तुझ्यासाठी खूप फायद्याचे ठरेल.'

डॅन विचारात पडला. हा असा कुणाचा एस. एम. एस. असू शकतो. फायदा म्हणजे कोणत्या फायद्याबद्द्ल बोलत असावा हा. आपल्या डोक्याला ताण देऊन डॅन तो नंबर कुणाचा असावा हे आठविण्याचा प्रयत्न करू लागला. कदाचित नंबर आपल्या डायरीत असू शकतो. डायरी काढण्यासाठी त्याने खिशात हात घातला तोच पुन्हा डॅनचा मोबाईल व्हायब्रेट झाला. डॅनने मोबाईलचे बटण दाबून मोबाईल कानाला लावला.

तिकडून आवाज आला,

" मला माहित आहे तू सध्या कुठे आहेस... हयूयाना फिलीकींन्स च्या फ्लॅटमध्ये... लवकरात लवकर कुणी ऐकणार नाही अशा जागी जा... मला तुझ्याशी फार महत्वाचे बोलायचे आहे"


जॉन आणि अँजेनी हॉलमध्ये बसले होते.

" या दोन्हीही खुनांवरून मी काही निष्कर्ष काढले आहेत..." जॉन अँजेनीला सांगत होता.

" कोणते?" अँजेनीने विचारले.

" पहिली गोष्ट ही की खुनी ... इंटेलेक्च्यूअल्स या कॅटेगिरीत मोडायला पाहिजे" जॉन म्हणाला.

" म्हणजे?" अँजेनीने विचारले

" म्हणजे तो प्रोफेसर , वैज्ञानिक, मॅथेमॅटेशियन ... यापैकीच काहीतरी त्याचे प्रोफेशन असले पाहिजे" जॉनने आपला निष्कर्ष सांगितला.

" कशावरून?" अँजेनीने विचारले.

" त्याच्या शून्याशी असलेल्या आकर्षणावरून असं वाटतं ... पण 0+6=6 आणि 0x6 =0 असं लिहून त्याला काय सुचवायचे असेल?" जॉन म्हणाला.

"असं होवू शकतं की त्याला एकूण 6 खून करायचे असतील" अँजेनी म्हणाली

" होवू शकतं" जॉन विचार करीत एकटक तिच्याकडे बघत म्हणाला.

जॉनने खुनाच्या जागी काढलेले काही फोटो अँजेनी जवळ दिले.

" बघ या फोटोंवरून विशेष असं काही तुझ्या लक्षात येतं का?" जॉन म्हणाला.

" एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आली आहे..." जॉन म्हणाला.

"कोणती?" फोटो न्याहाळत अँजेनीने विचारले.

" की दोन्हीही खून हे अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावरच झालेले आहेत..." जॉन म्हणाला.

अँजेनीने फोटो बघता बघता जॉनकडे बघत म्हटले, " हो बरोबर ... हे तर माझ्या लक्षातच आले नव्हते"

अँजेनी पुन्हा फोटो बघत होती. जॉन तिचे फोटो बघतानांचे हावभाव न्याहाळत होता. अचानक अँजेनीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे हावभाव उमटले.

" जॉन हे बघ..." अँजेनी दोन फोटो जॉनच्या समोर धरीत म्हणाली.

जॉनने ते दोन फोटो बघितले आणि त्याच्या तोंडातून निघाले,

" माय गॉड..."

जॉन उठून उभा राहिला होता.

(क्रमशः ...)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-9: पहिली चुक ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


कमांड1 आणि कमांड2 खुर्चीवर आरामात बसले होते. बॉसने त्यांच्यावर सोपविलेलं काम व्यवस्थित पार पडल्यामुळे ते खुष आणि समाधानी दिसत होते. त्यांची पूर्ण रात्र धावपळीत गेली होती. बसल्या बसल्या कमांड1ला तंद्री लागल्यागत होत होतं. त्याच्या समोरुन रात्रीचा एक एक प्रसंग जणू चलचित्राप्रमाणे सरकत होता....


... रात्रीचे 3-3.15 वाजले असतील. बाहेर बोचरी थंडी अंगाला झोंबत होती. इकडची तिकडची चाहूल घेत कमांड1 आणि कमांड2 एका अपार्टमेंटमध्ये घुसले. आपर्टमेंटमध्ये सगळीकडे भयाण शांतता होती. तिथे जी सेक्यूरीटी तैनात होती, त्याचा त्यांनी आधीच बंदोबस्त लावला होता. तरीही सावधगीरीने, पावलांचा आवाज न होवू देता ते लिफ्टजवळ आले. आजूबाजूला आपली तिक्ष्ण नजर फिरवीत कमांड1ने हलकेच लिफ्टचं बटण दाबलं. लिफ्ट उघडताच इकडे तिकडे बघत कमांड1 आणि कमांड2 दोघंही लिफ्टमध्ये घुसले. दोघांच्याही हातात पांढरे सॉक्स घातलेले होते. त्यांचा चेहरा कुणालाही व्यवस्थित दिसू नये म्हणून त्यांनी ओव्हरकोट घालून ओव्हरकोटची कॉलर उभी केली होती. लिफ्टचा दरवाजा बंद झाला. कमांड1ने समोर येऊन लिफ्टचे बटन दाबले ज्यावर लिहिले होते 10.

लिफ्ट दहाव्या फ्लोअरवर येऊन थांबली. लिफ्ट उघडली. कमांड1 आणि कमांड2 इकडे तिकडे बघत हळूच बाहेर आले. कुणी नाही असं बघून ते पॅसेजमध्ये चालू लागले. त्यांच्या शूजच्या तळाशी रबर लावलेलं असावं, कारण ते जरी झपाझप चालत होते तरी त्यांच्या शूजचा बिलकुल आवाज येत नव्हता. ते 103 नंबरच्या फ्लॅटसमोर येऊन थांबले. पुन्हा दोघांनी इकडे तिकडे बघितले. कोणीही नव्हतं. आपल्या ओव्हरकोटच्या खिशातून काहीतरी काढून कमांड1ने ते समोरच्या फ्लॅटच्या दाराच्या की होलमध्ये घातलं. दोन तीन झटके देऊन त्याने ते की होलमध्ये फिरविलं आणि दरवाज्याच्या हॅडलला एक हलकासा खाली दाबून झटका दिला. दार उघडलं . दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य तरळलं. आंत गडद अंधार होता. दोघेही हळूच फ्लॅटमध्ये घुसले. त्यांनी त्यांच्या हातातले पांढरे सॉक्स काढून ओव्हरकोटच्या खिशात ठेवले. सॉक्सच्या आत त्यांच्या हातात रबराचे हॅन्डग्लोव्हज घातलेले होते. त्यांनी हळूच आवाज न करता आतून दरवाजा लाऊन घेतला.

हॉलमध्ये अंधारात कमांड1 आणि कमांड2 चाचपडू लागले. अंधारातच त्यांनी बेडरूमच्या दिशेचा अंदाज बांधला आणि त्या दिशेने चालू लागले. अचानक कमांड1 मधे ठेवलेल्या टी पॉयला अडखळला. त्याने पडता पडता बाजूला ठेवलेल्या एका वस्तूला धरले आणि स्वत:ला सांभाळले. कमांड2ने पण त्याला पडण्यापासून वाचविण्यासाठी आधार दिला. तो पडायचा तर वाचला पण या गडबडीत बाजूला ठेवलेला एक गोल काचेचा पेपर वेट त्याच्या धक्याने घरंगळायला लागला. कमांड1 ने पेपरवेटला मोठया शिताफीने पकडले आणि पुन्हा पूर्वीच्या जागेवर व्यवस्थित ठेवले.

" अरे यार लायटर लाव ... सालं इथं काहीच दिसत नाही आहे" कमांड1 हळू आवाजात पण चिडून बोलला.

कमांड2ने आपल्या खिशातून लायटर काढून पेटविले. आता अंधूक प्रकाशात थोडेफार दिसायला लागले होते. त्यांच्या अगदी समोर एक उघडा दरवाजा होता.

बेडरूम इकडेच असायला पाहिजे...

कमांड1ने विचार केला. कमांड1 हळू हळू त्या दरवाज्याकडे निघाला. मागेमागे कमांड2 चालू लागला. दरवाज्यातून आत गेल्यावर एका बेडवर कुणीतरी झोपलेले असल्याची आकृती त्यांना दिसली. कमांड1ने तोंडावर बोट ठेऊन कमांड2ला 'बिलकुल आवाज करू नको' असे खुणावले. कमांड1ने अंधारात चाचपडून बेडरूमचा लाईट लावला. जे कोणी झोपलेलं होतं ते बहूधा गाढ झोपलं असावं कारण काहीही हालचाल नव्हती. कोण होतं ते समाजायला काही मार्ग नव्हता कारण त्याने तोंडावरून पांघरूण घेतले होते. कमांड1 ने आपल्या ओवरकोटच्या उजव्या खिशातून बंदूक काढली. झोपलेल्या आकृतीकडे बंदूक रोखत त्याने त्या आकृतीच्या चेहऱ्यावरचे पांघरूण काढले. ती एक सुंदर स्त्री होती. ती त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच असावी कारण क्षणाचाही विलंब न लावता कमांड1 ने सायलेंसर लावलेल्या बंदुकीने तिच्यावर गोळ्यांची बरसात करणे सुरू केले. तिच्या शरीरात हालचाल झाली पण ती फक्त मृत्यूपूर्वीची तडफड होती. पुन्हा तिचे शरीर ढिले पडून तिची हालचाल थांबली. झोपेतून उठायची पण उसंत कमांड1ने तिला दिली नव्हती. ती रक्ताच्या थारोळ्यात निश्चल अशी मृत अवेस्थेत पडली होती.

" ए, तुझ्याजवळचा चाकू जरा इकडे दे" कमांड1 कमांड2ला म्हणाला.

आता त्याच्या आवाजातला हळूपणा जाऊन त्याला एक वेगळीच धार आली होती. कमांड2 ने त्याच्या ओवरकोटच्या खिशातला चाकू काढून कमांड1च्या हातात दिला. कमांड1 तो चाकू मृत शरीराच्या रक्तात बुडवून भिंतीवर रक्ताने लिहायला लागला.

लिहिणे झाल्यावर कमांड1 तिथे जवळच असलेल्या फोन जवळ गेला. त्याच्या ओवरकोटच्या डाव्या खिशातून त्याने एक उपकरण काढले. फोन नंबर डायल केला आणि त्या उपकरणातून फोनमध्ये बोलायला लागला, " ... अजून एकजण ...हयूयाना फिलीकींन्स ...शून्यात विलीन झाली आहे..."

तिकडून काही आवाज येण्याच्या आधीच त्याने फोन ठेऊन दिला. कदाचित त्याने पोलीस स्टेशनला फोन केला होता. फोन ठेवल्यानंतर अचानक कमांड1चे लक्ष त्याच्या हाताकडे गेले.

" माय गॉड!" त्याच्या तोंडातून भीतीयुक्त आश्चर्याने निघाले.

" काय झालं?" कमांड2 कमांड1च्या हाताकडे बघत म्हणाला.

काय गडबड झाली ते आता कमांड2च्यासुध्दा लक्षात आलं होतं. कमांड1च्या उजव्या हातातला रबराचा हॅन्डग्लोव्ह फाटला होता. मघाशी हॉलमध्ये अडखळून पडण्याच्या गडबडीत कशाला तरी अडकून तो फाटला असावा.

" माझ्या हाताचे ठसे इथे सगळीकडे उमटले असतील ... आपल्याला इथून जाण्याच्या आधी ते सर्व साफ केले पाहिजे" कमांड1 आपल्या खिशातून रुमाल काढत म्हणाला.

" जास्त ठसे नसतील ... आपण पोलीस येण्याच्या आत पटापट साफ करू शकतो" कमांड2 आपल्या खिशातून रुमाल काढत म्हणाला.

दोघेही रुमालाने खोलीतल्या सगळ्या जागा लाईटचा स्वीच, बेडचा काठ, बाजूचा टेबल सर्व घाई घाईने साफ करायला लागले.

बेडरूममध्ये कुठेही त्याच्या हाताचे ठसे राहिले नसावेत याची खात्री करून ते हॉलमध्ये गेले. तिथे त्यांनी टी पॉय, दरवाज्याचे हॅन्डल, खालची फरशी , जिथे हात लागल्याची शक्यता होती ते सर्व कपड्याने साफ केले. अचानक त्यांना पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐेकायला येऊ लागला. दोघांनी घाईघाईने एकदा पुन्हा बेडरूममध्ये जाऊन नजर फिरविली. जसा पोलिसांच्या गाडीचा आवाज जवळजवळ येऊ लागला तसे ते धावतच समोरच्या दरवाज्याजवळ आले. दरवाजा हळूच उघडून बाहेरची चाहूल घेत ते दोघे तिथून पसार झाले....


.... अचानक कमांड1 विचाराच्या तंद्रीतून जागा होत आपल्या खुर्चीतून ताडकन उठला.

" काय झालं?" कमांड2 ने विचारले.

" गडबड झाली ... एक मोठी चूक झाली" कमांड1 म्हणाला.

कमांड1ची नशा पूर्णपणे उतरली होती.

" चूक? ... कोणती" कमांड2 ने विचारले.

कमांड1च्या चेहऱ्यावरचे भाव पाहून कमांड2ची नशा पण उतरायला लागली होती.

" माझ्या बोटाचे ठसे तिथे राहिले आहेत" कमांड1 म्हणाला.

" आपण तर सर्व जागी नाहिसे केले होते" कमांड2 म्हणाला.

" नाही ... एका जागी आपण साफ करायचे विसरलोे आहोत" कमांड1 म्हणाला.

" कुठे?" कमांड2 म्हणाला.

एव्हाना कमांड2पण उठून उभा राहिला होता.

" तुला आठवत असेल ... जेव्हा मी हॉलमध्ये अडखळून पडलो होतो ... तेव्हा तिथे टी पॉयवर ठेवलेला एक काचेचा पेपरवेट घरंगळायला लागला होता ..." कमांड1 सांगत होता.

कमांड2 कमांड1 कडे काळजीने बघत ऐकत होता.

" आवाज होऊ नये म्हणून मी तो पेपरवेट उचलून पुन्हा पूर्वीच्या जागेवर ठेवला होता" कमांड1 म्हणाला.

" माय गॉड ... त्याच्यावर तुझ्या हाताचे ठसे तर साफ करायचे राहूनच गेले"

कमांड1 गहन विचार करायला लागला.

" आता काय करायचं?" कमांड2 ने विचारले.

कमांड1 काहीच बोलला नाही. खिडकीजवळ जाऊन खिडकीच्या बाहेर बघत तो विचार करायला लागला. कमांड2 ला काय करावे अन काय बोलावे काहीच सुचत नव्हते. तो नुसता कमांड1च्या हालचाली बघत होता. कमांड1 पुन्हा खिडकीजवळून ते दोघे जिथे बसले होते तिथे परत आला. त्याने समोर ठेवलेला त्याचा व्हिस्कीचा रिकामा ग्लास पुन्हा भरला आणि एका घोटातच पूर्णपणे रिचविला. पुन्हा कमांड1 खिडकीजवळ गेला आणि विचारात मग्न झाला.

" काही तर करता येईल आपल्याला" कमांड2 कमांड1 ला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत होता.

कमांड1 काही वेळ स्तब्ध उभा राहिला आणि अचानक काही तरी सुचल्यासारखे ओरडला ,

" यस्स ऽऽ"

" काय, काही मार्ग मिळाला?" कमांड2 ने आनंदाने विचारले.

पण कमांड1 कुठे सांगण्याच्या मनस्थितीत होता? त्याने कमांड2 ला खुणावले,

" चल लवकर ... चल माझ्यासोबत चल"

कमांड1 घराच्या बाहेर पडला आणि त्याच्या मागे मागे कमांड2 चालत होता.

(क्रमशः ...)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-8: अजुन एक .. (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



जॉनची गाडी एका भर रहदारीच्या रस्त्यावरून धावू लागली. नंतर बरीच वळणे घेऊन त्याची गाडी एका पॉश वस्तीतल्या एका अपार्टमेंटजवळ आली. जॉन तिथे यायच्या आधीच पोलीस तिथे येऊन पोहोचलेले होते. यावळेस पोलिसांच्या व्यतिरिक्त मिडीयाची पण लक्षणीय उपस्थिती होती. गर्दीमुळे रस्त्यावर सगळी रहदारी विस्कळीत झालेली होती. जॉनने गाडी पार्क केली आणि तो गाडीतून बाहेर येताच मिडीयावाल्यांनी त्याच्या भोवती गर्दी करणं सुरू केलं. जरी तो त्याच्या प्राईव्हेट गाडीतून आला होता आणि युनिफॉर्ममध्ये नव्हता तरीही मिडीयावाल्यांना तो या केसशी संबंधित असल्याची कशी कुणकुण लागली कुणास ठाऊक?

"मि. जॉन वुई वुड लाईक टू हिअर यूअर कमेंट ऑन द केस प्लीज" कुणीतरी त्याच्यासमोर कॅमेरा आणि माईक्रोफोन घेऊन गेला.

"प्लीज बाजूला व्हा.... मला आत जाऊ द्या ... मला आधी इन्व्हेस्टीगेशन पूर्ण करू द्या ... मगच मी माझे मत मांडू शकेन" जॉन गर्दीतून आपला रस्ता काढीत म्हणाला.

तरी कुणीही बाजूला व्हायला आणि जॉनला रस्ता देण्यास तयार नव्हते. मोठया मुश्कीलीने जॉन त्या गर्दीतून रस्ता काढीत अपार्टमेंटच्या दिशेने निघाला. दुसरे काही पोलीस त्याला जाण्यासाठी रस्ता तयार करण्यास मदत करू लागले.

जॉन लिफ्टने अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावर पोहोचला. समोरच्याच फ्लॅटमध्ये पोलिसांची गर्दी होती. जॉन फ्लॅटमध्ये शिरताच सॅम समोर आला.

"सर, इकडे" सॅमने जॉनला बेडरूमकडे नेले.

बेडरूममध्ये बेडवर रक्तबंबाळ अवस्थेत एका स्त्रीचे मृत शरीर होते. आणि समोर भिंतीवर रक्ताने एक मोठा गोल काढला होता. यावेळी त्या गोलाच्या आत रक्ताने 0+6=6 आणि 0x6=0 असे लिहिलेले होते. जॉन समोर जाऊन भिंतीकडे निरखून पाहू लागला.

" कोण आहे ही ?" जॉनने सॅमला विचारले.

" हुयाना फिलीकिन्स ... टी व्ही आर्टीस्ट आहे" सॅम म्हणाला.

" एकटीच राहत होती का?" जॉनने विचारले.

" हो सर, ... शेजाऱ्यांचं तरी असंच म्हणणं आहे... त्यांच्या म्हणण्यानूसार अधून मधून कुणी येत असे तिच्याकडे ... पण प्रत्येक वेळी कुणी तरी वेगळाच असतो असं शेजारी सांगतात." सॅम त्याने काढलेल्या माहितीचा सारांश सांगत होता.

" खुन्याने भिंतीवर 0+6=6 आणि 0x6=0 असं लिहिलं आहे ... यावरून कमीत कमी एवढं तर स्पष्ट होतं की हा गोल म्हणजे शून्यच असला पाहिजे... पण 0+6=6 आणि 0x6=0 म्हणजे काय? ... की तो आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे?" जॉन आपला तर्क लढवित होता.

" अॅडीटीव्ह आयडेंटीटी प्रॉपर्टी आणि झीरो मल्टीप्लीकेशन प्रॉपर्टी ... गणितात शिकविलेलं आठवतं थोडं थोडं..." सॅम म्हणाला.

" ते ठीक आहे... पण त्या खुन्याला म्हणायचं तरी काय?" जॉनने जणू स्वत:लाच प्रश्न विचारला.

दोघंही विचार करू लागले. त्या प्रश्नाचं उत्तर दोघांजवळही नव्हतं.

"बाकीच्या रूम्स तपासल्या का?" जॉनने विचारलं.

" हो, तपास सुरू आहे" सॅम म्हणाला.

फोटोग्राफर फोटो घेऊ लागला. फिंगर प्रिन्ट एक्सपर्ट काही हाताचे, बोटांचे ठसे मिळतात का ते शोधत होते.

" मोटीव्ह बद्दल काही ?" जॉनने बेडरूमधून बाहेर येत सॅमला विचारले.

" नाही सर ... पण एवढं नक्की आहे की तो पहिला खून ज्याने केला होता त्यानेच हाही खून केला असावा" सॅम आपला तर्क सांगत होता.

" हो ... तुझं बरोबर आहे ... हा सिरियल किलरचाच मामला दिसतो." जॉन सॅमला दुजोरा देत म्हणाला.

(क्रमशः ...)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-7: मन वढाय वढाय... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



जॉन कारमध्ये जात होता. हॉस्पिटलमधून डॉक्टरांनी त्याला कळविले होते की अँजेनीला डिस्चार्ज केले आहे आणि ती तिच्या घरी गेलेली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेडीकली ती पूर्णपणे सावरलेली होती. फक्त मेंटली आणि इमोशनली सावरायला तिला थोडा वेळ लागेल. सानीच्या पोस्टमार्टमचे रिपोर्टसुध्दा आले होते. जॉनला त्या संदर्भात अँजेनीशी थोडी चर्चा करायची होती. चर्चा तो फोनवर पण करू शकला असता. पण कितीही मनाला आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे मन ऐकत नव्हते. तिला भेटण्याची त्याची इच्छा बळावत होती. त्याने तिला तोंडाने कृत्रिम श्वासोश्वास दिला तेव्हा त्याला काही विशेष वाटले नव्हते. पण आता वारंवार त्याला तिच्या ओठांचा त्याच्या ओठांना झालेला स्पर्श आठवत होता. त्याने कर्र ऽऽ... ब्रेक दाबले. गाडीला वळविले आणि तो निघाला - अँजेनीच्या घराकडे.

जॉनची कार अँजेनीच्या अपार्टमेंटखाली येऊन थांबली. त्याने गाडी पार्किंगमध्ये वळविली. पार्किंगमध्ये बराच वेळ तो नुसताच गाडीत बसून होता. आपल्या मनाशी संघर्ष करीत शेवटी तो गाडीतून उतरला. मोठी मोठी पावलं टाकीत तो लिफ्टकडे गेला. लिफ्ट उघडीच होती. निर्धाराने तो लिफ्टमध्ये शिरला. लिफ्ट बंद होऊन वरच्या दिशेने धावायला लागली.

लिफ्ट थांबली. लिफ्टमध्ये डिस्प्लेवर 10 आकडा आला होता. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि जॉन बाहेर पडला. अँजेनीच्या फ्लॅटचे दार आतून बंद होते. तो दारापाशी गेला. पुन्हा तिथे थोडा वेळ घुटमळला. तो डोअर बेल दाबणार तेवढ्यात समोरचा दरवाजा उघडला. दरवाज्यात अँजेनी उभी होती. जॉन एकदम गोरा मोरा होऊन ओशाळल्यासारखा झाला.

" काय झालं?" अँजेनी अगदी मोकळं खदखदून हसत म्हणाली.

इतकं मोकळं हसतांना त्याने तिला पहिल्यांदा बघितले होते.

" कुठं काय?... काही नाही.... मला तुझ्याकडे केस च्या संदर्भात थोडी चौकशी करायची होती... नाही म्हणजे करायची आहे" जॉन कसाबसा बोलला.

"ये की मग आत .... असा बोलतो आहेस जसं मी तुला चोरी करताना पकडलं आहे" अँजेनी हसत म्हणाली.

अँजेनीने त्याला आत घेऊन दार बंद केले.

जॉन आणि अँजेनी ड्रॉईंग रूममध्ये बसले होते.

" पोस्टमार्टम रिपोर्टच्या अनुसार ... सानीला बंदुकीची गोळी छातीत डाव्या बाजूला अगदी हृदयात लागली होती ... त्यामुळे जो गोल भिंतीवर काढला होता तो सानीने काढण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे" जॉन आपला तर्क प्रस्तुत करीत होता.

" म्हणजे मग तो आकार नक्कीच खुन्याने काढला असणार" अँजेनी म्हणाली.

थोडा विचार करुन ती पुढे म्हणाली " पण तो आकार काढून त्याला काय सुचवायचे असावे?"

" तोच तर सगळ्यात मोठा प्रश्न सध्या आपल्यापुढे उभा आहे" जॉन म्हणाला.

" जर आपण अशाप्रकारे यापूर्वीही एखादा खून झाला आहे का ... हे बघितले तर?" अँजेनीने आपले मत मांडले.

"ते सगळे शोधून झाले आहे... रेकॉर्डला तशा प्रकारचा एकही खून नाही...." जॉन म्हणाला.

तेवढ्यात जॉनच्या मोबाईलची बेल वाजली. त्याने मोबाईलचे बटन दाबून तो कानाला लावला, "यस ...सॅम"

जॉनने सॅमचे बोलणे ऐकले आणि तो एकदम उठून उभा राहत म्हणाला, " काय?"

अँजेनी काय झाले म्हणून त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागली.

"मी लगेच येतो" जॉन म्हणाला आणि दरवाज्याकडे जायला निघाला.

जॉनने मोबाईल बंद करून खिशात ठेवला.

जाता जाता तो अँजेनीला फक्त एवढंच म्हणाला, "मी तुला नंतर भेटतो ... मला आता लवकरात लवकर गेलेच पाहिजे..."

अँजेनी काही बोलणार त्याआधीच जॉन गेलेला होता.

(क्रमशः ...)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-6: ब्लैंक मेल ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



मंद चंद्राच्या प्रकाशात टेरेसवर कमांड1 आणि कमांड2 बसले होते. त्यांच्या समोर लॅपटॉप ठेवलेला होता. मधून मधून मजेत ते व्हिस्कीचे घोट घेत होते. कमांड1 कॉम्प्यूटरला भराभर कमांड देत होता. एका क्षणात तो की बोर्डवर कितीतरी बटनं दाबत होता.

" हे तू काय करीत आहेस?" कमांड2ने उत्सुकतेने विचारले.

" अरे हा पोलीस ऑफीसर जॉन आपल्या केसवर काम करीत आहे" कमांड1 ने की बोर्डवरची बटनं भराभर दाबता दाबता म्हटले.

" मग?" कमांड2 ने विचारले.

" त्याच्या मनात काय चालले आहे हे आपल्याला कळायला नको का?" कमांड1 म्हणाला.

" त्याच्या मनात काय चालले हे आपल्याला कसे कळणार?" कमांड2ने अविश्वासाने म्हटले.

" हे बघ आता तो ऑनलाईनच आहे... आणि ही मेल मी त्याला पाठवितो आहे .... ही मेल त्याचा पासवर्ड ब्रेक करेल" कमांड1 आत्मविश्वासाने सांगत होता." पण... कसा काय ब्रेक करणार?" कमांड2 आश्चर्याने म्हणाला.

" सांगतो सांगतो " कमांड1 ने मेलचे 'सेंड' बटण दाबले आणि पुढे म्हणाला,

" हे बघ, ही मेल जेव्हा तो उघडेल तेव्हा त्याच्या कॉम्प्यूटरवर 'सेशन एक्सपायर्ड' असा मेसेज येईल. मग तो पुन्हा जेव्हा त्याचा पासवर्ड टाकायला जाईल तेव्हा तो आपल्या प्रोग्रॅम मध्ये टाकलेला असेल. मग तो आपला प्रोग्रॅम तो पासवर्ड आपल्यापर्यंत सुखरुप पोहोचता करेल."

कमांड1च्या चेहऱ्यावर एक छद्मी हास्य तरळले.

कमांड2ने कॉम्प्यूटरकडे पाहात अंतर्मुख झाल्यागत आपला व्हिस्कीचा ग्लास बाजूला ठेवला.

" काय दिमाख आहे !" कमांड2 त्याला प्रशंसेने म्हणाला.

" हळू हळू तू पण शिकशील हे सगळं" कमांड1 त्याला आश्वासन देत म्हणाला.

"तुझ्यासारखा गुरू मिळाल्यावर मला काळजी करण्याचं काय कारण?" कमांड1कडे उत्साहाने आणि अभिमानाने बघत कमांड2 म्हणाला.

कमांड1ची जास्तीत जास्त प्रशंसा करण्याच्या नादात कमांड2चा धक्का त्याने बाजूला ठेवलेल्या व्हिस्कीच्या ग्लासला लागला आणि तो ग्लास खाली फरशीवर पडून फुटला. त्याचे 4-5 तुकडे झाले. कमांड2 ते ग्लासचे तुकडे उचलू लागला.

कमांड1ने कॉम्प्यूटरवर काम करता करता एक धावता नेत्रकटाक्ष काच उचलणाऱ्या कमांड2कडे टाकला आणि पुन्हा तो आपल्या कामात गुंतून गेला.

" इऽऽ" कमांड2 ओरडला.

" काय झालं?" कमांड1ने विचारले.

" अरे या काचेने बोट कापलं" कमांड2ने आपल्या वेदना लपविण्याचा प्रयत्न करीत कापलेल्या बोटाकडे निरखून बघत म्हटले.

" बी ब्रेव्ह ... डोन्ट अॅक्ट लाइक अ किड " कमांड1 म्हणाला आणि मॉनिटरकडे बघत पुन्हा आपल्या कामात मग्न झाला.

कमांड2ने तशाच रक्ताळलेल्या हाताने बाकीचे ग्लासचे तुकडे उचलले. तिथे एक पॉलीथीन बॅग पडलेली होती त्यात टाकले आणि त्या पॉलीथीनच्या बॅगला गाठ मारून ती बॅग घराच्या मागच्या बाजूला झाडीत टाकून दिली.

तेवढ्यात त्यांना एक मेल आलेली दिसली.

" उघडली वाटतं त्यानं आपली मेल.... याला तर भलती घाई दिसते आपला पासवर्ड ब्रेक करुन घेण्याची" म्हणत कमांड1ने ती मेल उघडली. मेल ब्लँक होती. मेलमध्ये पासवर्ड आला नव्हता. अचानक कमांड1ने विद्युत गतीने कॉम्प्यूटर बंद केला.

" काय झालं?" कमांड2 ने विचारले.

" साला आपण विचार केला तेवढा हा येडा नाही.... त्याला शंका आलेली दिसते" कमांड1 म्हणाला.

" मेल ब्लँक होती... म्हणजे असं असू शकते की त्याचा पासवर्डसुध्दा ब्लँक असावा" कमाड2ने आपला अंदाज सांगितला.

"मि. कमांड2 ... इमेल पासवर्ड हा कधीही ब्लँक नसतो" कमांड1 आपल्या विशिष्ट शैलीत म्हणाला. "पण ...तू मग एवढ्या तडकाफडकी कॉम्प्यूटर का बंद केलास?" कमांड2 ने उत्सुकतेने विचारले.

"अरे, जर त्याला शंका आली असेल तर तो आपल्याला ट्रेस करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार" कमांड2 म्हणाला.

"अच्छा अच्छा" कमांड2 समजल्याचा आव आणीत म्हणाला.

कमांड1 व्हिस्कीचा ग्लास घेऊन त्याच्या जागेवरून उठला.

"आपण इथे असं उघड्यावर बसायला नको" कमांड2 काळजी व्यक्त करीत म्हणाला.

"का बरं?" कमांड1 ने ग्लास घेऊन एकीकडे जात म्हटलं.

"नाही,... मी असं ऐकलं आहे की अमेरिकन सॅटेलाईटचे कॅमेरे जमिनीवरचं 10 बाय 10 इंच पर्यंत स्पष्ट बघू शकतात. त्यात आपण पण दिसू शकतो." कमांड2 काळजी दाखवित म्हणाला.

कमांड1 ग्लास घेऊन जाता जाता थांबला आणि मग हसायला लागला.

"काय झालं?" कमांड2 ने आश्चर्याने विचारले.

" अरे, हे अमेरिकन लोक की नाही प्रोपॅगँन्डा मध्ये फार एक्सपर्ट आहेत ...अरे, ते जर 10 बाय 10 इंच पर्यंत स्पष्ट बघू शकतात तर मग तो ओसामा बीन लादेन किती दिवसापासनं त्यांच्या नाकी नऊ आणतो आहे त्याला का ते पकडू शकत नाहीत?... हं हे खरं आहे की काही बाबतीत अमेरिकेच्या टेक्नॉलॉजीला तोड नाही... पण एका खऱ्या गोष्टी बरोबर 10 खोट्या गोष्टीसुध्दा ठोकून द्यायच्या ही अमेरिकेची स्टाईलच आहे... एका खऱ्या गोष्टी बरोबर 10 खोट्या गोष्टी ठोकण्याला काय म्हणतात माहित आहे ?"

" काय?" कमांड2ने उत्सुकतेने विचारले.

" शुगरकोटींग ... तुला माहित आहे? ... र्वल्ड वार 2 मध्ये हिटलरची फौज शेवटच्या क्षणापर्यंत का लढली?" कमांड1 म्हणाला.

कमांड2 कमांड1 कडे प्रश्नार्थक नजरेने बघायला लागला.

" हिटलरने प्रोपॅगॅन्डा केला होता की त्यांच्या सैन्यात लवकरच व्ही2 मिसाईल दाखल होणार आहे ... आणि जर ते मिसाईल त्यांच्या सैन्यात दाखल झाले तर ते जगावरसुध्दा राज्य करू शकणार होते" कमांड1 म्हणाला.

" मग झालं होतं का दाखल ते मिसाईल?" कमांड2 ने विचारले.

"कशाचं डोंबलाचं होते? ... असेल तर होईल ना" कमांड1 म्हणाला.

आता कमांड1 कॉम्प्यूटर पुन्हा सुरू करायला लागला होता.

" आता कशाला सुरू करतोस? ... तो पुन्हा ट्रेस करेल ना" कमांड2 ने आपली चिंता व्यक्त करीत म्हटले.

"नाही ... आता सुरू केल्यावर आपल्याला वेगळा आय. पी. अॅड्रेस मिळेल ... त्यामुळे तो आपल्याला ट्रेस नाही करू शकणार" कमांड1 कॉम्प्यूटर सुरू होण्याची वाट पाहत म्हणाला.

एव्हाना कॉम्प्यूटर सुरू झाला होता आणि मॉनिटरच्या उजव्या कॉर्नरला मेल आल्याचा मेसेजसुध्दा आला होता.

"बॉसची मेल आहे" मेल उघडत कमांड1 म्हणाला.

त्याने मेल उघडली आणि मेल वाचायला लागला.

"कमांड2..." कमांड1 ने आवाज दिला.

"काय?" कमांड2 ने त्याला प्रतिसाद देत म्हटले.

" आपल्याला पुढच्या कारवाईचे आदेश मिळाले आहेत" कमांड1 मेल वाचत म्हणाला.

कमांड2 कमांड1 च्या खांद्यावरून मेलमध्ये काय लिहिले आहे ते वाचायचा प्रयत्न करू लागला.

(क्रमशः ...)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-5: स्पंदन... (शून्य- कादंबरी)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


बी23 कडे जाता जाता जॉनला त्याचं त्यालाच आश्चर्य वाटायला लागलं.

ही कसली ओढ?...

असं तर पूर्वी कधी झालं नव्हतं...

आतापर्यंत कितीतरी केसेस त्याने हाताळल्या होत्या पण एका स्त्रीविषयी अशी ओढ...

आणि काही अनपेक्षित तर नसेल घडलेे अशी काळजी त्याला इतक्या तीव्रतेने कधीच वाटली नव्हती....

त्याने बी23 चे दार ठोठावले. दार उघडेच होते. दार ढकलून तो आत जायला लागला. आत बेडवर अँजेनी पडलेली होती. ती खिडकीतून बाहेर शून्यात बघत होती. चाहूल लागताच तिने दरवाज्याकडे बघितले. जॉनला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक फिकं हास्य झळकलं. ती अजूनही धक्यातून सावरलेली जाणवत नव्हती. तो तिच्याजवळ जावून उभा राहिला. तिने त्याला जवळच्याच स्टूलवर बसण्याचा इशारा केला. जॉन तिच्या जवळ जाऊन स्टूलवर बसला.

त्याने फुलांचा गुच्छ तिच्या बाजूला ठेवीत म्हटले, " कशी आहेस ?"

ती पुन्हा त्याच्याकडे पाहून नुसती हसली. हसण्यासाठीही जणू तिला कष्ट करावे लागत होते.

" संकट ज्याच्यावर कोसळते त्यालाच त्या पीडेची जाणीव असते... तू कोणत्या मनस्थितीतून जात असशील ते मी समजू शकतो..." जॉन बोलत होता.

अँजेनीच्या डोळ्यात अश्रू तरळायला लागले. जॉन बोलायचा थांबला. त्याने धीराचा हात तिच्या खांद्यावर ठेवला. आता तर तिला जास्तच गहिवरून यायला लागले. तिने आत्तापर्यंत रोखून धरलेला बांध तुटला आणि ती जॉनला बिलगून ओक्साबोक्शी रडायला लागली. जॉन तिला थोपटून धीर देण्याचा प्रयत्न करीत होता. तिला कसे समजवावे हे त्याला कळेनासे झाले होते.

आता ती थोडी नॉर्मल झाली होती. जॉनने ताडले की अँजेनीला आता खुनाच्या संदर्भात प्रश्न विचारायला काही हरकत नाही.

" कुणी खून केला असावा? ... तुला काही माहिती ... अंदाज?" जॉनने हळूच प्रश्न विचारला.

अँजेनीने नकारार्थी फक्त मान हलविली आणि ती खिडकीच्या बाहेर शून्यात बघायला लागली. जॉनने त्याच्या खिशातून एक फोटो काढला.

"हे बघ इथे भिंतीवर ... रक्ताने काहीतरी गोल असे काढण्यात आले आहे... हे काय असावे ... काही कल्पना? ... किंवा कुणी काढले असावे?" जॉनने विचारले.

अँजेनीने फोटोत बघितले. भिंतीवर दिसणाऱ्या गोल आकृतीच्या खाली बेडवर पडलेल्या तिच्या मृत नवऱ्याला पाहून तिला अजून भरून यायला लागले होते. जॉनने फोटो पुन्हा खिशात ठेवला.

" नाही म्हणजे त्या गोल आकाराचा कशाशी काही संबंध जोडता येतो का?... तो एबीसीडीतला 'ओ' असू शकतो ... किंवा ते शून्यही असू शकते..." जॉन म्हणाला.

" मी समजू शकतो की ... तुला खुनाबद्दल प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही ... पण जितकी जास्त, आणि जितकी लवकर माहिती मिळेल तेवढ्या लवकर आपण खुन्याला पकडू शकू.." जॉन पुढे म्हणाला.

अँजेनी आता व्यवस्थित बसून आपल्या भावना आवरीत खंबीरपणे म्हणाली, " विचार ... तुला जे विचारायचे आहे ते विचार"

जॉनसुध्दा आता सर्व माहिती काढून घेण्याची ही योग्य वेळ आहे हे जाणून ताठ बसला.

" सानी काय करत होता ?... म्हणजे बाय प्रोफेशन" जॉनने पहिला प्रश्न विचारला.

" तो इंपोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करायचा ... मेनली गारमेंटस् ... इंडीयन कॉन्टीनेंटमध्ये त्याचा व्यवसाय पसरलेला होता" अँजेनी सांगत होती.

" कुणी प्रोफेशनल रायव्हल?" जॉनने विचारले.

" नाही ... त्याचा डोमेन एकदम वेगळा असल्याने त्याला जवळपास कुणी प्रोफेशनल रायव्हल्स नव्हते" अँजेनी म्हणाली.

" बरं तू काय करतेस ?" जॉनने पुढचा प्रश्न विचारला.

" मी एक फॅशन डिझायनर आहे" अँजेनीने सांगितले.

बराच वेळ अँजेनीचा जाब जबाब सुरू होता. शेवटी स्टूलवरून उठत जॉन म्हणाला, " ठीक आहे सध्यापुरती एवढी माहिती पुरेशी आहे... आता तू थकली असशील ... म्हणजे मानसिकरित्या... आराम कर... पुन्हा काही वाटलं तर आम्ही तुला विचारूच"

जॉन जायला निघाला.

अँजेनी उठायला लागली तर जॉन म्हणाला, " तू पडून राहा... तुला आरामाची गरज आहे"

तरीपण त्याला दरवाज्यापर्यंत सोडायला अँजेनी उठलीच. जॉन दरवाज्यापर्यंत पोहोचत नाही तोच त्याला मागून अँजेनीचा आवाज आला-

" थँक यू ..."

जॉन एकदम थांबला आणि वळून म्हणाला " कशासाठी ?"

" माझा जीव वाचविण्यासाठी ... डॉक्टरांनी मला सगळं सांगितलं की जर तू मला वेळेवर कृत्रिम श्वास नसता दिलास तर कदाचित मी आता जिवंत नसते..." अँजेनी त्याच्याकडे डोळे भरून बघत म्हणाली.

" त्यात काय ... मी माझं कर्तव्य केलं" जॉन म्हणाला.

" तो तुझा मोठेपणा आहे" अँजेनी दरवाजापाशी जात म्हणाली.

एव्हाना जॉन जायला निघाला होता. तो झपाझप पावले टाकीत चालू लागला, कदाचित आपल्या अनावर झालेल्या भावना लपविण्यासाठी. तो थोड्या वेळातच वार्डच्या शेवटी जाऊन पोहोचला. उजवीकडे वळण्याच्या आधी त्याने एकदा मागे वळून अँजेनीच्या रूमकडे बघितले. ती अजूनही त्याच्याकडेच बघत होती.

जॉन पॅसेजमधून लिफ्टच्या दिशेने जात होता. अँजेनीला सोडून जातांना त्याला उगीचच हूरहूर लागून गेली होती. अचानक जॉनचं लक्ष लिफ्टकडे गेलं. लिफ्ट अजूनही त्याच्यापासून बरीच दूर होती. लिफ्टच्या पलीकडच्या बाजूने एक युवक आला. त्याने काळं टी शर्ट घातलं होतं आणि त्याच्या टी शर्टवर अगदी तसाच 'झीरो' काढला होता जसा त्याने पूर्वी खुनाच्या दिवशी बघितला होता. जॉन लगेच लिफ्टच्या दिशेनं धावायला लागला.

त्याने आवाज दिला, " हॅलो"

पण त्याचा आवाज पोहोचण्याच्या आधीच तो युवक लिफ्टमध्ये शिरला होता. जॉन अजून जोराने धावायला लागला. लिफ्ट बंद झाली होती पण अजून खाली किंवा वर गेली नव्हती. जॉन धावता धावता लिफ्टच्या जवळ गेला. त्याने लिफ्टचे बटन दाबले. पण व्यर्थ. लिफ्ट खाली जाण्यास सुरवात झाली होती. जॉनला काय करावे काही सुचत नव्हते. युवक त्या दिवशीच्या युवकासारखा नव्हता. पण का कोण जाणे जॉनला वाटत होते की खुनाचे काहीतरी रहस्य त्या 'झीरो' त दडले होते. जॉन बाजूच्या पायऱ्यांनी भराभर खाली उतरायला लागला. अधून मधून तो लिफ्ट पण बघत होता. लिफ्ट मध्ये कुठेच थांबायला तयार नव्हती. कदाचित ती एकदम ग्राऊंड फ्लोअरलाच थांबणार असावी. जॉनने बघितले तर लिफ्ट त्याच्यापेक्षा दोन मजले पुढे निघून गेली होती. तो अजून जोराने पायऱ्या उतरण्याचा प्रयत्न करायला लागला.

शेवटी दम लागलेल्या अवस्थेत जोर जोराने श्वास घेत तो ग्राऊंड फ्लोअरला पोहोचला. त्याने लिफ्टकडे बघितले. लिफ्टमधले लोक कधीच बाहेर पडले होते आणि लिफ्टवरचा डिस्प्ले लिफ्ट वरच्या दिशेने चाललेली आहे असं दर्शवित होता. जॉन धावतच दवाखान्याच्या बिल्डींगच्या बाहेर आला. त्याने सगळीकडे नजर फिरविली. पार्कीगमध्ये जाऊन बघितले. दवाखान्याच्या आवारातून बाहेर येऊन रस्त्यावर बघितले. तो काळ्या टी शर्टवाला युवक त्याला कुठेही दिसत नव्हता.
(क्रमशः ...)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-4: ती कुठे गेली ? (शून्य- कादंबरी)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


हॉस्पिटलच्या समोर एक पांढरी कार येऊन थांबली. त्यातून जॉन उतरला. आज तो त्याच्या नेहमीच्या युनिफार्ममध्ये नव्हता. त्याच्या हातात एक पांढऱ्या फुलांचा गुच्छ पण होता. सरळ लिफ्टकडे जाऊन त्याने लिफ्टचे बटन दाबले. लिफ्टमध्ये जाऊन त्याने फ्लोअर नं. 12 चे बटन दाबले. लिफ्ट बंद होऊन वर जायला लागली. त्याच्या डोक्यात पुन्हा विचारांची गर्दी व्हायला लागली...

भिंतीवर रक्ताने गोल का काढले असावे?...

मेडीकल चेकींगमध्ये रक्त सानीचेच होते....

नक्कीच गोल ज्याने काढले तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असावा....

खून कोणी केला असावा याची कल्पना अँजेनीला असेल का?...

लिफ्ट थांबली व लिफ्टची बेल वाजली. जॉनचे विचारचक्र थांबले. समोर इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेमध्ये 12 हा आकडा आला होता. लिफ्टचे दार उघडले आणि जॉन लिफ्टच्या बाहेर पडला. लांब लांब पाऊले टाकीत सरळ तो 'बी' वार्डमध्ये गेला.

जॉनने एकदा आपल्या हातातल्या पांढऱ्या फुलांच्या गुच्छाकडे बघितले आणि त्याने 'बी2' रूमचा दरवाजा ठोठावला. थोडा वेळ त्याने वाट बघितली. आत काहीच चाहूल नव्हती. त्याने दार पुन्हा वाजविले. काहीच प्रतिसाद नाही. त्याने आपली गोंधळलेली नजर व्हरंड्यात इकडे तिकडे फिरविली. त्याला आता काळजी वाटायला लागली होती. तो दार जोर जोराने ठोठावयाला लागला.

काय झाले असेल? ...

इथेच तर होती ती....

आज तर तिला डिस्चार्ज करणार नव्हते...

मग कुठे गेली असेल ती?...

काही अघटित तर घडले नसावे...

त्याला धडधडायला लागले. त्याने पुन्हा आजूबाजूला बघितले. वार्डाच्या शेवटी एक काऊंटर होते. काऊंटरवर माहिती मिळेल - असा विचार करून तो काऊंटरकडे घाई घाई जायला लागला.

"एक्सक्यूज मी" त्याने काऊंटरवरच्या नर्सचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

नर्सला हे रोजचेच असावे, जॉनकडे लक्ष न देता तिने आपले काम चालूच ठेवले.

" 'बी2' ला एक पेशंट होता अँजेनी कार्टर ... कुठं आहे ती? ... तिला काय डिस्चार्ज दिला का? ... पण तिचा डिस्चार्ज तर आज नव्हता ... मग कुठे गेली ती? ... तिथे तर कोणीच नाही " जॉनने प्रश्नांची सरबत्ती लावली.

" एक मिनिट ... एक मिनिट ... कोणती रूम म्हणालात तुम्ही?" नर्सने त्याला थांबवित विचारले.

"बी2" जॉन श्वास घेत म्हणाला.

नर्सने एक फाईल काढली. फाईल उघडून 'बी2' ... बी2' म्हणत तिने फाईलच्या इंडेक्सवरुन बोट फिरविले. मग इंडेक्सवर लिहिलेले पेज नंबर बघण्यासाठी तिने फाईलचे काही कागद चाळले.

"'बी2' ... मिसेस अँजेनी कार्टर..." नर्स खात्री करण्यासाठी म्हणाली.

" हो ...अँजेनी कार्टर" जॉनने कंन्फर्म केले.

जॉनने उत्कंठेने तिच्याकडे बघितले. पण ती अगदी शांत होती. जॉनची उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. त्याला तिच्या शांतपणाचा रागही येत होता.

" सॉरी ... मिस्टर ..?" नर्स जॉनकडे बघत म्हणाली.

जॉनच्या हृदयाचा ठोका चुकला होता.

" मिस्टर ..जॉन" जॉनने स्वत:ला सावरत आपले नाव सांगितले.

" सॉरी ... मिस्टर जॉन ... सॉरी फॉर इनकन्व्हीनियंस ... तिला दुसऱ्या रूममध्ये ... बी23 मध्ये हलविले आहे...." नर्स बोलत होती.

जॉनच्या जिवात जीव आला.

" अॅक्चूूअली ... बी2 फार कंजेस्टेड होत होती ना ... म्हणून त्यांच्याच..." नर्स सविस्तर सांगत होती.

पण जॉनला कुठे ऐकण्याची सवड होती? नर्स तिचे सांगणे पूर्ण करायच्या आधीच जॉन निघाला होता... बी23 कडे.
(क्रमशः ...)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-3:वर्ल्ड अंडर अंडरवर्ल्ड (शून्य- कादंबरी)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


एका कॉलनीत एक टुमदार घर. बाहेर एक कार येऊन थांबली. कारमधून उतरून एकजण घराच्या आवारात शिरला. तो जवळपास पंचविशीच्या आसपास असावा. त्याने काळा गॉगल घातला होता. चालता चालता आवारातील गार्डनवर नजर फिरवीत तो दरवाज्यापाशी पोहोचला. आपल्या कारकडे एक नजर टाकीत त्याने दारावरची बेल वाजवली. दार उघडण्याची वाट पाहत तो कॉलनीतल्या इतर घरांकडे बघायला लागला. दार उघडण्यासाठी बराच वेळ लागत होता. दारासमोर शतपावली केल्यासारखे फिरत तो दार उघडण्याची वाट पाहू लागला. आतून चाहूल लागताच तो आत जाण्याच्या पावित्र्यात दारासमोर थांबला. दार उघडले. समोर दारात त्याच्याच वयाचा एकजण उभा राहिला. आतला दारातून बाजूला झाला आणि बाहेरचा घरात शिरला. ना बोलण्याची ना हावभावांची काहीच देवाणघेवाण नाही. बाहेरचा आत गेल्यावर आतून दार बंद झालं. त्यांचं राहाणीमान ,पेहराव आणि शरीराची ठेवण यावरून दोघांचंही मूळ अमेरिकन तर नक्कीच वाटत नव्हतं. दोघंही चुपचाप चालत घराच्या तळघरात येऊन पोहोचले. घराच्या रचनेवरून या घरास तळघर असावं असं बिलकुल वाटत नव्हतं.
जो बाहेरून आला होता त्याने विचारले, " बॉसचा मेसेज आला का?"
" अजून नाही.... कधी काय करायचं बॉस सगळं मुहूर्त बघून करतो" दुसरा म्हणाला.
पहिला गालातल्या गालात हसत म्हणाला " एकेकाचं एक एक खूळ असतं"
दुसरा गंभीर होऊन म्हणाला "कमांड2 तुला जर आमच्यासोबत काम करायचं असेल तर सगळं कसं समजून घ्यावं लागेल. इथं सगळ्या गोष्टी तोलून मोलून प्रिकॅलक्यूलेटेड असतात"
कमांड2 नुसता त्याच्याकडे बघायला लागला.
" कोणतीही गोष्ट करायच्या आधी बॉसला त्याचा रिझल्ट माहित असतो" कमांड1 म्हणाला.
एव्हाना ते अंधाऱ्या तळघरात येऊन पोहोचले. तिथे मध्यभागी एका टेबलवर एक कॉम्प्यूटर ठेवलेला होता. दोघंही काम्प्यूटरच्या समोर जावून उभे राहिले . कमांड1ने कॉम्प्यूटरच्या समोरच्या खुर्चीवर बसून कॉम्प्यूटर सुरू केला. कमांड2 त्याच्या बाजूला एका स्टूलवर बसला. कॉम्प्यूटरवर लिनक्स ऑपरेटींग सिस्टीम सुरू होतांना दिसायला लागली.
" तुला माहित आहे मी लिनक्स का वापरतो?" कमांड1 म्हणाला.
आश्चर्याने बघत कमांड2 ने फक्त नकारार्थी आपलं डोकं हलविलं.
"कॉम्प्यूटरच्या जवळपास सगळ्या ऑपरेटींग सिस्टीम ज्यांचा कोड दिला जात नाही कुठल्या कंपन्या बनवितात?" कमांड1 ने विचारले.
" अमेरिकेतल्या" कमांड2ने उत्तर दिले.
" तुला माहित असेलच की ज्या सॉफ्टवेअरचं कोड कस्टमरला दिलं जातं त्यांना 'ओपन सोर्स' सॉफ्टवेअर म्हणतात... म्हणजे त्या सॉफ्टवेअरमध्ये काय होतं हे कस्टमरला कळू शकतं... आणि ज्या सॉफ्टवेअरचा कोडच कस्टमरला दिला नसेल त्या सॉफ्टवेअरमध्ये दुसरं असं बरंच काही होऊ शकतं जे व्हायला नको." कमांड1 सांगत होता.
"म्हणजे?" कमांड2 ने मध्येच विचारले.
"म्हणजे तुला माहित असेलच की मायक्रोसॉफ्टने एकदा जाहिर केले होते की ते त्यांच्या प्रतिर्स्पध्यांना शह देण्यासाठी त्यांच्या विंन्डोज ऑपरेटींग सीस्टीममध्ये 'टॅग्ज' वापरणार आहेत" कमांड1 म्हणाला.
" हो ... तर ?" कमांड2 पुढे ऐकू लागला.
" आणि त्या 'टॅग्ज' मुळे कंपनीला जे पाहिजेत तेच प्रोग्रॅम व्यवस्थित चालतील आणि दुसरे एकतर स्लो किंवा बरोबर चालणार नाहीत" कमांड1 म्हणाला.
"त्याचा लिनक्स वापरण्याशी काय संबंध?" कमांड2 ने विचारले.
" आहे ना ... अगदी जवळचा संबंध आहे... हे बघ जर ते आपल्या प्रतिर्स्पध्यांना शह देण्यासाठी असे 'टॅग्ज' वापरू शकतात की जेणे करून त्यांच्या प्रतिर्स्पध्यांचा एकदम खातमा होऊन जाईल... असंही शक्य आहे की ते त्यांच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये असे काही 'टॅग्ज' टाकतील की ज्याच्यामुळे सगळ्या जगातली महत्वाची माहिती इंटरनेटद्वारा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल ... त्यात आपल्यासारख्या लोकांच्या कारवायासुध्दा आल्या ... विशेषत: 9-11 नंतर हे त्यांना फार महत्वाचे झाले आहे" कमांड1 कमांड2कडे बघत त्याची प्रतिक्रिया घेत म्हणाला.
" हो तू बरोबर बोलतो आहेस ... असं होऊ शकतं" कमांड2 ने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
"म्हणून मी काय केलं माहित आहे?... लिनक्सचं सोर्स कोड घेऊन त्याला कंपाइल केलं आणि मग या कॉम्प्यूटरमध्ये इन्स्टॉल केलं ... आपल्याला सर्वेतोपरी काळजी घेणं फार आवश्यक आहे" कमांड1 सांगत होता.
त्याच्या शब्दात गर्व आणि स्वत:ची शेखी स्पष्टपणे जाणवत होती.
" अरे ही अमेरिका काय चीज आहे हे तुला माहितच नाही ... जगावर राज्य करण्याचा त्यांचा मनसुबा आहे आणि त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात" कमांड1 पुढे सांगायला लागला.
कमांड2ने कमांड1 कडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले.
" चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल केव्हा पडले ?... तू शाळेत शिकला असशील नं?" कमांड1 ने प्रश्न केला.
" अमेरिकेने चंद्रावर पाठविलेल्या यानातून 1969 साली नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले" कमांड2 ने चटदिशी उत्तर दिले.
"सगळ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या डोक्यात हेच कोंबलं जात आहे... पण लोकांनी सत्य काय आहे याचा कधी विचार केला? ... जो व्हीडीओ अमेरिकेने टी व्ही वर दाखविला होता त्यात अमेरिकेचा झेंडा फडफडतांना दिसत होता... जर चंद्रावर हवाच नसेल तर झेंडा फडफडणार तरी कसा... लोक चंद्रावर उतरले त्यांच्या सावल्या ... यानाची बदललेली जागा... असे कितीतरी पुरावे आहेत जे दर्शवितात की अमेरिकेचे यान चंद्रावर गेलेच नव्हते" कमांड1 आवेशात बोलत होता.
" काय बोलतोस तू ... मग काय सगळं खोटं आहे? ... पण हे सगळं खोटं कशासाठी?" कमांड2 ने आश्चर्याने विचारले.
" खोटं ... निखालस खोटं... एवढंच काय त्याच वेळी अवकाशातून सॅटेलाईटमधून जमिनीच्या घेतलेल्या चित्रात जो सेट त्यांनी तयार केला होता त्याचं चित्रसुध्दा मिळालं आहे... आणि हो तू बरोबर विचारलंस ... हे खोटं कशासाठी... हा एवढा खटाटोप आणि आटापिटा कशासाठी?... ज्यावेळी अमेरिकेने चंद्रावर मानव गेल्याचं जाहीर केलं तेव्हा रशिया हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी होता... आपण रशियापेक्षा वरचढ आहोत हे दाखविण्यासाठी हा सगळा अट्टाहास अमेरिकेने केला होता... आणि त्यात ते सफलसुध्दा झाले होते." कमांड1चा आवेश शब्दागणिक वाढत होता.
" बापरे ! म्हणजे एवढा मोठा धोका आणि तो पण संपूर्ण जगाला ..." कमांड2 च्या तोंडातून निघाले.
" अमेरिका सध्या ब्रिटिशांच्या मार्गाने जात आहे. दुसऱ्या महायुध्दापूर्वी ब्रिटिशांनी जगावर राज्य केलं. त्यावेळी त्यांच्या राज्यावरचा सूर्य कधीच अस्ताला जात नसे. आता अमेरिका ते करू पाहत आहे. फरक एवढाच की ते प्रत्यक्षपणे राज्य न करता अप्रत्यक्षपणे राज्य करीत आहेत म्हणजे 'प्रॉक्सी रूलींग'. अफगाणिस्थान, इराक, कुवेत, साऊथ कोरिया इथे ते काय करीत आहेत प्रॉक्सी रूलींगच की"
" हो बरोबर आहे तुझं" कमांड2ने दुजोरा दिला.
" आणि हेच अमेरिकेचं वर्चस्व नाहीसं करणं हे आपलं परम उद्देश्य आहे .." कमांड1 जोशात म्हणाला.
कमांड2 च्या चेहऱ्यावरून असं दिसत होतं की तो कमांड1 च्या बोलण्याने अतिशय प्रभावित झाला आहे. आणि कमांड1 च्या चेहऱ्यावर आपण कमांड2चं ब्रेन वॉश करण्यात सफल झालो आहोत याचं विजयी हास्य तरळत होतं.
तेवढ्यात सुरू झालेल्या कॉम्प्यूटरवर बझर वाजला. कमांड1ला मेल आलेली होती. कमांड1ने मेलबॉक्स उघडला. बॉसची मेल होती.
" हा बॉस आहे तरी कोण?" कमांड2ने उत्सुकतेने विचारले.
"हे कुणालाच माहित नाही ... आणि ते महत्वाचंसुध्दा नाही की तो कोण आहे? ... आपल्या सगळ्यांना जोडलं आहे ते एका विचारधारेने... आणि ती विचारधाराच महत्वाची... आज बॉस असेल उद्या नसणार ... पण त्याची विचारधारा ही नेहमी जिवंत राहिली पाहिजे." कमांड1 ने मेल उघडता उघडता सांगितले.
मेलमध्ये फक्त 'हाय' असे लिहिलेले होते आणि मेलला काहीतरी अटॅच केलेले होते. कमांड1 ने अटॅचमेंट ओपन केली. ते एक मॅडोनाचे 'बोल्ड' चित्र होते.
" बॉसने हे चित्र पाठविलं?" कमांड2 ने आश्चर्याने विचारले.
" तू अजून नवीन आहेस तुला कळायला अजून वेळ लागेल की दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात" कमांड1 चित्राकडे पाहत गालातल्या गालात हसत म्हणाला.
कमांड1 ने पटापट कॉम्प्यूटरच्या कीबोर्डची चार पाच बटने दाबली. समोर मॉनिटरवर एक सॉफ्टवेअर उघडले. कमांड1ने त्या मॅडोनाच्या चित्राला डबल क्लीक केले. एक निळा प्रोग्रेस बार हळू हळू सरकायला लागला. कमांड1 ने कमांड2 कडे गूढतेने बघितले.
"पण हे काय करतो आहेस स..."कमांड2 म्हणाला.
कमांड1ने चटकन कमांड2च्या तोंडावर हात ठेऊन त्याचे तोंड दाबले.
" चुकूनही तुझ्या तोंडात माझं नाव येता कामा नयेे ... तुला माहित आहे? ... भिंतीलासुध्दा कान असतात.
"सॉरी" कमांड2 ओशाळून म्हणाला.
"इथे चुकांना क्षमा नाही" कमांड1 दृढतेने म्हणाला.
तोपर्यंत प्रोग्रेस बार सरकून पूर्णपणे निळा झाला होता.
"याला म्हणतात स्टेग्नोग्राफी ... म्हणजे चित्रामध्ये माहिती लपविणे ... बघणाऱ्याला फक्त चित्र दिसेल ... पण या चित्रातसुध्दा बरीच महत्वाची माहिती लपविली जाऊ शकते" कमांड1 त्याला समजावून सांगू लागला.
"पण चित्र इथे यायच्या आधी कुणाच्या हाती जर लागले तर?" कमांड2 प्रश्न उपस्थित केला.
"ती माहिती फक्त या सॉफ्टवेअरनेच बाहेर काढता येते ... आणि त्याला पासवर्ड लागतो... हे सॉफ्टवेअर बॉसने स्वत: लिहिलेले आहे... त्यामुळे ते दुसऱ्या कुणाकडे असण्याची अजिबात शक्यता नाही." कमांड1ने त्याच्या प्रश्नाला समर्पक असे उत्तर दिले.
" काय माहिती लपविली आहे त्यात? कमांड2 ने उत्सुकतेने विचारले.
तेवढ्यात मॉनिटरवर एक मेसेज दिसायला लागला 'पुढच्या कामाला लाग... त्याची वेळ मागाहून कळविण्यात येईल.'
(क्रमशः ...)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Ch-2:आभाळ कोसळलं (शून्य- कादंबरी)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



अँजेनीने तिची कार अपार्टमेंटच्या पार्किंगच्या जागेकडे वळविली तेव्हा समोर तिला मगाशी दिसलेली पोलीस व्हॅन पार्क केलेली दिसली. तिला धडधडायला लागलं. काय झालं असावं? ती कारमधून उतरून आपल्या शॉपींग बॅग्ज सांभाळत घाईघाईने लिफ्टकडे गेली. लिफ्ट उघडून दोन पोलीस बाहेर येत होते. पोलीसांना पाहून ती अजूनच अस्वस्थ झाली. तिने लिफ्टमध्ये जाऊन बटन दाबले ज्यावर लिहिले होते 10. लिफ्टमधून बाहेर आल्या आल्या जेव्हा अँजेनीने आपल्या सताड उघड्या फ्लॅटसमोर गर्दी बघितली, तिला हातपाय गळाल्यासारखे झाले. तिच्या हातातल्या शॉपींग बॅग्ज गळून पडल्या. ती तशीच गर्दीकडे धावत निघाली. "काय झालं?" तिने कसबसं जमलेल्या लोकांना विचारलं. सगळे जण गंभीर होऊन फक्त तिच्याकडे बघायला लागले . कुणीही बोलायला तयार नव्हता. ती घरात गेली. बेडरूमकडे सगळ्या पोलिसांचा रोख पाहून ती बेडरूमकडे गेली. जाता जाता तिने पुन्हा एका पोलिसाला विचारले " काय झालं?". तो फक्त बेडरूमच्या दिशेने बघायला लागला. ती घाईघाईने बेडरूममध्ये गेली. समोरचे दृष्य पाहून तिचे राहिलेलेे अवसानसुध्दा गळून गेले. समोर तिच्या नवऱ्याचे रक्तबंबाळ मृत शरीर पाहून ती जागेवरच कोसळली. कसेबसे तिच्या तोंडून निघाले- " सानी...". तिची ती स्थिती पाहून तिला सावरण्यासाठी जॉन तिच्याजवळ गेला. त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण हे काय? जॉनच्या लक्षात आले की तिचा श्वासोश्वास बंद पडला होता. जॉनने पटकन आदेश दिला " अलेक्स कॉल द डॉक्टर इमीडीएटली ... आय थींक शी हॅज गॉट अ ट्रिमेंडस शॉक". अलेक्स पटकन फोनकडे गेला. जॉनला काय करावे काही सुचत नव्हते. "सर शी नीड्स आर्टिफिशीअल ब्रीदिंग" कुणीतरी सुचविले. जॉनने आपल्या तोंडातून तिच्या तोंडात हवा भरली आणि तिचे हृदय सुरू होण्यासाठी तिच्या छातीवर जोर देऊन दाब द्यायला लागला 101 , 102, 103. मोजून त्याने पुन्हा एकदा तिच्या तोंडात हवा भरली आणि तिच्या छातीवर जोर देऊन दबाव द्यायला लागला 101 , 102, 103. असे अजून एकदोन वेळ करून जॉनने तिचा श्वास बघितला. एकदा गेलेला श्वास पुन्हा परत यायला तयार नव्हता. एव्हाना त्याचे साथीदार जवळ येऊन जमा झाले होते. शेवटचा एक प्रयत्न म्हणून तो तिच्या तोंडात हवा भरून मोजायला लागला 101 , 102, 103. हॉस्पिटलमध्ये अँजेनीला इंटेसीव्ह केअर युनिट मध्ये हलविण्यात आले होते. बाहेर दरवाजाजवळ जॉन आणि त्याचा एक साथीदार उभा होता. तेवढ्यात आय.सी.यू मधून डॉक्टर बाहेर आले. बाहेर येताच त्यांनी त्यांच्या तोंडावरचे हिरवे कापड बाजूला सारले. जॉन त्यांच्या जवळ येऊन ते काय म्हणतात याची आतुरतेने वाट पाहू लागला. " शी इज आऊट ऑफ डेंजर .... नथींग टू वरी" डॉक्टर म्हणाले. तेवढ्यात जॉनच्या मोबाईलची घंटी वाजली. जॉनने मोबाईलचे एक बटन दाबून कानाला लावला , " यस सॅम" तिकडून आवाज आला " सर , आम्ही त्याला सगळीकडे शोधलं पण तो आम्हाला सापडला नाही. " " नाही सापडला? ... आपण येण्यात आणि तो जाण्यात असे किती वेळाचे अंतर होते?... तो जवळपासच कुठेतरी असायला पाहिजे होता." जॉन म्हणाला. " नाही सर.... कदाचित त्याने नंतर त्याचा टी शर्ट बदलला असावा कारण आम्ही जवळपासच्या सर्व पोलीस चौकींवर माहिती देऊन सुध्दा तो सापडला नाही" तिकडून आवाज आला. " बर त्याचं स्केच तयार करायला लागा.... आपल्याला त्याला पकडलंच पाहिजे" जॉनने आदेश दिला. "यस सर" तिकडून आवाज आला. जॉनने मोबाईल बंद केला आणि तो डॉक्टरांना म्हणाला, " अच्छा, आम्ही आता निघतो... टेक केअर ऑफ हर ... आणि जर काही प्रॉब्लेम असला तर आम्हाला कळवा." " ओके" डॉक्टर म्हणाले. जाता जाता जॉन त्याच्या सहकाऱ्याला म्हणाला , " तिचे नातेवाईक असतील तर माहित करा आणि त्यांना इन्फॉर्म करा" " यस सर" जॉनचा सहकारी म्हणाला.
....(क्रमशः)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Loading...
Loading...
Loading...

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network