Marathi world of novel books - Madhurani - CH-8 खोली

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Marathi world of novel books - Madhurani - CH-8 खोली

 Read Novel - मधुराणी - Hony -  on Google Play Books Store
वाचा काही निवडक प्रतिक्रिया -  प्रतिक्रिया 
जेवण वगैरे घेऊन दूपारी गणेश आणि सरपंच घराच्या बाहेर पडले. त्यांच्यासोबत एक सरपंचाचा घरगडीसुध्दा होता.
"सगळयात आंधी इथं तुमच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करने आवश्यक हाय... नेहमी नेहमी अपडाऊन करायला झेपनार नाय तुमाला... "
" हो मलाही तसंच वाटते ... कमीत कमी इथे आहे तोपर्यंत राहायला एखादी खोली मिळाली तर बरं होईल "
" हो मिळल की ...आमचं तिकडं एक घर हाय... तिथं कोणी राहात नसतो .. पण आम्ही नांगर डवरे पासा कुऱ्हाडी साखळया दोरखंड कासरे असं शेतीचं सगळं सामान तिकडे ठेवतो... पुढची खोली देऊ की तुमाला राहायला... "
" हो ... तेवढीच राखन होईल की आपल्या बासनाला " सरपंचाचा गडी मध्येच बोलला.
सरपंचाने त्याच्याकडे रागाने एक दृष्टीक्षेप टाकून त्याला चूप राहण्यास खुणावले.
साले हे घरगडी आडाणी ते आडाणीच कुठं काय बोलायच लेकांना साधी अक्कल नाय...
सरपंचाने विचार केला.
काय वाटलं असेल गणेशरावला... की आपण त्यांना राखनदार म्हणून आपल्या घरात ठेवतो...
" पण सरपंचजी ... मी जास्तकाही भाडं देऊ शकणार नाही "
" आवो त्याची काळजी तुमी करू नका ... आमी काय भाडं घेणार तुमच्याकडून ? " सरपंचाने गणेशच्या पाठीवर थाप देऊन म्हटले.
" नाही असं कसं ... जे काय असेल ते सांगा "
" आवो गणेशराव हे काय शहर हाय का भाडं घ्यायला... आमी जर भाडं घेतलं तुमच्याकडून तर साऱ्या गावात बोंबाबोंब अन् नालस्ती होईल आमची "
गणेशच्या लक्षात आले की आपण बसस्टॉपवरून ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने चालत आहोत.
" मघाशी बस स्टॉपवरून इकडूनच आलो होतो आम्ही "
" होना... आमचं घरबी इकडंच हाय ... कामपडल्यास आमच्या घरापुढूनच आले अससाल तुमी "
ते तिघेही पुन्हा मघाच्या दुकानासमोर आले. दुकानाच्या गल्ल्यावर अजूनही ती सुंदर स्त्री बसलेली होती. तिच्याकडे पाहून का जाणे कोणास ठावूक गणेशच्या अंगात शिरशिरी भरल्यासारखी झाली. त्याच्या हृदयाचे ठोके जलद होत आहेत असं त्याला जाणवलं. तिचे आतासुध्दा इकडे लक्ष नव्हते. तिच्या जलद बिनधास्त हालचाली मात्र टिपण्यासारख्या होत्या असं गणेशला वाटून गेलं.
" ते मधुराणीचं दुकान बरं का " गणेशच्या पाहण्याचा रोख पाहून सरपंच म्हणाले.
" अच्छा .. अच्छा " गणेश अधिक उत्सुकता न दाखवीत म्हणाला.
" हे बगा बरोबर तिच्या दुकानासमोरच आमचं घर " सरपंच त्या दुकानासमोरच्या एका घरासमोर उभे राहत म्हणाले. सरपंचाच्या बोलण्यात खटयाळपणा होता की नाही कोण जाणे पण गणेशला त्यांच्या बोलण्यात तो जाणवला होता.
घर म्हणजे विटा मातीने बांधलेल्या 3-4 पक्या खोल्या होत्या. खोल्यांवर उतार असलेले टीन पत्रे टाकलेले होते. आणि टीन नटबोल्टने फिट केल्यामुळे टीनाला मध्ये मध्ये छोटे छोटे गड्डे दिसत होते.
सरपंचाने गडयाच्या हातात चाब्या देत त्याला समोरच्या दाराचे कुलुप उघडण्यास खुणावले. गडयाने लगबगीने सरपंचाच्या हातातली चाबी घेऊन समोरच्या दाराचे कुलूप उघडले.
तेवढयात गणेश त्याच्या बाजूच्या हालचालीने दचकलाच. जवळजवळ त्याच्या अंगाला अंग लावूनच मधुराणी त्याच्या शेजारी येऊन उभी राहाली होती.
" नमस्कार सरपंचजी " मधुराणीचा मधुर आवाज घूमला.
किती गोड आवाज आणि त्यात कसला मार्दव असलेला जाणवत होता....
" नमस्कार " सरपंचाने वळून तिच्या नमस्काराला प्रतिसाद दिला.
" काय लई दिसानं फिरकले इकडं ... काय घराची रंगोटी करायचा विचार हाय की काय... तसं असेल तर सांगा आमाला ... आमच्या दुकानात पडलेले हायत काही रंग " ती सरपंचाना म्हणाली.
गणेश अगदी तिच्या शेजारी उभा राहून तिच्याकडे निरखून तिच्या बोलण्याची ढब, तिच्या हालचाली टिपू लागला. त्याला बोलतांना तिच्या ओल्या गुलाबी ओठांच्या होत असलेल्या हालचाली आणि त्यातून दिसत असलेले तांदळाच्या दाण्यासारखे तिचे पांढरे शुभ्र दात विशेष मादक वाटत होते. गणेश मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे पाहत होता.
" नाय हो... आपल्या गावात हे नवीन ग्रामसेवक आले हायत गणेशराव ... त्यांच्यासाठी एखादी खोली राहायला दयावं म्हणतो "
" अगंबाई खरंच की ... शहरातले दिसतात.... माझं तर बाई लक्षच नाय ... मी म्हटलं कोणी नविन पाव्हना हाय की काय तुमचा " ती गणेशकडे पाहत म्हणाली.
आता ती त्याच्याजवळून जरा दूर सरकून उभी राहाली. गणेशच्या हृदयात निराशेचे भाव तरळले. त्याला तिचा तो पुसटसा होणारा स्पर्श हवाहवासा वाटत होता.
पण ते निराशेचे भाव त्याच्या चेहऱ्यावरून पुन्हा विरले. तिची त्याच्या डोळयाला भीडलेली सरळ आर्त, गुढं आणि खोल नजर सरळ त्याच्या हृदयाचा ठाव घेत होती.
तिच्याकडे पाहून गणेश पुसटसा हसला.
" इथं राहाणार व्हय तुमी ... मंग झाले की तुमी आमचे शेजारी... आपलं लई जमणार बगा " ती पुढे म्हणाली.
तोपपर्यंत सरपंचाचा गडी दरवाजा उघडून आत गेला.
" बरं गणेशराव मी काय म्हंतो ही पुढचीच खोली घ्या तुमी " सरपंच म्हणाले.
" बरं सरपंचजी ... येते हं " मधुराणी तिथून आपल्या दूकानाकडे निघत म्हणाली.
सरपंचांनी मान हलवली. जाता जाता तिने एक नजर गणेशवर टाकून त्याला एक स्मित दिले. गणेशही तिच्याकडे पाहून गाल्यातल्या गालात हसला.
ती निघून गेली तसे सरपंच आणि गणेश त्या गडयाच्या मागे आत खोलीत गेले. तो गडी आत येऊन इकडे तिकडे शोधाशोध करीत होता.
" ये येडया आधी लाईट लाव ना... आमचे गडी म्हंजे न एक एक हले हायत " सरपंच चिडून म्हणाले.
गडयाने परत येऊन दाराच्या बाजूला असलेला बल्बचा स्वीच दाबला. खोलीत सगळीकडे बल्बचा पिवळा पिवळा प्रकाश पसरला.
खोलीत सगळीकडे नांगर वखर वैगेरे शेतीचे सामान पसरवून ठेवलेले होते. आणि त्या सामानावर धूळ साचलेली दिसत होती. काही पोत्यांचे पुरचूंडे सुध्दा बांधून ठेवलेले होते.
" मंग काय बरी हाय ना ही खोली.... ए तू या खोलीतले सगळे सामान त्या आतल्या खोलीत नेवून ठेव अन् ही खोली यांना साफ करून दे ....ते इथं राहाणार हायत आजपासून "
" जी मालक " गडी म्हणाला.
" अन् हो न्हाणी तिकडे आत हाय"
"न्हाणी?"
"म्हंजे बाथरुम" सरपंच हसत म्हणाले.
गणेशने आत जाऊन बाथरूम बघून घेतली.
गणेश बाहेर येता येता तोंडातल्या तोंडात बोलला " संडास.... संडास दिसत नाही "
" गणेशराव ....हे उजनी गाव हाय इथ अजून एकही संडास नाय.... सगळयांना मोकळ्या हवेची सवय हाय .... एकदा सरकारने बांधून दिले होते तीनचार संडास .... पण त्यात कोणीच जात नव्हतं .... शेवटी लोकांनी तोडून टाकले कमीत कमी एखादा तर ठेवायचा .... तुमच्यासारख्याच्या कामी आला असता"
गणेशचा चेहरा हिरमुसला पण तो त्याचे भाव लपविण्याचा प्रयत्न करीत म्हणाला,
" खोली तशी चांगली आहे.... तसा मीही जास्त काही राहाणार नाही इथं ....हप्त्यातून दोन तीन दिवस राहालं की बस... "
" अन् ए आता एक काम लागलं तुह्याकडं .... हे इथं असले म्हंजे पाणी बीनी भरून ठेवत जा त्यांचं " सरपंच त्यांच्या गड्याला म्हणाले.
" पाणी ? " गणेशने आश्चर्याने विचारले.
" आता नळ कुठाय म्हणून विचारू नका " सरपंच गणेशची गंमत करीत म्हणाले.
गणेश ओशाळल्यागत हसला.
" पाणी तिकडं विहिरीवरून भरून आणून देत जातील तुमाला आमचे गडी " सरपंच म्हणाले.
" चला आता तिकडं बजारात ऑफीसात जाऊ... तोपर्यंत तू साफसुफ करून ठेव रे " सरपंचानी गडयाला बजावले.
" जी मालक " गडी म्हणाला आणि लागलीच कामाला लागला सुध्दा.
सरपंच आणि गणेश खोलीतून बाहेर पडले आणि आफिसकडे निघाले. जाता जाता गणेशने खूप प्रयत्न करूनसुध्दा त्याची नजर समोर मधुराणीच्या गल्ल्यावर गेलीच.
क्रमश:...
When hungry, eat your rice; when tired, close your eyes. Fools may laugh at me, but wise men will know what I mean.
---in-Chi

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. suruvaat tar khup chan zaliye agadi drushya samor ubha rahate.... mi umchya magil sarv stories vachlya agadi sundar hotya....khup sundar lihita ho tumhi...hi story suspense aheka?? aslyas vachnyas maja yeil.....anyways tumhala hardik shubhechcha....aashach sunder stories lihit raha....best luck....ashwini dixit

    ReplyDelete
    Replies
    1. Mala chan vatale ki tumhi tyanche story lihnyache protahan vadvat ahe,

      Delete