कादंबरी - अद्-भूत (संपूर्ण) Horror, Suspense, Thriller [Email this] English Version-> [Aghast]
कादंबरी - शून्य (संपूर्ण) Suspense, Thriller [Email it] English Version->[Zero]
कादंबरी - ब्लैकहोल (संपूर्ण) Mystery, Suspense [Email it] English Version->[Black Hole]
कादंबरी - ई लव्ह (संपूर्ण) Romantic, Suspense [Email it] English Version->[eLove]
कादंबरी - मधुराणी (संपूर्ण) Story of a femine power [Email it] English Version->[Honey]
कादंबरी - मृगजळ (संपूर्ण) Romantic, Drama, Psy Thriller[Email it] English Version->[Illusion]
Mrityunjay - Immortal(Next Novel)
- Political Suspense Thriller -
A translator to translate ‘Mrugjal & Madhurani’ from English/Marathi to Hindi is required on volunteer basis Interested may contact -> marathinovel at gmail.com. Due credit as ‘Hindi version by ---XYZ---‘ will be given on the blog ‘HindiNovels.net’.

Marathi Online Novel - Madhurani CH-23 गेसींग

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Online Novel - Madhurani CH-23 गेसींग

चार पाच दिवसांपासून गणेश मधुराणीच्या दुकानाकडे फिरकलासुध्दा नाही. तशी त्याची हिंम्मतच झाली नाही. एक दोनदा खिडकीतून त्याची मधुराणीशी नजरानजर झाली होती तेवढीच. तेव्हा ती त्याला मोठमोठे डोळे करून त्याच्याकडेच पाहत असलेली आढळली. कधी त्याला त्या डोळ्यांत 'तो असा वागतो आहे' याचा राग दिसायचा. कधी विरहाचे दु:ख दिसायचे तर कधी ' माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर' असा आर्जव दिसायचा. त्याला कधी कधी नवल वाटायचे की मधुराणी डोळ्यांच्या भाषेने एवढं कसं बोलू शकते. की हे सगळे त्याने स्वत:च स्वत:च्या सोईने लावलेले अर्थ होते?

बाहेर काहीतरी गोंधळ ऐकू येत होता म्हणून गणेशने खिडकीच्या बाहेर डोकावून बघितले.

" ए पांड्या ... बिगीनं ये... तिकडं एक गेसींग गवसलं हाय मने" खिडकीच्या बाहेर एका पोराने आरोळी ठोकली आणि तो ओढ्याच्या दिशेने धावायला लागला.

त्याच्या मागे अजून दोनचार पोरं धावली. आणि ओट्यावर बसलेली वयस्कर मंड्ळी कावरी बावरी होऊन असमंजसपणे इकडे तिकडे बघू लागली. गणेशचं लक्ष मधुराणीकडे गेलं. ती आपल्या गल्ल्यावर बसून एका पोरासोबत चर्चा करत होती. तो पोरगा ओढ्याच्या दिशेने हात दाखवीत घाईघाईने हातवारे करीत तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता. एव्हाना त्या पोरानेही ओढ्याच्या दिशेने धूम ठोकली. एवढ्यात गणेशची आणि मधुराणीची नजरानजर झाली. तिने त्याला एक गोड स्माईल दिले. गणेशच्याही चेहऱ्यावर स्माईल येऊ लागले होते पण एकदम त्याला मधुराणीचा बाजारातला चंडीचा अवतार आठवला. तो पटकन खिडकीतून बाजूला झाला.

संध्याकाळच्या क्षितीजावर लाल छटा पसरलेल्या दिसत होत्या. ओढ्याच्या अलिकडे गावाच्या शेजारी एक ऊसाचे शेत होते. तिथे एका जागी गणेशला लोकांनी गर्दी केलेली दिसली. गणेश घाईघाईने त्या गर्दीकडे निघाला. अजूनही बरेच ग्रामस्थ त्या गर्दीकडे धावत जात होते. गणेशही आता झपाट्याने चालू लागला. एव्हाना अंधारायला लागलं होतं त्यामुळे काही जण कंदील घेऊन येत होते. गणेश जेव्हा गर्दीजवळ पोहोचला तेव्हा सर्वजण एकदम शांत झाले. काही जण गणेशकडे रोखून पाहू लागले. तर काही जण गर्दीच्या मध्ये पाहू लागले. गर्दीच्या मध्ये तो मुका आणि मुकी मान खाली घालून उभे होते. तेवढ्यात गणेशने पाहिले की एकजण घाईघाईने गर्दीत घुसला आणि त्या मुकीला बदडायला लागला.

" रांड ... आमच्याच पोटी याची व्हती ... "

तो त्या मुकीला बेदम मारायला लागला. मुकी जोरजोराने ओरडत होती. ती ओरडत होती की रडत होती काही कळायला मार्ग नव्हता आणि कुणाला त्याची काही फिकीरही दिसत नव्हती. त्यातच तो मुका रागाने ओरडून त्या माणसाच्या अंगावर धावून जायला लागला. त्याला गर्दीतल्या दोनचार आडदांड पोरांनी पकडून ठेवले.

" ... गावात तोंड दावायला जागा नाय ठूयली तुह्या ... आता तुले मी मरस्तोर मारणार हाय... मारता मारता मेली तर लय चांगलं हूईल... तुह्या केलेलं काळं तोंड घेऊन गावात फिरण्यापर जेलात जाणं कव्हाबी चांगलं. "

गणेशच्या आता प्रकरण बऱ्यापैकी लक्षात यायला लागलं होतं. मुक्यानं अन् मुकीनं इथं ऊसाच्या शेतात काहीतरी प्रेमप्रताप केला असणार. अन् तो मारणारा तिचा बाप असावा.

मुकीच्या बापाचा इकडे तोंडाचा पट्टा अन् तिकडं तिला लाथा बुक्याचा मार चालूच होता. आता मुकी जमिनीवर खाली आडवी पडली होती अन् तीचा बाप तिला लाथाबुक्याचा मार देत होता. प्रथम गणेशच्या मनाला जो तिचा बाप करत होता ते बरोबर वाटत होतं. किंबहुना प्रत्येक लाथाबुक्कीबरोबर एक अघोरी आनंद त्याच्या मनाला होत होता.

खरोखरच तिच्या बापाला तिनं समाजात तोंड दाखवायलासुध्दा जागा ठेवली नव्हती...

मी जर तिच्या बापाच्या जागी असतो तर तिचा जीवच घेतला असता...

मुकीच मुकी लेकाची पण भलती गुणी दिसते...

दुसरं कुणी सापडलं नाही तर तिनं बरोबर एक मुकाच शोधला....

आता तिच्या बापाला तिच्या लग्नाचं किती कठीण जाणार....

हो एखादा म्हातारा, दारुडा करेल की तिच्याशी लग्न आणि वर भरपूर हूंडा घेणार...

काही क्षण गणेशला आपण त्या मुकीचा बापच असल्याची जाणीव होत होती.

पण लवकरच त्याच्या मनाला जे होत होतं ते खटकायला लागलं. जे होत आहे ते काही बरोबर होत नाही आहे असं वाटायला लागलं. गणेश आता एका माणूसकीच्या नात्याने विचार करायला लागला.

पडली असेल बिचारी त्या मुक्याच्या प्रेमात...

त्याचेही कदाचित तिच्यावर प्रेम असेल...

चांगल्या लोकांनीच का प्रेम करावे? ...

मुक्यांनी करु नये असे कुठे काही लिहून ठेवलेले आहे का?...

तेही चारचौघांसारखेच..

त्यांनाही चारचौघांसारख्याच भावना...

त्यांच्याही आपल्या चारचौघांसारख्याच गरजा...

फक्त ते मुके...

आणि ते मुके होते ते काही त्यांची निवड नव्हती...

बिचाऱ्यांच्या नशिबाचा भाग होता...

अचानक गणेशला स्फूरण चढल्यासारखे व्हायला लागले. त्याला त्या मुकीचा बाप जो झोडत होता आणि ती मुक्याची तडफड पाहवल्या जात नव्हती. त्या मुकीच्या किंकाळ्या आणि त्या मुक्याची ती कर्कश्य रागयुक्त ओरड त्याला असह्य होवू लागली.

" थांबा ... हे काय करता आहात तुम्ही? ... बिचारीला काय आता जीवे मारणार?..."

एक आवाज आसमंतात घुमला. मुकीचा बापसुध्दा दचकला. सगळे जण काही क्षण स्तब्ध झाले. गणेशला स्वत:च स्वत:चा विश्वास होत नव्हता की तो आवाज त्याच्याच तोंडातून निघाला होता. मुकीचा बाप गणेशला न जुमानता तिला पुन्हा बदडायला लागला.

" अहो ... असं काय करता ... मरुन जाईल बिचारी"

" बिचारी?" तिच्या बापाने थांबून गणेशकडे पाहत तोंड वेंगाडून म्हटले.

तिचा बाप पुन्हा तिला बदडायला लागला.

आता गणेश मध्ये पडण्यासाठी पुढे सरसावला.

" गणेशराव... तुमी या भानगडीत पडणार नाय ... नायतर तोट्यात राहान... "

" तुमी गुमान इथं चाकरी करा ... अन् या गावाच्या भानगडीत पडू नगा"

" हे काय तुमचं तालूक्याचं ठिकाण नाय... तिथं चालत आसतील असे थेरं.... इथं चालायचे नाय..."

" अशी घटना आमच्या गावात कदी घडत नाय... ही पयलीच येळ आसल..."

" आमी लहान होत्यो तवा गावच्या पाटलाच्या पोरीला चंभाराच्या पोरासंग पकडलं होतं... पाटलानं तीचे तुकडे तुकडे करून कुत्र्यास्नी खाया घातले... " एक म्हातारा म्हणाला.

" इंग्रज पोलीस आले होत्ये तवा गावात.... चौकशी कराया..."

गणेशने त्या म्हाताऱ्याकडे पाहिले. जणू तो त्याच्या मुक नजरेने त्या म्हाताऱ्याला विचारत होता ' मग? .. मग पुढे काय झालं? '

" पोलीस इचारुन इचारुन थकले ...पर ते त्या पाटलाला पोरगी होती हेच साबूत करु नाय शकले.... खुनाची गोस तर लई दूर राह्यली"

गणेश आश्चर्याने त्या म्हाताऱ्याकडे बघायला लागला.

खरंच असं झालं असेल का?....

" पण आजोबा ती खूप जुनी गोष्ट होती .... आता जग खूप पुढे गेलं आहे..." गणेश त्या म्हाताऱ्याला समजावण्याच्या सुरात म्हणाला.

" अवो जग पुढं गेलं म्हूण काय एकमेकांच्या ऊरावर बसायचं..." एक तिरक्या टोपीवाला माणूस म्हणाला.

त्या गंभीर परिस्थितीतही थोडी खसखस पिकल्यासारखी झाली. कुत्सित हसणारी मुख्यत्वे जवान पोरं होती.

मुकीचा बाप अजूनच चिडला. त्याने रागाच्या भरात जवळच पडलेला एक मोठा दगड दोन्ही हाताने जोर लावून वर उचलला. दगड बराच मोठा आणि जड असल्यामुळे त्याला दगड उचलतांना बरेच कष्ट पडत होते. आता मुकीच्या बापाने तो दगड त्याच्या डोक्याच्या वरपर्यंत उचलला आणि निर्दयतेने तो मुकीच्या डोक्यावर आदळणार तेवढ्यात ...

क्रमश...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Kadambari - Madhurani CH-22 गोची

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Kadambari - Madhurani CH-22 गोची


Confrontation simply means meeting the truth head-on.

--- anonymous


पोटपूजा झाल्यावर गणेशने बाजाराच्या मैदानाच्या एका कोपऱ्यात असलेल्या महादेवाच्या मंदीरात जाण्याचे ठरविले. ते महादेवाचे मंदीर जुने असले तरी बरेच मोठे होते. मंदीराच्या आजूबाजूलासुध्दा बराच मोकळा आणि फुलांचे, फळांची झाडं लावलेला परिसर होता. एक मोठं लिंबाचं झाडं सुध्दा होतं. उन्हाळ्यात सावलीसाठी त्या झाडाचा फार उपयोग व्हायचा.

आणि आज तर बाजार आणि त्यातल्या त्या उन्हाळ्याचे रणरणते ऊन, लोकांनी त्या झाडाखाली बरीच गर्दी केली होती. काही जणांनी थकून भागून तानुन सुध्दा दिली होती. मंदीराच्या अगदी प्रवेशद्वाराच्या समोर एक सार्वजनिक विहिर होती. गावातले बरेच लोक तिथे पाणी शेंदत असत. मंदीरात जाता जाता गणेशला कोपऱ्यावर एक पानपट्टीवाला दिसला. तो तिथे पानपट्टीवाल्याजवळ थांबला. त्याला एक बनारसी पान बनविण्याची ऑर्डर दिली. पानपट्टीवाल्यासमोर बरीच गर्दी होती. कुणी विड्या मागत होते तर कुणी सिगारेट. कुणाला तंबाखाचा छोटा पुडा - तोटा पाहिजे होता. पानपट्टीवाला ती गिऱ्हाइकं आटोपून गणेशचे बनारसी पान बनवण्यासाठी घेईपर्यंत गणेश तिथेच त्याच्या समोर उभा राहिला. तोपर्यंत काय करावं हा विचार करीत गणेशने सभोवार पाहिले. पानपट्टीवाल्याच्या बाजूलाच मंदिराच्या चिऱ्याच्या भिंतीला लागून पोरांचा काचेच्या गोळ्याचा डाव रंगला होता. गणेश तिकडे गेला. जाता जाता त्याने पानट्टीवाल्याला पान तयार झाल्यानंतर आवाज देण्यास खुणावले.

कंच्या खेळणारी चारपाच पोरं होती. त्यातलं एक पोर भिंतीपासून साधारणत: दहा अकरा फूटावर असलेल्या दगडाजवळ गेलं. त्याच्या हातात 15-20 तरी कंच्या असाव्यात. त्याने त्या दगडाजवळ उभं राहून त्या कंच्या भिंतीच्या दिशेने अलगद फेकल्या. भिंतीच्या जवळ एक जमीनीत पाडलेला एका कंचीच्याच आकाराचा गड्डा - भक्का होता. त्या गोळ्या जश्या त्या भक्याच्या दिशेने घरंगळू लागल्या डावातल्या बाकीच्या पोरांचा जीव खालीवर होत होता. कारण एखादी गोळी जरी त्या भक्यात गेली तर तो पोरगा सगळ्याच्या सगळ्या कंच्या जिंकणार होता. बऱ्याच कंच्या त्या भक्याच्या अगदी जवळून घरंगळल्या पण एकही त्या भक्यात गेली नाही. मग त्यातल्याच एका पोराने कोणत्या गोळीला मारायचे ते त्या गोळ्या फेकणाऱ्या पोराला सांगितले. त्या पोराने हातात एक गोळी धरुन एक डोळा किंचित मीटून त्या गोळीचा नेम धरला आणि त्या गोळीला त्याच्या हातातली गोळी फेकून मारली. एकदम सगळे जण "बल्लू .. बल्लू" म्हणून ओरडले. त्याने मारलेली गोळी दुसऱ्याच गोळीला लागली होती. गोळी मारणाऱ्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली.

त्याने निराश चेहऱ्याने आपल्या चड्डीच्या खिशात हात घालून कंच्या काढल्या त्यातल्या तीन कंच्या मोजून डावात टाकल्या आणि मग पुढचा पोरगा डाव खेळण्यास तयार झाला.

गणेशला हे सगळं पाहून मजा वाटत होती. त्याला त्याचे लहानपणीचे दिवस आठवत होते. लहानपणी तो त्याच्या चाळीतल्या पोरांशी अशाच कंच्या खेळत असे. अचानक मागून आलेल्या आवाजाने गणेश भानावर आला.

" पान झालं सायेब" पानवाला ओरडला होता.

त्याने त्याच्याजवळून पान घेतले. पैसे दिले आणि ते पान तोंडात कोंबून त्याने त्याला एक सिगारेट द्यायला सांगितले. सिगारेट पेटवून गणेश पान खात खात, हळू हळू, पोट भरल्याच्या समाधानाने चालत त्या मंदीरात शिरला. मंदीराला दोनच दारं होती. मुख्य दरवाज्यातून आत शिरल्यावर मोठा हॉल लागत होता. हॉलमधून गाभाऱ्याकडे गेल्यास, गाभाऱ्याच्या बाहेर एक दगडाचा मोठा नंदी ठेवलेला होता. गावातली लहान लहान इब्लीस पोरं त्या नंदीच्या अंगाखांद्यावरून चढून खेळत असत. मंदीराला दोनच दारे असल्यामुळे हॉलमध्ये बराच आडोसा होता. मंदीराच्या हॉलच्या कोपऱ्यात आडोशाला नेहमीच पत्यांचे एकदोन डाव रंगलेले असत. आणि बाजाराच्या दिवशी तर खेळता खेळता सोबत बंडूच्या हॉटेलमधल्या गरमगरम मीरचीच्या भज्यांचा मोठ्या चवीने आस्वाद घेतला जाई. तसे पत्याचे डाव रोजच रंगलेले असत. गणेशला पत्ते खेळण्यात कधीच रस नव्हता. पण करमत नसेल तेव्हा गणेश नेहमीच आपल्या ऑफीसमधून उठून इथे मंदीरात येत असे. तिथे उभं राहून तो पत्यांचा डाव पाहण्यात गणेशला मजा वाटत असे. कधी कधी तर गणेशला नवल वाटायचं की ही खेडूत पोरं हा एवढा किचकट रमीचा डाव इतक्या सहजासहजी खेळू तरी कसा शकतात. म्हणजे या खेड्यातल्या पोरांनासुध्दा चारचौघांसारखं डोकं असतं पण कदाचित त्याचा वापर बहुधा बऱ्याच वेळा चूकीच्या किंवा निरर्थक मार्गाने होत असावा.

गणेश मंदीरात पत्त्यांचा डाव बघण्यात मग्न होता. तेवढ्यात कुणीतरी धावत आलं.

" ए चलारे ... तिकडं बजारात गोची झाली हाय.."

पत्त्यांचा डाव अर्ध्यातच बंद पडला. सगळ्यांनी डावात टाकलेले आपापले पैसे वाटून परत घेतले. एकाजणाने पत्त्याचं बंडल खिशात कोंबलं.

" काय झालं?" कुणीतरी काळजीच्या सुरात म्हणालं.

" अबे बिगीनं चाल .. तिथं जाऊनशन्यान बग की ... इथं काय बोंबलतो .. अन् इथं येळ कोणालं हाय " तो म्हणाला आणि जसा वाऱ्यासारखा आला तसा वाऱ्यासारखा मंदीराच्या दारातून बाहेर पडला. सगळे जण त्याच्यामागे धावत सुटले. गणेशचीही उत्सुकता चाळवली गेली.

काय झालं असेल?...

तो ही त्यांच्यामागे धावत नाही ... पण जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जाऊ लागला.

बाजारात एका जागी खूप गर्दी जमली होती. मंदीरातले पत्याचा डाव खेळणारे सगळे जण तिथे येऊन पोहोचले. गणेशही गर्दीत घुसून, होईल तेवढे आपले पाय उंचावून काय झालं ते बघू लागला. गर्दीच्या मध्यभागी जे चाललं होतं ते बघून गणेशला आपला धीर खचल्यासारखं झालं. त्याचे हातपाय गळून गेले. चेहरा एकदम पांढरा पडला. तिथे मधुराणी एका खेडूत इसमाला आपल्या अस्सल कोल्हापुरी चपलेने बदडत होती. तो माणूस आपल्या दोन्ही हाताने तिचा मार वाचविण्याचा प्रयत्न करीत होता आणि त्याला जी लाज वाटत होती तीही लपविण्याचा प्रयत्न करीत होता. जो मार खात होता तो कदाचित या पत्ते खेळणाऱ्या मंडळीपैकीच कुणाचा तरी मित्र असावा. कारण त्यातला एकजण मधे पडला.

'' काय झालं?" तो म्हणाला.

मधुराणी चांगल्याच आवेशात आणि रागात होती. त्या आवेशाच्या भरात तिने जो मधे पडला त्यालाही दोन तीन चपला लगावून दिल्या.

" नवराबायकोच्या झगड्यात अन् रस्त्यावरच्या झगड्यात पडू नाय ... मनतात ते काय खोटं नाय" एक वयस्कर बघ्या बाजूच्याला म्हणाला.

" मधूबाई..." तो बोलण्याचा प्रयत्न करु लागला.

" मधूबाई ... काय झालं ते तर सांगसाल?" मधे पडलेल्याने खाल्लेला मार पचवून काकुळतेने विचारले.

" मेला, मुडदा ... काय समजतो?... गर्दीतून जाताजाता चिमटा घेतला मेल्यानं ... घरी जाऊन त्याच्या मायबहिणीला चिमटा घे म्हणाव चांडाळाला.."

मधे पडणारा काय बोलावं हे न समजून म्हणाला

" कुठं घेतला चिमटा मधूबाई"

" मेल्या .. आता काय तुला उघडून दाखवू ... अन् हे मधूबाई मधूबाई काय चालवल... मी काय तुले तमाशात नाचनारी नाचीन वाटली का काय?"

" तसं नाय मधुबा ... मधू... ताई" तो म्हणालां.

'ताई' त्याच्या तोंडातून बळेच निघाल्यासारखं निघालं होतं.

गणेशने असा मधुराणीचा देवी चंडीचा अवतार पूर्वी कधीच बघितला नव्हता. त्याने मनातल्या मनात जे मधुराणीबद्द्ल मांडे ठरवीले होते ते तिथेच विरुन गेले. तो अगदी अवसान गळाल्या सारखा दिसत होता.


क्रमश:...


Confrontation simply means meeting the truth head-on.

--- anonymous


Marathi stories, marathi katha, marathi songs download, marathi free material to download, marathi kavita, marathi gosti, marathi vachanalaya, marathi hints, marathi quotes

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi literature - Madhurani : CH -21

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi literature - Madhurani : CH -21


Always bear in mind that your own resolution to succeed is more important than any other.

-- Abraham Lincon


गणेश बाजारात दूतर्फा लावलेल्या दूकानाकडे पाहत फिरु लागला. डोक्यावर मे महिन्याचं रणरणतं ऊन असतांना लोक हिरवागार भाजीपाला, पिकलेले आंबे, कांदे, लसून घेऊन बाजारात दूकानं लावून बसलेले होते. कुणी किराण्याचं दुकान लावून बसले होते तर कुणी नुसत्या धान्याचे, जसे गहू, ज्वारी, तांदूळ असे दुकानं लावून बसलेले होते. आज जास्त इकडे तिकडे न फिरता गणेश सरळ बंडू हॉटेलवाल्याच्या पालाकडे गेला. जाड ताडपत्रीच्या बांबू, दोऱ्या आणि लोखंडाचे गज ठोकून बनविलेल्या शेडला ती लोक 'पाल' म्हणत असत. बंडूकडे गरमागरम भजे, आलूवडे, डाळवडे, मिरच्या घातलेले भजे, शेव, चिवडा, बुंदी, जिलेबी इत्यादि खान्याची जिन्नसं मिळत. तळणाचा खमंग वास, गरम गरम तेलाचा मनाला भूरळ घालणारा आवाज, आणि समोर ताटात ठेवलेली ती खान्याची पिवळी, काही लाल अशी लोभस जिन्नसं. पालासमोरुन गेला अन् त्याच्या तोंडाला पाणी सुटलं नाही असं क्वचितच होत असे. आलूवड्याला ती लोक 'आलूबोंडा' म्हणत. बंडूच्या हॉटेलवरचा आलूबोंडा गणेशला फार आवडायचा.

" या सायेब... माझ्याइथल्या आलूबोंड्यासारखा आलूबोंडा तुमास्नी कुठबी मिळणार नाय.... माही आलूबोंडा बनवायची तऱ्हाच लय न्यारी हाय... " म्हणत त्याने आलूचा बनविलेला गोळा पातळ बेसनात बुडवून भट्टीवर ठेवलेल्या कढईत उकळत्या गरम तेलात सोडला. मग दुसरा, तिसरा... असे कढईभर आलूवडे झाल्यावर त्याने आपला बेसनाने माखलेला हात बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात घुसळून धूतला. त्या ओल्या हाताचे शिंतोडे मग त्याने आलूवडे तळल्या जात असलेल्या कढईत शिंपडले. 'तड् तड्' असा आवाज आला. हे सगळं बघायला गणेशला फार मजा वाटत असे.

" बसानं सायेब ... बसा"

गणेश पालाच्या आत पाल उडू नये म्हणून ठेवलेल्या एका दगडावर बसला. वडे होण्याची वाट पाहत तो त्या तळल्या जाणाऱ्या वड्यांकडे बघू लागला.

बंडू हॉटेलवाल्याच्या सोबत पालात त्याची बायको मदतनीस म्हणून होती. जेव्हा हा तळण काढायचा तेव्हा ती बाकीचे गिऱ्हाईक सांभाळायची. आणि जेव्हा ती तळण काढायची, तो गिऱ्हाईक सांभाळायचा.

गणेशला कुणीतरी सांगितले होते की बंडू हॉटेलवाल्याने दोन लग्न केली होती. एक बायको घर, लेकरं बाळं सांभाळायची आणि दूसरी बायको त्याच्यासोबत त्याची मदतनीस म्हणून हॉटेलसोबत गावोगाव फिरायची. ... कधी कुठे जत्रेला, दुसऱ्या गावच्या बाजाराला ते खेडोपाडी फिरुन तिथे पाल लावायचे. पंधरा दिवस एका बायकोला घेऊन फिरला की तो तिला घर आणि लेकरं बाळं सांभाळायला घरी ठेवायचा आणि पुढचे पंधरा दिवस दूसरीला घेऊन गावोगाव फिरायचा. आपल्या धंद्यानुसार त्याने आपलं जीवन कसं ऍडजेस्ट केलं होतं. तसा तो हिशोबी होता. त्याचा हिशोबीपणा त्याच्या या दोन लग्न करण्यातही दिसून येत होता. दुसरं लग्न करून एक्स्ट्रा बायको तं बायकोही मिळाली होती आणि बिनपगारी मदतनीस, तीही विश्वासाची.

एव्हाना वडे पूर्णपणे तळले होते. बंडू तळलेले वडे बाहेर काढून एका मोठ्या ताटात टाकू लागला.

" दुसरे हॉटेलवाले ... हे असे वडे तुमाला खायला देतील... पर हे झालं आर्ध काम ..."

तो उरलेले कढईतले वडे ताटात टाकत म्हणाला.

" आता पुढचं काम म्हंजी ... या परतेक आलूबोंड्याच्या एक एक थोबाडीत मारायची ... या झाऱ्यानं अशी... "

तो त्याच्या हातातला झाऱ्या प्रत्येक वड्यावर आपटत म्हणाला.

जसा जसा तो झाऱ्या तो त्या वड्यांवर आपटत असे तसे तसे ते वडे फुटत आणि उलत.

" अन्् मंग पुन्हा यास्नी तेलात टाकायचं ... आसं..."

पुन्हा मग फुटलेले आणि उललेले वडे तेलात टाकत तो म्हणाला.

" अवो हीच तर खरी आलूबोंडे बनवायची तऱ्हा... ही आमी .... आमच्या बापूपासून ... आमचा बापू... आमच्या आबापासून.... अन् आबा... पंजोबापासून... असं पीढ्या दर पीढ्या ही तऱ्हा आमी शीकत आलो..."

ही बंडूची बडबड प्रत्येक वेळी वडे खायला आल्यावर गणेशलाच नाही तर प्रत्येक वडे खाण्यासाठी आलेल्या गिऱ्हाईकांना ऐकावी लागत असे. पण सगळे जण त्या वड्यांच्या आवडीपोटी त्याची ही बाष्कळ बडबड ऐकून घेत असत.

तो पुन्हा तेलात टाकलेले वडे हातातल्या झाऱ्याने हलवीत होता. मध्ये मध्ये उगीच बाजूच्या पाण्याच्या भांड्यात हात बुडवून त्या ओल्या हाताचे शिंतोडे तो त्या गरम तेलाच्या कढईत शिंपडायचा. त्यामुळे 'तड् .. तड्' असा आवाज येत असे. आणि तसा 'तड् .. तड्' आवाज करण्याची जणू त्याला सवयच झाली होती. कदाचित एवढ्या उन्हा तान्हात... तापणाऱ्या भट्टीसमोर तेवढ्याच उत्साहाने नेहमी काम करण्याचे रहस्य त्या 'तड्.. तड्' होणाऱ्या आवाजात दडले असावे असे गणेशला नेहमीच वाटत आले होते.


क्रमश:..


Always bear in mind that your own resolution to succeed is more important than any other.

-- Abraham Lincon

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Novel books - Madhurani - CH-20 आठवडी बाजार

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

It is better to light a candle than to curse the darkness

-- Anonymous

आज गुरुवार असल्यामुळे आठवडी बाजार होता. सकाळपासूनच रस्त्यावर गर्दी आणि वातावरणात एक उत्साह भरलेला जाणवत होता. उजनीला आठवडी बाजाराच्या निमित्ताने आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे लोक येत. गणेश सकाळी आपली अंघोळ वगैरे आटोपून ऑफीसकडे निघाला. आज आठवडी बाजार असल्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातील लोकसुध्दा त्याच्याकडे येणार होते. म्हणजे रोजच्यापेक्षा कामाचा ताण आज जास्त राहाणार होता. म्हणून तो खोलीवरून लवकरच बाहेर पडला होता. जातांना त्याने एक नेत्रकटाक्ष मधुराणीच्या दूकानाकडे टाकला. तिनेही प्रतिसाद दिला - एक गोड स्माईल देऊन. ऑफीसकडे जाणारी त्याची पावले आपसूकच तिच्या दूकानाकडे वळली. आत्ताच ती दूकान उघडून बसली होती. दूकानात दुसरं कुणी गिऱ्हाईक नव्हतं. आणि तीचा नोकरही आला नव्हता. किंवा तिने त्याला कुठे दूसरीकडे पाठवले असावे.

" या गणेश " 'गणेश' या संबोधनावर जोर देत ती म्हणाली.

तिने 'गणेश' हे थोडं हळू आणि अडखळत संबोधलं होतं.

तिने पहिल्यांदाच गणेशला 'गणेश' असं एकेरी संबोधलं होतं. एरवी ती त्याला 'गणेशराव' असं संबोधायची.

गणेशच्या हृदयाची स्पंदनं वाढली.

" काय देऊ? ... बोला"

'काय देऊ' हे ती एका विशिष्ट अर्थाने आणि विशिष्ट शैलीने बोलल्यासारखी बोलली.

गणेश गोंधळून गेला. त्याचं ह्रदय जोरजोराने धडधडायला लागलं. चेहरा लाल व्हायला लागला होता. त्याने इकडे तिकडे पाहिलं. त्याला काय करावे काही सुचेना. दूकानावर जरी कुणी नव्हतं. तरी रस्त्यावरून बाजाराकडे जाणारे लोक दिसत होते.

" सिगारेट द्या " तो कसाबसा बोलला.

" द्या?" तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.

तिची भेदक नजर त्याला खुणावत होती.

" म्हणजे दे.." त्याने हिम्मत करून कसेतरी तिला एकेरी संबोधले.

तिने एक सिगारेट काढून त्याच्या हातावर ठेवली.

त्याने सिगारेट आपल्या हातात घेण्याच्या निमित्ताने तिचा हातही आपल्या हातात घेतला. तिने लाजून मान खाली घालून आपला हात नम्रपणे त्याच्या हातातून सोडवून घेतला.

तेवढ्यात तिथे एक गिऱ्हाईक आले. गणेश अवघडलेल्या स्थितीत उभे राहून त्या गिऱ्हाईकाच्या जाण्याची वाट पाहू लागला. त्या गिऱ्हाईकाने काहीतरी खरेदी केले आणि तो जाऊ लागला. गणेशला हायसं वाटलं. पण लागलीच दुसरं गिऱ्हाईक आलं. आणि त्यामागून तिसरं. असा गिऱ्हाईकाचा मग ओघच सुरु झाला.

" बरं येतो... " त्याच्या तोंडात आलेलं 'राणी' हे संबोधन मोठ्या मुश्कीलीने रोखत तो म्हणाला.

मधुराणी नुसती त्याच्याकडे पाहून हसली. तो वळून जड पावलांनी ऑफीसकडे निघाला.

गणेश ऑफीसमध्ये शिरला तेव्हा त्याच्या टेबलसमोर लोकांची बरीच गर्दी जमली होती. कुणाचे काही दाखले, कुणाच्या लोनकेससाठी कागदपत्र लागणार होते, तर कुणाला गव्हर्नमेंटने जाहिर केलेले अनुदान घेण्यासाठी काही कागदपत्रे हवी होती. गणेशने आल्याबरोबर सपाट्याने कामाला सुरवात केली. त्या कामाबरोबर मिळणाऱ्या वरच्या कमाईमुळे कदाचित त्याला काहीच कंटाळा जाणवत नव्हता. बाहेर ओटयावर पांडू पैसे जमा करण्यासाठी बसला होता. आधीही जेव्हा खराडे साहेब होते तेव्हाही तो हेच काम करत असे. तो लोक आत येण्याच्या आधीच त्यांच्याजवळून पैसे घेऊन एक चिठ्ठी त्यांच्याजवळ देत असे. पांडू जास्त शिकलेला नव्हता. जरी तो फक्त दुसरीच असला तरी पैसे घेऊन चिठ्ठी लिहिण्याचे काम चोख बजावत असे. पांडूला बाहेर बसविल्यामुळे गणेशची दोन कामे सोपी होत होती. एकतर पैसे प्रत्यक्ष घ्यावे लागत नसल्यामुळे लाचलूचपत खात्याची काही भीती नव्हती. तसे लाचलूचपत खाते इतक्या तडकाफडकी गावी येणार नाही याची त्याला जाणीव होती. पण नको दक्ष असलेले केव्हाही चांगले. गणेशला पांडूचा दुसरा फायदा असा होता की त्याला त्या लोकांना काय पाहिजे हे समजून घेण्यासाठी त्यांच्याशी जास्त चर्चा करावी लागत नसे. दिवसाच्या शेवटी गणेशही त्याला काही इनाम देत असे. त्या इनामाच्या लालचीवरच तर तो दिवसभर हे गणेशचे काम करीत असे.

गणेशच्या टेबलसमोर आता एकजणच उरला होता. त्याला एकट्याला पाहून गणेशने सुटकेचा एक उसासा टाकला आणि मग घड्याळाकडे बघितले. एक वाजत आला होता. सकाळपासून त्याला पाणी प्यायलासुध्दा उसंत भेटली नव्हती. आता त्याच्या पोटात कावळे ओरडणं सुरु झालं होतं. तहान लागून घसासुध्दा कोरडा झाला होता. त्याने विचार केला एवढ्या एका खेडूताला निपटवून बाहेर बाजारात एक चक्कर मारायची आणि जे भेटेल ते खायचे प्यायचे. तेवढ्यात बाहेरुन एक पोऱ्या आत आला. त्याच्या हातात पितळीचा एक ग्लास होता. त्याने काही न बोलता तो ग्लास गणेशच्या समोर ठेवला आणि काही न बोलता तो जायला निघाला.

" काय आहे रे?.." गणेशने त्या जाणाऱ्या पोराला विचारले.

" कोण जाणे?.." तो पोरगा खांदे उडवून म्हणाला.

" पांडूदानं पाठीवलं..." तो पुढे म्हणाला आणि निघून गेला.

गणेशने ग्लास हातात घेऊन प्रथम त्यात डोकावून बघितले आणि मग एक घोट घेतला. त्याला हायसं वाटलं. बाहेर ओट्यावर बसलेल्या पांडूने कुठूनतरी जूगाड जमवून थंडगार शरबताची व्यवस्था केली होती. शरबत बडीशोपीपासून बनविलेलं होतं. माठातल्या थंडगार पाण्यात साखर टाकायची आणि त्यात मग बारीक कुटून सोप घालायची. ते कापडातून गाळलं की झालं छान सोपेचं शरबत. गणेशने हे असं सोपीचं शरबत इथे उजनीतच प्रथम पीलं होतं. त्याला ते खूप आवडायचं. उरलेलं शरबत त्याने गटागटा पिवून घेतलं. त्याला तहानच तशी लागली होती.

आता गणेशने त्या उरलेल्या एकूलत्या एका जणाला बोलावले. तो एक खेड्यावरचा ऊंच च्या ऊंच 22 एक वर्षाचा पोरगा होता.

" काय पाहिजे? " गणेशनं विचारलं.

" बां न पाठवलं..." तो पोरगा म्हणाला.

" अरे हो तुझ्या बापानं पाठवलं... पण काय काम आहे ते तर सांगशील...?" गणेशने विचारले.

मग तो डोक्यावर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करु लागला.

" बाहेर पांडूला भेटला का?" गणेशने विचारले.

" हो भेटलोकी..." तो म्हणाला.

" मग त्याने काही चिठ्ठी गिठ्ठी दिली असेल ना?"

" हो देली की" त्याने वरच्या खिशातून एक चुरगाळलेला कागद काढला आणि गणेशच्या हातात दिला.

"येडंच आहे..." गणेश चिडून म्हणाला.

गणेशने एकदा त्या चुरगाळलेल्या कागदाकडे पाहिले आणि मग आश्चर्याने त्याच्याकडे पाहले. गणेशने तो चुरगाळलेला कागद उकलला. गणेश त्या कागदावर काय लिहिले ते वाचण्याचा प्रयत्न केला पण तो कागद एवढा चुरगाळलेला होता की गणेशला ते वाचता येत नव्हते.

" तुला लिहिता वाचता येते का?"

" मंग येते की? " तो अभिमानाने म्हणाला.

" अच्छा ... तर जरा इकडून येऊन मला हे वाचून दाखव बरं ... या चिठ्ठीवर लिहिलेले.." गणेश अजूनही त्या कागदावर लिहिलेले वाचण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

त्याने गणेशकडून जाण्यासाठी प्रथम कुठून रस्ता आहे ते बघितले. गणेशच्या समोर एकाला लागून एक असे तीन टेबल ठेवलेले होते आणि गणेश डाव्या कोपऱ्यात अगदी भिंतीला भिडून बसला होता. रस्ता तीन टेबल सोडून खोलीच्या एकदम उजव्या कोपऱ्यात भिंतीच्या बाजूला होता. मग त्याने गणेशच्या बाजूचा दुसरा टेबल सरकवून तिकडे जाण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याला काय वाटले कोणास ठावूक तो दुसऱ्या टेबलवरून त्याचा उंचच्या उंच पाय पलिकडे ठेवून त्या टेबलला ओलांडून गणेशच्या बाजूने गेला. गणेशने तो प्रकार बघितला. गणेश त्याच्याकडे नुसता आश्चर्यचकीत होऊन बघू लागला.

" अबे पागल आहेस का?" गणेश त्याला रागवण्यासाठी जोराने ओरडला पण दुसऱ्याच क्षणी त्या पोराच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आणि आधी त्याचा टेबल ओलांडण्याचा तो अजब प्रकार आठवून त्याला त्या पोराचे हसु आले.

" अबे काय एडा माणूस आहेस बे तू.. ते तिकडून रस्ता आहे ...तिकडून यायचं तर चक्क टेबल ओलांडून येतोस तू..." गणेश हसत हसत त्याला म्हणाला.

त्याला काय म्हणावे? हसावे की रागवावे? गणेशला काही सुचत नव्हते.

तो पर्यंत तो पोरगा टेबल ओलांडून गणेशच्या बाजूला उभा राहून वाकून त्या चिठ्ठीवर काय लिहिले ते वाचू लागला, " शेत वहितीचा दाखला"

क्रमश:..

It is better to light a candle than to curse the darkness

-- Anonymous

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi books - Madhurani - CH-19 अष्टावधानी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

universal-joke

Marathi books - Madhurani - CH-19 अष्टावधानी

Will you love me in December as you do in May,

Will you love me in the good old fashioned way?

When my hair has all turned gray,

Will you kiss me then and say,

That you love me in December as you do in May?

--- BaylorBound James Walker

बाहेर गणेशने बघितले की एक 21-22 वर्षाचा तरुण मुलगा आणि 18-19 बर्षाची तरुण मुलगी एकमेकांशी भांडत होते. ते ज्यातऱ्हेने भांडत होते त्यावरून असे दिसत होते की ते दोघंही मुके असावेत. त्यांचे भांडण बघून क्षणभर गणेशसुध्दा गालातल्या गालात हसला. त्याने मधुराणीच्या दूकानाकडे बघितले. ती अजूनही त्या मुक्यांच्या भांडणाकडे बघून हसत होती. ते पाहून आपसूकच गणेश तिच्या दूकानाकडे गेला. " गणेशराव ... बगा मुके कसे भांडताहेत... दोन मुके भांडतांना पाहिले का कधी तुमी?" गणेशला पाहताच ती म्हणाली.

" नाही बा ... पहिल्यांदाच पाहतो आहे " गणेशने हसतच तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

" तुमाला माहितेय ते काउन भांडत हायत ?"

गणेशने तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

" हे बगा हे मुकं चाललं होतं टमरेल घेऊन .. इकडं माणसाच्या गोदरीत... अन् मुकी चालली होती तिकडं बायांच्या गोदरीत... अंधारात दोघांची टक्कर झाली... अन्् दोघांचीही टमरेलं सांडली " मधुराणी गणेशची टाळी घेत पुन्हा जोराने हसायला लागली.

गणेशही जोरात हसायला लागला.

आज बरेच उशीरापर्यंत गणेश आणि मधुराणी गप्पा करीत बसले होते. तेवढ्यात एक माणूस घाई घाईने मधुराणीजवळ आला. त्याला श्वास लागला होता. तो बोलायला लागला.

" जरा दमानं ... आंधी जरा श्वास घ्या मंग बोला... मी इथंच हाय मी काय कुठं पळून चालली? " मधुराणी त्या माणसाला गमतीनं म्हणाली.

त्याने थांबून गणेशकडे पाहत आपला श्वास जरा व्यवस्थीत केला आणि खिशातली चाबी काढून मधुराणीकडे देत तो म्हणाला, " हे घ्या ... पंधरा पोते झाले ... तुमच्या गोदामात ठेवले"

तो चाबी मधुराणीच्या हातावर ठेवत होता. मधुराणी काही तरी कामाचं निमित्त करून तिकडे वळून काहीतरी शोधायला लागली. तीकडेच तोंड ठेवून ती म्हणाली, " ठेवा तिथं पेटीवर"

त्या माणसाने ओशाळल्या चेहऱ्याने ती चाबी मधुराणीच्या समोर ठेवलेल्या लाकडाच्या पेटीवर ठेवली. मधुराणीने तिच्या मागून शोधून वही आणि पेन काढला. मग समोर त्या माणसाकडे वळत म्हणाली,

" फक्त पंधरा पोते... मागच्या येळीपेक्षा कमी झाले की हो या येळी"

" काय गोष्टी करता? ... मागच्या येळी फक्त बारा पोतेच झाले होते की"

" मंग मागच्या येळी पेरलं बी कमीच होतं की"

" हो ते बराबर हाय पर ... उतार जवळपास बरोबरच आला असला पायजे"

मधुराणी वही अन्् पेन गणेशजवळ देत म्हणाली,

" गणेशराव काढा बरं उतार ... हं सांगा तुमी"

तो माणूस म्हणाला, " मागच्या बारी ... जवळपास अडीच एकराला बारा पोते झाले होते गहू ... अन् या बारी तीन एकराला पंधरा पोते ..."

गणेश वहीवर आकडेमोड करु लागला.

" नाही मधुराणी यावेळीच उतार चांगला आला ... यावेळी पाचचा अन्् मागच्या वेळी चार पॉइंट आठ चा"

" आवो मला माहित होतं... संभाजीरावर भरोसा हाय माझा... मी उगीच आपली त्यांची गंमत केली... काय हो की नाय संभाजीराव? " मधुराणी संभाजीरावकडे हसत पाहत म्हणाली.

संभाजीराव आपला लाजल्यासारखा हसला.

" बरं येतो मंग ..." तो म्हणाला.

मधुराणी त्याच्याकडे पाहत पुन्हा हसली जशी हसण्याच्या भाषेत म्हणत असावी " या आता"

तो निघून गेला.

तो नजरेआड होताच मधुराणी म्हणाली " मुडदा मेला... काम चांगलं करतो ... मेहनती हाय... पण उगीच लगट करतो... आता पाहिलं ना तुमी कसा चाबी माझ्या हातात देण्याचा प्रयत्न करत होता?... तेवढाच हाताला हात घासणार... घरी मायबहिणीला कर म्हणावं तसं"

हे बोललेलं गणेशलासुध्दा लागू होत होतं त्यामुळे तो गोरामोरा झाला.

चटकन मधुराणी गणेशच्या मांडीवर चापटी मारीत म्हणाली, " म्हंजी तशी लायकीबी लागते का नाय"

गणेशचा चेहरा पुन्हा खुलाला. त्याने विचार केला

चला म्हणजे आपल्याला नाही म्हटले मधुराणीने ...

आपण अपवादात मोडतो ...

पण हे असं एखाद्या विधवा स्रीच्या मजबुरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करने काही बरोबर नाही लोकांचं...

" गणेशराव तुमचा हिशेब लई भारी दिसतो... लई पटकन् हिशेब केला तुमी... मला माहिती नव्हतं तुमी गणीतात बी एवढं हूशार हाय म्हणून ... "

" मधुराणी तुम्ही आता फारचं स्तूती करता आहात .." गणेश लाजून म्हणाला.

तीथं दूकानात किंवा आजबाजूला अजून कुणीच नव्हतं. या एकांताचा फायदा घेऊन मधुराणी लाडीवाळपणे म्हणाली,

" गणेशराव तुमी मला ... आवो जावो नका करत जाऊ... "

गणेशने चमकून तिच्या डोळयात पाहिले. तिच्या डोळ्यात त्याला मादक भाव दिसायला लागले होते. गणेशचे कानशीलं गरम व्हायला लागले.

" अन्् फक्त मधू म्हणत जा ... किंवा राणी म्हणत जा... हं राणीच म्हणत जा"

गणेशचा घसा कोरडा पडायला लागला. त्याच्या हातापायात आता कंप सुटायला लागला होता.

त्याने लाजेने आपली दृष्टी मधुराणीच्या चेहऱ्यावरून हटवली. तरी त्याला जाणवत होते की अजूनही मधुराणीची दृष्टी त्याच्या चेहऱ्यावरच रोखलेली होती. ती जणू त्याला तिच्या डोळ्याने पिऊन घेत होती.

" तुमचा दूकानाचा हिशेब कोण ठेवतो" तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.

" मीच ठेवते ... का? ... तुमी काय मला अडाणी समजता की काय?" मधुराणी जोराने हसत म्हणाली.

" नाही तसं नाही ... " तो गोंधळून म्हणाला.

" तो शेजारचा विलास करतो मला मदत कधी कधी..."

" नाही ... मी म्हटलं मीही करीत जाईन की मदत तुम्हाला कधी कधी."

" तुमाला..." तिने हटकले

" नाही म्हणजे तुला" असं म्हणतांना गणेशचा चेहरा लाजून लाल लाल झाला होता.

" तशी मदतीची मला गरज नाय ... पण मदतीचा जर दुसरा काही उद्देश आसल तर चालल" पुन्हा मधुराणी त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाली.

त्याने पुन्हा लाजेने आपली नजर हटवली. तो आता तिच्या पुढे ठेवलेल्या लाकडाच्या पेटीकडे पाहू लागला. पेटीवर मधुराणीचा उगीच चाळे केल्यासारखा हात लाकडाच्या पेटीशी खेळू लागला होता. तिच्या हाताच्या हालचालीवरून तिच्या मनाची अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती.

गणेश आता आपली हिम्मत बांधण्याचा प्रयत्न करु लागला. त्याची तिच्या डोळ्याला डोळा देण्याची तर हिम्मत होत नव्हती.

पण नाही ती आपल्याला सिग्नल देत होती ...

तिच्या सिग्नलला प्रतिसाद देणे आवश्यक आहे ...

नाही तर ती आपल्याला काय समजेल... नंपूसक ...

नाही ... काही तरी प्रत्यूतर द्यायलाच पाहिजे....

त्याच्या डोक्यात विचारचक्र घूमू लागलं. तो त्याच्या प्रत्येक हालचालीच्या परिणामाचा विचार करायला लागला.

साली आपल्या गळ्यात पडली तर? ...

पंचाईत होऊन जाईल ...

नुसती मजा करण्यापर्यंत गोष्ट ठीक आहे...

जाऊ दे ते नंतरचं नंतर बघू ...

आधीे ... तिच्या सिग्नलचे उत्तर तर देऊ...

त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिची नजर अजूनही त्याला पिऊन घेत होती. त्याने पुन्हा लाजेने मान खाली घातली. त्याला आता स्वत:चा राग येऊ लागला.

'मुर्खा ती एवढी सिग्नलवर सिग्नल देत आहे ..

अन् तू असा ठोंब्यासारखा बसला आहेस नुसता ...

हातपाय गाळून...

नाही काहीतरी करायलाच पाहीजे...

लोखंड तापून लाल लाल झालं आहे...

हीच योग्य वेळ आहे घाव घालण्याची...

त्याने शेवटी ठरविले....

तिच्याकडे पाहणं तर शक्यच नाही ...

तिच्या डोळ्याकडे पाहिले की सुर्याकडे पाहावे तसे त्याला होत होते. ...

कमीत कमी ... खाली मान घालून का होईना ...

आपण तीचा हात तरी हातात घ्यायला पाहिजे...

तो हळू हळू हिम्मत करून आपला हात तिच्या पेटीवर ठेवलेल्या हाताकडे सरकवू लागला. त्याच्या हाताला कंप सुटला होता. पायाला सुध्दा कंप सुटला होता. तो आपल्या थरथरत्या हाताला कसा तरी आवर घालून तिच्या हाताजवळ सरकवू लागला. बाहेर एवढी थंड हवा वाहत असतांना त्याच्या सर्वांगाला घाम फूटला होता. शेवटी त्याने मनाचा हिय्या करून शेवटी आपल्या थरथरत्या हाताची झडप तिच्या हातावर घातली. पण हे काय तत्पूर्वीच तिने तिथून आपला हात उचलून घेतला होता. त्याला मेल्यावरून मेल्यासारखे झाले. त्याला आपला घोर अपमान झाल्यासारखे वाटले. पण तेवढयात तिचा आवाज आला

" बापू ... जरा जपून ... जरा कमी घ्या नायतर ... कालच्यासारखं त्या गटारात लोळाल"

गणेशने खाली घातलेली मान उचलून बघितलं. मधुराणीच्या समोर दाढीचे खुनटं वाढलेला एक वयस्कर खेडूत उभा होता. त्याने मधुराणीच्या समोर हात पसरला होता. आणि मधुराणीने एक एकचे दोन कल्दार त्याच्या हातावर ठेवले होते. त्या माणसाने आपल्या पसरलेल्या हाताची मूठ वळून ते पैसे आपल्या हातात घेतले आणि काहीही न बोलता तो तिथून निघून गेला.

अच्छा म्हणजे मधुराणीने तो माणूस आला म्हणून आपला हात बाजूला सारला होता ...

नाहीतर फार बिकट प्रसंग आला असता...

मधुराणीने अष्टावधानी राहून तो बिकट प्रसंग टाळला होता...

गणेशने विचार केला. त्याला तिचं खरोखर अप्रुप वाटत होतं.

खरंच आपल्या डोळ्यात पाहत असतांनासुध्दा तिचं सगळीकडं लक्ष होतं...

आणि आपण...

खरोखर अष्टावधानीच म्हटलं पाहिजे तिला...

आता त्याच्या चेहऱ्यावरचे अपमानाचे भाव विरले होते. त्याने मधुराणीकडे बघितले. ती त्याच्याकडे खट्याळपणे बघत उठली.

" कोण होता ?" तो आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपविण्यासाठी काहीतरी बोलायचे म्हणून बोलला.

" सासरा" ती म्हणाली.

" चला आता खूप येळ झाली ... दूकान बंद करायला पायजे... नायतर लोक..." वाक्य अर्धवट सोडत ती आवरा आवर करायला लागली.

" ठिक आहे मीही निघतो आता..." तो उभा राहत तिचा निरोप घेत म्हणाला.

ती पुन्हा त्याच्याकडे खट्याळपणे पाहत हसली आणि आपल्या आवरा आवरीच्या कामात पुन्हा मग्न झाली. जसे काही झालेच नाही. खरंच तिच्या एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात चपळपणे शिरण्याचे कसब वाखाणण्यासारखे होते.

तो तिच्या विजेसारख्या चपळ आणि चलाख हालचालीकडे बघत आपल्या खोलीकडे वळला. तो जड पावलांनी आपल्या खोलीकडे जात होता. दरवाजाजवळ उभं राहून त्याने एकदा वळून मधुराणीकडे पाहिलं. तिनेही त्याच्याकडे एक नेत्रकटाक्ष टाकला. अजूनही ते खट्याळ हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं होतं.

क्रमश:...

Will you love me in December as you do in May,

Will you love me in the good old fashioned way?

When my hair has all turned gray,

Will you kiss me then and say,

That you love me in December as you do in May?

--- BaylorBound James Walker

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi world of books - Madhurani CH-18 - गुपीत भाषेचं रहस्य

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

laughing_idiots Marathi world of books - Madhurani CH-18 - गुपीत भाषेचं रहस्य

Normal is getting dressed in clothes that you buy for work and driving through traffic in a car that you are still paying for - in order to get to the job you need to pay for the clothes and the car, and the house you leave vacant all day so you can afford to live in it.

--- Ellen Goodman

जसजसे दिवस जात होते गणेशचं त्याच्या खिडकीतून मधुराणीकडे पहाणं वाढत होतं. मधुराणीही गणेश इकडे खिडकीत आला की तिकडून त्याच्याकडे पाहून हसून प्रतिसाद द्यायची. त्याचं दूकानात जाणंही वाढलं. प्रथम काहीतरी घेण्याचे निमित्त करून तो जायचा. पण हल्ली तो साधी सुपारी फोडण्यासाठी अडकित्ता, सुईदोरा, सुतळी, इत्यादी निमित्त करून दूकानावर जाऊ लागला. मधुराणीही हसत हसत त्याला जे लागतं ते द्यायची. वस्तू देता घेतांना ती आपल्या कोमल हातांचा थोडा का होईना स्पर्श न चूकता करायची. हळू हळू गणेशचीही हिंम्मत वाढायला लागली होती. तोसुध्दा तिला स्पर्श करण्याच्या मोक्याच्या शोधातच राहू लागला. हल्ली हल्ली तर मधुराणीच्या स्पर्शाशिवाय आणि तिच्या आर्त नजरेत डूबून चिंब झाल्याशिवाय गणेशचा दिवसच जात नसे. त्यानेही विचार केला चला या अशा दुर्गम खेड्यात तेवढाच एक विरंगुळा. आणि तीही काय करणार तिचं ते वयच असं आणि वर बिचारीचा नवरा मेलेला.

एक दिवस तिने त्याला तिच्या खास भाषेचंही गुपीत सांगितलं.

" मीर्फी तुर्फुझ्यावर्फरर्फ प्रेर्फेमर्फ कर्फरतेर्फे .... बगा समजते का काही."ती म्हणाली.

" नाही बॉ ... एखादी तेलगु सारखी साऊथ इंडीयन भाषा वाटते.." तो डोक्यावर जोर देण्याच्या अविर्भावात म्हणाला.

" आवो ... खूप सोपं हाय... तेच्यातल र्फ, र्फु, र्फा, र्फे काढून टाकायचं... झाल बस."

" बस एवढं सोपं... " तो म्हणाला .

" आता पुन्हा सांग बरं तू काय म्हणाली होती " गणेशने पुन्हा विचारले.

" मीर्फी तुर्फुझ्यावर्फरर्फ प्रेर्फेमर्फ कर्फरतेर्फे " तिने ते वाक्य पुन्हा उच्चारले.

" मी... तुझ्या... पुढं काय होतं एकदा सांग .. अन् जरा हळू सांग..." गणेश वाक्य जुळवत म्हणाला.

" मीर्फी तुर्फुझ्यावर्फरर्फ प्रेर्फेमर्फ कर्फरतेर्फे "

" मी तुझ्या... वर ...प्रेम... करते... म्हणजे ... मी तुझ्यावर प्रेम करते... बरोबर आहे ना"

" हो एकदम बरोबर... "

तिने काय वाक्य उच्चारले हे गणेशला समजले होते... पण त्याचा अर्थ जरा उशीरा समजला. अर्थ लक्षात येताच त्याचा चेहरा लाजेने एकदम लाल लाल झाला.

" बगा ... बगा कसे लाजताय ... आवो ... असे लाजता काय... मी आपलं उदाहरण दिलं" मधुराणी म्हणाली.

" एवढं सोपं...पण एवढं सोपं असूनही ही भाषा इतरांना का कळत नाही" गणेश आपल्या चेहऱ्यावरचे लाजेचे भाव हटविण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

" कारण त्यांच अजून एक गुपीत हाय... ही भाषा फास्ट बोलावी लागते... नायतर ऐकणाऱ्याला कळू शकते"

" हो बरोबर आहे तुझं" तो म्हणाला.

एक दिवस संध्याकाळी गणेश थकून विश्रांतीसाठी पडला होता. आज त्याला जवळच्या एका खेड्यावर जावे लागले होते. त्या खेड्यावर जाण्यासाठी बस नव्हती. सरपंचांनी बैलगाडीची व्यवस्था केली होती. गणेशला बैलगाडीची सवय नव्हती. बैलगाडीत आदळून आदळून पार शरीराचा एक एक अवयव दूखत होता. तरी बरं प्रवासाला सोबत दोघंजण होते. एक गावोगावी मोटर पंप पंखे याचं मेकॅनिकचं काम करणारा बबन आणि दुसरा होता येडा. त्याचं नाव काय होतं माहित नाही पण लोक त्याला तो वागायला थोडा विक्षीप्त असल्यामुळे ' येडा ' म्हणूनच हाक मारायचे. प्रवासाच्या दरम्यान बबनसोबत गप्पा मारत मारत गणेशचा वेळ छान गेला होता. येड्याने तर गप्पा मारण्याचा प्रश्नच नव्हता. पण मधे मधे गंमत म्हणून ते त्याची फिरकी घ्यायचे. पडल्या पडल्या गणेशला बैलगाडीत जातांनाची एक गंमत आठवली आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू तरळले. बैलगाडीत मागे तिघे बसले होते आणि गाडीवान गाडी हाकत होता. गाडी आदळल्यामुळे त्रास होवू नये म्हणून मागे गवताची पेंढी पसरवली होती. म्हणजे रस्त्यात बैलांना खायला चारासुध्दा झाला असता.

" या गाडीच्या धक्यानं माणसाचे सारे नट बोल्ट ढिले होऊन जायचे " बबन चाक दगडावरून गेल्यामुळे आदळलेल्या गाडीच्या धक्यातून सावरत म्हणाला.

त्याच्या मेकॅनिकच्या व्यवसायाला अनुसरुन त्याने अगदी योग्य उपमा दिली होती.

गणेश येड्याकडे इशारा करून गंमतीने म्हणाला, " या येडयाचे नट बोल्ट होऊन होऊन किती ढिले होणार ... याचे नट बोल्ट तर आधीच ढिले झालेले आहेत."

बबन गणेशला टाळी देऊन जोरजोराने हसायला लागला होता.

पडल्या पडल्या गणेश तंद्रीतून बाहेर आला. बाहेर काहीतरी गोंधळ ऐकू येत होता. त्याने पडल्या पडल्या कड बदलून खिडकीतून बाहेर बघितले. बाहेर बराच अंधार झाला होता. साडेसात आठ वाजले असतील. तो बाहेर कशाचा गोंधळ आहे ते लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करु लागला.

" बो बो ... बॅ बॅ ..." एका पुरुषाचा कर्कश्य आवाज आला.

" ओ.. ऍ ... ना .. ना ... ना" त्यामागेच एका स्त्रीचा कर्कश्य आवाज आला.

गणेश कड बदलून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करु लागला. ते असबंध आवाज पुन्हा पुन्हा येऊ लागले. जणू कोणी भांडत होते. मध्येच मधुराणीचा मोठ्याने खळखळून हसण्याचा आवाज आला. आता मात्र गणेश उठून बसला. बाहेर काय चालू आहे हे बघण्याची त्याला उत्कंठा लागली होती. उठून कपडे बदलून तो खोलीतून बाहेर पडला.

क्रमश:

Normal is getting dressed in clothes that you buy for work and driving through traffic in a car that you are still paying for - in order to get to the job you need to pay for the clothes and the car, and the house you leave vacant all day so you can afford to live in it.

--- Ellen Goodman

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Books - Madhurani- CH-17 ऑफीस

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

marathi_jokes_vinod

Marathi Books - Madhurani- CH-17 ऑफीस

Advice is what we ask for when we already know the answer but wish we didn.

…Erica Jong

गणेश गावातल्या ऑफीसमध्ये बसला होता. ऑफीसमध्ये गावकऱ्यांची गर्दी झाली होती होती. ऑफीसमध्ये काम असणाऱ्यांपेक्षा रिकामटेकडेच जास्त जमा झाले होते. कुणी ओट्यावर बसून तंबाखूचा बार भरत होते तर कुणी चिलीम फुकत होते. ऑफीसमध्ये ग्रामपंचायतच्या खर्चाने एक मोठा रेडिओ घेतला होता. आणि तो रेडिओ सुरु करून लोक अधेमधे बातम्या किंवा गाणे ऐकत असत. बुधवारी संध्याकाळी आठचा टाईम हा गावातल्या नवीन जोमाच्या पोरांसाठी राखून ठेवलेला असे. राखून ठेवलेला असे म्हणजे त्यावेळी ते बिनाका गीतमाला ऐवजी कुणालाच दुसरं काहीही लावू देत नसत. तर रिकामटेकड्यांपैकी काही लोक ओट्यावर बसून रेडिओवर बातम्या ऐकत होते. गणेशचे ऑफीस म्हणजे तिथेच हॉलमध्ये एका कोपऱ्यात एकाला लागून एक असे तीन टेबल टाकले होते आणि त्या टेबलच्या मागे दोन खुर्च्या टाकलेल्या होत्या. त्यातल्या एकदम कोपऱ्यातल्या खुर्चीवर गणेश बसला होता. गणेशच्या टेबलसमोर दोनजण उभे होते. त्यातला एक ठार अडाणी वयस्कर खेडूत होता. त्याला गणेशने विचारले-

" बोला काय पाहिजे?"

" सायेब... ते 7-11 का काय म्हणत्यात ते..." तो खेडूत म्हणाला.

" 7-12" गणेशने त्याची चूक दूरुस्त केली.

" व्हय ... तेच ...तेच ... " तो खेडूत हसून उत्साहाने म्हणाला.

" जुना 7-12 किंवा त्याची कॉपी आहे का? "

त्या खेडूताने प्रश्नार्थक नजरेने प्रथम गणेशकडे आणि मग त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या 20-21 वर्ष वय असलेल्या पोराकडे पाहिले.

" तुमचं नाव सांगा " गणेशने त्याला विचारले.

" गणपत सदोबा खोत" त्या खेडूताने आपलं नाव सांगितलं.

गणेशने टेबलवर त्याच्या समोर ठेवलेल्या एका रजिस्टरवर ते लिहून घेतलं.

" सर्वे नंबर माहित आहे का?"

पुन्हा त्या खेडूताने प्रश्नार्थक नजरेने प्रथम गणेशकडे आणि मग त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या पोराकडे पाहिले.

" तुमच्या लोकांचं हेच फार तापदायक आहे ... जुना 7-12 नाही... सर्वे नंबर .. माहित नाही... तुमचं नाव तुम्हाला माहित आहे हे आमचं नशीब... फक्त नावावरून रेकॉर्ड शोधणं म्हणजे वेळ लागेल... पुढच्या सोमवारी या..." गणेश चिडून म्हणाला.

" बिगीनं होत आसल तर बगा सायेब" तो अती हीन दीन होऊन विनवणी करु लागला.

" बरं ... बरं ... गुरुवारी येऊन बघा... " गणेश त्याला कटवल्यासारखे करीत म्हणाला.

तो खेडूत हात जोडून निघून गेला.

" हं तुला काय पाहिजे? " तिथे दुसऱ्या उभ्या असलेल्या पोराला गणेश म्हणाला.

" आमची अन् चूलत्याची हिस्सेवारीची भानगड हाय ... तर ती कशी मीटवायची ते इचाराया आलो होतो "

" त्या पोराला गणेशने बऱ्याचदा मधुराणीच्या दूकानात येतांना पाहिले होते. गणेश ऑफीसचं काम करीत होता खरा पण त्याच्या डोक्यात कायम मधुराणीच्या विचाराचं चक्र चाललेलं होतं - एखादी मधमाशी कानाजवळ इकडून हाकललं तर तिकडून, तिकडून हाकललं तर इकडून कायम आवाज करावा तसं.

" बस " गणेशने समोरच्या एका खुर्चीवर इशारा करून त्याला बसायला सांगितले.

तेवढ्यात तो पूर्वी येऊन गेलेला खेडूत पून्हा परत आला.

" आता काय आहे ?" गणेश कससं तोंड करून म्हणाला.

" नाय ते आपल्या कामाला खर्च किती येईन?" तो खेडूत खालच्या आवाजात म्हणाला.

" का तुम्हाला माहित नाही का? "

त्या खेडूताने नकारार्थी मान हलविली.

" बाहेर ओट्यावर पांडू बसला आहे त्याला विचारा" गणेश त्या खेडूताकडे दुर्लक्ष केल्यागत त्याच्याकडे न पाहताच म्हणाला.

" जी " तो खेडूत म्हणाला.

साहेंबांनी खुर्चीवर बसायला सांगितलं खरं. पण आपण काही चूकीचं तर नाहीना ऐकलं? या अविर्भावात तो पोरगा कधी खुर्चीकडे तर कधी गणेशकडे पाहत खुर्चीजवळ घूटमळत होता.

" अरे बसकी..." गणेशने त्याला पुन्हा बसायला सांगितले.

तो लाजत लाजत खुर्चीवर बसला.

तो खेडूत आश्चर्याने कधी त्या खुर्चीवर बसलेल्या पोराकडे तर कधी गणेशकडे पाहत बाहेर पडला.

गणेशने डोळ्याच्या कोपऱ्यातून त्या खेडूताला बाहेर गेलेले पाहताच सरळ मुद्यालाच हात घातला.

" तुला मधुराणीच्या दूकानात बऱ्याच वेळा बघितलं आहे मी "

" हो ... सामानसूमान घ्यायला ... ते दूकान नजदीक पडते ना" तो लाजून म्हणाला.

" खूप पोरं जमा होतात तिथं संध्याकाळी ... काय भानगड काय आहे?" गणेश आजूबाजूला चाचपडल्यासारखे करत होता. पण त्याचा मूळ उद्देश मधुराणीबद्द्ल माहिती काढणे हा होता.

" काय नाय सायेब ... बिड्या फुकायला जमा होतात... रिकामटेकडे .. दुसरं काय करतात लेकाचे " तो म्हणाला.

" खोटं बोलू नको... " गणेश गालातल्या गालात हसत त्याला म्हणाला.

" त्याचं काय हाय सायेब... गुळ आसल तितं माशा गोळा व्हायच्याच" तो एक डोळा बारीक करीत म्हणाला.

" अच्छा म्हणजे तू सुध्दा..."

" नाय सायेब... मी आपलं बाकीचे पोरं जात्यात म्हूण जातो आपला"

" अस्सं" गणेश हसून त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला.

तो लाजून इकडे तिकडे बघू लागला. तेवढ्यात एक गावंढळ पोरगा आत आला.

गणेशने त्याच्याकडे नापसंतीनेच पाहिले. त्याला समोर खुर्चीवर बसलेल्या पोराला मधुराणीबद्दल अजून प्रश्न विचारायचे होते. आणि तिथे त्याला अजून दुसरे कुणी नको होते. पण तो पोरगा बेशरमासारखा तिथेच उभा राहिला.

" पण तिच्या घरात दुसरं कुणी नाही का? ... नेहमी मला तर तीच गल्ल्यावर बसलेली दिसते"

गणेशला वाटलं नाव न घेता मधुराणीबद्दल विचारलं तर त्याच्या काय लक्षात येणार आह?े.

" सासरा हाय ना ... पर त्यो दारु पिऊन लोळत असतो उकंड्यावर " तो पोरगा म्हणाला.

" मग नवरा? " गणेशने त्याच्या परीने अगदी महत्वाचा प्रश्न विचारला.

" नवरा मेला सायेब... बिचारीचा ... लगीन झाल्यावर एका वर्साच्या आतच मेला बिचारा"

" कोण म्हन्ते मेला ... मारलं तेला पाटलानं" दुसरा पोरगा जो येऊन गणेशच्या टेबलशेजारी उभा राहिला होता तो म्हणाला.

" ए ढेकळ्या... कोर्टामंदी साबीत केलं हाय पाटलानं..." खुर्चीवर बसलेला पोरगा आता आवेशाने उठून उभा राहत म्हणाला.

" कोर्टात लई वशीला हाय पाटलाचा ... तिथं तो पैसे देऊन मेलेल्यालं जीतं करील ... काम पडलंतं "

" ए फोकणीच्या तोंडात येईल ते बोलू नको"

दोघांची आता चांगलीच जूंपण्याच्या मार्गावर होती. गणेश मध्ये पडला.

" ए तू बाहेर जा बघू आधी .. याचं काम होवू दे ... मग तू आत ये... "

गणेशने जो पोरगा मागावून आत आला होता त्याला बाहेर हाकललं.

तो घाणेरड्या शिव्या देत मध्ये मध्ये वळून बघत बाहेर गेला.

मग गणेशने त्या पोराकडून मधुराणीची शक्य होईल तेवढी माहिती काढून घेतली.

बिचारी मधुराणी ...

नवरा लग्न होऊन एका वर्षाच्या आत वारला...

बिचारीचं नशिबच खोटं....

तिच्या जीवाची काय घालमेल होत असेल....

गणेशला तिच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागली होती.

क्रमश:...

Advice is what we ask for when we already know the answer but wish we didn.

..Erica Jong

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi kadambari - Madhurani CH-16 पुनर्मीलन

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi kadambari - Madhurani CH-16 पुनर्मीलन

समोरचा भिंतीचा कोपरा जसा गणेशला दिसायला लागला त्याच्या हृदयाची स्पंदनं वाढू लागली. तो कोपरा ओलांडला की बस मधुराणी आपल्या नजरेस पडणार. तो झपाझप पावले टाकीत चालू लागला. त्याच्या मागून अजूनही सदा येत होता. पण गणेशला ना सदाचे भान होते ना रस्त्यात दिसणाऱ्या लोकांचे. गणेश मधुराणीच्या भेटीसाठी अगदी अधीर झाला होता.

एकदाचा तो क्षण आला. कोपरा पार करताच गणेशला गल्ल्यावर बसलेली मधुराणी दिसू लागली. ती आपल्या कामात गुंग होती. कधी एकदा ती आपल्याकडे पाहते आणि कधी आपण तिच्या त्या आर्त नजरेत बुडून जातो असे त्याला झाले होते. तो मधुराणीच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला.

" बोला गणेशराव ... काय देऊ ? .. सिगारेट?" मधुराणीने अगदी सहज गणेशकडे पाहत विचारले.

गणेशला आपल्या मनातले मांडे मनातच विरत असल्यासारखे जाणवत होते. ती अगदी तिऱ्हाईतासारखी गणेशशी बोलत होती. त्या दिवशी ज्या तऱ्हेने मधुराणीने त्याला जाता जाता निरोप दिला त्यावरूनतरी आज तिचे असे तिऱ्हाईतासारखे बोलणे अपेक्षित नव्हते. गणेशला आश्चर्याचा धक्का बसला होता. जे होत होते ते सगळे गणेशला अनपेेक्षित होते. त्याला असे वाटत होते की आपल्या पायाखालची जमीन दुभंगावी आणि तिने आपल्याला त्यात सामावून घ्यावे. गणेशचा चेहरा खर्रकन् पडला. त्याला काय बोलावे काही सुचत नव्हते.

" नाही एक लक्स साबन पाहिजे होती " तो काहीतरी बोलायचे म्हणून बोलला. खोलीवर दोन लक्स साबन पडून होत्या. पण आता परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की काहीतरी विकत घ्यावेच लागणार होते.

" का व्हील देऊ" मधुराणी आधीच्या एका गमतीवरून कोटी करीत खळखळून हसली.

गणेश कसाबसा हसला. त्याला उगीच वाटत होते की मधुराणी कदाचित त्याच्या पडलेल्या चेहेऱ्याकडे पाहून आपली खिल्ली उडवल्यासारखी तर हसली नसावी?

मधुराणीने एक लक्स साबन काढून त्याच्या हातावर ठेवली. त्याच्या हातात शिरशीरी भरल्यासारखे झाले. त्याची अपेक्षा होती की मधुराणी त्याच्या हाताला स्पर्श करेल. पण यावेळी जणू जाणून बुजून तिने ती साबन वरूनच त्याच्या हातावर ठेवली. त्याचा घोर अपेक्षाभंग झाला होता. त्याने खिशातून पैसे काढून दिले आणि निराश चेहऱ्याने तो जाऊ लागला.

मागून मधुराणीचा मंजुळ आवाज आला-

'' दोन दिस काय गावाला गेले होते की काय? ... लई चूकचूकल्यासारखं वाटत होतं "

गणेशने वळून मधुराणीकडे पाहिले. त्याचा चेहरा आता उजळला होता. मधुराणीच्या नजरेत पुन्हा ते आर्त भाव दिसू लागले होते. त्याला वाटले पुन्हा तिच्याकडे परत जावे.

पण नको...

बरे दिसणार नाही...

तो पुन्हा वळून आता उत्साहाने त्याच्या खोलीकडे चालायला लागला. तो विचार करु लागला.

आपणही किती वेडे आहोत....

इथे असलेल्या सगळ्या लोकांसमोर कशीकाय मधुराणी आपल्या मनातले भाव व्यक्त करणार होती....

पण तिने आपल्या हाताला एक नाजूकसा का होईना स्पर्श करायला काय हरकत होती....

पण जातांना तिने पुन्हा इशारा दिला होताच की...

ज्या अर्थी तिला दोन दिवस आपण नसल्याची जाणीव झाली होती...

त्याअर्थी तिच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी आहे हे नक्की...

क्रमश:

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Latest Novel Book - Madhurani CH- 15 आपल्या घरी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Latest Novel Book - Madhurani CH- 15 आपल्या घरी

गणेश तालूक्याच्या ठिकाणी आपल्या घरी आला. घरी बायको होती एक गोंडस मुलगा होता. पण त्याचं मन तिकडेच गावात राहालं होतं - मधुराणीजवळ. केव्हा एकदा परत उजनीला मधुराणीजवळ जातो असं त्याला झालं होतं. मध्ये सुट्ट्या होत्या म्हणून, नाहीतर कधीच तो उजनीला जाऊन पोहोचलासुध्दा असता. आणि सुट्टीच्या दिवशी जावं तर कुणाला उगीच शंका यायची. सुट्टीचे दोन दिवस दोन महिन्यासारखे त्याला जड जात होते. त्याने आपलं सामानसुमान बांधून आधीच तयार ठेवलं - तेवढाच वेळ जाईल म्हणून.

जितक्या उत्कटतेने आपण उजनीला एकदा पोहोचण्याची वाट पाहतो आहोत...

तेवढ्याच ... कदाचित त्याहीपेक्षा जास्त उत्कटतेने मधुराणी आपली वाट पाहत असेल...

तो विचार करु लागला.

शेवटी आपल्या मनातल्या भावना कितीही आपण आवरण्याचा प्रयत्न केला तरी...

त्या व्यक्त केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही....

मधुराणीने इशाऱ्याने का होईना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या....

आपण तिथे गेल्यापासूनच आपण तिच्या मनात भरलो असलो पाहिजे...

नाहीतर तिच्या नजरेत इतकी आर्तता आपल्याला का जाणवावी...

की ज्यामुळे आपणही तिच्याकडे आकर्षित होत गेलो....

तिने आपल्यावर असं भाळावं...

इतके लोक सोडून तिने आपलीच निवड करावी...

म्हणजे आपल्यातही काहीतरी असलंच पाहिजे...

त्याला स्वत:च्या रुपाचा अभिमान वाटत होता. काहीही असो तिनेही आपलं मन आपल्यासमोर उघडं केलं हे फार महत्वाचं. नाहीतर आपणच एखाद्या लंपटासारखं तिच्या मागे लागलेलं बरं दिसलं नसतं....

शेवटी तो दिवस उजाडला. सोमवार. ज्या दिवसाची गणेश आतूरतेने वाट पाहत होता. आजही गणेशला उजनीपर्यंतचा बसचा प्रवास जरासुध्दा जाणवला नाही. प्रवासभर त्याला आपले दोन्ही हात समोर करून मिठीत घेण्यास आतूर असलेली मधुराणी दिसत होती. बसमध्ये शेजारी कोण बसलेलं आहे... बसमधले बाकीचे प्रवासी काय करीत आहेत... खिडकीच्या बाहेर काय दृश्य दिसत आहेत कशाचीच त्याला काहीही जाणीव नव्हती.

बस ब्रेक लागल्यामुळे झटका देऊन थांबली. उजनी आली होती. गणेशच्या चेहऱ्यावर हास्य तरळायला लागलं. आज बॅग घेऊन गर्दीत सगळ्यात समोर तो खाली उतरण्यास धडपडत होता. तो बसच्या बाहेर पडला किंबहुना गर्दीनेच त्याला बाहेर आणले होते. बाहेर पडल्याबरोबर त्याने चहुकडे एक नजर फिरविली.

न जाणो मधुराणी बस स्टॉपवर आपली वाट पाहत उभी असावी...

किती वेडी आशा असते...

त्याने स्वत:लाच समज दिली.

ती बरं कशी असणार इथे?....

तिला आपण यायचा दिवस थोडीच माहित होता....

तेवढ्यात गणेशला सदा त्याच्याकडे येतांना दिसला. गणेशने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

" आवो गणेशराव ... तुमी व्हय... म्या तर आदी ओळखीलंच नाय " सदा समोर येऊन म्हणाला.

गणेश त्याला टाळत समोर जाऊ लागला.

" अन्् हे काय सायेब... एखांद्या... गा... उकंड्यावर लोळ्ल्यागत हाल करून घेतलंयासा" सदा गणेशच्या मागे मागे जात म्हणाला.

गणेशला त्याच्या बोलण्यावरून लक्षात आलं होतं की तो आधी 'गाढवासारखं उकिरड्यावर लोळल्यासारखे हाल करून घेतले' असं म्हणणार होता. पण त्यानं 'गाढवासारखं' म्हणनं टाळलं होतं. गणेशने थांबून आपल्या कपड्याकडे बघितलं. गर्दीतून अगदी प्रथम येणाच्या नादात ते चुरगळले होते. आणि खिडकीतून येणाऱ्या धुळीने ते माखले होते. यावेळी धुळीपासून स्वत:ला वाचविण्याचे भान त्याला कुठे होते? त्याने केसावरून हात फिरवला. केसही विस्कटल्यासारखे आणि धुळीने माखले होते कदाचित. आता या अश्या अवतारात मधुराणीसमोर जायचे. गणेशला स्वत:चीच लाज वाटू लागली.

" आणा इकडं सायेब ... तुमी लई दमला असान ... म्या घेतो ते सामान" सदा म्हणाला.

" नाही ... नको " म्हणत गणेश झपाझप पावले टाकीत निघाला - मधुराणीच्या दूकानाकडे.

त्याला केव्हा एकदा मधुराणी त्याच्या नजरेस पडते असे झाले होते.

क्रमश:...

43 Things Tags:

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Sahitya - Kadambari - Madhurani- CH-14 स्पर्श

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Never be afraid to laugh at yourself, after all, you could be missing out on the joke of the century.

-- Dame Edna Everage

बसमध्ये खिडकीतून धूळ येत होती. तर कधी बस आदळत होती. बसमध्ये चिकार गर्दी होती आणि ती लोकांची चिवचिव. बस घाटातून जातांना गणेशला मळमळ होत असे. पण आज गणेशला काहीच जाणवत नव्हते.

तिच्या हाताच्याच स्पर्शाने आपले हे हाल झाले आहेत ...

तर पुढे काय होणार कोण जाणे?...

स्पष्ट आहे ती आपल्याला प्रोत्साहन देत आहे...

म्हणजे आपल्यालाच तिच्याबद्दल वाटत नाही तर ...

तिलाही आपल्याबद्दल वाटते...

आग दोनो तरफ बराबर लगी हूई है...

खट् खट् ... गणेशला काहीतरी वाजल्या सारखे जाणवले. पण त्याने दुर्लक्ष केले. त्याला त्याच्या दिवास्वप्नातून जागे व्हायचे नव्हते. पुन्हा खट् खट् आवाज आला. यावेळी त्याला कुणीतरी हलविले सुध्दा. त्याने भानावर येऊन बघितले. कंडक्टर होता.

" तिकीट ..." तो पुन्हा खट् खट् वाजवीत म्हणाला.

" हो ... हो ... " गणेशने गोंधळून खिशात हात घातला.

एक पाचची नोट काढून कंडक्टरच्या हातात देत म्हणाला " एक उजनी द्या"

" अहो गाडी उजनीवरूनच निघाली आहे... " कंडक्टर हसत म्हणाला.

" नाही म्हणजे ... एक तालूक्याचे तिकीट द्या" गणेश आपल्या चेहऱ्यावर आलेले ओशाळलेले भाव लपवीत म्हणाला.

कंडक्टर बऱ्याच वेळी हाच राहत असे. गणेशला कुणाकडून तरी कळले होते की त्याचे गाव रस्त्यातच कुठे तरी लागते आणि म्हणून तो ह्याच गाडीवर नेहमी ड्यूटी घ्यायचा. आपल्या गावी गाडी थांबवून तो नेहमी सकाळचा किंवा संध्याकाळचा डबा कलेक्ट करत असे. त्याच्या गावला गाडी जरा जास्तच वेळ थांबायची. डबा घेता घेता दोनचार इकडच्या तिकडच्या जास्तीच्या गप्पाही तो मारत असे. खट् खट् वाजवत त्याने तिकीट फाडलं आणि गणेशच्या हातात दिलं. आणि तो पुन्हा खट् खट् वाजवत पुढे जाऊ लागला. गणेशने ते तिकीट आपल्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवले आणि तो पुन्हा खिडकीबाहेर बघत आपल्या दिवास्वप्नात रमून गेला.

"साहेब उठा ... झोपले का काय?" या आवाजाने गणेश दचकून उठला.

त्याला कुणीतरी खांद्याला धरुन गदगद हलविले होते. गणेशने गोंधळून इकडे तिकडे बघितले तर गाडीतले सगळे जण उतरले होते. गाडी बस अड्ड्यात शिरली होती आणि फक्त तो एकटाच गाडीत अजूनही बसलेला होता. त्याला बसच्या कंडक्टरने उठवले होते. कंडक्टर तुच्छतेने त्याच्याकडे पाहत होता. गणेश चांगलाच ओशाळला होता. आपले भाव लपवीत त्याने वरून आपली बॅग काढली आणि बसमधून उतरु लागला. जेव्हापासून मधुराणीचा गोड स्पर्श त्याला झाला होता... नाही तिने तो मुद्दामच केला असावा ...

नाहीतर ती गोड हसली कशाला असती...

तेव्हापासून गणेश अगदी हवेत तरंगत होता. तिच्या दूकानापासून जड पावलाने केव्हा तो बस स्टॉपवर आला ... केव्हा बस आली... केव्हा तो बसमध्ये चढला आणि केव्हा बस तालूक्याच्या अगदी बस अड्ड्यात येऊन पोहोचली ... त्याला काहीच कळले नव्हते. अगदी अजूनही तिचे ते गोड हास्य, तिच्या त्या स्पर्शाची शिरशीरी आणि तिची ती भेदक नजर त्याच्या डोळ्यासमोरुन हटत नव्हती.

गणेश बसमधून उतरला. त्याच्यामागे कंडक्टरसुध्दा उतरला. बसचा ड्रायव्हर उतरुन कंडक्टरची वाट पाहत मागच्या दारात उभा राहिला होता. कंडक्टरने उतरल्यावर गणेशला थोडे समोर जाऊ दिले आणि दबक्या आवाजात गणेशकडे इशारा करीत चिडून ड्रायव्हरला म्हणाला-

" येडंच आहे... सगळी बस रिकामी झाली ... अन् पाहतो तर हे ध्यान खिडकीच्या बाहेर पाहत बसून होतं.."

ड्रायव्हर गणेशकडे पाहून कुत्सित हसला.

गणेशला सगळं ऐकू येत होतं पण तिकडे दुर्लक्ष करीत तो बॅग घेऊन तिथून निघून गेला.

क्रमश:

Never be afraid to laugh at yourself, after all, you could be missing out on the joke of the century.

-- Dame Edna Everage

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi new book- Novel - Madhurani - CH-13 घर

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

 

The cure for boredom is curiosity. There is no cure for curiosity.

... Ellen Parr

आज शुक्रवार. गणेशला इथे गावात येऊन पाच दिवस झाले होते. सकाळी अंघोळ करून भराभर तो आपलं सामान आवरु लागला. त्याच्या हालचालीत एक उत्साह होता. आज तो तालूक्याच्या ठिकाणी आपल्या घरी परत जाणार होता. घरी परत जाऊन बायकोला आणि मुलाला भेटण्याच्या नुसत्या कल्पनेने सुध्दा त्याच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. दुसरे आनंदाचे कारण म्हणजे मागच्या तीन दिवसात मधुराणीच्या बाबतीत विचलित होणाऱ्या मनाला आवर घालण्यात तो पूर्णपणे यशस्वी राहिला होता. मागच्या तीन दिवसात मधुराणीच्या समोरासमोर येण्याचा कित्येक वेळी प्रसंग आला होता. पण एकदासुद्धा चूकूनही त्याची मधुराणीच्या नजरेला नजर मिळालेली नव्हती. त्याला त्याचाच सार्थ अभिमान वाटत होता. त्याला हेही जाणवत होते की मागच्या तीन दिवसापासून त्याच्या मनाची जी बेचैन अवस्था झाली होती ती शमल्यासारखी जाणवत होती.

गणेश जवळजवळ कपडे घालून तयार झाला होता. तेवढ्यात समोरचं दार वाजलं. त्याने समोर जाऊन दार उघडलं. समोर डोक्याला कापड गुंडाळलेला एक खेडूत उभा होता. त्याने खाली धोतर आणि वर कापडाची बनियन घातली होती. गणेशने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले.

" मालकानं सामान पोचवाया पाठवलं " तो खेडूत म्हणाला.

" कुणी ?... सरपंचांनी? "

'' जी.." तो म्हणाला.

गणेश दारातून बाजूला झाला तसा तो खेडूत आत शिरला. गणेशने कोपऱ्यात ठेवलेल्या त्याच्या बॅगकडे इशारा करीत म्हटले -

'' ती तेवढी एकच बॅग आहे.... ती घेऊन तू समोर हो... मी आलोच मागनं "

" जी "

त्याने डोक्याचे कापड सोडले. त्याची गोल गोल गुंडाळी करून चुंबळ केली आणि डोक्यावर ठेवली. मग बॅग उचलून त्याने डोक्यावर त्या गुंडाळीच्या वर ठेवली. तो बॅग घेऊन दारातून बाहेर जाऊ लागला. '' सांभाळ रे बाबा... वर लागेल " गणेश म्हणाला.

तो दारातून थोडं वाकून बाहेर पडला. त्याच्या बॅग डोक्यावर घेऊन जात असलेल्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत गणेशने दार बंद केले.

गणेशने बाहेर येऊन दाराला कुलूप लावले. त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या प्रत्येक हालचालीत प्रचंड उत्साह ओसंडून वाहत होता. चला आता एकदा बस स्टॉपवर जाण्याच्या आधी झकासपैकी एक सिगारेट पिवूया. त्याने विचार केला. तो कुलूप लावून मधुराणीच्या दुकानात गेला. आता त्याला मधुराणीची नजर टाळण्याची जवळ जवळ सवयच झाली होती.

" एक ब्रिस्टॉल " त्याने एक रुपयाचे नाणे मधुराणीच्या समोर लाकडाच्या पेटीवर ठेवीत म्हटले.

आज मधुराणी काहीच बोलली नाही. नेहमी ती काही ना काही चांगली मोकळी चाकळी गणेशशी बोलायची.

गणेशला उगीच हुरहूर लागून गेली.

आपलं काही चुकलं तर नाही ना?...

मग आज ती का नाही बोलली...

आपल्यावर रागावली तर नसेल ना?...

की कदाचित आपण गावाला चाललो याचं तर तिला दु:ख होत नसावं?....

छे छे असं काही नसावं....

आपण उगीच सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करतो आहोत....

तिने बोलायलाच पाहिजे असं काही आहे का?....

आज नसेल बिचारीचा मूड....

ही तर आपली उगीच जबरदस्ती झाली...

त्याने आपल्या डोक्यातले विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. मधुराणीने चुपचाप आपल्या मागे ठेवलेल्या रॅकमधले ब्रिस्टॉलचे पाकिट काढले आणि त्यातली एक सिगारेट काढून गणेशच्या हातावर ठेवली. अचानक गणेशने चमकून तिच्याकडे पाहिले. सिगारेटच्या व्यतिरीक्त अजून काहीतरी गणेशच्या हाताला जाणवले होते. चक्क मधुराणीने गणेशचा हात सिगारेट देता देता अलगद दाबला होता. का चूकून दाबल्या गेला होता? हे जाणण्यासाठी त्याने तिच्याकडे चमकून पाहिले होते. तिच्या चेहऱ्यावर एक मादक, घायाळ करणारे, रहस्यमय आणि तेवढेच अर्थपूर्ण स्मित पसरले होते. गणेश तिच्या आर्त नजरेत पुन्हा अडकून पडला होता. त्याचा तिच्या डोळ्यात न बघण्याचा निर्धार केव्हाच विरुन गेला होता. त्याचे हृदय धडधडायला लागले. त्याच्या अंगाला दरदरुन घाम फ़ूटला होता. गोंधळून त्याने ती सिगारेट घेतली आणि तो बस स्टॉपच्या दिशेने चालू लागला. त्याला पावले टाकनंसुध्दा जड जात होतं. त्याचे एक मन म्हणत होते की घरी जाणे रहित करावे. पण नको सरपंचाच्या गड्याने सामान समोर बस स्टॉपवर नेले होते. आता जर जाणे रहित करावे तर कुणाला शंका यायची. तसाच जड पावलाने तो कोपऱ्यापर्यंत चालत राहिला. कोपऱ्यावरून कितीही मनाचा निग्रह केला तरी तो वळून मधुराणीकडे पाहण्याचे टाळू शकला नाही. तीही आमंत्रित करणाऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत विरहाचे दु:ख होते, आणि एक अदृष्य आकर्षित करणारी शक्ती होती. जड मनाने तो बस स्टॉपकडे निघाला. आता वळून बघितले तरी ती दिसत नव्हती. ती नजरेआड झाली होती. तरीही त्याला जाणवत होते की ती त्याच्याबरोबरच येत होती. हो अगदी त्याच्या सोबत - हृदयाच्या एका कप्प्यात कुठेतरी घर करून!

क्रमश:

The cure for boredom is curiosity. There is no cure for curiosity.

... Ellen Parr

 

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi sahitya - Novel - Madhurani CH-12 नजरेचे तिर

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Some people like my advice so much that they frame it upon the wall instead of using it.

.. Gordon R. Dickson

सकाळी बऱ्याच उशीरा गणेशला जाग आली. आज गणेशला इथे येऊन पुरते दोन दिवस झाले होते. त्याने डोळे किलकीले करून बघितले तर उन्हाची तिरीप खिडकितून आत आली होती. बाहेरुनसुध्दा लोकांचा गलबला ऐकू येत होता. रात्री बऱ्याच उशीरापर्यंत गणेशला झोप आली नव्हती. काल रात्रीही तीच परिस्थिती होती. रात्री राहून राहून मधुराणीचे आर्त डोळे त्याच्या मन:चक्षूसमोर येत होते. तो ताडकन् उठून उभा राहाला आणि घाईघाईने खिडकीजवळ गेला. खिडकीतून गल्ल्यावर बसलेल्या मधुराणीची एक झलक दिसल्यावर कुठे त्याला बरे वाटले. तिचं इकडे लक्ष नव्हतं. ती आपल्या कामात गुंग होती.

हे आपल्याला काय होत आहे?....

गणेश विचार करु लागला.

पूर्वी कधी आपल्याला असं झालं नव्हतं....

एखाद्या स्त्रीची एवढी ओढ!...

हे काही योग्य नाही...

कदाचित बायकोच्या विरहामुळे आपल्याला असं होत असावं....

पण विरह तरी कसला?...

आपल्याला इथे येऊन जेमतेम दोन तर दिवस झाले आहेत ....

असू शकते.... कदाचित आपल्या प्रिय व्यक्तीचे उणेपण तिच्यापासून दूर गेल्यावरच कळते...

तो हळू हळू चालत आपल्या बॅगजवळ जाऊ लागला. त्याचं मन खिडकीतून हटायला तयार होत नव्हतं. जड पावलांनी मोठ्या मुश्कीलीने तो आपल्या बॅगजवळ गेला. बॅग उघडली. बॅगमधलं वरचं सामान उचलून बुडात हात घातला. बुडातून त्याने त्याचा, बायकोचा आणि मुलाचा फॅमिली फोटो बाहेर काढला. मग कितीतरी वेळ तो त्या फोटोकडे न्याहाळून पाहू लागला.

ही एवढी गोंडस बायको असतांना आपलं मन विचलित का व्हावं?...

नाही. आपण आपल्या मनाला आवर घातलीच पाहिजे....

त्याने मनाचा पक्का निर्धार केला.

गणेश अंघोळ करीत होता. मनाचा निर्धार केल्यापासून त्याला बरं वाटत होतं. पण हा आपला निर्धार टिकला पाहीजे. अंघोळ करता करता त्याच्या डोक्यात एक कल्पना येऊन गेली.

सगळी किमया ही मधुराणीच्या भेदक नजरेत आहे....

आपण तिच्या नजरेला नजरच देण्याचे टाळले तर?...

तर आपला निर्धार टिकविणं कदाचित शक्य आहे...

कदाचित नाही आपल्याला आपला निर्धार टिकवलाच पाहीजे...

इतका वेळ संथपणे अंधोळ करणाऱ्या गणेशला आता घाई झाली होती. आता अंघोळ आटोपून आपण तिच्या दूकानात जाऊया. नाहीतरी त्याला काही घरात लागणाऱ्या चिल्हर वस्तू खरेदी करायच्या होत्या. त्याने ठरविलं की तिच्या दूकानात जायचं. सामान खरेदी करायचं. कदाचित तिच्याशी - ती बोलली तर बोलायचं सुध्दा. पण काहीही झालं तरी तिच्या नजरेला नजर द्यायची नाही.

झालं तर मग ठरलं....

अंघोळ आटोपून गणेशने पटापट कपडे घातले. खुंटीला लटकविलेली थैली काढली आणि तो घाईघाईने निघाला - मधुराणीच्या दूकानात. त्याच्या मनात एक विचार डोकावून गेल्यावाचून राहिला नाही.

ही कसली घाई...

ही कसली ओढ !...

तिच्याकडे बघण्याचीसुध्दा ओढ आणि आता तिच्या नजरेला टाळण्याचीसुध्दा ओढ....

सगळं कसं अजबच वाटत होतं.

रिकामी थैली एका हातात घेऊन गणेश तिच्या नजरेला नजर देण्याचे कटाक्षाने टाळीत मधुराणीच्या गल्ल्यासमोर उभा राहाला. त्याने त्याच्या हातातली रिकामी थैली नोकराकडे दिली.

" बोला सायेब ... काय पायजे " मधुराणी गणेशच्या डोळ्यात डोळे घुसवून म्हणाली.

गणेश तिच्या नजरेला नजर देण्याचे टाळीत तिच्या डोक्यावरून मागे बघत म्हणाला, " ही लीस्ट आहे "

त्याने सामानाची यादी मधुराणीच्या हातात दिली.

" सायेब .. आमच्या दूकानात यादी घेऊन येणारं कदाचित तुमीच पहिलं गिऱ्हाईक असान " तिनं यादी हातात घेऊन आलटून पालटून पाहत म्हटले.

मग यादी त्याला परत करीत ती म्हणाली, " मंग वाचाकी जोरानं यादी ... मी वाचली काय अन्् तुमी वाचली काय एकच "

तो यादी परत घेऊन वाचू लागला.

" लक्स एक .. रिन एक... चहापत्ती सव्वाशे ग्रॅमचा एक पूडा... साखर एक किलो...अगरबत्ती एक पूडा ... चांगला द्या जरा सुवासिक... "

नोकर पटापट सामान काढत होता.

" आवो जरा ... दमानं ... त्याला सामान काढू द्या की एक एक ... नायतर होईल त्या दिवशीसाखी गडबड.."

मधुराणी गोड हसली. गणेशही तिच्या मोत्यासारख्या चमकणाऱ्या दाताकडे पाहत हसला. पण तिच्या नजरेला मात्र तो कटाक्षाने टाळीत होता.

नोकराने सर्व सामान पिशवीत भरुन ती पिशवी गणेशच्या हातात दिली. तेवढ्यात तिथे सदा आला. गणेशने सदाकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. परवाच्या शिव्या तो अजून विसरला नव्हता. सदा आपण होऊन गणेशजवळ गेला.

" नमस्कार गणेशराव " सदाने त्याला आदबीनं नमस्कार केला.

गणेशने सदाकडे दुर्लक्ष केलं. सदाचं त्या रात्रीचं रुप आणि आताचं रुप यात जमीन आसमानचा फरक होता. त्यामुळे या माणसाशी कसं वागावं गणेशला काहीच कळत नव्हतं.

गणेश आपली सामानाची पिशवी घेऊन जायला निघाला.

" आणा इकडं ... मी घेतो झोऱ्या '' सदा गणेशच्या हातातली थैली घेत म्हणाला.

'' नाही ... नको '' जवळ जवळ त्याच्या हातातली थैली हिसकावून घेतच गणेश म्हणाला

मधुराणी पोट धरून हसूं लागली.

गणेश जसा आपल्या खोलीकडे जाऊ लागला तशी मधुराणी म्हणाली-

" पुर्फुन्हार्फा कर्फधीर्फी येर्फेतार्फा "

" काय... काय?" गणेश वळून पण तिच्या डोळ्यात न बघता म्हणाला.

" काय नाय .... तुमालाबी ही भाषा शिकवावी लागेन असं दिसतं... " मधुराणी लाघवीपणे म्हणाली.

गणेशला तिच्या या लाघवी बोलण्याने तिच्याकडे बघण्याचा एकदम मोह झाल्यासारखे झाले.

पण नको...

नजरेचे तीर निष्प्रभ होतात हे पाहून शत्रूपक्षाने हे दुसरे अस्त्र टाकलेले दिसते...

गणेश मोठ्या मुश्किलीने स्वत:वर नियंत्रण करीत सदाला टाळत आपल्या खोलीकडे निघाला.

सामानाची थैली घेऊन घरात आल्यावर प्रथम गणेशने समोरचं दार लावून घेतलं. खिडकीतून त्यानं पाहिलं. सदा गेला होता. त्यानं सुटकेचा श्वास टाकला. त्याचं लक्ष मधुराणीकडे गेलं. मधुराणी आपल्या कामात मग्न गल्ल्यावर बसलेली होती. गणेशने खिडकीतून बाजूला होत थैली कोपऱ्यात ठेवली; शर्टच्या वरच्या खिशातून सिगारेटचे पाकिट काढले. त्यातली सिगारेट काढून त्याने ती देवळीत ठेवलेल्या माचीसने पेटवली. तो आता सिगारेटचे लांब लांब झुरके घेऊ लागला. त्याला या गोष्टीचे समाधान वाटत होते की त्याने मघाशी दूकानात एकही वेळ मधुराणीच्या नजरेला नजर भिडविली नव्हती. त्याच्या मनातली घालमेलही आता कमी झाल्यासारखी वाटत होती. त्याला तिच्या नजरेचे सर्व भेदक तीर निष्प्रभ केल्याचा विजयी आनंद होत होता.

क्रमश: ...

Some people like my advice so much that they frame it upon the wall instead of using it.

.. Gordon R. Dickson

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Loading...
Loading...
Loading...

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network