कादंबरी - अद्-भूत (संपूर्ण) Horror, Suspense, Thriller [Email this] English Version-> [Aghast]
कादंबरी - शून्य (संपूर्ण) Suspense, Thriller [Email it] English Version->[Zero]
कादंबरी - ब्लैकहोल (संपूर्ण) Mystery, Suspense [Email it] English Version->[Black Hole]
कादंबरी - ई लव्ह (संपूर्ण) Romantic, Suspense [Email it] English Version->[eLove]
कादंबरी - मधुराणी (संपूर्ण) Story of a femine power [Email it] English Version->[Honey]
कादंबरी - मृगजळ (संपूर्ण) Romantic, Drama, Psy Thriller[Email it] English Version->[Illusion]
Mrityunjay - Immortal(Next Novel)
- Political Suspense Thriller -
A translator to translate ‘Mrugjal & Madhurani’ from English/Marathi to Hindi is required on volunteer basis Interested may contact -> marathinovel at gmail.com. Due credit as ‘Hindi version by ---XYZ---‘ will be given on the blog ‘HindiNovels.net’.

Marathi Book vishwa - Madhurani CH-36 दाराची कडी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

sponsered link - मराठी कथा

Marathi Book vishwa - Madhurani CH-36 दाराची कडी

त्याने हळूच मधुराणीच्या उघड्या घराच्या दाराची कडी वाजवली.

आतून काहीच कसा आवाज नाही...

मधुराणी आहे नं घरात?...

गणेशने पुन्हा दाराची कडी वाजवली.

" कोण हाय?" आतून मंजुळ आवाज आला.

गणेशच्या कंठातून आवाज फुटेनासा झाला.

इथे आवाजच निघत नाही तोंडातून...

इथेच अशी फसगत झाली तर पुढे कसं होईल?...

चला असंच पटकण परत वळू या...

पण नाही असं ऐन वेळी पळ काढणं योग्य नाही...

पळ काढणे हे काही हिमतीचं लक्षण नव्हे...

आणि मर्दानगीचं तर नाहीच नाही...

आता आपल्याला हिम्मत दाखवायलाच पाहिजे...

आपल्याला पुरुषार्थ दाखवायला पाहिजे...

स्त्री कितीही हिम्मतवान असली तरी पुढाकार हा पुरुषानेच घ्यावा लागतो...

" कोण हाय?" आतून पुन्हा आवाज आला. यावेळचा आवाज थोडा वैतागलेला वाटत होता.

" मी ...गणेश" गणेश कसाबसा बोलला.

चला आपल्या कंठातून आवाज तर फुटला...

त्याला त्याचाच आनंद झाला. आणि अजून धीर आला.

असंच आपल्याला धीरानं घ्यावं लागेल...

" गणेश ... मंग या की आत... मी इकडं कपडे बदलत आहे" आतून आवाज आला.

मधुराणीचे कपडे बदलण्याच्या आधीचे एक चित्र गणेशच्या डोळ्यासमोरुन तरळून गेलं.

तिच्या शरीराची आजपर्यंत आपण नुसती कल्पना करत होतो. आज कदाचित ते प्रत्यक्ष पाहण्याचा योग दिसतो...

त्याच्या श्वासांची गती अजूनच वाढू लागली.

तिनं कपडे बदलत आहे हे सांगण्याची काही गरज नव्हती...

म्हणजे मुद्दामच तिने आपण कपडे बदलत आहोत हे सांगितले...

हा एक निमंत्रणाचाच भाग समजायला पाहिजे का...

अर्थातच... किंबहुना इतक्या दिवसापासनं ती सिग्नल वर सिग्नल देत होती...

अजून यापेक्षा किती स्पष्ट सिग्नल तिने द्यायला हवा...

गणेश हळू हळू घरात गेला. जातांना न विसरता त्याने समोरच्या दाराला लावून आतून कडी घातली. त्याला कडी घालतांना जाणवले की आपले हात थरथरताहेत. आणि पायसुध्दा गळून गेल्यासारखे होत आहेत. कडी लावून तो आत वळला. एक मोठा दीर्घ श्वास घेऊन त्याने पुन्हा आपली हिम्मत एकवटण्याचा प्रयत्न केला.

" तिथं वसरीत बसा ....बाजंवर" आतून पुन्हा आवाज आला.

ती फक्त ओसरीत बसा एवढंसुध्दा म्हणू शकली असती...

बाजंवर म्हणण्याचा तिचा काहीतरी गुपीत उद्देश असावा...

नक्कीच हाही एक निमंत्रणाचाच प्रकार...

आता असंच सरळ आत जावं ...

पुन्हा मधुराणीची विवस्त्र आकृती त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेली.

हं आताच गेलं पाहिजे...

हाच सगळ्यात चांगला चान्स आहे...

तो ओसरीतल्या बाजेपर्यंत चालत आला. आता तो तिथून सरळ आत जिथे मधुराणी कपडे बदलत असावी तिथे जाण्याचा मनाचा हिय्या करु लागला. पण हे काय. त्याचं मन जाण्यास तयार होतं पण पाय साथ देत नव्हते. ते एकदम गळून गेले होते. सर्व अंगाला दरदरुन घाम आला होता. अश्या अवस्थेत मधुराणी आपल्याला पाहिल तर ती काय विचार करील. तो मटकन तिथे ओसरीत ठेवलेल्या बाजेवर जाऊन बसला. बसल्यावर त्याला जरा बरे वाटले. त्याने आपल्या सदऱ्याच्या खिशातून रुमाल काढला आणि तो आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसु लागला.

" मधुराणी मला पाणी हवं होतं... फार तहान लागली अन्... आज गड्यानं पाणीसुध्दा भरलं नाही" तो केव्हा बोलला त्याला कळलंच नाही.

एकदम गप राहणं ही योग्य नाही ...

बोलून थोडं वातावरण मोकळं ठेवणंही आवश्यक आहे...

त्याने त्याच्या मनाची समजूत काढली.

" पाणीच पायजे नं ... मंग एवढं स्पस्टीकरन कशापाई... तुमाला कधी ना हाय का माझ्या घरी येण्यासाठी" आतून मधुराणीने गणेशची फिरकी घेतली.

तुमाला कधी ना हाय का माझ्या घरी येण्यासाठी...

मधुराणीचे हे वाक्य त्याच्या डोक्यात राहून राहून फिरु लागले.

म्हणजे हेही निमंत्रण...

आणि तेही अगदी स्पष्ट...

आता काही तरी करायलाच पाहिजे...

" नाही तसं नाही ... " गणेश बाजेवरून ताडकन उभा राहत आपला काहीतरी बोलला.

तो हळू हळू मधुराणीचा आवाज जिकडून येत होता तिकडे जाऊ लागला.

एवढ्यात...

" देतेच हं एवढी वेणी घातली की देतेच ... " म्हणत मधुराणीच आतून बाहेर आली.

गणेश पटकण मागे सरकून बाजेवर जाऊन बसला.

पुन्हा वेळ चुकली ...

अश्या बाबतीत टायमींगला फार महत्व असतं...

असं कितीदा मी वेळ चूकविणार?...

असं जर नेहमी होत गेलं ...

तर एक दिवस ती आपल्याला अव्हेरनार...

अन् वर म्हणणार... वेंधळाच आहे...

काही कामाचा नाही हा माणूस...

गणेशने तिच्याकडे पाहले. मधुराणीने हिरवी साडी नेसली होती. हिरव्या साडीत ती अजूनच खुलून दिसत होती. त्याची नजर आपसूकच तिच्या डोळ्याला जाऊन भिडली. तिच्या डोळ्यात एक खोडकरपणा गणेशला दिसला. गणेशला अजूनच हूरुप आला. मनात आलेली वैफल्यावस्था पूर्णपणे नाहीशी झाली होती.

गणेश जिथे बसला होता तिथे बाजेच्या मागे एक देवळी होती. तिथे मधुराणी आपल्या दातात केसांची पीन आणि हातात विंचरलेले केस धरीत गेली. तिथून वाकून देवळीत बघण्यासाठी बरीच जागा होती. पण मधुराणी आपल्या मांडीचा स्पर्श गणेशच्या मांडीला होत वाकली आणि देवळीत काहीतरी शोधू लागली. गणेशला ते अजून एक खात्रीलायक निमंत्रणच होते. त्याच्या मनातल्या भावनांचे आता निश्चयात रुपांतर झाले. गणेशचे हात तिच्या कमरेला विळखा घालण्यास शिवशिवू लागले. गणेशने मनाचा हिय्या करून आपले हात पुढे सरसावले. तो तिच्या कमरेला विळखा घालणार एवढ्यात ती मागे सरकून पुन्हा आत जायला लागली. कदाचित ती जे शोधत होती ते तिला देवळीत सापडले असावे.

अजून एक चांगली संधी हूकल्याचा मन:स्ताप गणेशच्या चेहऱ्यावर दिसू लागला. गणेशने आत जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघितले. मोठ्या गळ्याच्या ब्लाऊजमधून तीची गोरी मान आणि खांदा जणू गणेशला खुणावत होता. आत जाण्याच्या आधी दरवाज्यात ती थांबली आणि तिने फिरुन एक भेदक नजर गणेशवर टाकली. ती आत गेली होती आणि गणेश घायाळ अवस्थेत बाजेवर बसलेला होता. तो खाडकन् उभा राहिला.

आता आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे...

याच्यापेक्षा चांगला मौका पुन्हा पुन्हा येणे नाही ...

तो मधुराणी ज्या खोलीत गेली होती तिकडे चालू लागला. त्याच्या श्वासांची गती वाढत होती. त्याने मनातली भीती सगळी झटकून टाकली. त्याच्या अंगात आता जोम संचारला होता. तो त्या खोलीच्या उघड्या दारात येऊन उभा राहाला. मधुराणी पाठमोरी उभी राहून आपली वेणी विंचरत होती. तो आत गेल्यामुळे खोलीतला उजेड अडला होता. म्हणजे तो आल्याची तिला नक्कीच चाहूल लागली असावी. पण ती आपली वेणी विंचरण्यात अजूनही मग्न होती. म्हणजे मुद्दाम ती तसे दाखवीत असावी. तो तिच्या जवळ जायला लागला. त्याच्या श्वासांची गती आणि उष्णता त्याला जाणवू लागली. त्याच्या कनपट्या गरम व्हायला लागल्या होत्या. त्याला आता सगळं असह्य झालं होतं.

एक ... दोन... तीन....त्याने आता श्वास रोखून वाघाने आपल्या सावजावर झेप मारावी तसे तीचा हात एकदम आपल्या हातात पकडला. जे आपण ठरविलं होतं ते करून दाखविल्याचा आनंद त्याला झाला होता.

आता त्याला मधुराणीच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा होती.

मधुराणी आपला हात सोडवत एकदम मागे सरसावली. हे म्हणजे त्याला अगदी अनपेक्षित होते. तिने आपल्या डोळ्याचा एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला. त्या डोळ्यातल्या भावना तो समजण्याचा प्रयत्न करु लागला. पण काही केल्या त्याला त्या भावना कळत नव्हत्या.

तिला आपल्या या कृत्याचा राग आला होता का?...

ती आपल्याला अजून प्रोत्साहीत करीत होती की अजून काही...

त्याला काही समजत नव्हते. त्याने मनाचा हिय्या करून पुन्हा तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला.

" आवो असं काय करता?" त्याच्या कानावर मधुराणीचे शब्द घणाणले.

मधुराणी पुन्हा त्याच्याकडे एक सरळ कटाक्ष टाकत फिरुन खोलीतून बाहेर पडू लागली.

पुन्हा त्याच्या श्वासांची गती वाढली... गरम श्वास जाणवायला लागले... कनपटी गरम झाली ... पण यावेळी त्याची फजीती झाल्याच्या शरमेच्या भावनेने.

म्हणजे हिने आपल्या प्रेमाचा अव्हेर केला आहे...

गणेशला ते खरेच वाटत नव्हते.

आपण हिच्या मनातल्या भावना ओळखण्यात एवढं कसं चुकलो...

त्याचं अवसान पूर्णपणे गळलं होतं... मटकन खालीच बसावं असं झालं होतं.

जाता जाता मधुराणी दारात वळून उभी राहाली. तिच्या नजरेत त्याला राग, प्रेम, द्वेश, पश्चाताप, तिरस्कार या सगळ्या भावनांचे दर्शन घडले.

आपण काहीही सहन करु पण तिचा राग आणि तिरस्कार सहन नाही करु शकणार...

आपण उगेचच या फंदात पडलो...

एका स्त्रीचं ह्रदय ब्रम्हदेवालाही कळू शकलेलं नाही म्हणतात ते काय खोटं नाही...

त्याला स्वत:चाच राग येत होता. त्याला मधुराणीचाही राग येत होता. त्याने स्वत:ला सावरले आणि झपाझप पावले टाकत तो बाहेर पडला. बाहेर मधुराणीकडे पाहण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. पण त्याचे तिरपे डोळे तिच्याकडेच होते. तसंच झपाझप चालत तो समोरच्या घराच्या बंद दरवाजाजवळ गेला. दाराची कडी उघडली. बाहेर जाण्याच्या आधी तिरप्या डोळ्याने मधुराणीकडे बघितले.

त्याला तिच्या डोळ्यात ' थांब .. असा ... मध्यावर टाकून मला एकटं सोडून जाऊ नकोस' अशा भावना दिसल्या.

पण नाही नको...

आतापर्यंत आपण हिला समजण्यात कदाचित चूकत गेलो...

ती चूक आता पुन्हा नको...

खाडकन त्याने दार बाजूला सारले आणि तो बाहेर पडला. त्याने मागे वळून पाहण्याचीसुद्धा तसदी घेतली नाही.

बाहेर येऊन उन्हातही त्याला आता बरे वाटत होते. त्याच्या घामेजलेल्या शरीराला शिवून एक वाऱ्याची झूळक गेली. त्याला छानपैकी थंडगार वाटत होते.

चला एक घाव दोन तुकडे झाले...

हे असं किती दिवस भिजत घोंगडं ठेवायचं होतं...

तो मधुराणीच्या घरातून बाहेर येऊन त्याच्या खोलीसमोर आला. बराच वेळ तिथे घूटमळला.

आता कुठं जावं?...

खोलीवर जावं?...

की लग्नाच्या तिथं?...

खोलीवर एकदमचं एकटं वाटलं असतं. तेवढा एकांतही त्याला नकोसा वाटत होता. म्हणजे तेवढ्या एकांताची त्याला भीती वाटत होती. लग्नाच्या तिथं जावं तर ... तिथे बिलकुलच एकांत नव्हता. तेवढा गलबलाही त्याला नको होता. मग तो त्याची खोली सोडून आणि लग्नाचं ठिकाण सोडून जिकडे त्याला त्याचे पाय नेतील तिकडे चालू लागला. तो लग्नाच्या ठिकाणाच्या अगदी विरुध्द दिशेने बाजाराकडे चालू लागला. चालताना त्याचं कुठेही लक्ष नव्हतं.

आज गुरुवार नसल्यामुळे बाजाराचं मैदान एकदम रिकामं होतं. बाजाराच्या मोकळ्या मैदानात तो एका जागी येऊन उभा राहिला. त्या मैदानात त्याने चहुकडे नजर फिरविली. एवढ्या मोठ्या मैदानात तो एकटाच उभा होता.

कसं एकदम भकास वाटतं...

मग बराच वेळ वेड्यासारखं गावात तो इकडे तिकडे फिरला. जवळजवळ सगळेच लोक लग्नाच्या घरी गेले असल्यामुळे गाव कसं रिकामं रिकामं वाटत होतं. जसं एखाद्या डाकुच्या टोळीने आत्ताच लूटून न्यावं तसं. फिरता फिरता एका जागी दूर कुठेतरी त्याला मानवी उपस्थितीची जाणीव झाली. कुणाचा तरी आवाज येत होता. तो तिकडे वळला. जेव्हा तो जवळ जाऊन पोहोचला तेव्हा त्याला कळले की आपण मुकीच्या घरासमोर येऊन थांबलो आहोत. मुकीच्या घराला बाहेरुन कुलूप होते.

मुकीच्या घरचे लोक नक्कीच लग्नाच्या घरी गेले नसावेत...

मग ते कुठे गेले असावेत....घराला कुलूप लावून...

शेतात वैगेरे गेले असावेत...

पण घराच्या आतून आवाज येत होता. ह्रदयाला भिडणारा... माणसाच्या सगळ्या जाणीवा एकदम शिथील करणारा... दगडालाही पाझर फोडणारा... मुकीचा चित्कार... ते तिच्या तुटलेल्या ह्रदयाचे चित्कार येत होते. कदाचित त्याचे ह्रदयही असेच चित्कार करित होते. पण ते त्याच्याशिवाय कदाचित कुणालाही ऐकू येत नव्हते.

क्रमश:

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi blog of Novels - Madhurani CH-35 मुक्याचं लग्न

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

sponsered link - मराठी जोक्स

Marathi blog of Novels - Madhurani CH-35 मुक्याचं लग्न

आज गावात सर्वत्र वर्दळ जाणवत होती. आज मुक्याचं लग्न होतं. मुक्याच्या बापानं अन् मामानं आटापिटा करून मुक्यासाठी दुसरी मुलगी शोधली होती. मुलगी शेजारच्याच एका गावातली एका गरीब घरातली होती. नवरा मुका असला म्हणून काय झालं आपली पोरगी मुक्याच्या इथे असलेल्या बागायती शेतीमुळे कमीत कमी रेलचेलीत तर नांदेल. नवरीच्या बापाने विचार केला असावा. मुलीच्या बापाची एवढी हलाखीची परिस्थिती होती की त्याची लग्न लावण्याचीसुध्दा ऐपत नव्हती. म्हणून मुक्याच्या बापानेच लग्नाची सर्व जबाबदारी घेतली होती आणि लग्न मुलाकडेच ठेवलं होतं. पोरगी मिळेपर्यंत मुका कडक बंदोबस्तात होता. त्याला मुकीला भेटण्याची बिलकुल परवानगी नव्हती. इकडे मुकीच्या बापानेही तिला जवळपास कोंडूनच एका खोलीत ठेवले होते.

लग्न सकाळी अकराच्या सुमारास होतं. पहाटे सात वाजेपासूनच मुलीकडच्या मंडळीच्या बैलगाड्या येणं सुरु झालं होतं. ती मंडळी मुलीकडची असल्यामुळे त्यांची कुणी जास्त वरवर करीत नव्हतं. वर टेकडीवरच्या शाळेत त्यांची उतरण्याची व्यवस्था केली होती.

इकडे गावात गावातली मंडळी जसं आपल्याच घरचं लग्न या थाटात नविन कपडे घालून मिरवीत होते. गावात एखादं लग्न असलं की मंडपाची, लाऊडस्पीकरची जबाबदारी भिकाकडे असे. जेवणावळीची व्यवस्था किसनकडे असे. त्यांच्या आपापल्या टीम ठरलेल्या असत. पाटील, सरपंच मंडळीचे सर्वच मंडळीना वेळोवेळी मार्गदर्शन असे. गावातल्या वारकाकडे लोकांची केस कापने, दाढी करणे, मालिश करणे या व्यतिरिक्त अशा लग्नप्रसंगी निमंत्रण देण्याची, लग्न मंडपात लोकांना टीका लावण्याची अश्या जबाबदाऱ्यासुध्दा त्याचेकडे असत. या कामाचे लोकांना वारकाला कधीही पैसे द्यावे लागत नसत. ते वर्षातून एकदा त्याला एक पायली, दोन पायली असा धान्याच्या स्वरूपात मोबदला देत. आणि लग्नप्रसंगाच्या कामाच्या मोबदल्यात त्याला आणि त्याच्या कुटूंबीयांना नविन कपडे मिळत. लग्नप्रसंगाला दोन तीन दिवस जसे घरच्या लग्नासारखे त्याचे कुटूंबच्या कुटूंब झटत असे. त्यांचे खाने पीणे सगळे मग लग्नघरीच.

झालं दहा वाजले. लग्नघरची वरदळ अजूनच शिगेला पोहोचली होती. त्यातच बँडबाजाचा आवाज लाऊड्स्पीकरवरचे गाणे याने वातावरण अजूनच भारुन गेल्यासारखे वाटत होते. गणेशला वारीक सकाळीच निमंत्रण देऊन गेला होता. गणेशने नविन इस्त्रीचे कपडे अंगावर चढवले आणि तो आपल्या खोलीला कुलूप लावून घराच्या बाहेर पडला. त्याने नेहमीप्रमाणे एक नजर मधुराणीच्या दुकानाकडे टाकली. दुकान बंद होतं. मग त्याने तिच्या घराकडे पाहालं. घर उघडंच होतं. तेवढ्यात घरातून त्याला दुकानावरचा नोकर आणि मधुराणीचा सासरा बाहेर पडतांना दिसले. ते बहुतेक लग्नघरीच जात असावेत. ते दोघं जाईपर्यंत गणेश तिथेच आपल्या दाराजवळच घुटमळला. मधुराणीच्या घरांच दार अजूनही उघडं होतं म्हणजे मधुराणी अजूनही घरातच होती. गणेशच्या डोक्यात एकदम विचारचक्र फिरु लागलं....

गावातली जवळपास सगळी मंडळी लग्नघरी जात आहेत...

आणि मधुराणी घरात एकटीच आहे...

म्हणजे हा चांगला मौका आहे...

नाहीतरी एक सुप्त विचार आपल्या मनात आणि कदाचित तिच्याही मनात बऱ्याच दिवसांपासून घोळत आहे...

आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याला यासारखा एकांत आणि मौका कधीही भेटणार नाही ...

गणेशची पावले आपसूक मधुराणीच्या घराकडे चालू लागली. जाता जाता मधुराणीचा मादक स्पर्श आठवत होता. तिची आर्त निमंत्रीत करणारी नजर आठवत होती. आणि ते नेहमीचं तिचं खोडकर हास्य.

आपण चाललो तर खरं....

पण तिथे गेल्यावर आपली फजिती तर नाही होणार ना?...

म्हणजे आतापासून सगळी प्लॅनींग केलेली बरी...

सुरवात कशी करायची...

तो हळू हळू सगळं काही मनाशी निश्चीत करीत तिच्या घराकडे चालू लागला. अधून मधून आजूबाजूलाही पाहत होता.

कुणी आपल्याला पाहत तर नाही ना?...

नाही तर करणं काही नाही अन् फुकटची बदनामी...

चला कुणी तर दिसत नाही...

पण असंच जाणं चांगलं दिसणार नाही ...

काहीतरी निमित्त केलं पाहीजे....

नाहीतरी आज लग्नाच्या गडबडीमुळे आपल्या घरात सरपंचाच्या गड्याने पाणी भरलेलं नाही ...

या अशा भर उन्हाळ्यातल्या तापलेल्या उन्हात पाणी पिण्याचं निमित्त एकदम चांगलं राहील...

तशी त्याला गरम वातावरणामुळे तहान लागलेलीच होती पण आता त्याच्या घशाला अजूनच कोरड पडू लागली - अर्धी उन्हामुळे आणि अर्धी त्याच्या मनस्थीतीमुळे. तो तिच्या घराच्या दाराजवळ जाऊन उभा राहिला. त्याने पुन्हा सभोवार एक नजर फिरविली.

कुणी पाहत तर नाही? ...

आजूबाजूला कुणीच नव्हते...

लग्नघरच्या लाऊडस्पीकरचा आणि बँडबाजाचा आवाज येत होता. त्या आवाजाने गणेशच्या अंगात अजूनच उत्साह आणि आवेश संचारला. त्याच्या श्वासांची गती वाढली होती. ह्रदयही धडधड करायला लागलं होतं.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Online Library - Madurani - CH-34 शिरशिरी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Online Library - Madurani - CH-34 शिरशिरी

एक दिवस गणेश महाद्याची बॉलींग खेळत होता अन् तिकडे आंब्याच्या सावलीत मधुराणी उभी होती. त्याचं सगळं लक्ष तिकडे मधुराणीकडे. इकडे महाद्यानं कधी बॉल टाकला अन् गणेशच्या डोक्याला घासून गेला ते त्याला कळलंच नाही. ते तरी बरं बॉल नुसता त्याच्या डोक्याला घासून गेला. नाहीतर कवटीच फुटायची बला होती. गणेश घाबरुन खाली पडला. सगळे जण त्याच्या अवतीभोवती जमा झाले. मधुराणीसुध्दा धावत आली. तिने खाली बसून गणेशचं डोकं चाचपलं. तिच्या हाताला लाल लाल रक्ताचा डाग लागला.

" ए कोणीतरी जाऊन डॉक्टरला ... जसा हाय तसा घेऊन या" मधुराणीने पूर्ण सुत्र आपल्या हातात घेतले.

गणेश दोन्ही हाताने डोकं धरुन निपचित खाली पडून होता.

" गणेशराव... गणेशराव..." तिने हलवून गणेश शुध्दीवर आहे का याची खात्री केली.

गणेशने तसेच डोकं धरलेल्या स्थितीतच मधुराणीकडे एक आर्त नजर टाकली.

" ए गणप्या त्या लभाण्याच्या इथून तू पाणी आण"

" गणेशराव ... कसं वाटतं..." एक पोरगा म्हणाला.

" ए मुड्द्या बाजूला हो ... डोस्क्याला लागल्यावर कसं वाटणार हाय" मधुराणी त्याच्यावर चिडून ओरडली.

" नाय म्हंजी वकल्यासारखं वाटते का... " तो पोरगा म्हणाला.

तेवढ्यात गणप्या पळत एका लोट्यात पाणी घेऊन आला.

" गणेशराव ... थोडं पाणी प्या ... मंग बरं वाटल... " मधुराणी म्हणाली.

" जरासं पाणी त्याच्या तोंडावर मार रे... " एकजण म्हणाला.

" आरं तोंडावर पाणी मारायला तो काय... बेसुध पड्ला व्हय... चांगलं होश हाय तेला..." दुसरा म्हणाला.

सगळ्यांना गणेशसाठी काहीतरी करायला पाहिजे असं वाटत होतं पण कुणाला काय करावं काही सुचत नव्हतं. कुणी त्याचे तळपाय चोळु लागला, कुणी त्याला थापटत होता तर कुणी कुरवाळायचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात बबन्या डॉक्टरची बॅग घेऊन पळत आला आणि मागे मागे डॉक्टर त्याला गाठण्याचा प्रयत्न करीत पळत होते. बबन्याने आल्या आल्या खाली बसून डॉक्टरची बॅग उघडली.

" आरं आता काय तुच इंजक्शन देतं व्हय ... येऊ दे की डाक्तरला" एकाजणाला एवढ्या गोंधळातही मस्करी करण्याचा मोह आवरला नाही.

तेवढ्यात डॉक्टर तिथे येऊन पोहोचले.

" कुठे लागलं?'' डॉक्टर कसेतरी दम लागलेल्या स्थितीत दोन श्वासांच्या मधे बोलले.

" डोस्क्याला लागला चेंडू... " गर्दीतलं कुणीतरी एकजण बोललं.

" नुसता चाटून गेला म्हून बरं नायतर कवटीच फुटली आसती" दुसरा एकजण बोलला.

बोलणाऱ्याकडे मधुराणीने नुसते रागाने बघितले.

बोलणारा काय समजायचं ते समजून चूप बसला.

" कस मळमळल्यासारखं होतं का गणेशराव?" डॉक्टरने विचारले.

गणेशने नुसतं डोकं हलवून 'नाही' म्हटलं.

मग डॉक्टरने स्टेथेस्कोप काढून कानाला लावला आणि गणेशची छाती पोट तपासू लागले.

" त्याच्या डोस्क्याला लागलं अन् हे ध्यान बग त्याची छाती पोट तपासते..." एकजण दबलेल्या आवाजात खुसफुसला.

" अजून कुठे तर नाय लागलं ना काही?" डॉक्टरने तपासता तपासता विचारले.

पुन्हा गणेशने नुसतं डोकं हलवून 'नाही' म्हटलं.

डॉक्टर गणेशची नाडी तपासू लागले. मधुराणी प्रश्नार्थक चेहऱ्याने डॉक्टरकडे पाहू लागली.

" घाबरण्याचं काय कारण नाय ... थोडा मार लागलेला हाय बस येवढंच... " डॉक्टर आपला स्टेथेस्कोप गुंडाळून बॅगमध्ये ठेवूत म्हणाले, " मी काही गोळ्या देतो ... त्या यांना दोन टाईम घ्यायला सांगा... त्यानं आराम पडल''

डॉक्टरने त्याच्या बॅगमधून दोन शिशा काढल्या. प्रत्येक शीशीतल्या तीन गोळ्या काढून त्याचे अर्धे अर्धे असे तुकडे केले आणि दोन्ही गोळ्यांचे दोन अर्धे तुकडे असे मिळून सहा पुड्या बांधल्या.

" ह्या पुड्या त्यांना सकाळ संध्याकाळ घ्यायला सांगा " मधुराणीच्या हातात पुड्या ठेवत डॉक्टर म्हणाले.

रात्र झाली होती. गणेश नुसता तापाने फणफणला होता. संध्याकाळ पासून त्याला भेटायला येणाऱ्यांची नुसती रिघ लागली होती. सरपंच, पाटील, मास्तर सगळे येऊन गेले होते. शेजारच्या सारजाबाईने ज्वारीची पातळ पेज करून आणली होती. तिने स्वत:च्या हाताने चमचा चमच्याने त्याला पाजली होती. तीही बऱ्याच वेळ थांबून आपल्या घरी निघून गेली. आता रात्रीचे बारा बाजले असावेत. मधुराणी अजूनही त्याच्या उशाशी बसून होती. मधूनच कधी ती त्याच्या कपाळावरून तर कधी चेहऱ्यावरून हात फिरवीत होती. गणेशला अशा अवस्थेतही तीचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. त्याला वाटत होते की कचकन मधुराणीला आपल्या बाहूपाशात ओढून घ्यावे. पण त्याचे हातपाय गळून गेलेले होते. अर्धे तापाने आणि अर्धे मधुराणीच्या स्पर्शाने.

" तू जा आता मधुराणी ... जा बरं जाऊन झोप आता " गणेश पडल्या पडल्याच आपल्या मनात चाललेली घालमेल लपवीत म्हणाला.

त्याच्या अंगात ताप अजूनही होता. हाता पायात गोळे येऊन अशक्तपणा आला होता. डॉक्टरने डोक्याला जखम झाली तिथे पट्टी बांधली होती.

" तुमाला अशा अवस्थेत सोडून?" मधुराणी गणेशच्या गळ्याचा ताप बघत म्हणाली.

त्यालाही ती तिथेच हवीहवीशी वाटत होती. त्याने तीचा हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या छातीशी घट्ट धरुन पकडून राहिला.

ती हलकेच आपला हात सोडवीत म्हणाली " तुमी गप रहा बर पडून ... आराम केला तरच बरं वाटल."

ती उठून त्याच्या पायाजवळचं पांघरुन उचलीत म्हणाली, " अंगावर देऊ का टाकून... बाहेर बगा कशी अंगाला थंडी झोंबत हाय "

गणेशला काय बोलावं काही सुचत नव्हतं.

हो थंडी तर पडली आहेच ...

पण ती त्या चादराने कशी जाणार....

इतका चांगला मौका चालून आला ...

अन् सालं एखाद्या म्हाताऱ्यासारख शरीर साथ देइनासं झालं...

ती त्याच्या पायाशी बसून त्याचे पाय चेपून देऊ लागली आणि गणेशच्या शरीरात तिच्या मऊ स्पर्शाने अजूनच शिरशिरी शीरू लागली.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi online literature - Madhurani CH-33 गावातली क्रिकेट

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi online literature - Madhurani CH-33 गावातली क्रिकेट

आत्तापर्यंत गणेशची ओळख गावातल्या इतर बऱ्याच लोकांशी झाली होती. गावातल्या इतर त्यातल्या त्यात पुढारलेल्या पोरांचं जमण्याचं ठिकाण म्हणजे गावातलं टेलरचं दुकान - मारोती टेलरचं दूकान. तिथे गावातली तरुण मंडळी जमून गावातल्या प्रकरणाची चर्चा होत असे. संध्याकाळी एखादा तास जरी तिथे घालवला तरी गावतल्या दिवसभराच्या प्रकरणाची इत्यंभूत माहिती मिळत असे. तिथल्या हौशी पोरांनी क्रिकेटची टीम तयार केली होती. ते रोज संध्याकाळी 5 ते 6-7 असे आंबराईत क्रिकेट खेळत असत आणि खेळणं झाल्यावर मग परत टेलरच्या दुकानासमोर गप्पांची मैफिल जमत असे. क्रिकेटचं सर्व सामान तिथेच टेलरच्या दुकानात ठेवल्या जात असे. त्यामुळे पोरं क्रिकेट खेळायच्या आधी आणि क्रिकेट खेळणं झाल्यावर पुन्हा तिथेच जमत असत. गणेशने या इतक्या मागासलेल्या खेड्यात पोरांना क्रिकेटचा नाद कसा जडला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. तर रेडीओवर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकता ऐकता त्या पोरांना क्रिकेटचा छंद जडला होता. गावसकर वेंगसकर, अमरनाथ अशी नावं त्या पोरांच्या तोंडी येत. मग काय सुताराच्या पोराने बॅट आणि स्टंप बनविण्याची जबाबदारी घेतली. चंभाराच्या पोराने सुताराच्या पोराने केलेल्या लाकडाच्या गोल चेंडूला एकदम मस्त कमावलेल्या चामड्याचे आवरण चढवले आणि झाला क्रिकेटचा चेंडू. झालं क्रिकेटचं सामान.

गणेशही संध्याकाळी त्या पोरांसोबत क्रिकेट खेळण्यात रमू लागला. खरोखर काही काही पोरांचे त्या खेळातले कौशल्य पाहून कधी कधी गणेश थक्क होऊन जात असे. महादा नावाचा पोरगा तर अशी बॉलींग करत असे की चांगल्या चांगल्यांची तारांबळ उडत असे. त्याचा वेगवान चेंडू येतांना पाहून तर बरीच जणं स्टंप सोडून बाजूला होत. जखमी तर त्याने किती जणांना केलं होतं. मग मात्र टेलरने पायाला लावण्याच्या पॅड बनविण्याची जबाबदारी घेऊन कापडाच्या आत कापुस टाकून पॅड बनविले. पण एक पोरगा लोखंड्या तो मात्र कितीही वेगवान चेंडू असो बिना ग्लोब्जचा विकेट किपींग करायचा. गणेशने एकदा आश्चर्य वाटून त्याचे तळहात बघितले होते. तो गीट्टी फोडणे, गिट्टीची टोपली उचलणे, विहिरी खोदणे अशी मेहनतीची कामं करीत असे. त्याच्या तळहातावर मेहनतीचं काम करून करून घट्टे पडले होते आणि जाड कातडीचा थर तयार झालेला होता. म्हणजे त्याच्या हातावर नॅचरल ग्लोब्ज तयार झाले होते. ज्या पोराला गावातले सगळे जण येडा म्हणत तो तर ऑलराउंडर होता. त्याला बॉलींग टाकायला सांगितली की त्याचा सबंध फक्त त्याच्या हातातल्या चेंडूशी आणि समोरच्या तीन स्टंपशी असे. त्याला बाकी कशाचही भान राहत नसे. तसच त्याला बॅटींग करण्यास सांगितली तर त्याचा सबंध चेंडूशी आणि त्याच्या हातातल्या बॅटशीच राहत असे. फिल्डींगमध्येही तो चोख होता. मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रीशीयन बबन तर इंटीलीजेंट क्रिकेटर होता. नविन नविन शॉट शोधन्यात आणि नविन नविन प्रकारचे चेंडू फेकण्यात त्याचा हात कुणीच धरत नसे. ऑफिसमधला पांडू त्याला फक्त एखादा ओव्हर बॅटींग जरी करु दिली तर त्याच्या बदल्यात क्रिकेटचे सामान टेलरच्या मशीनमधून ग्राऊंडपर्यंत आणत असे. पण सामान परत ठेवायच्या वेळी प्रत्येक वेळा तो गायब झालेला असे. मारोती टेलर असाच कधीतरी येऊन एखादा दोन बॉल खेळून जात असे. कारण त्याला त्याच्या टेलरिंगच्या कामापासूनच बिलकुल फ़ुरसत मिळत नसे. जेव्हा तो बॅटींग करायला उभा राही तेव्हा त्याला बॅटने बॉल मारण्यापेक्षा जास्तीत जास्त लक्ष स्वत:चे धोतर सांभाळण्यासाठी द्यावे लागे.

'वाईड' बॉलला ती पोरं 'वाईट बॉल' म्हणत असत आणि आऊट ची अपील 'आऊट दे' असं जोरात ओरडून करीत. अशा बऱ्याच क्रिकेटच्या गंमती होत्या की गणेशला त्या गंमतींचं हसू येत असे. एकदा 6-6 पोरांच्या दोन टीम करून मॅच खेळण्यात येत होती. 6 जणं एका बाजूने म्हणजे ते तसे कमीच होते. म्हणून फिल्डींग दोन्ही टीमचे पोरं मिळून करीत. त्यातल्याच एकाजणाला ते अंपायरसुध्दा करीत. जी टीम बॉलींग करीत होती त्यातल्याच एका पोराला अंपायर करण्यात आले. बॉलींग करणाऱ्याने बॉल टाकला आणि तो बॅटमनच्या पॅडला लागला. बॉलींग करणाऱ्या टीमची आता अपील करण्याची वेळ होती. त्या टीमच्या सगळ्यात आधी कुणी अपील करावी तर ती अंपायरने केली होती. तो त्या क्षणापुरता विसरला होता की तो अंपायर आहे. गणेशसहित सगळे जण गदगदून हसायला लागले होते.

गावतल्या टमरेल घेऊन घराच्या बाहेर पडलेल्या लोकांनाही ही क्रिकेटची फुकटची करमणूक आवडू लागली. ते आपले आमराईच्या झाडाखाली सावलीत उभे राहून एका हातात रिकामा टमरेल घेऊन क्रिकेटचा आनंद घेत. मधुराणीही आता गणेश खेळायला येऊ लागल्यापासून तिथे आंब्याच्या झाडाखाली उभं राहून घटकाभर का होईना त्याला दाद देत होती. कधी कधी तर गावातली पाटील, सरपंच, यासारखी प्रतिष्ठीत मंडळी सुध्दा तिथे यायची. आणि घटकाभर न चूकता थांबून जायची. पाटील तर आल्या आल्या सरळ ग्राऊंड मधे घुसायचे.

" ए गणप्या जरा आण रे बॅट हिकडं "

गणप्या स्टंप सोडून पळत जाऊन पाटलाच्या हातात बॅट द्यायचा.

" ए तुमच्यापैकी कोणाची बॉलींग चांगली हाय रे " बाह्या वर सरकवत पाटील म्हणायचे.

" पाटील ... महाद्या लय बेस बॉल टाकतो "

" आबे तशी नाय ... झोडायला कोणाची चांगली हाय"

मग बबन्या आपला बॉल घेऊन त्याच्याच्याने जेवढी हळू बॉलींग टाकता येईल तेवढी हळू बॉलींग टाकायचा. एवढ्या हळू बॉलींगवर पाटील आपले झपाझप झोडायचे. पाच सहा बॉल खेळल्यावर पाटील ती बॅट एकीकडे खाली जमिनीवर टाकत म्हणायचे

" धत ... तेरी ... मंग याच्यापर आपलं गिल्लीदांडू काय वाईट हाय रे पोरोहो"

पोरं नुसते फिदीफिदी हसायचे.

" आजकालची ... पिढीच लय फुसकी ... आमच्या येळी दिसभर उन्हातान्हात गिलीदांडू, कबड्डी, धप्पाकुटी खेळायचो... अन् राती पुन्हा लपाछपी खेळायचो..." म्हणत ते बाह्या खाली सरकवत तिथून निघून जात.

पोरं पुन्हा आपला खेळ पूर्ववत खेळू लागत.

contd…

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Novel - Madhurani CH-32 चोरी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Novel - Madhurani CH-32 चोरी

आज गुरुवार बाजाराचा दिवस. गणेश सकाळीच ऑफिसमध्ये जाऊन आला. तिथे आज काही विशेष काम नव्हतं. कंटाळून शेवटी त्याने बाजारात एक चक्कर मारली. भाजीपाल्यावाल्यांच्या समोरुन एक चक्कर मारली. सारजाबाईचं घरचंच माळवं असल्यामुळे भाजी घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. मग कपड्यावाल्यांच्या इकडून एक चक्कर मारली. कपड्यावालाच्या पालात मस्त छोटे छोटे लहान मुलांच्या कपड्यापासून मोठ्या माणसांचे धोतर बायांचे लूगडे साड्या वगैरे ठेवलेले होते. त्या कपड्यात बंजारी लोकांचा लेंगा आणि वरचा टॉप असा विशेष पेहराव सुध्दा होता. तो पेहराव पाहून गणेशला उगीचच गम्मत वाटत होती. आता दुपारची धंद्याची वेळ होती त्यामुळे सगळीकडे खेड्यापाड्यातून आलेल्या गिऱ्हाईकांची झुम्बड पडली होती. रस्त्याच्या दुतर्फा दुकानावर गर्दी तर होतीच पण रस्त्यावरसुध्दा पुराचा लोंढा वाहावा तसा लोकांचा लोंढा चालत होता. गणेश गर्दीतून रस्ता काढत समोर चालला होता. गणेशला अक्षरश: बोअर होत होतं.

...चला एकदा गावात मधुराणीच्या दुकानाकडे जाऊन येऊ या...

त्याचे पाय आपसूकच मधुराणीच्या दुकानाकडे वळले. बाजाराच्या गर्दीतून बाहेर येऊन तो पाण्याच्या टाकीकडे चालायला लागला. पाण्याच्या टाकीजवळच्या पारावर वडाच्या सावलीत त्याला दोन मिनीट थांबण्याची इच्छा झाली.

.. पण नाही नको प्रथम मधुराणीच्या दुकानावरच गेलं पाहीजे...

मग तो चावडीकडे वळला आणि चावडीच्या जवळच मधुराणीचं दुकान आणि त्याची खोली होती. दुरुनच मधुराणीच्या दुकानावरची प्रचंड गर्दी पाहून तो हिरमुसला.

एवढ्या गर्दीत मधुराणीशी बोलणं शक्यच नाही ...

मग दोन मिनिट तो जागच्या जागीच घुटमळला.

परत बाजारात जावं की खोलीवर जाऊन थोडं अंग टाकावं...

चला इथवर आलोच आहो तर मधुराणीची एक झलक तरी पाहून जावं ...

तो मधुराणीच्या दुकानाकडे चालू लागला. दुकानावरच्या गर्दीतून रस्ता काढत कसातरी तो मधुराणीच्या गल्ल्याजवळ पोहोचला.

" ए शाम्या बग त्या बाईनं गुळ लेंग्यात टाकला ... जा .. जा पकड तिला... हे भिकारचोट खेड्यावरचे लोक इथं येऊन चोऱ्या करतात... " मधुराणीच्या चलाख नजरेने एका बाईने गुळ चोरलेला हेरला होता.

'' अरे जा लवकर ... धर तिला" मधुराणी ओरडली.

मधुराणीच्या दुकानावरच्या नोकराने गर्दीत इकडेतिकडे बघून एका काढता पाय घेणाऱ्या बाईला हेरले. त्या नोकराची आणि त्या बाईची नजरा नजर होताच ती झपाझप पावले टाकीत बाजाराच्या दिशेने चालायला लागली. गणेश मधुराणीच्या जवळ उभा राहून तो सगळा प्रकार बघायला लागला. मधुराणीचे त्याच्याकडे बिलकुल लक्ष नव्हते.

" ए बाई मले ... तेल दे " गर्दीतून कुणीतरी तेलाची शीशी समोर मधुराणीच्या पुढ्यात धरीत म्हटले.

" मले ... एक किलो मीठ दे" एक बाई मीठ घेण्यासाठी आपला लेंगा समोर करीत म्हणाली.

" मला एक सिगारेट दे" गणेशने दहाची नोट तिच्या पुढ्यात धरीत म्हटले.

" आवो थांबाहो जरा ... तिकडं लोक सगळं दुकान उचलून न्यायची पाळी आली ... जरा दम धरा की " मधुराणी एकदम चिडून गणेशवर खेकसली.

पण जेव्हा तिच्या लक्षात आले की तो गणेश आहे ती ओशाळून म्हणाली " गणेशराव तुमी होय ... मला वाटलं दुसरंच कोणीतरी हाय''

" नाही ... प्रथम तुझं होवूदे ... निवांत... तशी मला घाई नाही आहे..."

" पर आम्हाले हाय नं... " एक बाई गर्दीतून म्हणाली.

त्या बाईकडे रागाने एक कटाक्ष टाकत मधुराणी पुन्हा चिडून म्हणाली " ए बाई... लई घाई आसल तर दुसऱ्या दुकानावर जा ... ते तिकडं बगानं माझा नोकर ... त्या बाईला धरायला गेला हाय ... मी जर इथून गल्ल्यावरून उठून तुमचं सामान द्यायला जरा का इकडं तिकडं गेली की... ही चोट्टी लोकं माझं सार दुकानच लूबाडून नेतील..."

ती बाई गप बसली.

मधुराणीचं अगदी बरोबर होतं...

ती इथं गल्ल्यावर बसलेली असतांना जर एखादी बाई तिकडे गुळ चोरण्याची हिम्मत करु शकते...

तर ती का जराशीही पाठमोरी झाली तरी इकडे गर्दीतले लोक तीचं दुकान लूटू शकले असते...

" गणेशराव ... थांबा जरासं थांबा ... तो शाम आल्यावर देते हं " ती गणेशला म्हणाली.

तेवढ्यात मधुराणीच्या नोकराने त्या बाईला धरुन आणले.

" ए सटवे माह्यावर चोरीचा आरोप करतं का ... म्या इकत घेतलेला गुळ हाय हे... पैसे मोजलेत म्या ह्याचे..." ती बाई मधुराणीवर वरचढ होत म्हणाली.

" इकत घेतला ... आसं... " मधुराणी गल्ल्यावरून खाली उतरत म्हणाली.

'' ए शाम्या तू दुकानात जा आन लक्ष ठेव मी जरा बगते या बाईनं कव्हा इकत घेतला ते'' मधुराणी आता त्या बाईच्या पुढ्यात येऊन उभी राहाली.

" इकत घेतला तू ... आसं" मधुराणीनं त्या बाईच्या झीपोट्या धरत एक झणझणीत तिच्या गालात हाणली.

" सांगबर ... किती गुळ घेतला? ... अन्् केवढ्याचा धेतला?..." मधुराणीनं अजून एक तिच्या कानशीलात हाणली.

" ए बाई ... मारायचं काम नाय ... "

" मंग सांगनं किती गुळ घेतला? ... अन्् केवढ्याचा घेतला? " मधुराणीने तिच्या झीपोट्याला एक हिसका देत तिला खाली पाडले.

" सांगतो थांब .. " ती बाई उभं राहण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.

" सांग की ..."

" अर्धा किलो... चार आण्याचा" ती बाई कशीबशी बोलली.

" चार आण्याचा अर्धा किलो कव्हापासून यायला लागला..." मधुराणीने आता तिच्या पाठीत एक बुक्की मारली.

तिच्या लेंग्यातला गुळ तिनं काढून घेतला अन् म्हणाली, " शाम्या मोज बरं हा गुळ किती भरतो ते..."

शामने मधुराणीच्या हातातले गुळाचे ढेकुळ घेतले आणि तराजूत टाकून तो मोजायला लागला.

" दिड किलो हाय मालकिण"

" हे बगा लोकहो ... ही बाई म्हण्ते ... इनं अर्धा किलो गुळ माह्याजवळून इकत घेतला ... अन् मंग हा दिड किलो कसा भरला ... अन् ती म्हण्ते तिनं मला याचे चार आणे दिले ..." मधुराणीने खाली बसलेल्या बाईच्या कमरेत एक लात मारली.

" आता बोल नं सटवे... भोसडीचेहो इथं या गावात येऊन चोऱ्या करता ... थांब आता तुव्ह इथं येणंच बंद करते... ए शाम्या ... मंघा हवालदार दिसला होतानरे..."

" हो मालकीण त्याची थैली इथच ठुईली त्यानं ... येतो म्हणला बजारातून ..."

" शाम्या एक दोरी आण ... इलं बांधून त्या पोलीसाच्याच हवाली करते..."

" मले माफ करा .बाई ... मी चुकली ... मी माह्या गालात मारुन घेतो पर मले पोलीसाच्या हवाली नका करु ... मह्या पोराबाळाचं कसं व्हईन" ती बाई गयावया करून मधुराणीचे पाय धरुन रडू लागली.

" आसं... पोराबाळाचं काय व्हईन... चोरी करतांनी नाय आठवले पोरंबाळं... '' मधुराणीने अजून एक लात तिच्या कमरेत हाणली.

" चाल उठ इथून महा धंद्याचा टायम हाय ... म्हूण सोडते... अन् याद राख पुन्हा माह्या दुकानावर दिसली तर... उठ अन् लवकर तोंड काळं कर इथून..." मधुराणीने तिच्या झीपोट्या धरुन उठविले.

ती बाई उठताच तिने तिथून काढता पाय घेतला.

" भिकारचोट लेकाचे... " म्हणत मधुराणी पुन्हा दुकानात जाऊन गल्ल्यावर चढली.

इतका वेळ गणेश तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याने मधुराणीचे हे असे चंडीचे रुप दुसऱ्यांदा बघितले होते.

पण काहीही असो मधुराणीची प्रसंग हाताळण्याची हातोटीच वेगळी आहे...

एखादी बाई असती तर गोंधळून गेली असती ...

आपल्या बायकोची नाही का एकदा ती मागे गाडीवर बसली असतांना एकदा एका भामट्याने पर्स हिसकाटून नेली ...

अन् कितीतरी वेळ तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता...

तो चोर पळून गेल्यावर कितीतरी वेळाने ती सावरली होती ...

पण तो पर्यंत चोर पळून गेला होता...

त्याजागी जर मधुराणी असती तर गाडीवरून उडी मारुन त्याच्या मागे धावली असती ...

अन् त्या चोराच्या मानगुटीला पकडेपर्यंत थांबली नसती ...

आज गणेशला भरुन आल्यासारखे होत होते आणि सारखे मधुराणीचे कौतुक वाटत होते.

अन् बाईच्या जातीने आजकाल असंच कणखर राहायला पाहिजे...

आपल्या देशातली जर प्रत्येक बाई इतकी कणखर झाली...

तर आपल्या देशात बाईची पिळवणूक होणे शक्यच नाही ...

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Books Library - Madhurani CH 31काय डेंजर लोक आहेत ...

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Books Library - Madhurani CH 31काय डेंजर लोक आहेत ...

" काय डेंजर लोक आहेत तुमच्या गावातली ... चांगली चाललेली बैठक फिसकटवली त्यांनी " गणेश मधुराणीला म्हणाला.

" लग्नाच्या बैठकीचं आसंच आसतं ... कोण कुठं फांजी मारल आन कशी बैठक फिसकटून टाकल काही सांगता येत नाय " मधुराणीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

" तू काहीही म्हण ... मला तर यात पाटलाचीच चाल दिसते... "

" कशी काय?"

" सरपंचानं जुळवलं होतं नं ते सगळं ... ते त्याला पाहवलं गेलं नाही असं मला वाटतं"

" छा.. छा ... तसा नाय करायचा पाटील... त्यो तसा चांगला माणूस हाय ... तसं आसतं तर त्यानं मिटींगच भरवली नसती.... अन् मिटींगबी त्यानं त्याच्या घरी नसती घेतली..." मधुराणी म्हणाली.

गणेश मनातल्या मनात विचार करु लागला.

ही पाटलाबद्दल एवढं चांगलं कशी बोलू शकते...

त्या पाटलाच्या जिपनेच तर इच्या नवऱ्याला धडक मारली होती...

अन् त्यात तो मेला होता...

तसं पाहिलं तर तिने आज पाटलांनी मिटींगला बोलावल्याचं निमंत्रण देखील स्वीकारायला नको होतं...

पण तो विषय आता आपण इथे काढावा का?...

नाही आता नको पुन्हा कधीतरी...

पण वरकरणी काहीही न दाखवीता तो म्हणाला, " यालाच तर पॉलीटीक्स म्हणतात ... "

" पॉलीटीक्स बिलीटीक्स आपल्याला नाय बा कळतं... तरीबी पाटील तसं काही करणार आसं नाय वाटत ... आपल्याला माणसं ओळखण्याची नजर हाय... तुमाला नाय ओळखली का मी ... '' गणेशच्या डोळ्यात आपले खोडकर डोळे टाकत ती म्हणाली.

" बायांची जात भोळी असते ... त्यांना नाही कळत हे असं ...मी स्वत:च्या डोळ्यानं पाटलाला त्या डॉक्टरला खुणावतांना पाहलं " गणेश तिची खोडकर नजर टाळत म्हणाला.

" जाऊद्या गणेश ... काय त्याचं घेऊन बसला" मधुराणी गल्ल्यावरच्या गल्ल्यावर गणेशकडे सरकत म्हणाली.

" पण कुणीतरी बोलायला पाहिजे होतं... हे एवढं चूक होत आहे ... आता बिचाऱ्या त्या मुकीचं काय होणार... बाईच्या जातीवर अन्याय होत आहे हे दिसत असतांना तू तरी काहीतरी बोलायला पाहिजे होतं... तुही अशी गप बसशील असं वाटलं नव्हतं मला" गणेश आवेशाच्या भरात बोलला.

आता मात्र मधुराणीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून ती एकदम गंभीर झाली.

गणेशला वाटून गेले की उगीचच आपण असे बोललो. काय बोललो त्यावर एकदा विचार करून चाचपडून बघितले.

.. पण आपण काय चूकीचं बोललो?...

" गणेशराव ..." गणेशवरून आता मधुराणी तिऱ्हाईतासारखी 'गणेशराव' या संबोधनावर आली.

" या दुनियेत बऱ्याच अशा गोष्टी हायेत की ज्या योग्य असतात ... पण होत नायत... हा सगळा नशिबाचा खेळ असतो... त्यात आपण बोलून न बोलून काही उपयोग नसतो... आता तुमी बोललेच की ... झाला काही बोलून उपयोग ... चारचौघात अपमान झाला तो वेगळाच... मी बोलले आसते तरी तेच झालं आसतं... बाईच्या जातीनं माणसात बोलायचं काम नाय म्हणून कोणीतरी गप केलं आसतं मला..." आता मधुराणी आवेशात बोलू लागली.

" नाही तसं नाही ..." गणेश बोलण्याचा प्रयत्न करून तिला शांत करण्याचा प्रयत्न करु लागला.

गणेशचं वाक्य मधेच अर्ध्यावर तोडत मधुराणी पुढे म्हणाली,

" तुमाला वाटते की त्यांचं लगीन झालं आसतं तर बरं झालं आसतं... तुमच्या वाटण्याला काय अर्थ हाय... आता समजा मला वाटते की तुमचं अन् माझं लगीन झालं तर किती बरं होईल... "

गणेश एकदम धक्का लागल्यागत गंभीर होऊन तिच्याकडे बघायला लागला.

" पण तुमच्या माझ्या वाटण्याला काही अर्थ हाय? ... ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी ..."

इचा आपल्याशी लग्न करण्याचा विचार तर नाही ना ...

गणेश विचार करु लागला.

आपलं पहिलं लग्न मोडून आपल्याशी लग्न करण्याचा तर बेत नाहीना इचा...

चांगली भयानक बाई दिसते ...

आपल्याला हळू हळू तिच्या जाळ्यात तर ओढत नाही ना ही...

" तुमी तर लई सिरीयस झाला..." मधुराणीच्या बोलण्याने तो विचारातून जागा झाला.

" काळजी नगा करु ... तुमच्या कडून माझी काई जास्त अपेक्षा नाय ... लग्नाची तर नक्कीच नाय... एक कुटुंब उध्वस्त करून दुसरी उभी करणारी बाई वाटते मी .. व्हय?"

" नाही तसं नाही ..." गणेश फिका फिका हसत म्हणाला.

"गणेशराव... तुमी लई सिरियस होता राव" मधुराणी त्याची टाळी घेत म्हणाली.

म्हणजे इची अपेक्षा तरी काय आहे मग...

खरचं खेड्यात राहून किती मुक्त, स्वच्छंद आणि पुढारलेल्या विचाराची बाई आहे ही ...

" अन् तुमाला हेबी वाटत आसल की ह्या बाईच्या नवऱ्याला त्या पाटलाच्या गाडीनं उडीवलं अन् ही बाई त्याच्या घरी मिटींगला जाते काय अन् त्याची बाजू घेऊन कशी बोलते काय?.... " मधुराणी पुन्हा आवेशाने बोलत होती.

गणेशने एकदम तिच्याकडे चमकून बघितले.

अरे बापरे...

हीला आपल्या मनातले विचार कसे काय माहित झाले...

काय मनकवडी बाई आहे...

नाही ... आपण मनात आणण्याची आणि तिने बोलण्याची एकच वेळ झाली असेल..

केवळ योगायोग असावा...

" आता मला सांगा माहा नवरा दारु पिदाडून त्याच्या जिपसमोर गेला होता... त्यो नव्हता आला जिप घेऊन याच्या अंगावर... आता त्यात कोणाचा दोष... अन् त्या पाटलाशी वैर घेऊन काय मिळणार हाय... ते मासोळीनं पाण्यासोबत वैर घेतल्यासारखं होणार की नाय?..." मधुराणी पुढे म्हणाली.

गणेश काही न बोलता तिच्याकडे नुसता बघत होता.

नाही इचं वागणं अगदी व्यवहाराला धरुन आहे...

पाटलाशी वैर करून इच्यासारख्या एकट्या बाईचा या गावात टिकाव लागणं कठीण आहे...

गणेश जरी तिच्याकडे पाहत होता तरी तो आपल्या विचारात गढून गेलेला होता.

" काय गणेशराव ... मधे मधे ... तुमी कुठ विचारात निघून जाता बॉ" यावेळी मधुराणीने गणेशच्या दंडाला धरुन गदगद हलविले. तिच्या त्या नाजूक हाताच्या स्पर्शाने गणेशचे रोमांच उभे राहाले. गणेश पुन्हा विचारांच्या विश्वात गेला..

मधुराणी...

मला हळू हळू आता तुझं मन समजू लागलं आहे...

आणि कदाचित तुलाही आता माझं मन हळू हळू समजू लागलेलं आहे...

गणेश तिच्याकडे पाहत तिला नजरेने जसा पिवून घेत होता.

क्रमश:....

Marathi sahitya vishva, Marathi web site blog portal, sanketsthal,Useful Marathi feeds, Marathi feeds in XML form, Marathi web 3.0, Marathi ajax, Marathi OS, Marathi computers

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Language Literature - Madhurarani CH-30 लर्फवर्फकर्फर येर्फे ...

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Language Literature - Madhurarani CH-30 लर्फवर्फकर्फर येर्फे ...

गणेश मधुराणीच्या दुकानावर आला तेव्हा दुकानावर बरीच गर्दी होती. कालच्या मिटींगपासून गणेशच्या मनात बरच काही धुमसत होतं. ते तिच्याजवळ बोलून मन हलकं करावं असं गणेशला वाटत होतं. पण लोकांची गर्दी पाहता ते बोलणं शक्य नव्हतं. गणेशनं गर्दीतून डोकावून मधुराणीकडे बघितले. तिने त्याच्याकडे एक दृष्टीकटाक्ष देत एक विशिष्ट अविर्भाव करीत मधुर स्मित केले.

प्लीज मला समजून घे... हे लोक गेल्याशिवाय कशीकाय मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकेन' हाच अर्थ असावा तिच्या अविर्भावाचा...

नक्कीच...

गणेश न राहवून तिच्या दुकानासमोर मागे पुढे अशा चकरा मारायला लागला. दोनतीन चकरा मारल्यानंतर त्याने विचार केला.

इथे थांबून असे चकरा मारने बरे दिसणार नाही...

कोणी अर्थाचा अनर्थ काढेल....

त्याने गर्दीतून मधुराणीकडे पाहून हातानेच गोल फिरवून 'नंतर येतो' असे खुणावले. तिनेही त्याला डोळ्यानेच संम्मती दिली.

तो तिथून परत आपल्या खोलीवर निघाला. जातांना त्याला मधुराणीचा आवाज आला, " लर्फवर्फकर्फर येर्फे ... मीर्फी वार्फटर्फ पार्फाहीर्फीनर्फ".

तो एकदम ब्रेक लागल्यागत थांबला.

अरे ही तर मधुराणीची कोड भाषा आहे...

काय म्हणाली तॊ?...

अं... हं... त्यातले र्फ, र्फा, र्फे काढून टाकायचे...

तो मनातल्या मनात तिने उच्चारलेल्या वाक्यावर र्फ, र्फा, र्फे काढून टाकण्याची प्रक्रिया करु लागला.

काय उरते...

... ल... व...क...र... ये ... मी ... वा... ट... पा...ही..ऩ

हं ... लवकर ये मी वाट पाहीन...

अरे म्हणजे ती आपल्यालाच हे म्हणत होती...

पण ती अशा तऱ्हेने बोलली की दुकानातल्याच कुणाला तरी बोलली असावी...

गणेशने वळून तिच्याकडे पाहिले. ती त्याच्याकडेच पाहून गालातल्या गालात हसत होती. तेच आर्त डोळे आणि तीच घायाळ करणारी मादक नजर. तिची नजर त्याला एका प्रेमीकेची आपल्या प्रियकराला साद घालणारी नजर वाटत होती. गणेशही तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला आणि परत आपल्या खोलीकडे निघाला.

जाता जाता त्याच्या समोरुन त्याला मुकी टमरेल घेऊन गोदरीवर जातांना दिसली. त्याने इकडे तिकडे वळून बघितले. मुका कुठेही दिसत नव्हता. पण लोकांच्या कुत्सित नजरा त्याला तिच्याकडे पाहतांना दिसल्या. त्याला कुणीतरी सांगितले होते की आजकाल मुक्याला एका खोलीत डांबून त्याच्यावर कडा पहारा ठेवण्यात येतो आहे म्हणून. मुकीचाही चेहरा निस्तेज वाटत होता. जड पावलाने तो आपल्या खोलीत परतला.

दारावरच्या पडलेल्या थापेने गणेश दचकून उठला.

कोण असेल...

मघाशी मधुराणीच्या दुकानावरून येऊन तो विचार करीत गादीवर पडला होता. केव्हा डोळा लागला त्याला काही कळलेच नव्हते. त्याने उठून खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. पूर्णपणे अंधारून आले होते. त्याची नजर मधुराणीच्या दुकानाकडे गेली. दुकानात आता कुणीच गिऱ्हाईक नव्हते. पण दुकानाचा गल्ला रिकामाच होता. तिथे मधुराणी नव्हती.

मधुराणीनेच तर दारावर थाप दिली नसेल....

असा विचार करून तो ताडकन उठून उभा राहिला. दाराजवळ जाऊन त्याने दार उघडले आणि त्याने समोर हसून पाहले. पण समोर मधुराणी नव्हती. सारजाबाई होती.

मग मधुराणी असा गल्ला रिकामा सोडून कुठे गेली असावी?....

सारजाबाईने त्याचे संध्याकाळचे जेवण एका ताटात पदराने झाकून आणले होते. कुणाकडे जेवायचे नसल्यास त्याच्या जेवणाची जबाबदारी सारजाबाईकडे होती. तशी त्या बदल्यात ती त्याच्याकडून काही मागत नसे. प्रथम त्याने तिला त्याबदल्यात अधूनमधून पैसे देण्याचा प्रयत्न केला होता. पण ती पैसे घेत नसे. पण त्याला असे फुकट तिच्याकडून जेवणे चांगले वाटत नव्हते. तशी तीची परिस्थितीही बेताचीच होती. मग त्याने एक मधला मार्ग काढला होता. अधून मधून महिन्याचा किराणा तो तिच्याइथे भरत असे. कधी तालूक्याच्या ठिकाणावरून तिला पातळ वैगेरे आणत असे.

नेहमीप्रमाणे काही न बोलता सरावाने सारजाबाईने ताट आत आणून झाकून ठेवले आणि सकाळचे खरकटे ताट उचलून नेले.

गणेश बाहेर येऊन इकडे तिकडे मधुराणीला शोधू लागला. गल्लीत एका कोपऱ्यात बाजूला अंधारात मधुराणी त्याला एका लूगड्यावाल्या बाईशी काहीतरी बोलत असतांना दिसली. त्यांची हलक्या आवाजात काहीतरी खुसरफुसुर चालली होती. लूगड्यावाल्या बाईच्या हातात रिकामे टमरेल होते. म्हणजे गोदरीतून परतल्यानंतरच्या तिच्या मोकळ्या गप्पा चाललेल्या होत्या. गणेशचं तिकडं लक्ष जाताच आणि त्या लूगड्यावाल्या बाईची त्याच्याशी नजरानजर होताच ती आटोपतं घेत जरा जोराने त्याला ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली. " आता तेला तालूक्याच्या ठिकाणच्या डाक्तराकडं नेवू मनला धनी ... "

अन् तिनं तिथून काढता पाय घेतला.

"थीकडून आल्यावर मंग सांगतो बाकीचं" ती जाता जाता म्हणाली.

ती जाताच मधुराणीने गणेशकडे पाहिले आणि ती आपल्या दुकानाकडे जात म्हणाली " मघाशी आले होते?"

गणेशने मागे वळून आपल्या खोलीच्या दाराला ओढून कडी घातली आणि तोही तिच्या दुकानाकडे निघाला.

क्रमश:...

Marathi language literature, Marathi code language, Maratathi Entertainment, Marathi world, Marathi on net, Marathi .pdf .rar books, Marathi rapidshare

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi wangmay - Madhurani CH 29 मंग मिटींग करायची सुरु?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi wangmay - Madhurani CH 29 मंग मिटींग करायची सुरु?


" मंग मिटींग करायची सुरु? " पाटलांनी सभोवार एक नजर फिरविली.

" मुकीच्या बाप कुठाय ... अन् मुक्याचा बाप?" बैठकीत एक शोधक नजर फिरवीत पाटील म्हणाले," आरे तुमी लोक तिकडं कोपऱ्यात काय बसले ... अन् तेबी एकजण या कोपऱ्यात अन् दुसऱ्या त्या कोपऱ्यात..." पाटलांनी गंमत केली.

बैठकीत सौम्य खसखस पिकली.

" आरं ... इकडं या की म्होरं.... " पाटलांनी त्यांना समोर बोलावले.

मग पुन्हा पाटलांनी सभोवार एक नजर फिरविली अन् गणेश बसला होता त्या कोपऱ्यात पाहत म्हटले," अन् गुरुजी, गणेशराव ... तुमी या जरा इकडं समोर.. अन् भटजी तुमी जरा म्होरं सरका "

गुरुजी उठले. आता गणेशचा नाईलाज झाला. त्याने उठता उठता मधुराणीकडे बघितले. तिच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य होते. गणेश समोर जाऊन पाटलाच्या शेजारी जाऊन बसला.

" हं सरपंच सर्वात आंधी काय करायचं?" पाटलांनी मिटींगची सर्व सुत्र हाती घेत म्हटले.

" आता काय .. मुक्याचा बाप अन् मुकीचा बाप दोघही लग्नाला तयार हायत ... काय पांडूरंग, रघू ... "

दोघांनीही मुकाट्यानं आपापल्या माना हलविल्या.

" मंग पुढची गोष्ट म्हणजे लग्नाचा मुहुर्त काढायला पायजे..." सरपंच म्हणाले.

" अन् देण्याघेण्याचं ..." एकाजणाने तोंड विचकलं.

" आवो होईल की तेही ... आंधीे मुहुर्त तर काढा" सरपंच म्हणाले.

" काय भटजी ... येथुन पुढं पहला मुहुर्त कव्हा निघतो?" पाटलांनी भटजीला विचारले .

भटजीने पुढे सरकत आपलं जुनाट तांबूस झालेलं पंचांग उघडलं.

दोन तीन पानं चाळून तो म्हणाला " तुळशीचं लगीन झाल्याबरोबर पहला मुहुर्त पुढच्या महिन्याच्या सत्तावीस तारखेला येतो"

" कोणवार येतो? " सरपंचाने विचारले.

" गुरुवार " भटजी म्हणाला.

" म्हंजे बजाराचा दिस" एकजण बोलला.

" भटजी अजून पुढचा मुहुर्त पहा" सरपंच म्हणाले.

गावात बाजाराच्या दिवशी दिवसभर सगळे जण कशात ना कशात गुंतलेले असल्यामुळे शक्यतो लोक लग्नप्रसंग घ्यायचं टाळत.

भटजीने अजून त्याच्या हातातले पंचांग चाळल्यासारखे करीत म्हटले " मंग एकोणतीस हाय... शनिवार ...''

" ठीक हाय मंग एकोणतीस करून टाका फिक्स... काय कसं पांडूरंग, रघू "

मुक्याच्या वडीलाने आणि मुकीच्या वडीलाने नुसत्या माना डोलवल्या.

पुढे पाटील म्हणाले, "तर मंग एकोणतीस फिक्स... आता पुढचा मुद्दा घ्या"

पाटलाने उगीच पुन्हा फाटे फुटू नये म्हणून त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

" आता देण्याघेण्याचं ठरवा" मुक्याच्या बापाजवळचा एकजण घाई करीत म्हणाला.

त्याला आधीच मुक्याच्या बापाने पढवून ठेवलेले दिसत होते.

पाटलाने एक नजर मुक्याच्या बापावर टाकत म्हटले, " काय पांडूरंग ....काय अपेक्षा हायत तुझ्या"

मुक्याच्या बापाने चुळबुळ करीत आजूबाजूला पाहिले.

तेवढ्यात गणेशच्या लक्षात आले की पाटलाने गावातल्या डॉक्टरला खुणावले होते. ते त्याच्या व्यतिरिक्त कदाचित कुणाच्याच लक्षात आले नसावे. पण गणेश पाटलाच्या अगदी जवळ बसल्यामुळे ते गणेशच्या नजरेतून सुटले नव्हते.

" एक मिनीट ... देण्याघेण्याच्या मुद्याच्या आधी माझा एक मुद्दा हाय... '' डॉक्टरांनी हस्तक्षेप केला.

आता सर्व नजरा डॉक्टरांकडे वळल्या. डॉक्टर तसे स्वभावाने शांतच. ते कधी अशा मिटींगमध्ये बोलत नसत. त्यांचा काय मुद्दा असावा सगळे जण त्यांच्याकडे उत्सुकतेने बघू लागले.

" हे बगा ... मुक्याचं अन् मुकीचं जर लगीन लावलं तर एक प्राब्लेम होऊ शकतो" डॉक्टर गूढतेने म्हणाले.

" प्राब्लेम? ... कोणता?" चार पाच जणांच्या तोडातून आश्चर्याने निघाले.

डॉक्टरने बैठकीत झालेलं गंभीर वातावरण अजून गंभीर बनविण्यासाठी एक पॉज घेतला. मुकीच्या वडीलाच्या चेहऱ्यावर भीतीचं अन् काळजीचं सावट पसरलं.

" कोणता प्राब्लेम? ... डॉक्टर जरा बोलाकी" सरपंच अस्वस्थतेने म्हणाले.

" आवो डॉक्टर ... बोलाकी असं दातखीळी बसल्यागत काय उभा राहलासा" पाटील म्हणाले.

" नाय म्हणजे मी सांगावं की नाय हा विचार करतोय" डॉक्टर म्हणाले.

" ए डॉक्टर.... तू आता पुढं बोलतं का हानू एक तुह्या कानशिलात" मुकीच्या जवळ बसलेला मुकीचा बलदंड मामा चिडून उठत म्हणाला.

त्याला मुकीच्या बापाने समजावून खाली बसविले. डॉक्टरला घाम फुटला होता. त्याने एकदा पाटलाकडे पाहिलं.

" सांग ... सांग ... मी हाय तू काळजी करु नको" पाटील त्याला धीर देत म्हटले.

" मुक्याचं अन् मुकीच जर लगीन झालं तर त्यांची होणारी संतानंसुध्दा मुकीच होवू शकतात... म्हणजे तशी जास्तीत जास्त शक्यता हाय" डॉक्टर म्हणाले.

बैठकीत स्मशानवत शांतता पसरली.

" मंग त्यानं काय होणार हाय?" एकजण बोलला.

" असं कसं ... काय होणार हाय म्हन्ता..." मुक्याच्या बापाच्या जवळ बसलेला एकजण उठला अन् म्हणाला "अरे आदीच एका मुक्याला वागवता वागवता नाकी नऊ येतात... आता जर लगीन झालं तर झाले दोन... अन् पोरंबी मुकी निघाली तर त्यो तर मुक्याचा कळपच होईल... मंग त्यास्नी कुणी संभाळायचं... "

" त्यास्नी आमी संबाळू ... त्याची तुमी नगा काळजी करु" मुकीचा मामा जोशात येऊन म्हणाला.

" अन् आमच्या वंशाच्या दिव्याचं काय ... त्यो बी मुकाच ... ते आमाला चालायचं नाय..." दुसरा एकजण मुक्याच्या वडीलाच्या बाजूचा म्हणाला.

" हे बगा ... दोन्हीकडचे लोकहो जरा शांत व्हा" सरपंचानी हस्तक्षेप केला.

" असं कसं म्हंता सरपंच ... ते मुकी पोरं काय तुमी संबाळणार हाय का?" मुक्याचा मामा अतापर्यंत जो शांत बसला होता तो म्हणाला.

" त्यातूनही आपण काहीतरी मार्ग काढू ... मी एकटा नाय पण आमचं गाव काहीतरी व्यवस्था करील."

" म्हंजे तेच की पोरं दारोदारी भीक मागतील ... अन् तुमचे गाववाले त्यानला भीक वाढतील.." मुक्याच्या मामा तावातावान म्हणाला.

" पांडूरंगराव ... उठा... हे बैठक मोडली ... आपल्या मुक्याला लागल तेवढे लोक पोरी द्यायला तयार हायत ... अन् त्याबी चांगल्या... मुक्या भहीऱ्या नाय... " मुक्याच्या मामाने मुक्याच्या बापाला उठवले.

" असं नका करु ... त्या मुक्याच्या मनाचा तरी विचार करा" गणेशराव मिटींगचा बिघडलेला रागरंग बघून प्रथमच बोलले.

" तुमी कोण? ... " मुक्याचा मामा तावातावानं गणेशला म्हणाला.

" आमच्या गावचे ग्रामसेवक हायत..." कुणीतरी माहिती पुरवली.

" तुमी आम्हास्नी जास्ती शहानपणा शिकवू नका... सरकारनं देलेलं काम मुकाट करत जा अन् पगार घेत जा... या अस्ल्या भानगडीत जास्त लूडबूड करु नका... " मुक्याचा मामा चिडून गणेशला म्हणाला.

गणेशला बाकीच्या कुणीही साथ न दिल्यामुळे त्याला नाईलाजाने चूप बसावे लागले.

" चला पांडूरंगराव... इथं आता एक मिनटं बी थांबून उप्योग नाय... मुक्याच्या लग्नाची तुमी काळजी नगा करु ... त्याची मी जीम्मेदारी घेतो..." मुक्याच्या मामाने मुक्याच्या वडीलाला हाताला धरून जवळ जवळ ओढण्यास सुरवात केली.

" अन् तुमच्या पोरानं आमच्या पोरीचं आयुष्य बरबाद केलं त्याचं काय ... " इतका वेळ मुकीच्या वडीलाने समजावून समजावून खाली बसलेला मुकीचा मामा उठला.

" आर त्याच्यात आमचा काय दोष ... तुमाला तुमची पोरगी आवरता आली नाय ... ही तुमची चूकी ... आमच्या पोरानं काई जबरदस्ती नाय केली ... तुमच्या पोरीनच घेतलं त्यालं ऊरावर..." मुक्याचा मामा मुक्याच्या वडीलाला दरवाजाकडे घेऊन जात बोलला.

" ये फोकनीच्या ... तोंड संभाळून बोल" मुकीच्या बापाकडील एक जण उठून शिव्या देऊ लागला.

मुकीच्या मामाच्याने आता राहवले गेली नाही.

" तुह्या मायचा ... तू थांब तुला दावतो ... ए सुदामा धर रे त्याला...." मुकीचा मामा आता मुक्याच्या मामाच्या अंगावर धावून जात म्हणाला.

त्याच्या मागे मुकीच्या बापाकडचे काही जण धावले. आता मुक्याच्या बापाच्या पार्टीचेसुध्दा काही लोक सरसावले.

त्यांच्यात चांगलीच जुंपली होती. बैठकीत सगळीकडे गोंधळ माजला होता. तेवढ्यात एक धीरगंभीर करडा आवाज बैठकीत घुमला.

" ये भोसडीचेहो ... इथून निगा आधी बाहेर... तिकडं बाहेर जाऊन ... एकमेकांच्या ऊरावर बसा.. की एकमेकांची डोस्की फोडा ..." पाटीलांनी चिडून त्यांना बाहेर हाकलून लावले.

थोडावेळ बैठकीतले वातावरण स्तब्ध झाले.

" राम्या लाव रे हाकलून लेकांना" पाटलांनी त्याच्या एका नोकराला आदेश दिला.

राम्या आणि त्याचे दोन तीन साथीदार पुढे सरसावून एकेकांना त्यांच्या दंडाला धरुन बाहेर काढू लागले. ते लोक आपल्या पकडलेल्या दंडाला हिसडा देऊन बाहेर निघू लागले.

गणेश मधुराणी आणि इतर प्रतिष्ठीत मंडळी गोंधळ पाहून उठून उभी राहाली होती. बैठकीत एकदम शांतता पसरली होती. फक्त बाहेर जाणाऱ्या लोकांच्या चपला बुटांचा आवाज येत होता. आणि मधे मधे पाटलांच्या नोकराचा आणि त्या लोकांमधील तुरळक वाद ऐकायला येत होता.

" मंडळी बसा ... हे म्हंजे असं झालं ... एखाद्याचं कराया जावं भलं ... अन् ते म्हंतात आमचंच खरं... " पाटील म्हणाले.

सरपंच खाली न बसता जाण्यासाठी दाराकडे जाऊ लागले.

"आवो सरपंच ... दोन मिनीट बसा की ... चहा घेऊ अन् मंग मिटींग बरखास्त करु... तशी बरखास्त व्हायची कोन्ती राह्यली मिटींग..." पाटील म्हणाले.

सरपंच जावं की थांबाव या विवंचनेत पुन्हा आपल्या जाग्यावर बसले.

" बाकीची मंडळीबी बसा... जरा..." पाटील म्हणाले.

काही लोक बसावं की नाही या संभ्रमात उभेच राहाले.

" आवो बसा बसा ... नायतर तुमीच उद्या मनसाल पाटलानं बिनच्याचच वापस पाठवलं" पाटील गंमत केल्यासारखे बोलले.

पाटलाच्या या गमतीवर बरेच जण जबरदस्ती हसल्या सारखे हसले आणि खाली बसले.

आतापर्यंत भांडणारे दोन्ही पार्टीचे लोक बाहेर जाऊन पोहोचले असतील. कारण आता खालून मोठमोठ्यांनी भांडण्याचा आवाज येत होता.

क्रमश:....

Marathi village story, Gram panchayat, Gram sevaks, illliteracy in the villages, Sarpanch, Patil, Marathi elibrary

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Novel Book - Madhurani- CH-28 पाटील कसे नाही आले अजून?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Novel Book - Madhurani- CH-28 पाटील कसे नाही आले अजून?

अचानक गणेशला जाणवले की बैठकीतली कुजबूज एकदम शांत झाली. तो त्याच्या बाजूला बसलेल्या गुरुजीसोबत बोलत होता. त्याने एकदम सगळी बैठक शांत का झाली हे बघण्यासाठी वळून बघितले. बैठकीतले जवळपास सगळे चेहरे आ वासून बैठकीच्या दाराकडे पाहत असल्याचं त्याला आढळलं. त्यानेही दाराकडे वळून बघितले. त्याचही तोंड उघडं ते उघडंच राहालं. दारात मधुराणी उभी होती. ती आज छानपैकी नटून थटून आली होती.

ती इथं कशाला आली असावी?....

ती त्याच्याकडेच पाहत होती.

ही बया आपल्या मागे तर इथे नाही ना आली?...

हा विचार येताच गणेशच्या पोटात गोळाच उठला.

मग तिने तिथेच दारात उभे राहून बैठकीत सभोवार नजर फिरविली. सरपंचाशी तीची नजरानजर होताच तिने सरपंचाला नमस्कार केला.

मग पुन्हा तीची नजर बैठकीत सगळीकडे फिरून गणेशवर येऊन स्थिरावली. गणेशला तिने एक गोड स्मित दिले. ती गणेशकडे हळू हळू चालत येऊ लागली. ती जशी जशी गणेशजवळ येऊ लागली तसे गणेशच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. त्याला घाम फुटायला लागला होता.

" इकडं मधे ये की मधुराणी" सरपंचाने तिला त्यांच्याजवळ येऊन बसण्यास खुणावले.

" नाय नको ... इकडं कोपऱ्यातच बरं हाय" ती म्हणाली.

आता कुठे गणेशच्या जिवात जीव आला.

म्हणजे ती ही मिटींगलाच आली होती...

मी तर आपला वेगळाच विचार करत होतो...

नाही तिच्याजवळ तसं काहीही करण्याची हिम्मत आहे...

गणेशच्या डोळ्यासमोरुन एकदम तो माणूस येऊन गेला ज्याला मधुराणीने चिमटा काढला म्हणून चक्क चपलीने झोडपले होते. एव्हाना मधुराणी गणेशच्या जवळ येऊन चांगली त्याच्या मांडीला मांडी लावून बसली.

तशी इथे जागाही कमी आहे म्हणून कदाचित तिची मांडी आपल्या मांडीला लागत असावी...

नाही तसं ती तिला जागा करण्यासाठी आजूबाजूच्यांना सरकायला सुध्दा सांगू शकली असती...

तशी तीची दुसरी मांडी पलिकडून बसलेल्या गुरूजींच्या मांडीला सुध्दा लागत होती...

पण नाही गुरूजींना तिची मांडी फक्त पुसटशी लागत होती आणि आपल्या मांडीला तर ती चांगली चिकटून बसली होती...

गणेशला तिच्या मांडीचा गुबगुबीत स्पर्श सुखावह वाटू लागला होता. गणेशनेही पलिकडे सरकून तिला व्यवस्थित बसण्यास जागा देण्याची तसदी घेतली नाही. गणेशने एकदा चोरून आजूबाजूला बसलेल्या माणसांवर आपली नजर फिरवून घेतली.

नाही म्हणजे आजूबाजूचे लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहत आहेत...

पण मधुराणी आपला चेहरा हसरा ठेवत आजूबाजूच्या लोकांकडे बघत अशी बसली होती की कुणाला गणेशची काहीही शंका येत नव्हती. त्याला हायसं वाटलं. त्याला अजून एक गोष्ट जाणवली की आजूबाजूचे लोक कुणी चोरून तर कुणी उघड उघड तिच्याकडेच पाहत होते.

आता मात्र सरपंचांना अस्वस्थ वाटायला लागले होते. इतका वेळ झाला सगळे लोक येऊन बसले पण अजून पाटलांचा काही पत्ता नव्हता. आपल्याला बोलावून इथे पाटलांनी असं ताटकळत ठेवनं आता सरपंचांना अपमानास्पद वाटायला लागलं होतं.

" पाटील नाय आले का अजून?" सरपंचांनी चेहऱ्यावरचे भाव लपवीत इकडे तिकडे पाहत म्हटलं.

" पाटील पुजेत हायतं" पाटलांचा एक चमचा बोलला.

" इतका वेळ पुजा... आशी कोणती पुजा करताहेत बॉ" सरपंचानी गमतीचा आधार घेत म्हटले.

आजूबाजूला थोडी खसखस पिकली.

" जा बरं एकदा त्यांना सांगून ये... म्हणावं सगळे लोक येऊन खूप वेळ झाला आहे... जरा आटपतं घ्या म्हणावं...'' सरपंचांनी त्याच चमचाला आदेश दिला.

तो खेडूत आपली टोपी सांभाळत उठला आणि लगबगीनं बैठकीच्या दारातून बाहेर पडला.

बराच वेळ झाला तो खेडूत पाटलांना बोलावण्यासाठी गेला तो अजूनही परत आला नाही. सरपंचाची अस्वस्थता पाहून अजून एकजण पाटलांना बोलावण्यासाठी गेला तोही तीकडेच गुल. आता लोकांतली कुजबूज थंडावली. काही जण बैठकीतून उठून जाऊन बाहेर येरझारा घालू लागले. काही लोकांनी विड्या चिलमा पेटविल्या. काही जण तंबाखुचे बार चोळू लागले. सरपंच अस्वस्थ होऊन गॅलरीत गेले. तरीही अजून बरीच मंडळी बैठकीत बसून होती. बैठकीतले काही जण तिथेच लवंडले. गणेशमात्र तिथून उठण्यास तयार नव्हता. तो अजूनही मधुराणीच्या मांडीच्या स्पर्शातच अडकून पडला होता.

सगळे जण एक एक जण बाहेर जात आहेत...

आपणही थोडं बाहेर जाऊन यावं नाहीतर उगीच कुणाला शंका...

गणेश उठण्यासाठी उकड झाला.

" आवो बसाकी गणेशराव कुठं निघाले.... का तुमालाबी शीगारेटची हूक्की आली" मधुराणी गणेशला म्हणाली.

गणेश जावं की बसावं या संभ्रमात मुकाट्याने खाली बसला. तेवढ्यात बाहेर गेलेल्या लोकांचा एक लोंढा बैठकीत आला.

" आले वाटतं पाटील..." गणेश म्हणाला.

" हो ना बाई इतका वेळ नुसतं ताटकळत बसायचं ... उगीच आले मिटींगला" मधुराणी कुरकुरत म्हणाली.

मग गणेशकडे पाहून आपल्या चेहऱ्यावरचे कुरकुरण्याचे भाव बदलून हसत मधुराणी म्हणाली, " पण हे एक बरं झालं तुमी इथं भेटले... नायतर मी कव्हाचीच निघून गेले असते"

गणेश नुसता तिच्याकडे पाहून लाजून हसला.

बाहेर गेलेले सगळे लोक आत बैठकीत येऊन जेव्हा स्थिरावले तेव्हा सर्वात शेवटी दारातून पाटील आत आले. आत येताच त्यांनी बैठकीत एक नजर फिरवून सर्वांना नमस्कार केला. मग बैठकीत मधे येऊन बसत गॅलरीत पाठमोऱ्या सरपंचाला आवाज देत म्हणाले,"नमस्कार हो सरपंच ... आत या ... चला आता मिटींग लवकर लवकर उरकून घेऊ"

सरपंचांनी मागे वळून पाटलांना नमस्कार केला आणि थोडे नाराजीनेच ते पाटलाजवळ येऊन बसले.

" मंग करायची मिटींगची सुरवात? ... " पाटलांनी सरपंचाची जशी परवानगी घेतली.

सरपंचांनी पाटलाकडे नुसते संमतीदर्शक पाहिले.

सभोवार पाहता पाहता पाटलाचे लक्ष कोपऱ्यात बसलेल्या मधुराणीकडे गेले.

" मधुराणी इकडं समोर ये की अशी..." पाटलांनी तिला समोर बोलावले.

" मी तर आल्याआल्याच तिला इकडं बसायला सांगितलं होतं.... पण..." सरपंचांनी वाक्य अर्धवट सोडत मधुराणीकडे पाहत म्हटले.

मधुराणीने तिथून कोपऱ्यात बसूनच हाताने 'तुमचं चालू द्या मी इथेच बरी आहे' असा इशारा केला.

मग काहीतरी आठवल्यागत पाटलांनी सभोवार एक नजर फिरवीत म्हटले,

"अरे हो ... मंडळी ... या बारीनं इलेक्शनला लेडीज रिजर्वेशनच्या दोन सीट हायत... मंग एकतरी तयार कराया नको?... म्हून मुद्दाम मीच मधुराणीला मिटींगला बलवलं ... तिला सय व्हायला नको?" पाटील म्हणाले.

गणेशला पाटलांच्या बोलण्यात व्यवहार चातुर्य आणि एका राजकारण्याचा कसलेला मुरब्बीपणा दिसून येत होता. कारण गणेश पूर्वी पाटलांशी बोलला होता तेव्हा ते चांगले शुध्द मराठी बोलू शकत होते. आणि बोलण्यातून तरी चांगले सुशिक्षीत जाणवत होते. मग त्यांनी यावेळी असे अडाणी का बोलावे?. कदाचित लोकांमध्ये मी तुमच्यातलाच एक आहे ही भावना बिंबवावी म्हणून.

क्रमश:...

Marathi sahitya, meeting, Patil, sarpanch, village Story, Reservation, Election, Marathi literature online on net, read kadambari on net

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi online Library - Madhurani - CH-27 मिटींग

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi online Library - Madhurani - CH-27 मिटींग



त्याचं लक्ष बैठकीच्या गॅलरीत गेलं. तो उठून गॅलरीत गेला. गॅलरीतून त्याने सभोवार नजर फिरविली. हा गावातला सगळ्यात उंच भाग म्हणून गावातली सगळी घरं छोट्या छोट्या आकारात खेळण्यातल्या घरांसारखी दिसत होती. त्या घरांना वेढलेली शेतांची हिरवळ फारच नयनरम्य वाटत होती आणि त्या हिरवळीतून नागमोडी वळणे घेत वाहणारा ओढा एखाद्या चित्रात एखाद्या चित्रकाराने सुरेख रेघोटी ओढावी असा भासत होता. त्या हिरवळीला चहुबाजूने उंच उंच डोंगरांनी वेढलेले होते. जणू ते डोंगर तटरक्षकाची भूमीका पार पाडत असावेत. गणेश बराच वेळ ते सौंदर्य आपल्या डोळ्यांनी पिऊन घेत होता. बैठकीतल्या कुजबूजीने तो भानावर आला. त्याने वळून मागे बैठकीत बघितले. बरीच गर्दी जमा झाली होती. पण अजून पाटील आणि सरपंच दिसत नव्हते. तो परत बैठकीत आला. तो पूर्वी जिथे बसला होता ती कोपऱ्यातली जागा अजूनही रिकामी होती. तो पुन्हा तिथे जाऊन बसला. तेवढ्यात गावच्या शाळेचे हेडमास्तर मते गुरुजी आले. त्यांना लोकांनी नमस्कार चमत्कार केला. त्यांनी बसण्यापूर्वी आपली नजर बैठकीत सभोवार फिरविली. माणसाचं कसं मजेदार असतं. जेव्हा तो अशा गर्दीच्या ठिकाणी जातो. आपला कंफर्टेबल झोन निवडतो. जिथे त्याला सोईस्कर वाटते आणि मग तिथे जाऊन बसतो. त्यांनी कोपऱ्यात बसलेल्या गणेशला हेरले. तो ही सरकारी नोकर आणि आपणही सरकारी नौकर. आपलं सूत चांगलं जमणार. म्हणजे बऱ्याच बाबतीत गोष्टी करायला आपला कॉमन इंटरेस्ट राहणार. त्यांनी गणेशला नमस्कार केला आणि ते त्याच्या शेजारी जाऊन बसले.

" काय गणेशराव ... बऱ्याच दिवसांनी दिसले?" त्यांनी बसता बसता त्याच्या मांडीवर थाप देऊन म्हटले.

" हो ना... काय करणार... आम्हाला तुमच्या शाळेत काम नसते आणि तुम्हाला आमच्या ऑफीसात नसते ... मग अशी अमावस्ये पौर्णिमेलाच आपली भेट होणार " गणेश म्हणाला.

" हे मात्र तुमचं बरोबर आहे.'' गुरुजी म्हणाले.

तेवढ्यात सरपंच आले. पुन्हा नमस्कार चमत्काराचा एक गोंधळ उडाला. काही लोक लगबगीनं उठून त्यांच्याजवळ गेले.

" आली का सगळी मंडळी?" सरपंचाने सगळ्यांना संबोधून प्रश्न विचारल्यासारखा विचारला.

त्यात त्यांनी दोन उद्देश साध्य केले होते. एकतर बैठकीतल्या सगळ्या लोकांशी संवाद साधला होता. आणि ज्यांचं कुणाचं लक्ष नव्हतं किंवा जे कोणी आपलं लक्ष नाही असं भासवत होते त्यांना आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली होती.

" जवळ जवळ आले की सगळे लोकं... फकस्त पाटील राह्यले...हे मी असा गेलो अन् त्यानला घेऊन आलो." उठून उभा राहून सरपंचाजवळ आलेला एकजण म्हणाला.

त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत सरपंच बैठकीच्या अगदी मधे काही इतर प्रतिष्ठीत मंडळीसोबत बसले.

" काय शामराव.. काय म्हणते तुमचं सीड?'' सरपंचाने शामरावच्या शेजारी बसत म्हटले.

" काय म्हणणार हाय ?... केली यावर्सी हिम्मत... गुऱ्हाळात मुंडकं टाकलं ... आता बगू गोड लागते का जळते ते." शामराव म्हणाले.

" आवो जळणार कसं... तुमी चांगली हिम्मत केली... तुमाला तर इनाम द्यायला पायजे... बगू सरकार खाती एखादी योजना हाय का ते... " सरपंचाने शामरावला तस्सली देत गणेशकडे हात करीत म्हटले, " काय गणेशराव ... हाय का एखादी योजना?"

" हो आहेत ना ... याबाबतीत मी एक बैठक घ्यावी म्हणतो ... त्यात तुम्हा लोकांना सगळी सविस्तर माहिती मिळेल..."

गणेशने माहिती पुरवली.

" मंग घ्याकी लौकरात लौकर.... कव्हा घेता ... सांगा...'' सरपंचाने गणेशला हातोहाती विचारून घेतले.

" तुम्ही म्हणाल तेव्हा" गणेश म्हणाला.

" मंग... घेता या शुक्रवारी ... काय शामराव कसं"

" हो चालल की..." शामराव म्हणाले.

" हो शुक्रवारी चालेल ... तशी नोटीस काढून मी शिपायाकरवी सगळ्यांकडे फिरवतो..." गणेश म्हणाला.

" आवो शिपायासोबत कशाला ... इथं हायतच की सगळे... तुमी फकस्त आता वेळ सांगा..." सरपंच म्हणाले.

" सकाळी दहा वाजता चालेल?" गणेशने सरपंचाला विचारले.

" चाललं की ... काय गावकरी मंडळी" सरपंचाने बैठकीतल्या इतर लोकांना विचारले.

" हो ... हो... " बैठकीत दोनचार आवाज घुमले.

" हं गणेशराव ... मंग फिक्स ... शुक्रवारी सकाळी दहा वाजता" सरपंचानी शिक्कामोर्तब केला.

गणेशने सहमतीदर्शक मान हलविली. गणेशला सरपंचाची तिथल्या तिथं प्रकरण निकालात काढण्याची ही पद्धत फार आवडायची. पण गणेशला काय जाण होती की सरपंचाच्या या गोष्टीमुळेच गावातल्या बऱ्याच लोकांची मनं दुखावल्या जायची. त्यांचं म्हणनं असायचं की सरपंच आपल मत कधीच घेत नाहीत. ते आपल्याला कस्पटाप्रमाणे किंमत देतात. आणि स्वत:च हेकेखोरपणे वागून सर्व निर्णय स्वत:च घेतात.


क्रमश:...


Marathi katha, Marathi online library publication, Marathi free books, Marathi sahitya books online, Marathi bana, Marathi gosti, Marathi movies songs download free

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi webnovel - Madhurani - CH-26 पाटलाचा वाडा

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi webnovel - Madhurani - CH-26 पाटलाचा वाडा

पाटलाच्या वाड्यावर नेहमीच वर्दळ राहत असे. पाटलाचा वाडा म्हणजे जुनी पुरातन गढी होती. वाडा वर उंचावर होता. आणि त्या गढीला सभोवताली तटरक्षक भिंत होती. भिंतीवर संरक्षणासाठी चारपाच जागी शिपायांना पहारा देण्यासाठी पोस्ट सारख्या जागा होत्या. आता त्या जागा रिकाम्याच होत्या कारण आता तशी जरुरत कधी भासत नसे. आज पाटलांच्या वाड्यावर एक खास मिटींग होती. एक एक गावातली मंडळी यायला लागली. पाटलाच्या घरी मिटींगला बोलावणे असणे हे एक मानाचे द्योतक समजल्या जात असे. मिटींगला मोजकेच गावकरी बोलावले होते. पण बाहेर मिटींगमध्ये काय झाले हे ऐकण्यास उत्सुक हौशी मंडळी पाटलाच्या वाड्याभोवती जिथे जागा मिळेल तिथे बसत असत. मिटींगसाठी आत जाणारा त्या जमलेल्या लोकाकडे तुच्छतेने पाहून अभिमानाने आपली छाती फुगवून आत जात असे. मिटींग चालू असतांना मधूनच कुणीतरी काहीतरी निमित्त करून बाहेर येत असे तेव्हा त्या ऐकण्यास उत्सुक मंडळीचा त्याच्या भोवती गराडा पडत असे. आणि तो बाहेर आलेला तेवढाच भाव खावून आढेवेढे घेत त्या मंडळींना आतली बातमी देत असे.

गणेशने पाटलाचा वाडा दृष्टीपथात येताच आपल्याला वेळ तर झाला नाही ना याची खात्री करीत आपल्या हाताच्या घड्याळीकडे पाहिले. सांगितलेल्या वेळेस अजून 5 मिनीट बाकी होते. त्याचे लक्ष पाटलाच्या वाड्याच्या आजूबाजूला जमलेल्या मंडळीकडे जाताच त्याच्या हृदयाचा ठोका चुकला.

आपण इथे यायच्या आधीच तर काही गडबड झाली नाही ना....

पण मिटींगला तर अजून वेळ आहे...

की मिटींग व्हायच्या आधीच काही गडबड झाली ...

गणेशने एक गोंधळलेली नजर त्या लोकांवरून फिरविली. सगळे उत्सुक डोळे त्याच्याकडेच पाहत होते.

आत गेल्यावर कळेलच काय झाले ते...

गणेश घाईघाईने पाटलाच्या वाडयात घुसला. वाड्यात तर घुसला पण पुढे आत जाण्यास दोन तीन मार्ग होते.

यापैकी नेमक्या कोणत्या मार्गाने आत जायचे?

तो गोंधळलेल्या स्थितीत इकडे तिकडे बघू लागला. तेवढ्यात पाटलाचा एक गडी तिथे त्याच्या दिमतीला आला.

" आसं इकडं यावा ... " तो गडी एकीकडे हात दाखवून गणेशला त्याच्या मागे यायचे सुचवून म्हणाला.

गणेशने नुसते त्याच्याकडे पाहून एक स्मित केले. गणेशची पाटलाच्या वाड्यात येण्याची ही पहिलीच वेळ होती. तशी त्याची आणि पाटलाची भेट पूर्वी बरेच वेळा झाली होती. पण ती मुख्यत: ऑफीसमध्ये आणि गावातल्या वेगवेगळ्या सभारंभात. त्या गड्याने वेडेवाकडे वळणे घेत गणेशला गढीच्या वरच्या भागात नेले. वर एक ऐसपैस बैठक होती. बैठकीत गावातली प्रतिष्ठीत दोनचार मंडळी बसलेली होती. गणेशला पाहताच त्यांच्यात नमस्कार चमत्काराचे आदान प्रदान झाले. पाटील, सरपंच वैगेरे अजून यायचेच होते.

गणेश बैठकीच्या एका कोपऱ्यात जाऊन बसला. बाकीच्या मंडळीच्या विड्या, पान, चिलमा, तंबाखुचे बार सुरु होते आणि सोबत शेतातल्या गावातल्या गप्पा सुरु होत्या. गणेशला कुणात मिसळावेसे वाटले नाही म्हणून तो एकटाच बसून राहिला. त्याच्या शेजारीच बैठकीच्या कोपऱ्यात एक म्हातारा खेडूत बसला होता. त्या खेडूताने आपल्या शर्टच्या खाली हात घालून आतील कापडाच्या बनियनला पोटावर असलेल्या खिशातून त्याची चंची काढली. चंची खाकी रंगाच्या कापडापासून बनवलेली होती. त्या खेडूताने हळूच त्या चंचीची गाठ सोडली. त्याच्या सगळ्या हालचाली कशा संथ होत्या. चंची उघडल्यावर त्याने चंचीतून त्याची चिलीम काढली. चिलीम व्यवस्थित स्वच्छ केली. चिलिमीच्या बुडात एक बारीक गोळीसारखे काहीतरी होते. ते बाहेर काढले. तेही स्वच्छ केले आणि पुन्हा चिलीमीच्या बुडात टाकले. कदाचित ते चिलीम ओढतांना तोंडात तंबाखू जाऊ नये म्हणून बुडात टाकत असावेत. मग त्याने चंचीतून छोटसं अजून एक कापडाचं बोचकं काढलं. गणेश त्या म्हाताऱ्याच्या हालचालींचे बारकाईने निरिक्षण करीत होता. त्याने ते बोचकं सोडलं. त्यातला तंबाखु काढून चिलीमीत व्यवस्थित दाबून भरला. आता तो पुन्हा त्याची चंची धुंडाळू लागला. त्याने चंचीतून एक छोटा पांढरा दगड काढला. त्या दगडाला ती लोक गार म्हणत असत आणि तो तसा दगड शेतात किंवा ओढ्याच्या काठी वाळूत बऱ्याच प्रमाणात सापडत असे. तो दगड तसाच हातात धरुन त्याने चंचीतून एक कीचेन सारखी काहीतरी वस्तू काढली. ती वस्तू म्हणजे एका बाजूला लोखंडाची छोटीशी जाड पट्टी होती आणि दुसऱ्या बाजूला त्या पट्टीला बांधलेला रेशमाचा कोसला होता. त्याने तो कोसला उघडला. त्या कोसल्याला बरोबर मधे कापून त्याची डबी बनवलेली होती. त्या कोसल्याच्या डबीत कापुस ठेवलेला होता. गणेशने एकदा एका जणाला विचारले होते. तो कापसाच्या झाडाचा कापूस नसून काटशेवरीच्या झाडाचा कापूस होता. त्याला ते लोक कफ म्हणत असत. तर त्या म्हाताऱ्याने त्या कोसल्याच्या डबीतला थोडासा कफ काढून त्याच्या हातातल्या पांढऱ्या दगडाच्या काठाला लावला आणि मग तो त्या लोखंडाच्या पट्टीने त्या दगडाला जोरात घासून तो कफ पेटविण्यासाठी ठिणगी पाडू लागला. दोन तीनदा असफल प्रयत्न केल्यावर चवथ्यांदा तो कफ पेटला. त्याने तो कफ चिलीमीच्या तोंडावर ठेवला आणि मग चिलीमीच्या बुडात एक छोटंस कापड लावून तो त्या चिलमीचे जोरजोरत झुरके मारू लागला. जसा तो जोरात ओढत असे चिलमीच्या तोंडावर लाल विस्तवासारखा तंबाखू पेटतांना दिसत असे. दोन तीन झुरके मारल्यानंतर तो म्हातारा त्याच्या तोंडातला धूर मोठ्या ऐटीत सोडत असे.

गणेश इतक्या वेळचा त्या म्हाताऱ्याकडे पाहत असल्याचे त्याच्या लक्षात आले असावे. दुसऱ्यांना दोन तीन झुरके घेऊन तोंडातून धूर सोडत तो म्हातारा गणेशकडे चिलीम असलेला हात पुढे करीत म्हणाला, " घेऊन बगता .."

गणेशने कससं तोंड करून हाताच्या इशाऱ्यानेच नाही म्हटले.

" नाय?... अवो लय मजा हाय याच्यात... ते बिडी अन् सिगरेटमंदी काय दम नाय... एकडाव घेऊन त बगा..."

त्या म्हाताऱ्याने पुन्हा आग्रह केला.

" नाही ... खरंच नको" असं म्हणून गणेश आता त्या म्हाताऱ्याकडचं आपलं लक्ष हटवून इकडे तिकडे बघू लागला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Maharastriyan Literature - Madhurani - CH-25 सिग्नल

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Maharastriyan Literature - Madhurani - CH-25 सिग्नल



गणेश जेवढं शक्य होईल तेवढं मधुराणीच्या दूकानावर जाण्याचं टाळत होता. पण आज त्याचा नाईलाज झाला. काही किराणा सामान घ्यायचं होतं आणि गावातलं दुसरं दुकान सुध्दा बंद होतं. दुसरं दुकान दर शुक्रवारी बंद असायचं. दर शुक्रवारी त्या दुकानदाराच्या अंगात गजानन महाराज येत असे म्हणे.

पण गजानन महाराजाचा दिवस तर गुरुवार....

मग गुरुवारी अंगात येण्याच्या ऐवजी...

शुक्रवारी कसा काय येतो गजानन महाराज त्याच्या अंगात....

गणेशने त्यावर बराच रिसर्च करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांना या प्रश्नाचं उत्तर विचारण्याचा प्रयत्न केला. पण समाधानकारक उत्तर कुणाकडूनच मिळाले नाही. पण एक दिवस विचार करता करता गणेशला त्याचे उत्तर मिळाले. गुरुवार हा बाजाराचा दिवस. त्या दिवशी खरेदीसाठी शेजारच्या खेड्यावरचे लोक सुध्दा उजनीत येत. त्याच्या हप्त्यात होणाऱ्या इतर दिवसाच्या विक्री मिळून जेवढी विक्री होत असे त्यापेक्षा एकट्या बाजाराच्या दिवशी एका दुकानाची विक्री होत असे. म्हणजे गुरुवारला दुकान बंद ठेवणं परवडणारं नव्हतं. म्हणून कदाचित एड्जेस्टमेंट म्हणून त्या दुकानदाराच्या अंगात गजानन महाराज गुरुवारच्या ऐवजी शुक्रवारी येत असावे. गणेश मनातल्या मनात हसला.

किराणा घेण्यासाठी थैली हातात घेऊन बाहेर येत गणेशने आपल्या दरवाज्याला कुलूप लावले. मधुराणीची शक्य तेवढी नजर चूकवत गणेश मधुराणीच्या दूकानात गेला. तो काय द्यायचे ते सांगणार तेवढ्यात एक एक 3-4 वर्षाचा मुलगा धावतच दूकानात आला.

" मावशी एक चॉकलेत दे..." एक रुपयाचं नाणं मधुराणीच्या समोर असलेल्या लाकडाच्या पेटीवर ठेवत तो आपल्या बोबड्या बोलात म्हणाला.

मधुराणीने त्याला लाडाने उचलून जवळ घेतले.

" मावशीच्या बछड्या....किती दिसांनं आलास... कुठं होता इतके दिस..." मधुराणीने त्याला जवळ घेत तिरक्या नजरेने गणेशकडे पाहत म्हटले.

" जा बॉ मी एकाजणाची कट्टी घेणारहे.... मी एकाजणाशी बोलणार नाय.... " मधुराणीने लाडे लाडे त्या छोट्या मुलाशी राग आल्याचा अविर्भाव करीत म्हटले. मधूनच मधुराणी तिरक्या नजरेने गणेशकडे पाहत होती.

" मावशी चॉकलेत ..." ते छोटं मूल पुन्हा म्हणालं.

" देते रे माझ्या वासरा... " मधुराणीने तिरक्या नजरेने गणेशकडे पाहत पटापट त्या मुलाचे दोन तीन पापे घेतले.

मधुराणीने त्या मुलाला सोडले आणि चॉकलेट काढून त्याच्या हातावर ठेवले. चॉकलेट हातात पडताच त्या मुलाने धूम ठोकली.

" असाच येत जारे माझ्या पिल्ल्या... " मधुराणी मोठ्याने म्हणाली.

ते मूल पळता पळता वळून पाहत मधुराणीकडे पाहत नुसतं हसलं.

" लई गोड लेकरु हाय" मधुराणी गणेशला म्हणाली.

मधुराणी गणेशलाच उद्देशून बोलल्यामुळे गणेशला काय बोलावे काही सुचत नव्हते.

" हो ना... मूलं म्हणजे देवाघरची फुलं" गणेश कसाबसा बोलला.

" तुमचा देवावर विश्वास हाय?" मधुराणीने गणेशला विचारलं.

" तसा आहे ही ... आणि नाही ही" गणेश म्हणाला.

" माणसानं एका येळी दोन्ही काठावर राहण्याचा प्रयत्न करु नाय... कोणता तरी एक काठ धराव ... नाय तर तरास होतो" मधुराणी गणेशच्या डोळ्याला डोळे भिडवून म्हणाली.

तिच्या बोलण्यात किंचित नाराजीचा सुरही होता. गणेश तिच्या बोलण्यातला गूढार्थ शोधण्याचा प्रयत्न करु लागला.

" सोडा ते जाऊ द्या... लई दिसानं दिसले... काही घेण्यासाठी आले का आसंच" मधुराणी एकदम आपला मूड बदलून उपरोधाने बोलल्यासारखी बोलली.

" तसं नाही ... म्हणजे थोडं सामान घ्यायचं होतं... " गणेश अवघडल्यासारखा बोलला.

" तरी म्हटलं आज सूर्य कसा पश्चिमेकडून उगवला" मधुराणीने टोमणा मारला.

" नाही तसं नाही ..." गणेश आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करु लागला.

" अन् तेबी आज शुक्रवारचं तिकडचं दूकान बंद आसल म्हून आले असाल" मधुराणी नाराजीच्या सुरात म्हणाली.

गणेशला काय बोलावे काही समजत नव्हते.

गणेशचा पडलेला चेहरा पाहून मधुराणी खळखळून हसली.

" तुमी तर एकदम नाराज झाले... मी आपली आशीच थट्टा केली" मधुराणी हसत म्हणाली.

मधुराणी इतक्या पटापट आपले भाव कसे बदलू शकत होती याचं गणेशला आश्चर्य वाटलं. कदाचित तीही गोंधळात पडली असेल की कोणती प्रतिक्रिया व्यक्त करावी.

पण एक नक्की होतं की आपलं तुटक वागणं मधुराणीला आवडलेलं दिसत नव्हतं...

गणेशला एकदम उचंबळून आल्यासारख झालं. अचानक त्याला मधुराणी एखाद्या प्रेमवीराने अव्हेरलेल्या बिच्याऱ्या प्रेमीकेसारखी जाणवायला लागली. त्याला तिच्या मनाची तडफड जाणवत होती. ती तडफड लपविण्यासाठीच कदाचित तिचे भाव इतके पटापट बदलत होते. त्याला वाटत होते पटकन समोर जाऊन तिला बाहूपाशात घेऊन कुरवाळावे आणि तिची समजूत काढावी.

आपण कदाचित तिच्याशी फारच निष्ठूरतेने वागलो...

आपल्याला असं एकदम तोडून वागायला नको होतं....

तिचा जीवाभावाचा साथीदार तिचा नवरा राहिला नव्हता ...

म्हणून कदाचित ती आपल्यात ती तिचा जीवाभावाचा साथीदार शोधत असावी....

पण आपण कसेकाय तिच्या जीवाभावाच्या साथीदाराची जागा घेऊ शकतो...

आपल्याही काही मर्यादा आहेत...

तरी पण आपल्या मर्यादेत राहून आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण तिच्यासाठी करायला काय हरकत आहे...

तो पर्यंत मधुराणीने गणेशचं सामान काढून त्याच्या समोर ठेवलं.

" हे घ्या तुमचं सामान" मधुराणीने म्हटलं.

" पण मी तर सामानाची यादी नव्हती सांगितली"

" गणेशराव ... मी काय तुमाला एकदोन दिसाची ओळखते... तुमाला कव्हा काय लागतं... म्हणजे कोणतं सामान लागतं हे मला सगळ ठावूक झालं हाय आता... "

खरंच आपल्याला जे पाहिजे होतं बरोबर तेच सामान मधुराणीने काढलं होतं...

किती बारकाईने लक्ष असतं तिचं आपल्यावर...

अगदी साबन कोणती लागते...

चहापत्ती कोणती ...

आणि किती लागते...

खरंच तिचा जीव तर नाही ना बसला आपल्यावर...

नक्कीच बसला असणार ...

नाहीतर इतक्या बारकाईने आपल्याकडे लक्ष देण्याचं काय कारण असावं तिचं...

विचारांच्या तंद्रीत गणेश त्याच्या थैलीत सामान भरू लागला. एका हाताने थैली धरून दुसऱ्या हाताने सामान भरणे त्याला जड जात होते.

" आणा मी धरते थैली " म्हणत मधुराणीने तिच्या दोन्ही हाताने थैली धरली.

थैलीचा एकीकडचा भाग गणेशने आधीच धरलेला होता. त्या भागाला मधुराणीने अश्या तऱ्हेने धरले की गणेशचा हातही तिच्या हातात येईल. अनपेक्षितपणे मधुराणीने त्याचा हात तिच्या हातात घेतल्याबरोबर गणेश गोंधळला. त्याने गोंधळून पटकन आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला. पण दुसऱ्या क्षणीच पश्चातापाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर आले.

आपण उगीच आपला हात मागे घेतला...

किती चांगला चांन्स आपल्याला मधुराणीने दिला होता...

दैव देते आणि कर्म नेते हे काही खोटे नाही...

आपण थैलीचा दुसरा भाग पुन्हा पकडायला पाहिजे...

तो थैलीचा मधुराणीचा हात असलेला भाग पकडण्यासाठी मनाचा निश्चय करू लागला. पण त्याची हिंम्मत होईना.

गणेशचा तो गोंधळ पाहून गालातल्या गालात हसत मधुराणी म्हणाली , " वेंधळेच हात पण ... पक्के वेंधळे हात... तुमच्या बायकोचं कस होत आसल कोण जाणे"

अरे काय करतोस? ...

ती तर सरळ तुझ्या पुरूषत्वावर घाव घालीत आहे...

गणेशने पक्का निर्धार करून मधुराणीचा हात असलेला थैलीचा भाग पकडण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत सामान भरणं झालं होतं.

" आता अजून काही टाकायचं हाय का थैलीत" गणेशने तिच्या हातासकट थैली पकडलेली पाहून मधुराणी त्याची गंमत करीत म्हणाली.

" नाही .. बस एवढंच " म्हणून गणेशने पुन्हा आपला हात मागे ओढून घेतला.

मधुराणी खोडकरपणे पाहून गालातल्या गालात हसायला लागली.

गणेश लाजून आणि गोंधळून लाल लाल झाला होता. त्याला स्वत:चा रागही येत होता. की तो परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकत नव्हता म्हणून. त्यामुळे त्याचा चेहरा अजूनच लाल झाला. त्याने तश्या अवस्थेत पटकन थैली घेतली आणि तरातरा त्याच्या खोलीकडे चालू लागला.

खोलीचे कुलूप उघडून आत जाण्याच्या आधी त्याने एकदा वळून मधुराणीकडे पाहिले. ती अजूनही त्याच्याकडे पाहून हसत होती. उगीचच त्याला वाटून गेले की तिच्या डोळ्यात ' किती कच्चा आहे हा ... याचे कसे होणार' असे भाव तरळल्याचे वाटून गेले. तो पटकन खोलीत घुसला. दरवाजा लावण्यासाठी वळण्याची सुध्दा त्याला हिम्मत झाली नाही. खोलीत आल्यावर सरळ तो बाथरुममध्ये गेला. लोट्याने माठातले थंडगार पाणी काढून त्याने ते थंडगार पाणी आपल्या चेहऱ्यावर शिंपडले.

काय करतोस तू ...

वेंधळ्यासारखा...

ती सिग्नलवर सिग्नल देत आहे ....

आणि तू आहेस की नुसता ठोंब्यासारखा वागतो आहे....

नाही काहीतरी केलेच पाहीजे...

गणेशचा जबडा निर्धाराने आवळला गेला.

मी माझ्यापरीने माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला...

पण मधुराणी तुच माझ्या प्रयत्नांना यश येऊ दिले नाही...

आता मी हरलो आहे ...

मी पूर्णपणे हरलो आहे...

आता येथून पुढे जे ही होईल त्याला मी जबाबदार राहणार नाही ...

त्याला मधुराणी तुच पूर्णपणे जबाबदार राहणार आहेस...

असा विचार करताच गणेशला बरे वाटू लागले. त्याच्यातले अपराधीपणाचे भाव पूर्णपणे नाहीसे झाले होते.


क्रमश:....


Marathi maharastriyan sahitya literature, Marathi kavita, Marathi kavya, Marathi vinod, me mi marathi, e Marathi, zee marathi, i marathi, v marathi, episode original literature

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Marathi Literature - Madhurani CH-24 जिंदाबाद

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

 

Marathi Literature - Madhurani CH-24 जिंदाबाद

Expecting the world to treat you fairly because you are a good person is a little like expecting a bull not to attack you because you are a vegetarian

-- Dennis Wholey

आता मुकीच्या बापाने तो दगड त्याच्या डोक्याच्या वरपर्यंत उचलला आणि निर्दयतेने तो मुकीच्या डोक्यावर आदळणार तेवढ्यात ...

" थांबा " एक धिरगंभीर आवाज घुमला.

सगळे जण स्तब्ध होऊन मागे वळून पाहू लागले. मुलीच्या बापाने तो दगड आज्ञाधारकपणे बाजूला फेकून दिला. गणेशनेही मागे वळून पाहिले. मागे गावचे सरपंच उभे होते. गणेशने आधी सरपंचाचं सात्वीक रुप पाहिलं होतं. पण आज अशा बिकट प्रसंगानाही खंबीरपणे तोंड देण्याचं सरपंचाचं वकुब गणेश पहिल्यांदाच पाहत होता.

" रघूजी ... ती तुमची पोरगी झाली म्हून काय झालं.... त्यामुळं कायदा हातात घेण्याचा अधिकार तुमाला मिळत नाय" सरपंच मुकीच्या जवळ येऊन उभे राहत म्हणाले. तिथे उभे राहून त्यांनी त्यांची खंबीर नजर एकदा सभोवार जमलेल्या लोकांवर फिरवीली. जणू ते डोळ्यांच्या भाषेतच लोकांशी संवाद साधत होते.

एवढे सगळे लोक इथे उभे असून असं अघोरी कृत्य इथे घडू तरी कसं शकतं?....

तुम्हा सगळ्याच्या सगळ्या लोकांची काय बुध्दी भ्रष्ट झाली की काय?....

मुलीच्या बापाचं मी समजू शकतो ...

त्याच्या डोक्यावर संतापाचा सैतान बसलेला होता ...

पण तुम्ही?...

जसे सरपंच प्रत्येकाला प्रश्न विचारीत होते. त्या अंगातून भेदून जाणाऱ्या नजरेस नजर भिडविण्याची कुणाचीही छाती झाली नाही. सगळ्या लोकांनी आपल्या माना खाली घातल्या.

" मुक्याचा बाप हाय का इथं? " सरपंचाने जमावाला प्रश्न विचारला.

जमावात चुळबुळ सुरु झाली. मुक्याला काही तरुणांनी पकडून धरले होते. तिथून मागून कुठूनतरी एक खेडूत भितभीतच समोर आला.

" इकडं ये असा म्होरं.... " सरपंचाने त्याला एका बाजूला समोर येण्यास खुणावले.

" अन् तू मुकीचा बाप... रघू ... इकडं ये असा ... त्याच्या बाजूला उभा ऱ्हा " सरपंचाने मुकीच्या बापाला फर्मावले.

तो मुक्याच्या बापाच्या बाजूला जाऊन उभा राहिला. मुकीचा बाप हीन दीन अवस्थेत उभा होता. त्याने एकदा मुक्याच्या बापाकडे पाहिले पण त्याने त्याची दखल घेण्याचे सौदार्ह्यसुध्दा दाखविले नाही. तो उध्दटासारखा आणि बेफिकीरपणे उभा होता.

" ए त्या मुक्याला सोडा रे... " सरपंचाने फर्मावले.

मुक्याला पकडलेल्या तरुणांनी त्याला सोडले.

" ए त्या मुक्याला इकडं उभं करा रे ... त्याच्या बापाच्या बाजूला" सरपंचाने त्या तरुणांपैकी एकाला फर्मावले.

त्या तरुणाने मुक्याच्या दंडाला धरुन त्याला त्याच्या बापाच्या बाजूला नेवून उभे केले.

" ए तू तुह्या पोरीला इकडं आणून तुह्या बाजूला उभं कर" सरपंचाने पोरीच्या बापाला फर्मावले.

पोरीचा बाप हळू हळू त्याच्या पोरीजवळ गेला. मुकी अजूनही जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आपलं तोंड लपवून रडत होती. तिचा बाप तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. तो काही क्षण तिथे घुटमळला. त्याला समजत नव्हते आता मी कोणत्या हक्काने तिला उठवू. त्याने वाकून तिच्या दंडाला धरुन तिला उठविले. ती कन्हत कन्हत उठली. तीची आणि तिच्या बापाची एक क्षण नजरा नजर झाली. तिला एकदम गहिवरून आले आणि ती तिच्या बापाच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. त्याच्याही डोळ्यात एकदम टचकण पाणी आले. नकळत तिच्या बापाचा मायाळू हात तिच्या पाठीवरून फिरु लागला. ते दृश्य पाहून गणेशलाही गहिवरून आल्यासारखं झालं होतं.

" तिला इकडं घेऊन ये आसं... " सरपंचाने त्यांना आवरतं घेण्याच्या उद्देशाने पुन्हा सांगितले.

रघूने मुकीला आपल्यापासून बाजुला केले आणि तिच्या खांद्याला धरुन तिला समोर आणले. तो त्याच्या पहिल्या जागेवर उभा राहिला आणि त्याने मुकीला त्याच्या डाव्या बाजूला त्याच्या जवळच उभे केले. मुकी मान खाली घालून उभी राहाली. एवढ्या सगळ्या जमावाला तोंड देण्याची तीची बिचारीची हिम्मत होत नव्हती.

गणेशने प्रथमच मुकीला इतके जवळून आणि न्याहाळून बघितले होते. ती सुंदर होती. रंग ही गोरा होता. अंगकाठी सडपातळ. सुडौल बांधा. पण एवढ्या सौंदर्यात एकच बाधा होती की ती मुकी होती. कुणाला जर माहित नसेल की ती मुकी आहे तर कुणीही पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडावा असं तिचं रुप होतं.

" आता सगळे जण तुमी इकडं माझं ऐका... " सरपंचाने फर्मावले.

मुकीचा बाप सरपंचाकडे पाहू लागला. मुक्याच्या बापही अनिच्छेने सरपंचाकडे पाहू लागला. मुकी आपली बिचारी अजूनही मान खाली घालून उभी होती. आणि मुका कधी सरपंचाकडे तर कधी मुकीकडे पाहत होता. त्याच्या मुकीकडे पाहतांनाच्या नजरेत त्याला तिच्याबद्दल वाटणारी काळजी, कणव दिसत होती. बिचाऱ्याचं खरोखरच तिच्यावर प्रेम दिसत होतं. किंबहुना आता तो मुका असुनही त्याचं तिच्यावरचं प्रेम जसं व्यक्त होत होतं. तसं कदाचित तो बोलू शकला असता तर व्यक्त करु शकला नसता. तरीही त्याच्या मुक भावनांना तिच्याइतकं कुणीही समजू शकत नसावं.

" तुमाला तुमची इज्जत प्यारी हाय? ..." सरपंचाने त्यांना प्रश्न विचारला.

फक्त मुकीच्या वडीलाने सरपंचाकडे आगतिकपणे पाहिलं. मुक्याचा वडील नजरेला नजर देण्याचं टाळीत होता.

" तुमाला तुमच्या गावाची इज्जत प्यारी हाय का ?" सरपंचाने यावेळी मुक्याच्या वडीलाकडे रोखून पाहत धीरगंभीर आवाजात म्हटले.

मुक्याच्या वडीलाने कशीबशी सरपंचाच्या नजरेला नजर मिळविली.

" मंग ऐका पंचायतीचा निवाडा मी इथच देऊन टाकतो..."

सगळे जण सरपंच पुढे काय म्हणतो हे ऐकण्यासाठी त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहू लागले.

" या दोघांचं लवकरात लवकर पहिला मुहूर्त पाहून लगीन लावून टाका..."

सगळ्या लोकांनी आश्चर्याने सरपंचाकडे पाहिलं.

अरे हे आपल्याला कसं सुचलं नाही? .... त्यांना कदाचित वाटलं असेल.

सगळ्या लोकांच्या नजरेत संमती दिसू लागली.

" काय रघू तुला मान्य हाय का?" सरपंचाने मुकीच्या वडीलाला विचारले.

" हो... महाराज ... पोराच्या बापानं आमच्या पोरीला पदरात घेतलं तर त्यांचे लई उपकार होतील आमावर.." मुकीचा वडील आनंदाने मुक्याच्या बापाकडे आपलं उपरणं पसरवीत म्हणाला.

मुक्याच्या वडीलाने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तो फक्त गहन विचारात पडल्यासारखा दिसला.

" काय पांडूरंग तुला मान्य हाय का?" सरपंचाने मुक्याच्या वडीलाला विचारले.

" जी सरकार ... जशी आपली विच्छा" मुक्याचे वडील गोंधळून म्हणाले.

सगळ्या जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आंनंद पसरला. गणेश कौतुकाने सरपंचाकडे पाहत होता.

याला म्हणतात लिडरशीप...

खरंच सरपंच तुम्हाला मानलं बॉ आपण आज...

सरपंचाने चुटकीसरशी सर्वमान्य निवाडा देऊन समस्या सोडविली होती.

" अरे मंग बगता काय एकमेकांच्या तोंडाकडं... चला लागा कामाला ... आपल्याला लवकरात लवकर बार उडवून देला पायजेे" सरपंच आनंदाने म्हणाले आणि गावाच्या दिशेने तरातरा चालू लागले.

सगळे लोकही आता आनंदाने सरपंचाच्या मागोमाग गावाकडे निघाली

काही अतीउत्साही पोरं आनंदाने आणि आवेशाने घोषणा देऊ लागले.

"सरपंच.."

"जिंदाबाद"

"सरपंचाच'

"जिंदाबाद"

क्रमश:...

Expecting the world to treat you fairly because you are a good person is a little like expecting a bull not to attack you because you are a vegetarian

-- Dennis Wholey quotes

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

Loading...
Loading...
Loading...

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network