Ch-21: जॉनच्या बॉसची व्हीजीट ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


ऑफिसमध्ये अजून कुणीच आलं नव्हतं. जॉन सकाळी सकाळी एकटाच येऊन टेबलसमोर आपल्या खुर्चीवर बसला. तो थकल्यासारखा वाटत होता. त्याने मग एक फाईल काढून तो ती चाळायला लागला. त्याचं त्या फाईलमध्ये काहीच लक्ष लागत नव्हतं. तरी तो एकाग्र होण्याचा प्रयत्न करीत ती फाईल चाळत होता. थोड्या वेळाने एक एक करीत ऑफिसचा दुसरा स्टाफ यायला लागला.

आता ऑफीसमध्ये चहलपहल आणि कुजबूज त्याला ऐकायला येत होती. तेवढ्यात जॉनजवळ एक मेसेंजर आला.

" सर, बॉस आले आहेत..." मेसेंजरने जॉनला निरोप दिला.

" बॉस ?..."

" सर ... शहर पोलीस शाखाप्रमुख"

" काय? इतक्या सकाळी सकाळी?" जॉन आपल्या खुर्चीवरून उठत म्हणाला.

शहर पोलीस शाखाप्रमुख आला म्हणजे काहीतरी नक्कीच गंभीर असणार...

विचार करीतच जॉन त्यांना रिसीव्ह करण्यासाठी बाहेर गेला. शहर पोलीस शाखाप्रमुख जॉनला रस्त्यातच भेटले.

" गुड मॉर्निंग सर" जॉनने अभिवादन केले.

" जॉन आय निड टू टॉक टू यू. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट" शहर पोलीस शाखाप्रमुख न थांबता सिरीयस मूडमध्ये म्हणाले.

जॉन तसाच वळून त्यांच्या मागे यायला लागला. दोघेजण येऊन जॉनच्या कॅबिनमध्ये बसले.

" काय ? खुनाचा काही थांगपत्ता लागला का?"

बसल्या बसल्या शहर पोलीस शाखाप्रमुखांनी जॉनला प्रश्न केला.

" नाही सर, अजून काहीच माहिती हाती लागत नाही. अन त्यातच भर म्हणजे ...तुम्हाला माहित आहेच. आपलाच कुणीतरी माणूस त्या खुन्याला फितूर झाला आहे" जॉन म्हणाला.

" अजून किती खून व्हायची वाट पाहवी लागणार आहे आपल्याला?"

शहर पोलीस शाखाप्रमुखांनी तिरसट प्रश्न विचारला.

" सर, मला वाटते तुम्हाला आत्तापर्यंंत केलेल्या तपासाबद्दल थोडक्यात माहिती देतो...म्हणजे तुम्हाला आम्ही करीत असलेल्या तपासाबद्दल कल्पना येईल... "

जॉनने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो त्याच्या बॉसला त्यांनी या केसवर आत्तापर्यंंतच्या केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती देवू लागला

" जसे मी तुम्हाला आधी सांगितले होते...पहिल्या खुनाच्या वेळी आम्हाला एक 'झीरो' असं लिहिलेला टी शर्ट घातलेला माणूस लिफ्टमध्ये चढतांना दिसला होता... तसाच टी शर्ट घातलेला एक माणूस मला जिथे अँजेनीला अॅडमीट केले होते त्या हॉस्पिटलमध्येसुध्दा आढळला होता...दोघंही आमच्या तावडीतून थोडक्यात सुटले होते... म्हणून मग आम्ही दोघांचीही स्केचेस काढून सर्व मिडीयाद्वारे लोकांत जारी केली... त्या दोघांनाही आम्ही पकडलं सुध्दा पण शेवटी असं कळलं की त्या दोघांचाही या खुनांशी कसलाही संबंध नाही.... इन फॅक्ट तसे 'झीरो' लिहिलेले टी शर्ट घालण्याची हल्ली फॅशन आहे... पण हा खुनीही भिंतीवर रक्ताने झीरो काढतो त्यामुळे आम्ही हे खून आणि ते दोन टीशर्टवाले या घटना एकमेकांना जोडल्या होत्या... त्यामुळे अगदी सुरवातीपासूनच आम्ही खुनी पकडण्याच्या दृष्टीने निश्चित केलेली दिशा पूर्णपणे चुकली.... त्यात वेळ वाया गेला तो गेलाच, आमची मेहनतही वाया गेली... आणि शेवटी निराशाच पदरी पडली.... आता पुन्हा आम्ही नव्या जोमाने कंबर कसून तयार झालो आहोत... आणि आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत अगदी जिवाचीसुध्दा पर्वा न करता..." जॉन म्हणाला.

त्याचा इशारा एवढ्यातच त्याच्यावर झालेल्या हल्याकडे होता.

"पूर्ण प्रयत्न करीत आहा. तर मग खुनी का सापडत नाही? तुम्हाला वाटत असेल एवढ्या सकाळी येऊन तुम्हा लोकांना त्रास देण्याच्या ऐवजी मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन शांत खुर्चीवर बसून आराम का करत नाही? माझ्या खुर्चीला किती काटे आहेत काही कल्पना आहे तुम्हाला? सारखं वरून दडपण असतं. सगळ्या शहरात दहशत पसरली आहे. रात्री आठ वाजायच्या आत सगळे रस्ते सुनसान होतात. प्रत्येक माणसाला वाटते की पुढचा नंबर त्याचाच आहे. इतके दिवस लोक चूप होते. आता ते त्या मेयरला जाऊन जाब विचारीत आहेत आणि तो मेयर माझ्या बोकांडीवर बसला आहे अन त्यात भर म्हणजे हे प्रेसवाले पोलिसांच्या बाबतीत उलटं सुलटं छापून आपली बदनामी करीत आहेत. अक्षरश: लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडण्याची वेळ आली आहे. आता खूप झालं आहे. डोक्यावरून पाणी जात आहे. प्रकरण अगदी मिनीस्ट्री पर्यंत गेलं आहे. अशा परिस्थितीत मी शांत राहू शकत नाही. तुम्हाला मी जास्तीत जास्त 4 दिवसांची मुदत देतो. तिकडे काहीही करा आणि चार दिवसात त्या खुन्याला माझ्यासमोर हजर करा लाईव्ह ऑर डेड"

"सर आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतोच आहोत"

" मला मेहनत नाही, रिझल्ट पाहिजे" शहर पोलीस शाखाप्रमुख खुर्चीवरून ताडकन उठत म्हणाले.

जॉनपण त्याच्या खुर्चीवरून उठला. शहर पोलीस शाखाप्रमुख आता जायला लागले. जाता जाता ते दारात थांबून वळले आणि म्हणाले,

"...आणि तुमच्याच्याने जर केस सुटत नसेल तर राजीनामा द्या. मी दुसरी काहीतरी व्यवस्था करीन"

शहर पोलीस शाखाप्रमुख टकटक बुटांचा आवाज करीत निघून गेले. जॉन दरवाज्यापर्यंत गेला आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला जातांना बघत राहिला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. hi katha kharojharach faar cchan aahe mi pudhchya chapterchi aturtene vaat pahat aahe

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network