Ch-24: मिस उटीन हॉपर ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


बेडरूममध्ये मंद मंद उजेड होता. बेडवर कुणीतरी झोपलेले दिसत होते. एक काळी आकृती हळू हळू बेडरूममध्ये शिरली. प्रथम बेडरूममध्ये इकडे तिकडे नजर फिरवीत ती आकृती दरवाजाच्या बाजूला भिंतीवर काहीतरी शोधायला लागली. कदाचित लाईटचे बटन शोधत असावी. भिंतीवर चाचपडल्यानंतर त्या आकृतीला एका जागी बरीचशी इलेक्ट्रीकची बटनं सापडली. ती आकृती एक एक बटन दाबून बघत होती. शेवटी एक बटन दाबल्यावर बेडरूममध्ये लख्ख प्रकाश झाला. आकृतीचे शरीरसुध्दा उजेडाने न्हावून निघाले. एक आनंदाची पुसटशी भावना त्या आकृतीच्या चेहऱ्यावर उमटली. लाईटचे बटन सापडल्याचा आनंद.

वास्तविक पाहता लाईटचे बटन सापडणे ही ती आकृती जे कार्य करण्यासाठी आली होती त्याच्या तुलनेत एक किरकोळ गोष्ट...

पण माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो...

आनंद मानायाचा एकही प्रसंग तो सोडायला तयार नसतो...

हं, त्याच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात...

चांगल्या कृत्यातच त्याला आनंद मिळतो...

पण पुन्हा त्याची चांगल्याची परिभाषा आपाआपली...

त्याचं चांगलं काम हे दुसऱ्यांच्या दृष्टीने वाईटही असू शकतं..

ती बेडरूममधली आकृती म्हणजे दुसरे तिसरे कुणीही नसून कमांड1 होता. बेडरूममध्ये उजेड होताच बेडवर झोपलेली स्त्री दचकून खडबडून जागी झाली. कदाचित ती गाढ झोपेत नसावीच मुळी. समोर हातात पिस्तूल घेतलेल्या कमांड1ला पाहून ती घाबरून गेली. ती भीतीने थरथर कापायला लागली. ती आता एक मोठी किंकाळी फोडणार एवढ्यात कमांड1ने त्याच्या हातातील पिस्तूलाचा ट्रीगर दाबला. पिस्तूलाला सायलेंसर लावलेले असणार कारण 'धप्प' असा आवाज झाला आणि समोरची स्त्री बेडवर अचेतन होऊन पडली. तिचे किंकाळण्यासाठीचे तोंड उघडे ते उघडेच राहिले.

आता मात्र त्याचा चेहरा आनंदाने अगदी उजळून निघाला.

" मिस उटीन हॉपर ... आय अॅम सॉरी. मरणे हे तुझ्या नशीबात विधीनेच लिहिलेले होते... मी कोण?...मी फक्त विधीच्या हातातलं एक खेळणं." कमांड1 स्वत:शीच बोलत होता.

चट्दिशी कमांड1ने त्याच्या कोटाच्या उजव्या खिशातून एक धारदार चाकू काढला आणि खचाखच तिच्या निश्चल पडलेल्या शरीरावर चाकूचे वार केले. जेव्हा तो चाकू पूर्णपणे उटीनाच्या गरम ताज्या रक्ताने माखला तेव्हाच तो थांबला. मग तो पुढे जाऊन समोरच्या भिंतीवर त्या रक्ताने लिहायला लागला. भिंतीवर एक मोठे शून्य काढून तो पुढचे लिहिणार एवढ्यात दूर कुठेतरी पोलिसांच्या जीपचा सायरनचा आवाज त्याला यायला लागला. कमांड1ने खिडकीतून बाहेर पाहिले. आवाज अजूनही दूरवर होता. त्याने घाईघाईने पुन्हा चाकू उटीनाच्या रक्ताने माखला आणि भिंतीवर पुढचे लिहायला लागला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network