Ch-25: वेळेचा घात? ... (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


घाईघाईने सर्व सोपस्कार आटोपून धावतच कमांड1 फ्लॅटच्या दरवाज्यातून लिफ्टजवळ आला. थोड्या वेळापूर्वीच त्याला पोलिसांच्या सायरनचा आवाज बिल्डींगच्या खाली येऊन मग बंद झाल्यासारखा वाटला होता. त्याने लिफ्टच्या डिस्प्लेवर पाहिले. लिफ्ट वर येत होती. तो घाबरून गेला.

म्हणजे पोलीस बिल्डींगमध्ये तर नव्हते आले?..

आणि कदाचित पोलीसच वर येत असावेत ...

त्याच्या पोटात एकदम भीतीचा गोळा उठला. त्याला काय करावे काही सुचेना. त्याने अशा घाबरलेल्या अवस्थेतही पटकन निर्णय घेतला आणि तो पायऱ्यांनी वर धावायला लागला. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की पायऱ्यांवर धावतांना त्याच्या बुटांचा आवाज होतोय. त्याने पायातले बूट काढून तिथेच टाकून दिले आणि मग तो अनवाणी पायानेच वर जोरात धावायला लागला. धावता धावता तो खाली काय होत असेल याचा कानोसाही घेत होता. शेवटी तो बिल्डींगच्या टेरेसवर येऊन पोहोचला. टेरेसवर त्याने इकडे तिकडे बघितले. वरती टिमटिमत्या चांदण्यांनी भरलेले आकाश आणि आजूबाजूला टिमटिमत्या लाइटस्ने भरलेले शहर. धावत आल्यामुळे त्याला दम लागला होता आणि घाम आला होता. वर थंड हवा वाहत होती. घामेजल्या अंगाला ती अजूनच थंड वाटत होती. त्याला हायसं वाटलं. पण त्याला थांबायला वेळ नव्हता. बिल्डींगच्या समोरच्या बाजूला येऊन त्याने खाली डोकावून बघितले. बिल्डींगच्या अगदी समोर पोलिसांची व्हॅन उभी होती. व्हॅनजवळ तीन सशस्त्र पोलीस उभे होते. त्याला एक कळत नव्हतं की-

खुनाची माहिती पोलिसांना कळली तरी कशी?...

असंही होवू शकतं की ते दुसऱ्याच एखाद्या अपराधाच्या संदर्भात इथे आले असावेत ...

दुसऱ्या अपराधासाठी जर ते इथे आले असतील आणि आपण जर पकडले गेलो तर तो एक भयंकर योगायोगच म्हणावा लागेल...

तशी त्याला खात्री होती की बॉसने दिलेल्या वेळात कधीही दगाफटका होणार नाही. आत्तापर्यंंत तरी तसा त्याचा अनुभव होता.

आता इथून निसटायचे कसे?...

तो विचार करू लागला.

एक गोष्ट मात्र पक्की होती की बिल्डींगच्या समोरच्या बाजूने निसटनं शक्य नव्हतं....

दुसरा काहीतरी पर्याय शोधण्यासाठी तो इकडे तिकडे बघायला लागला. बिल्डींगच्या दोन्हीही बाजूने निसटणं शक्य नव्हतं. एक तर उतरायला काही नव्हतं आणि कसंबसं उतरलं तरी त्या पोलिसांच्या समोरूनच जाणं हा एकमेव पर्याय होता. मग कमांड1 हळू हळू बिल्डींगच्या मागच्या बाजूने जाऊन तेथील पाहणी करू लागला. त्याने मागील बाजूस डोकावून खाली बघितले. मागच्या बाजूने उतरण्यासाठी पाईप होते. ते बघून त्याला थोडं हायसं वाटलं. पण मागच्या बाजूने दुसऱ्या एका बिल्डींगवर लावलेल्या सोडीयम लँपचा उजेड पडत होता. त्यामुळं उतरतांना कुणाच्या तरी नजरेत येणं शक्य होतं. तो अजून काही पर्याय शोधण्यासाठी विचार करू लागला. त्याच्याजवळ जास्त वेळ नव्हता.

जर चुकून पोलीस इथे टेरेसवर आले तर...

तर तो आयताच त्यांच्या हातात सापडणार होता....

त्याने बिल्डींगच्या मागच्या बाजूची एकदा व्यवस्थित पाहणी करण्याचे ठरविले. त्यासाठी तो मागच्या बाजूला असलेल्या कठड्यावर चढला. पाईप वरपासून जमिनीपर्यंत गेले होते. कदाचित ड्रेनेज पाईप असले पाहिजेत. पाईपवर जागोजागी खिळे लावलेले असल्यामुळे उतरतांना पकडण्यासाठी सोईचे होते. अचानक त्याच्या लक्षात आले की त्याच्या मागे टेरेसवर काहीतरी हालचाल झाली आहे. तो वळून पाहीपर्यंंत एक काळी आकृती त्याच्यावर झेपावली आणि तिने आपला पूर्ण जोर लावून कमांड1ला टेरेसवरून खाली ढकलले. या अचानक झालेल्या हल्यामुळे कमांड1 गोंधळून गेला. त्याला सावरण्यासाठीसुध्दा वेळ मिळाला नाही. तो बिल्डींगवरून खाली कोसळू लागला. पडतांना त्याचा चेहरा वरती टेरेसकडेच होता. ती काळी आकृती टेरेसवरून वाकून त्याला खाली पडतांना पाहत होती. मागच्या बिल्डींगवरून येणाऱ्या सोडीयम लाईटच्या प्रकाशात त्याला त्या काळ्या आकृतीचा चेहरा दिसला. तो त्या चेहऱ्याकडे डोळे फाडून पाहू लागला. इकडे खाली पडून मरणाची भीती आणि समोरचा चेहरा पाहून त्याच्या भीतीत आणि आश्चर्यात अजूनच भर पडली होती.

तो चेहरा कमांड2चा होता...

त्याचा विश्वासच बसत नव्हता....

त्याने पुन्हा शाश्वती करून घेतली.

हो तो चेहरा, त्याचा मित्र ज्याच्यावर त्याने अतिशय विश्वास ठेवला होता त्या कमांड2चाच होता...

पण त्याने असे का करावे?...

तो त्या प्रश्नावर विचार करून काही निष्कर्षापर्यंंत पोहोचण्याच्या आतच धाडकन खाली जमिनीवर लावलेल्या फरशीवर आदळला. जवळपास 15/16 मजले वरून पडून त्याच्या डोक्याची शकलं शकलं झाली होती आणि पडल्याबरोबर त्याचा जीव गेला होता. इकडे वर त्याला पडतांना पाहणाऱ्या कमांड2च्या चेहऱ्यावर एक छद्मी हास्य तरळले होते .

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network