Ch-30: प्रेस कॉन्फरन्स (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


मोकळ्या मैदानात एका उंच जागी एक टेबल ठेवलेले होते. टेबलवर वेगवेगळ्या टि व्ही चॅनल्सची नावं असलेले मायक्रोफोन ठेवलेले होते. टेबलच्या समोर मोकळ्या जागेत काही खुर्च्या ठेवलेल्या होत्या. तिथे प्रेसवाल्यांनी गर्दी केलेली होती. काही प्रेसवाले खुर्चीवर बसून प्रेसकॉन्फरन्समध्ये शहराचे पोलीस शाखाप्रमुख येण्याची वाट पाहत होते. काही वार्ताहर छोटे छोटे समूह करून काहीतरी चर्चा करीत होते. चर्चा तीच. सध्या शहरात सुरू असलेल्या खुनांची.

" पुष्कळ दिवसांपासून त्याच त्याच बातम्या. एक मरगळ आली होती. ह्या खुनांमुळे ती मरगळ दूर झाल्यासारखी वाटते." एकजण म्हणाला.

" म्हणजे तुला असं तर नाही ना म्हणायचं की हे खून होत आहेत ते चांगलंच होत आहे" दुसरा खोचकपणे म्हणाला.

" अरे तसं नाही" पहिला गोंधळून म्हणाला.

" अरे म्हणजे तसंच आहे. पण उघड उघड कबुलही करू शकत नाही" दुसरा हसून म्हणाला.

मग दोघेही हसायला लागले.

" साला, काय करणार आपलं कामच तसं आहे. दुसऱ्यांच्या जिवावर आपल्याला बातम्या बनवाव्या लागतात" तिसरा एकजण म्हणाला.

" हो ना. आणि बातम्या नसतील तर आपलं पोट कसं भरणार?"

" अरे जेव्हा मी नवीन नवीन या क्षेत्रात आलो तेव्हा रोज सकाळी देवाला प्रार्थना करायचो ... की देवा, आज तरी एखादी बातमी मिळू दे"

" म्हणजे थोडक्यात देवा आज तरी एखादा अॅक्सीडेंट , खून"

" किंवा काहीतरी खरमरीत घडू दे"

पहिल्याने तिसऱ्याची टाळी घेत त्याचं वाक्य पूर्ण केलं.

दुसरीकडे टी व्ही चॅनल्सवाले आपाआपले कॅमेरे घेऊन तयार होते. त्यांच्यातही चर्चा सुरू होती.

" अरे रोज किती वाईट वाइट घडतं या जगात" एकजण म्हणाला.

" ते तरी बरं... आपल्याला हे सगळ उघड्या डोळ्यांनी बघावं लागत नाही" दुसरा म्हणाला.

" उघड्या डोळ्यांनी नाही तर कसे बघतो आपण ?" दुसऱ्याने आश्चर्य व्यक्त करीत म्हटले.

" अरे म्हणजे या कॅमेराची झापड असते की आपल्या डोळ्यांवर"

दोघे जण खळखळून हसू लागले.

आता प्रेस कॉन्फरन्समध्ये फक्त शहर पोलीस शाखाप्रमुखांच्या येण्याची वाट होती. तेवढ्यात टेबलच्या पलिकडच्या बाजूला थोडी हालचाल झाली. इकडे टेबलच्या अलिकडे बसलेल्या प्रेसच्या लोकांमध्ये कुजबूज आणि चहलपहल सुरू झाली. प्रेसच्या लोकांना शहर पोलीस शाखाप्रमुख येतांना दिसले होते. आपल्या बॉसच्या मागे जॉन आपल्या जड पावलांनी चालत होता. शेवटी टेबलच्या त्या बाजूला शहर पोलीस शाखाप्रमुख आणि जॉन असे दोघेजण उभे राहिले . टेबलाच्या या बाजूला प्रेसवाल्यांची झुंबड उडाली होती. कितीतरी दिवसांपासून चिघळत असलेल्या सिरियल किलरच्या केसबद्दल प्रश्न विचारण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती.

प्रेसवाल्यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

" खुनी कोण आहे?"

" त्याला जिवंत का पकडू शकले नाही?"

" खुनी शोधण्यासाठी इतका वेळ का लागला ?"

शहर पोलीस प्रमुखाने एक नजर पूर्ण प्रेसवाल्यांवर फिरविली.

" वन बाय वन" शहर पोलीस प्रमुख आपल्या करड्या स्वरात म्हणाला.

" यस यू" मग शहर पोलीस प्रमुखाने एका गरीब दिसणाऱ्या प्रेसवाल्याला इशारा केला.

" सर, कशावरून जो माणूस बिल्डींगवरून पडून मेलेला सापडला तोच खुनी आहे?" एका टीव्ही चॅनलवाल्याने प्रश्न विचारला.

" आतापर्यंत झालेल्या खुनाच्या तिन्ही डेड बॉडीत ज्या बंदुकीच्या गोळ्या सापडल्या होत्या त्या त्याच्याच बंदुकीतून झाडल्या गेलेल्या होत्या. हे आमच्या टेक्नीकल टीमने सिध्द केलं आहे आणि खुन्याच्या कोटाच्या खिशात एक चाकू सापडला त्या खिशाच्या कापडावर तिन्ही मृतकांच्या रक्ताचे डाग सापडलेले आहेत." शहर पोलीस प्रमुखाने सविस्तर माहिती पुरविली.

" पोलीस त्या खुन्याला जिवंत का पकडू शकले नाहीत?... जर जिवंत पकडू शकले असते तर अजून काही माहिती मिळाली असती. जसे खुनाचा उद्देश वगैरे" दुसऱ्या एका प्रेसवाल्याने पटकन आपले तोंड घुसवून प्रश्न विचारला.

" खुनाच्या बाबतीत माहिती मिळताच आम्ही तडकाफडकी घटनास्थळी पोहोचलो... जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा खून झालेला होता पण खुनी बिल्डींगमधून बाहेर पडला नव्हता... मग आम्ही इमारतीला चारही बाजूने घेरले. त्यामुळे खुन्याला तिथून निसटण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते आणि त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही" शहर पोलीस प्रमुखाने विस्ताराने सांगितले.

जॉनने आपल्या बॉसकडे आश्चर्याने बघितले. बॉस खोटं बोलत आहे याचे नाही तर तो किती सफाईनं खोटं बोलतो आहे याचं जॉनला आश्चर्य वाटत होतं.

" काय ? खुन्याने आत्महत्या केली? पण काही लोकांच म्हणणं आहे की तो वरून पडला असावा" एका जणाने प्रतिप्रश्न केला.

" टेरेसला साडेतीन फूट उंच भिंत असतांना तो तिथून पडला असे म्हणणे चुकीचे ठरेल" शहर पोलीस प्रमुखाने आपला तर्क लढवित उत्तर दिले.

" खुनाबद्दल पोलिसांना कुणी माहिती दिली होती?" एका वर्तमानपत्राच्या रिपोर्टरने विचारले.

" आता या सगळ्या गोष्टी सांगणं जरा कठीण आहे. आमचे तळागाळात हेर आणि खबरी विखुरलेले असतात. त्यांच्याच एकाने आम्हाला ही माहिती पुरविली. काही जण आपलं नाव गुप्त ठेवू इच्छितात. तर काही जणांची त्यांचं नाव जाहिर करण्याला परवानगी असते. काहीही असो शेवटी खुनी, मृत का होईना पकडला गेला हे महत्वाचे. त्यामुळे कदाचित अजून कितीतरी होवू घातलेले खून टळले आणि या गोष्टीचे श्रेय मी आमच्या सक्षम पोलीस डिपार्टमेंटच्या अथक परिश्रमाला देतो. त्यांना त्यांच्या मजबूत नेटवर्कमुळे माहिती मिळाली. नुसती माहितीच नाही तर ते तिथे वेळेवर पोहोचले आणि खुन्याला तिथून निसटण्याचे सर्व मार्ग बंद झाले" शहर पोलीस प्रमुख आता तिथून निसटण्याचा प्रयत्न करीत समारोपाचे शब्द बोलले.

ते तिथून निघण्यासाठी वळणार येवढ्यात अजून एकाने प्रश्न विचारला,

" सर, त्या खुन्याचा उद्देश काय असावा?"

" सिरीयल किलर म्हणजे एक प्रकारचे माथेफिरूच. नाही का? त्यांना खून करण्यासाठी उद्देश वगैरे कशाची गरज लागत नाही. आता ते डोक्यानेच वेडे म्हटल्यावर त्यांचा उद्देश काय असावा हे सांगणे तसे कठीणच." गालातल्या गालात हसत पोलीस शाखाप्रमुख म्हणाले. ते पाहून बरेच इतर आजूबाजूचे पत्रकार ज्याने प्रश्न विचारला त्याच्याकडे कुत्सीतपणे पाहून हसू लागले.

बिचारा प्रश्न विचारणारा गोरा मोरा झाला.

आता शहर पोलीस प्रमुख टोलवाटोलवीची उत्तरे देवू लागले.

" सर , खुन्याच्या घरातील काम्प्यूटरची हार्डडिस्क कुणीतरी पळविली हे खरं आहे का?" एकाजणाने शहर पोलीस प्रमुखाचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत विचारले.

शहर पोलीस प्रमुख त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत म्हणाले,

" मला वाटते मी सर्व प्रकरणावरून पूर्णत: पडदा हटेल अशा प्रकारे यथायोग्य माहिती आपल्याला पुरविली आहे आणि तुमच्या जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यास ही माहिती पुरेशी आहे.... थँक यू"

शहर पोलीस प्रमुख जे एकदाचे पाठ फिरवून निघाले ते तिथून बाहेर जाईपर्यंत थांबलेच नाहीत. त्यांच्या मागे खाली मान घालून जॉन मुकाट्याने चालत होता.

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network