Ch-31: पॉलीटीक्स (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


जॉन ड्रॉइंग रूममध्ये बसून हळू हळू व्हिस्कीचे घोट घेत होता. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की तो डिस्टर्ब होता. तेवढ्यात त्याची डोअर बेल वाजली. तो व्हिस्कीचा ग्लास टीपॉयवर ठेवून उठला. समोर जाऊन त्याने दार उघडले. दारात त्याच्या समोर अँजेनी उभी होती.

" मी किती वेळपासून तुझा मोबाईल ट्राय करीत आहे. तुझा मोबाईल बंद आहे की काय?" अँजेनी दारातून आत येत म्हणाली.

" प्रेसवाल्यांचे फोनवर फोन येत आहेत... म्हणून बंद करून ठेवला आहे" जॉन समोरचे दार बंद करीत म्हणाला.

अँजेनीने ड्रॉइंग रूममध्ये आल्यावर टीपॉयवर ठेवलेला व्हिस्कीचा ग्लास बघितला आणि मग जॉनच्या चेहऱ्याकडे निरखून बघू लागली.

" काय झालं? अपसेट दिसतोस" अँजेनीने त्याला विचारले.

" बस... सांगतो" त्याने स्वत: एका खुर्चीवर बसत आणि अँजेनीला समोरच्या खुर्चीकडे बसण्याचा इशारा करीत म्हटले.

तिने समोरची खुर्ची त्याच्या बाजूला ओढली आणि ती अगदी जवळ त्याच्या शेजारी बसली. त्याने व्हिस्कीचा ग्लास पुन्हा उचलला आणि ओठाला लावला.

" असं कुढत राहण्यापेक्षा आपले प्रॉब्लेम्स कुणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करायला पाहिजेत" अँजेनी त्याचा हात हातात घेत म्हणाली.

त्याने त्याचा दुसरा हात तिच्या हातावर ठेवला.

" काय डिपार्टमेंटमध्ये काही प्रॉब्लेम झाला?" अँजेनीने त्याचा हात थोपटत विचारले.

" सांगतो... सगळं सांगतो" व्हिस्कीचा ग्लास बाजूला ठेवत तो म्हणाला.

जॉनने एक दीर्र्घ उसासा टाकला आणि तिला सांगायला लागला...


जॉन त्याच्या बॉसच्या, म्हणजे शहर पोलीस शाखा प्रमुखाच्या समोर बसलेला होता.

" सर, त्या बिल्डींगच्या खाली सापडलेल्या मृतदेहाची शहानिशा करून आम्ही ही काही माहिती मिळविलेली आहे" जॉन आपल्या समोरच्या फाईलमधले कागद चाळत म्हणाला.

" हं " बॉसने नुसता हूंकार भरला.

जॉनच्या बॉसने त्याच्या तोंडातल्या सिगारचा एक मोठा झुरका घेतला.

" त्या मृतदेहाच्या खिशात एक बंदूक सापडली... आतापर्यंंत झालेले तिन्हीही खून त्याच बंदुकीचा वापर करून झालेले आहेत."

बॉसने तोंडातल्या सिगारची राख समोर टेबलवर ठेवलेल्या अॅश ट्रेमध्ये झटकून टाकत म्हटले,

" म्हणजे आपण ज्या खुन्याचा शोध घेत होतो, तो आयताच, मेलेला का असेना आपल्याला सापडला."

" सर, मला वाटते तसा निष्कर्ष काढणे म्हणजे जरा घाईचे होईल " जॉन म्हणाला.

" हे बघ जॉन, आता पोलिसांच्या गळ्यापर्यंंत पाणी आलेलं आहे. आता ही शब्दांशी खेळण्याची वेळ नव्हे. सध्या तरी परिस्थिती निवळण्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस करणे आवश्यक आहे आणि आपला निष्कर्ष चुकीचा असावा असं तुला का वाटतं? " बॉसने जॉनच्या डोळ्यात रोखून पाहत विचारले.

"तशा पुष्कळ गोष्टी आहेत." जॉनने फाईलची काही पानं उलटवित म्हटलं.

" उदाहरणार्थ? " बॉसने सिगार विझवत सरळ बसत त्याला विचारले.

" नंबर एक - खऱ्या खुन्याने कुणाला तरी मारून त्याच्या खिशात आपली बंदूक टाकली असू शकते. आणि हे सगळं तो त्याच्यावरचं केंद्रित असलेलं लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी करू शकतो.

नंबर दोन - जेव्हा आम्ही त्या मेलेल्या इसमाच्या घरात धाड टाकली तेव्हा त्याच्या कॉम्प्यूटरमधली हार्डडिस्क गायब होती. याच्यामागे बरीच कारणं असू शकतात. खुनी हा एकटा नसून अजून बरेचजण त्याला सामील असू शकतात. आधी सांगितल्याप्रमाणे खुनी कुणीतरी दुसराच असून तो हे सगळं आपल्यावरचं लक्ष हटविण्यासाठी करू शकतो किंवा ती एक साधी चोरीसुध्दा असू शकते"

जॉन बॉसची प्रतिक्रिया आजमवण्यासाठी थांबला.

" हं, अजून काही" बॉसनं त्याला अजून काही बोलायचे आहे का हे सूचित करीत म्हटले.

" नंबर तीन - या वेळेस खुनाची माहिती खुन्याने न देता कुणीतरी त्रयस्थ इसमाने दिली होती कारण जिथून फोन आला होता तिथून खुन्याला खुनाच्या वेळेपर्यंंत खुनाच्या जागी पोहचणंं जवळ जवळ अशक्य होतं. हा आताचा अपवाद वगळता यापूर्वी खून झाला तिथूनच खुन्याने फोन केले होते. कुणीतरी त्यांच्या टोळीतला माणूस फुटला असावा किंवा कुणाला तरी ही माहिती कळली जो आपली ओळख लपवू इच्छितो"

जॉनने उरलेलं सगळं जवळ जवळ एका श्वासात सांगितलं आणि तो त्याच्या बॉसच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला.

जॉनचा बॉस त्याच्या खुर्चीवरून हळूच उठला. खिडकीच्या बाहेर पाहत त्याने नवीन सिगार शिलगावली. मग सिगारचे झुरके घेत त्याने जॉनच्या भोवती खोलीत एक चक्कर मारली.

" झालं तुझं ?" बॉस त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला.

जॉनने नुसती मान हलविली.

" हे बघ जॉन, तुला माहित आहेच या घटनेमुळे आपल्या पोलिसांची प्रतिमा किती मलीन झाली आहे आणि तू जे सांगतो आहेस या सगळ्या शक्यता आहेत. त्यांचा आपल्याजवळ अजून असा ठोस पुरावा नाहीये "

जॉनचा बॉस खोलीत हळू हळू चकरा मारत बोलत होता.

" पण सर.." जॉनने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला.

त्याला अडवीत जॉनचा बॉस म्हणाला,

" मला वाटतं या केसवर काम करून आणि सारख्या दडपणामुळे तू शारिरीकरित्या आणि मानसिकरित्याही थकला आहेस आणि थकलं की असं होतं पुष्कळ वेळा. माणसाचा गोंधळ उडतो आणि मग तो भलतेसे निष्कर्ष काढायला लागतो."

" नाही सर, तसं काही नाही ." जॉनने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

" हे बघ, मी काय म्हणतो ते नीट ऐक " जॉनचा बॉस करड्या आवाजात म्हणाला.

" आता एक प्रेस कॉन्फरंस घ्यावी लागेल. त्यात एकाच वेळी केसची संपूर्ण माहिती देऊन आपल्या पोलीस डिपार्टमेंटची उरली सुरली लाज राखावी लागेल आणि मग ..... आणि मग तू एका महिन्याच्या सुट्टीवर जा... मी तुझी सुट्टी आताच सँक्शन करतो ... मग तू तुझी मैत्रिण अँजेनीला घेऊन एखाद्या हिलस्टेशनला जा. तू काळजी करू नकोस. मी सगळी व्यवस्था करतो"

जॉनने एकदम चमकून त्याच्या बॉसकडे पाहिले. आपल्या बॉसला आपल्याबद्दल आणि अँजेनीबद्दल कसे कळले? त्याच्या नजरेत अजूनही आश्चर्य आणि अविश्वास तरळत होता.

" आय अॅम सॉरी... इट्स यूवर पर्सनल मॅटर... बट इटस् माय प्रोफेशनल वे ऑफ वकीर्ंंग .... मला सगळ्यांवर बारीक नजर ठेवावी लागते"

जॉन काही बोलण्याच्या आधीच त्याच्या बॉसने खुर्चीच्या मागे टांगलेला त्याचा ओव्हरकोट उचलला आणि दरवाज्याकडे जायला लागला.

दरवाज्याजवळ थांबून जॉनकडे वळून बघत तो म्हणाला , " उद्या सकाळी दहा वाजता मी प्रेस कॉन्फरंस बोलावली आहे. काय बोलायचे ते मी बोलतो. यू जस्ट बी देअर."

जॉनच्या उत्तराची वाट न पाहता त्याचा बॉस टाक टाक बुटांचा आवाज करीत तिथून निघून गेला. जॉन गोंधळून कधी त्याच्या बॉसच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे तर कधी त्याच्या हातातल्या फाईलमधल्या कागदांकडे बघत उभा राहिला.

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network