Ch-32: व्हॅकेशन (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


जॉनची कार जशी भरधाव वेगाने धावत होती तसे त्याचे विचारसुध्दा भरधाव वेगाने धावत होते. त्याच्या शेजारी उजवीकडे अँजेनी बसलेली होती. जॉन गाडी ड्राईव्ह करीत होता. ती जरी जॉनच्या शेजारी बसली होती तरी तिला एकटेपणाची जाणीव होत होती. कारण जॉन जरी भौतिकरित्या कारमध्ये बसलेला होता तरीही मानसिकरित्या तो दुसरीकडे कुठेतरी होता. हळूहळू गाडीने मुख्य शहराचा भाग मागे सोडला. आता फक्त तुरळक घरेच खिडकीतून रस्त्याच्या बाजूला दिसत होती. हळू हळू तीही नाहीशी झाली. काही वेळाने गाडी चारही बाजूने हिरव्या कुरणाने , हिरव्या झाडांनी , हिरव्या आच्छादलेल्या डोंगरांनी वेढलेल्या स्वर्गतुल्य प्रदेशातून धावू लागली. रस्त्याच्या दोनही बाजूने डोळ्यांना सुखावेल अशी नुसती हिरवळ वेढून होती. अँजेनीने जॉनकडे बघितले. तो अजूनही आपल्याच विचारात मग्न होता.

" तू बसला आहेस माझ्या शेजारी खरा पण तू अजूनही त्या खुनाच्या केसमध्ये अडकलेला दिसतोस." अँजेनी त्याच्याकडे बघून म्हणाली.

अँजेनीच्या बोलण्याने तो भानावर आला.

" हो,... नाही , तसं नाही " तो गोंधळून म्हणाला.

" मला कळतंय. तुझ्या बॉसने तुझ्या बाबतीत जे केलं ते काही बरोबर केलं नाही. पण काही वेळा आपला इलाज नसतो बघ नंं; माझ्या बाबतीत तरी नियतीनं कुठं बरोबर केलं आहे " तिला सानीची आठवण येऊन ती बोलली.

त्याला काय बोलावे काही कळेना. गाडी चालविता चालविता त्याने फक्त तिच्याकडे एक प्रेमळ दृष्टीक्षेप टाकला.

तेवढ्यात आसमंतात पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ लागला.

" इथे कुठेतरी धबधबा वाहत असावा असं दिसतंया" तो विषय बदलण्याच्या उद्देशाने म्हणाला.

" तो बघ तिकडे. किती सुंदर! " दु:खाच्या छटेतून बाहेर येत अँजेनी उत्साहाने म्हणाली.

तिच्या चेहऱ्यावर एखाद्या छोट्या निरागस गोंडस मुलाचे भाव तरळत होते.

स्वच्छ शुभ्र खळखळणारे पाणी खडकांच्या खडबडीतून धावत सुटले होते.

" वाव, किती सुंदर!" तिने निर्देश केलेल्या दृष्याकडे बघून जॉनच्या तोंडून निघाले.

" किती साम्य आहे माणसाच्या जीवनात आणि त्या पाण्यात " ती पुन्हा आपल्या पूर्वीच्या दु:खद छटेत प्रवेश करीत म्हणाली.

" कसे काय?" जॉनने विचारले.

जॉनला उगीच अपराध्यासारखे वाटू लागले. आपण विचारात गढून गेलो नसतो तर ती तिच्या दु:खाच्या गर्तेत ओढली गेली नसती. तिला त्या दु:खाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तो तिच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करू लागला.

" बघ ना. ते पाणी एकदा वरून पावसाच्या स्वरूपात पडले की त्याची जीवनयात्रा सुरू होते मग त्या यात्रेला शेवट नाही. ते पाणी शेवटी समुद्राला जावून मिळेपर्यंंत त्याने थांबायचं म्हटलं तरी थांबण्याचं त्याच्या हाती नसतं " अँजेनी भावूक होऊन बोलत होती.

" ते तिकडे बघ, हरणं कशी टणाटण उड्या मारत धावताहेत" जॉन अचानक एकीकडे निर्देश करीत म्हणाला.

जॉनच्या बाजूने खिडकीतून स्प्रींग बग्जचा एक मोठाच्या मोठा थवा गाडीच्या चाहूलीने उड्या मारीत सैरावरा धावायला लागलेला दिसत होता.

" किती गोड! किती गोंडस!" अँजेनीच्या तोंडून निघाले.

तिचे डोळे आनंदाने चमकायला लागले होते.

एव्हाना गाडी पुढे गेली होती आणि तो थवा मागे पडला होता. ती गाडीतून परत परत वळून त्या हरणांच्या कळपाकडे ती दिसेनाशी होईपर्यंंत पाहत होती.

" आपलं कॉटेजसुध्दा पुढे कुठेतरी याच प्रवाहाच्या काठावर असावं" जॉन म्हणाला.

" काय तिथेसुध्दा हा प्रवाह आहे ! " तिने आनंदाने विचारले.

" हो असं तो सांगत तर होता" जॉन म्हणाला.

... to be contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

 1. खुपच रोमहष॑क !
  दररोज मी नवीन प्रकरणाची आतुरतेने वाट पहातो

  ReplyDelete
 2. nice and interesting.
  daily wait for next part.

  its just like sherlock holmes stories.

  ReplyDelete
 3. very suspicious and thriller novel.Thanks sunil aie keep it up

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network