Ch-34: फिशींग (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


खळखळत्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूला टुमदार कॉटेजेसचा समूह होता. त्या कॉटेजेसच्या पलिकडे उत्तुंग डोंगर आपल्या कुशीत हिरव्यागार झाडांच्या मखमलीला घेऊन ऐटीत उभे होते. वर आकाशात त्या डोंगराच्या शिखराशी शिवाशिवीचा खेळ खेळणारे शुभ्र ढग. आणि ते संपूर्ण वातावरण खळखळत्या प्रवाहाच्या मंजुळ आवाजाने भरून गेले होते. त्यातच मधे मधे बाजूच्या उंच झाडांत लपलले पक्षी साद घालीत होते.

प्रवाहाच्या पाण्यात पाय सोडून जॉन आणि अँजेनी एका खडकावर बसले होते. दोघांच्याही हातात एक एक मासे पकडण्यासाठी पाण्यात सोडलेला गळ होता. दोघंही आनंदी दिसत होते. अँजेनीला जॉनची गंमत करण्याचा मूड झाला. तिने त्याला एक कोडं विचारलं.

" एकदा नंबर बारा बार मध्ये गेला आणि त्याने बारटेंन्डरला व्हिस्की मागतली. पण बार टेन्डरने त्याला तिथून हाकलून लावले... काय कारण असेल हाकलण्याचे?"

अँजेनीने गळ एकदा हलवून बघितला आणि मग प्रश्नार्थक मुद्रेने जॉनकडे बघितले.

" आता हे नंबर्स केव्हापासनं बारमध्ये जायला लागले? " जॉनने तिची छेड काढीत म्हटले.

" सांगना..." अँजेनी त्याच्याकडे लाडात येऊन पाहत म्हणाली.

" मला वाटते ही हत्ती आणि मुंगीच्या जोक्ससारखी भानगड दिसते" जॉन हसून म्हणाला.

" मग सांग की ... बार टेन्डरने नंबर बाराला का हाकलून लावले? " अँजेनी तकादा लावत म्हणाली.

" नाही बुवा ...मला तर काही सांगता येत नाही...का हाकलून लावले... तूच सांग? " जॉनने आपली हार कबूल करीत म्हटले.

" इतक्या लवकर हरलास ..." अँजेनीने त्याला चिडविण्याच्या सुरात म्हटले.

" नाही ... मला तर काही सुचत नाही आहे... हरलो ... मी हरलो... आता तर सांगशील का हाकलून लावले?" जॉन उत्तर ऐकण्याच्या उत्सुकतेने म्हणाला.

" अरे ... कारण नंबर बारा हा अंडरएज होता... अठरा वर्षापेक्षा कमी" अँजेनी हसत म्हणाली.

" असं होय... अरे ... खरंच की..." जॉन सुध्दा हसायला लागला.

" आता अजून एक सांग..." अँजेनी पाण्यातला गळ हलवून बघत म्हणाली.

" हं...बोल " जॉनने तिला उत्साह दाखवित म्हटले.

" नंबर एट नंबर थ्री ला काय म्हणेल? " अँजेनीने विचारले.

" आता हे नंबरर्स एकमेकांना बोलायला सुध्दा लागले?" जॉनने पुन्हा तिची छेड काढीत म्हटले.

" बोलायचं काय ... काही वेळाने ते एकमेकांवर प्रेम सुध्दा करू लागतील...आपल्यासारखं" अँजेनी त्याला टिच्चून प्रतिउत्तर देत म्हणाली.

" शक्य आहे...म्हणूनच कदाचित 99, 66, 63, 69 हे कोडवर्ड पडले असतील" जॉन एक डोळा मारत म्हणाला.

अँजेनीने लाजेनं मान खाली घेतली.

थोड्या वेळाने मान वर करीत ती त्याच्याकडे लाजेने पाहत म्हणाली,

"चांगलाच बदमाश आहेस ..."

जॉन नुसता तिच्या डोळ्याला डोळे भिडवून गालातल्या गालात अर्थपूर्ण हसला.

" सांगना... नंबर एट नंबर थ्री ला काय म्हणेल?" अँजेनी त्याच्या छातीवर खोटं खोटं मारून लाडात येत म्हणाली.

" नाही बुवा ... हे सुध्दा मी हारलो... तूच सांग" जॉन लाडे लाडे म्हणाला.

" अरे ...नंबर एट नंबर थ्रीला म्हणेल ...वील यू शट अप यूवर माऊथ प्लीज"

" अरे वा छानच आहे" जॉनने आपला गळ हलवून बघत म्हटले.

" बर अजून एक ... नंबर एटने नंबर सिक्स ला नंबर नाईन कडे बोट दाखवून समजाविले ... काय समजाविले असेल?" अँजेनीने विचारले.

" बघ तुझे नंबर एक एक स्टेप पुढे जात आहेत... प्रथम बार मध्ये गेले ... नंतर बोलायला लागले ... अन आता एकमेकांना समजावयाला लागले... आता पुढची स्टेप ..."

जॉन पुढे काही बोलण्याच्या आधी अँजेनीने गमतीने एक मुक्का त्याच्यावर उगारला.

" हं सांगतो .. सांगतो..." जॉन तिला भ्यायल्यासारखं दाखवित म्हणाला, " ... काय समजावले असेल... काय समजावले असेल... हं तो म्हणाला असेल हा काय नेहमी उलटा उभा राहतोस ... बघ तो नंबर नाईन किती शहाणा आहे... कसा सरळ उभा राहतो..." जॉनने गमतीने म्हटले.

" अरे वा... यू आर राईट..." अँजेनी आश्चर्याने म्हणाली

" काय ! मी बरोबर आहे ! " जॉन आश्चर्याने आणि अविश्वासाने उदगारला.

" यस ...यू आर अब्सल्यूटली राईट...आधी कधी तू एकले असशील हे" अँजेनीने शंका काढली.

" अगं नाही ... खरचं नाही ... मी आपला सहजच अंदाज बांधला " जॉन म्हणाला.

थोडा वेळ दोघंही शांत होते.

मग जॉन म्हणाला " आता मी एक विचारतो"

अँजेनीने डोळ्यानेच होकार दिला.

" नंबर शून्य नंबर एट ला काय म्हणाला असेल?" जॉन ने विचारले.

शून्य ... शून्याचा उल्लेख एकून अँजेनीच्या चेहऱ्यावर एक उदासी पसरली. तिच्या चेहऱ्यावरचे ते अवखळ हास्य तो अल्लडपणा अचानक मावळला. जॉनच्या लक्षात आले की त्याने शून्याचा उल्लेख करायला नको होता.

" आय अॅम सॉरी..." तो तिच्या पाठीवर थोपटत म्हणाला.

ती काही न बोलता पाण्यातला गळ हलवू लागली.

" आय अॅम सॉरी ... अगं माझ्या लक्षातच नाही आलं" तो पुन्हा म्हणाला.

" इट्स ऑलराईट ..." ती स्वत:ला सावरत म्हणाली " तूच सांग... मला नाही जमत"

" काय?" जॉनने विचारले.

" अरे शून्य नंबर एट ला काय म्हणाला ते सांग" ती पुन्हा अवखळ होण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.

जॉन काहीच बोलला नाही.

" सांग ना" ती त्याचा चेहरा आपल्याकडे करत म्हणाली.

जॉन तिच्याकडे बघून हसत म्हणाला " हरलीस ...इतक्या लवकर "

" हो ... सांग ना " ती उत्सुकतेने म्हणाली.

" शून्य नंबर एट ला काय म्हणाला ... नाईस बेल्ट" जॉन हसत म्हणाला.

" अरे वा...नाईस "

तीसुध्दा त्याच्यासोबत हसायला लागली.

बराच वेळ पुन्हा शांततेत गेला. दोघंही आपाआपले गळ हलवून बघण्यात मग्न होते.

" तुला मासे बनविता येतात का?" अँजेनीने जॉनच्या जवळ सरकत विचारले.

आपला जड लागलेला गळ ओढून पाहत जॉन म्हणाला " नाही"

" मग आपण मासे का पकडत आहोत?" अँजेनीने विचारले.

" अरे ... कशाला म्हणजे खाण्यासाठी" जॉन तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला.

" मग याचा काही एक उपयोग होणार नाही" अँजेनी म्हणाली

" म्हणजे? "

" मलासुध्दा मासे बनविता येत नाहीत"

" काय? " तो आश्चर्याने म्हणाला.

" हं, तुला कच्चे खायचे असतील तर काही हरकत नाही " ती गमतीने म्हणाली.

" तुलासुध्दा बनविता येत नाहीत? काही हरकत नाही आपण बनवून तर बघूया... ट्राय करायला काय हरकत आहे? " त्याने सुचविले.

" अन् जर नाही जमले तर"

" जसे बनतील तसे खावू. कमीत कमी कच्चे खायची तर वेळ येणार नाही " तो हसत म्हणाला.

तेवढ्यात अँजेनीला जाणवले की तिचा गळ जड लागतो आहे. तिने गळ हलवून बघितला. बहुतेक तिच्या गळाला मासा लागला होता. तिने गळ गुंडाळाण्यास सुरवात केली. एक तपकीरी शेड असलेला पांढरा मासा तडफडत गळासोबत तिच्या जवळ जवळ येऊ लागला. तिने हळूच त्याला गळातून काढून बाजूला खडकावर ठेवलेल्या वेताच्या टोपलीत टाकले आणि ती पुन्हा गळ पाण्यात सोडायला लागली. तेवढ्यात फुलपाखरासारखे काहीतरी तिच्या नाकाला लागून तिला पाण्यात पडलेले जाणवले. तिने नाकाला हात लावून पुसलं आणि मग त्याच हाताने आपल्या डोळ्यावरचे केस बाजूला करीत गळ पाण्यात सोडण्यात ती मग्न झाली.

जॉन अचानक तिच्याकडे बघून जोरजोराने हसायला लागला.

तिने जॉनकडे बघत विचारले, " काय झालं ?"

" तुझा मासा कुठाय ? " त्याने विचारले.

तिने मागे ठेवलेल्या टोपलीत बघितले तर तिथे मासा नव्हता.

" कुठाय? " ती इकडे तिकडे बघायला लागली.

" खरंच कुठाय?" ती गालातल्या गालात हसत म्हणाली.

तिला गंमत वाटत होती.

" गेला तो पाण्यात उडी मारून तुझ्या नाकावर टीच्चू देऊन" तो पुन्हा जोरजोराने हसत म्हणाला.

" अच्छा तो मासा होता होय" ती लक्षात येऊन नाकाला हात लावत म्हणाली आणि तीसुध्दा त्याच्या सोबत जोरजोराने हसायला लागली.


क्रमश: ...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network