Ch-42:शून्याचा शोध कुणी लावला?(शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in Englishलिफ्टमधून बाहेर येऊन जॉन फ्लॅट क्रमांक 3 कडे जाऊ लागला. फ्लॅटच्या उघड्या दाराभोवती बघ्यांची गर्दी जमली होती. काही रिपोर्टरसुध्दा तिथे मधे मधे करत होते. तिथे बाहेर दरवाजाजवळ उभे असलेले पोलीस आळसावलेले दिसत होते. जॉनला बघताच ते आळसावलेले पोलीस सतर्क झाले. ते उगीच बघ्यांच्या गर्दीला आणि तिथे घुसलेल्या रिपोर्टरांना रागावून तिथून हाकलून देवू लागले. जॉनला बघताच ते रिपोर्टर जॉनला सामोरे येऊन त्याला अडवून उभे राहिले. तिथे उभ्या असलेल्या आणि जॉनच्या मागे मागे आलेल्या पोलिसांनी त्यांना जवळजवळ पकडूनच बाजूला केले. जॉन तडक आत गेला.

आत हॉलमध्ये तपासपथक आपल्या कामात मग्न होतं. जॉन त्यांना डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेत बेडरूमकडे वळला. बेडरूममध्ये सॅम होता. जॉनला बघताच तो जॉनच्या पुढ्यात आला.

" साला काहीच पत्ता लागत नाहीये " सॅम जॉनला काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.

" आपल्या डिपार्टमध्येच तडा गेलेला असेल तर काय पत्ता लागणार आहे" जॉनने रागाने टोमणा हाणला.

जॉनचा मूड पाहून सॅमने चूप राहणेच योग्य समजले.

बेडरूममध्ये फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात नियोल वॅग्नरचा देह पडलेला होता. नियोल पंचविशीतला चांगला भारदस्त व्यक्तीमत्व असलेला तरुण होता. तो फ्लॅटमध्ये एकटाच राहत असावा. म्हणजे फ्लॅटमधल्या सामानावरून आणि अजून त्याची दखल घ्यायला कोणी आले नव्हते, त्यावरून तरी तसेच वाटत होते. नियोलच्या पोटावरून ओघळून फरशीवर रक्ताचा डोह साचून थिजला होता. पलीकडून पाठीखालून एक रक्ताचा ओघळ बाहेर आला होता. नियोलच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीची निशाणी तर होतीच सोबत त्याला चाकूने चांगलेच जबर जागोजागी भोसकलेले होते. नियोलचे तोंड अर्धवट उघड्या स्थितीत, मान एकीकडे वाकडी झालेल्या स्थितीत पडलेले होते. जीव जाण्याच्या आधी त्याने प्राणांतिक तडफड केली असावी. त्याच्या अंगात नेहमीचेच बाहेर किंवा ऑफीसमध्ये जायचेच कपडे होते.

खुनी त्याच्या मागोमाग घरात घुसला असावा...

असावा म्हणजे ह्या सगळ्या शक्यताच!...

खोलीतलं, नियोलच्या अंगावरचं, खिशातलं सगळं सामान जसंच्या तसं होतं.

सगळं म्हणजे जे किमती होतं ते तरी....

बाकीचं काही खुन्यानं नेलं असावं की नसावं याचा काहीच पत्ता लागत नव्हता. जॉनला आत्तापर्यंंतच्या अनुभवावरून समजलं होतं की काही काही खुनी सगळ्याच किमती वस्तू नेत नाहीत. काही किमती वस्तू मुद्दाम पोलिसांची दिशाभूल व्हावी म्हणून तशाच ठेवतात. त्यातल्या त्यात नियोल एकटाच असल्यामुळं खुन्याने काय नेलं अन काय ठेवलं समजायला काही मार्ग नव्हता.

नियोलवरून हटून जॉनची नजर समोर रक्ताने भरलेल्या ...नव्हे भरविलेल्या भिंतीकडे गेली.

पुन्हा तेच...

रक्ताने काढलेले एक मोठे शून्य... शून्यच ते...

आणि त्या शून्यात तो खुनी दडलेला होता...

पण शून्य म्हणजे तर काहीच नाही ...

मग त्यात तो कसा दडलेला असेल?...

शून्याच्या मध्ये रक्ताने लिहिलेले होते

" शून्याचा शोध कुणी लावला?"

मग या प्रश्नात नक्कीच खुनी दडलेला असावा...

जॉन विचार करू लागला.

जॉनला आता हा गुंता सोडवण्याची फारच निकड भासू लागली.

तो बोलून तर बसला होता की 'संध्याकाळी प्रेस कॉन्फरंसमध्ये तो सगळं सांगेन' म्हणून.

पण सध्यातरी त्याच्याजवळ सांगण्यासारखे काहीच नव्हते. म्हणजे संध्याकाळपर्यंंत तरी खुन्याचा शोध लागायलाच हवा होता.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network