Ch-43: पुन्हा प्रेस कॉन्फरन्स (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in Englishजॉन त्याच्या बॉसच्या कॅबिनमध्ये त्याच्या समोर बसला होता. कॅबिनमध्ये ते दोघेच होते. बराच वेळ दोघांच्या मध्ये एक अनैसर्गिक शांतता पसरली होती.

"अलेक्सचा पण पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे" जॉन एका फाईलमधले काही कागद काढत म्हणाला.

जॉनचा बॉस मागे खुर्चीवर रेलून सिगार पीत शांतपणे जॉनचं म्हणणं ऐकून घेत होता.

" मृत्यूचं काहीही कारण दिसत नाही" जॉन म्हणाला.

त्याच्या बॉसनं तोंडातली सिगार काढून तिची राख अॅश ट्रे मध्ये झटकली.

" पण मला खात्री आहे की त्याला इन्शुलिनचा ओवरडोज देऊन मारलं असावं... इन्शुलीनच्या ओवरडोजनं असंच होतं. पोस्टमार्टममध्ये मृत्यूचं काहीच कारण सापडत नाही आणि सिध्दही करता येत नाही... कधी कधी तर तो खून आहे की नैसर्गिक मृत्यू अशीही शंका यायला लागते" जॉन म्हणाला.

जॉनचा बॉस खुर्चीवरून उठला आणि पाठमोरा सिगार पीत खिडकीतून बाहेर पाहू लागला. मग मागं वळून तो जॉनला म्हणाला,

" हे बघ जॉन आपण इथे नियोलच्या खुनासंदर्भात चर्चा करायला बसलो आहोत. तू मधेच हे उपटसुंभ अलेक्सचं काय घेऊन बसलास "

" कारण त्याचासुध्दा या खुनाशी संबंध आहे" जॉन खंबीरतेने म्हणाला.

" त्याचा या खुनाशी संबंध? तुला वेडबिड लागलं की काय? तो अॅलेक्स साला कशानं मेला काहीच पत्ता नाही... अन तू याचा अन त्याचा संबंध जोडतोस" बॉस चिडून म्हणाला.

" संबंध आहे म्हणून जोडतो आहे" जॉन आवाज चढवून म्हणाला

" अॅलेक्सला बहुतेक त्या खुन्याचा पत्ता लागला होता... म्हणून त्या खुन्यानं अलेक्सलाच खतम करून टाकलं"

तेवढ्यात आत एक शिपाई आला. शिपायाच्या चाहूलीने दोघांमधील संवाद भंग पावला. दोघांनीही त्या शिपायाकडे बघितलं. शिपायाने बॉसच्या कानाशी वाकून सांगितलं,

" साहेब , बाहेर पत्रकारांनी गर्दी केली आहे"

शिपायानं निरोप दिला आणि तो बाहेर निघून गेला.

" पत्रकार यावेळी ? यांचं काय डोकं बिकं फिरलं की काय?.." जॉनचा बॉस आश्चर्यानं म्हणाला.

" साले जिथं पहा तिथं जमा होतात...यांना फक्त बातम्या हव्या असतात...कोण मेलं कशानं मेलं ... कशाचं काही सोयरसुतक नसतं यांना" बॉस चिडून म्हणाला.

" मीच संध्याकाळी पत्रकार परिषद आहे असं जाहिर केलं होतं" जॉन म्हणाला.

" पत्रकार परिषद? तू जाहिर केलंस ?...आता हे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. आधीच सगळे लोक आणि सगळी मिडीया खवळलेली आहे. आता ते आपल्याला कच्चे चावून खातील. तुला कुणी सांगितलं होतं हा शहाणपणा करायला?"

आता मात्र बॉस जॉनवर जाम भडकला होता.

" सर सकाळी त्यांना टाळण्यासाठी माझ्या तोंडून निघालं" जॉन कसाबसा सावरत म्हणाला.

" तोंडून निघालं? म्हणजे चुका तुम्ही करत जा आणि निस्तरत मात्र आम्ही बसायचं" बॉस कडाडला.

" सर ...मागे मी म्हणालो होतो तसं जर तुम्ही ऐकलं असतंत तर ही वेळ आपल्यावर आलीच नसती..." आता मात्र जॉनचं धैर्य सुटायला लागलं होतं.

" तुला काय वाटतं? मागे तुझं जर ऐकलं असतं तर...तर ही वेळ जी आता आली आहे ती तेव्हाच आली असती. तू तपासात ऐवढा विलंब लावला होतास त्यावर मी पांघरूण घालायचा प्रयत्न केला. तुला मी ऑप्शन दिलं होतं. लवकरात लवकर तपास लावा किंवा होत नाही असं सांगून दुसऱ्याला तरी करू द्या."

जॉनला काय बोलावं काही सुचेनासं झालं.

जॉन थोडा नरम होऊन म्हणाला " पण आता यांना काय सांगायचं?"

" त्याची तू काळजी करू नकोस. सगळं मी सांभाळून घेईन" बॉसनं सुध्दा सरड्यासारखं रंग बदलून जॉनला धीर देण्याच्या आविर्भावात म्हटले.

जॉनला त्यातल्या त्यात बरं वाटलं.

बॉसने सिगार समोरच्या अॅश ट्रेमध्ये चुरगाळून विझवली आणि खुर्चीवरून उठत म्हणाला "चल"

बॉस उठून उघड्या दरवाज्यातून 'खाट खाट' बुटाचे आवाज करीत बाहेर पडला आणि त्याच्या मागे जॉन चूपचाप चालायला लागला.


क्रमश:

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network