Ch-44: एका दगडात दोन पक्षी (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in Englishजॉनचा बॉस आणि जॉन पत्रकारांना सामोरे गेले, तोच पत्रकारांची झुंबड च्या झुंबड त्यांच्या दिशेनं आली.

विजा चमकल्यासारखे कॅमेऱ्यांचे फ्लॅश त्यांच्या चेहऱ्यावर पडू लागले. तिथे तैनात असलेल्या पोलिसांना हाताचं कड करून पत्रकारांना थोपविण्याचं काम करावं लागत होतं. तरीही मागे सगळीकडे गोंधळ चालू होता.

" क्वायट प्लीज" बॉसचा करडा आवाज घुमला.

सगळीकडे शांतता पसरली. तरीही काही पत्रकारांची समोर घुसण्यासाठी चुळबूळ सुरू होतीच. बॉसने आत्मविश्वासाने सभोवार एक नजर फिरविली.

" यस्स" बासने पत्रकारांना प्रश्न विचारण्यासाठी इशारा केला.

समोर असलेल्या पत्रकारांची एकच झुंबड उडाली. बॉसला नुसता गोंगाट झाल्यासारखा आवाज आला. कोण काय विचारत होतं काहीच कळत नव्हतं.

" आय वुईल इन्शोर दॅट दी लास्ट पर्सन इज ऑल्सो अॅन्सर्ड... वन बाय वन प्लीज" बॉस शांततेने म्हणाला.

जॉनने आश्चर्याने बॉसकडे पाहिले. त्याला त्याच्या निर्धास्ततेचं आश्चर्य वाटत होतं.

" तुमचा तो खुनी मेला होता ना, मग आता काय पुन्हा जिवंत झाला?" एक पत्रकाराने आवेशाने आणि तिरस्काराने विचारले.

" पोलीस खातं इतकी घोर जनतेची दिशाभूल करील अशी अपेक्षा नव्हती" दुसरा म्हणाला.

"एवढं होऊनही बेशरमासारखी जनतेला तोंड देण्याची बरी तुमची हिम्मत होते" तिसरा अगदीच चिडून म्हणाला.

" माईंंड यूवर लँगवेज" बॉस कडाडला.

बॉसनं एकदम पावित्रा बदलला होता. जॉनसुध्दा एक क्षण दचकलाच. पोलिसांची पडती बाजू असूनही बॉस असा कसा वागू शकतो याचं जॉनला आश्चर्य वाटत होतं.

सगळीकडे शांतता पसरली.

" हे बघा, मागे आमची चूक झाली मी मान्य करतो. खुनी एकापेक्षा जास्त असू शकतात हे आम्ही गृहीतच धरलं नाही" बॉस एकदमच हीन दीन होऊन बोलू लागला.

बॉसची ही स्टाईलच होती. प्रथम एकदमच अंगावर चढायचं आणि दुसऱ्याच क्षणी एकदम शेळी होऊन मान टाकायची. त्यामुळं आधी तर समोरचा माणूस हादरून जातो आणि नंतर गोंधळून जातो. तसंच झालं. सुरवातीला सगळे पत्रकार हादरून एकदम शांत झाले आणि दुसऱ्या क्षणीच गोंधळून गेले. इतके की त्यांना बॉसची दया आणि कीव यायला लागली. पण ते शेवटी हाडाचे पत्रकार होते. बॉसच्या डिपार्टमेंटचे कुणी त्यांच्या हाताखालचे मिंधे पदाधिकारी नव्हते. लवकरच ते सावरले आणि त्यांनी बॉसवर पुन्हा हल्ला चढवला.

" तुम्ही जनतेचे रक्षक, जनतेचे कैवारी. तुमच्यावर जनतेची जबाबदारी. तुम्ही माफी मागून असे हात झटकून मोकळे होवू शकत नाही"

" आणि आता तरी केसची काय प्रगती आहे? की जिथून सुरू झाली होती तिथंच" कुणीतरी बोललं.

" शून्य गोल असल्यासारखी" कुणीतरी शेपूट जोडली.

थोडी टवाळी टिंगल केल्यासारखी खसखस पिकली.

" तुम्हाला असं माफी मागून गप्प बसता येणार नाही. तुम्हाला काहीतरी अॅक्शन घ्यायलाच पाहिजे"

बॉसला बोलण्यासाठी कुणी चान्सच देत नव्हता.

" ती पण आत्ता या सगळ्यांच्या समोर तुम्हाला जाहिर करायला पाहिजे"

" हो हो आत्ता या सगळ्यांसमोर" बरेचजण एकसुरात बोलले.

आता मात्र बॉसला घाम फुटला. समोरचे पत्रकार हातघाईवर आले होते. बॉसची ट्रीक काही चालली नव्हती. किंबहुना तितक्याच जोरात त्यांच्या अंगावर बूमरँगसारखी उलटली होती.

" जस्ट अ मिनिट प्लीज" बॉसनं हात वर करून लोकांना शांत व्हायला सांगितलं.

पत्रकार थोडे शांत झाले.

" मी माझा अॅक्शन प्लॅन तुमच्या समोर जाहिर करणार आहे"

बॉसला अर्ध्यात तोडून काही जण ओरडले.

" आत्ता इथे आधीसारखी चालढकल चालणार नाही"

बॉसची आता चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी गत झाली होती.

" हो... हो आत्ता इथेच मी माझा अॅक्शन प्लॅन सांगणार आहे " बॉस नरमलेल्या आवाजात आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हणाला.

मग मात्र समोरचे पत्रकार एकदम शांत झाले - बॉसचा अॅक्शन प्लॅन आहे तरी काय हे ऐकण्यासाठी. सगळ्या पत्रकारांनी आपले मायक्रोफोन्स शक्य होतील तेवढे समोर घुसविले.

" नंबर एक. पोलीस हे जनतेचे कैवारी असतात आणि जनतेचा त्यांच्यावर पूर्णत: विश्वास असतो. जनतेच्या त्यांच्यावरच्या विश्वासावर तडा जाता कामा नये म्हणून पोलिसांना नुसती चूक झाली असं कबूल करून चालणार नाही. त्यासाठी त्यांना मोठयात मोठी सजा ही मिळालीच पाहिजे की जेणेकरून ते अशी चूक पुन्हा करण्याची गफलत आणि हिम्मत करणार नाहीत"

जॉनने गोंधळून बॉसकडे पाहिले. बॉस पोलिसांच्याच विरोधात बोलत होता.

आपली ऐकण्यात काही चूक तर होत नाही ना...

किंवा बॉसची बोलण्यात काहीतरी चूक होत असली पाहिजे...

" आणि म्हणूनच मी या क्षणी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे"

आपला निर्णय सांगण्यापूर्वी बॉसने मुद्दाम एक मोठा पॉज घेतला की जेणेकरून त्याच्या निर्णयाने त्याला जो परिणाम साधायचा होता तो साधला गेला पाहिजे. सगळीकडे शांतता पसरली.

" आणि माझा निर्णय हा आहे की ज्यांच्यामुळे चूक झाली आहे त्यांना ताबडतोब सजा देण्यात यावी. त्यासाठी प्रथम एक समिती बसविण्यात येणार आहे. ती समिती या सगळ्या गफलतींचा कसून तपास करील आणि ज्यांच्यामुळे ही चूक झाली त्या ऑफीसरला या समितीचा निकाल येईर्यंंत बडतर्फ केल्याचं मी जाहिर करीत आहे"

जॉनला उभ्या उभ्या धरणीकंपाचा धक्का बसल्यासारखं झालं. जॉन आश्चर्याने त्याच्या बॉसकडे पाहू लागला. पण बॉसचं लक्ष त्याच्याकडे नव्हतंच!

" आणि त्या ऑफीसरच्या जागी तोपर्यंंत तपासासाठी ताबडतोब मी दुसरा योग्य अधिकारी नेमत आहे"

जॉन त्याच्या बॉसचं हे रूप प्रथमच पाहत होता. तो अजूनही आश्चर्याने बॉसकडेच बघत होता. अचानक जॉनच्या आश्चर्याने बॉसकडे पाहणाऱ्या चेहऱ्यावर कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकायला लागले. आता पत्रकारांचा मोर्चा जॉनकडे वळला होता. बॉसने या संधीचा फायदा घेतला. पत्रकारांचं लक्ष जॉनवर केंद्रीत झाल्याचं पाहून त्याने हळूच तिथून काढता पाय घेतला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network