Ch-46: गुगल सर्च (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


एकदम हताश, निराश, म्लान चेहऱ्याने जॉन अॅँजेलीच्या समोर बसला होता.

" साला ब्लडी बॉस. त्यानं मला दगा दिला" जॉन रागाने टेबलावर आपली आवळलेली बंद मूठ आपटत म्हणाला.

अॅँजेली उठून जॉनच्या जवळ गेली आणि प्रेमाने ती त्याच्या केसातून आपला हात फिरवू लागली.

" असं वाटलं बंदूक सरेंडर करण्याच्या अगोदर बंदुकीची नळी त्याच्या कानशिलात ठेवावी आणि सगळ्याच्या सगळ्या गोळ्या द्याव्या उतरवून त्याच्या मस्तकात" जॉन पुन्हा रागाने म्हणाला.

अॅँजेलीने त्याच्या डोक्यातून आपला हात काढून घेतला.

ती त्याच्या समोर उभी राहून समजावण्याच्या सुरात म्हणाली,

" हे बघ जॉन, बॉसवर चिडून काही उपयोग होणार आहे का? बॉसनं जे काही केलं ते आपली चमडी वाचवण्यासाठी. त्याच्या जागी दुसरं कुणीही असतं तरी कदाचित त्यानंही असंच काहीतरी केलं असतं"

" नाही ... त्याचा आधीपासूनच माझ्यावर राग होता. तो कधी ना कधी मला असा दगा देणारच होता" जॉन तिचे बोलणे तोडत म्हणाला.

" पण बॉसनं आपल्याला दगा दिला आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हा मुद्दा आता तितकासा महत्वाचा नाहीये"

जॉननं तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं.

" तू तुझ्यावर लादलेले आरोप कसे धूवून काढू शकतोस हे सध्या जास्त महत्वाचं आहे"

" माझ्यावर लादलेले आरोप मी कसे धूवून काढणार ?" जॉन निराशेने म्हणाला.

" तुझ्यावर लादलेलेे आरोप खोडून काढण्याचा एकच मार्ग आहे"

जॉननं पुन्हा तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं.

" ... आणि तो म्हणजे त्या खुन्याला पकडणे" तिने त्याला आशेचा किरण दाखविण्याचा प्रयत्न करीत म्हटले.

" पण ते आता कसं शक्य आहे ? माझ्याकडचे सगळे अधिकार , शस्त्र त्यांनी काढून घेतलेले आहेत. आता जरी मी प्रयत्न केला तरीही तो एखाद्या पंख कापलेल्या पक्षाने आकाशांत उंच भरारी घेण्याच्या निरर्थक प्रयत्नासारखे होईल "

" नाही. असं एकदम हताश होऊन चालणार नाही. आता काम मोठं जोखमीचं झालं आहे खरं पण तुझ्याजवळही जोखिम पत्करण्यावाचून दुसरा मार्ग नाही"

जॉन खुर्चीतून उठला. तो खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. त्याला खिडकीबाहेरचे रात्रीच्या अंधारात आजूबाजूच्या लाईट्समुळे चमकणारे गोल तळ्यातले पाणी दिसले.

अगदी शांत. ना प्रवाह ना खळखळ...

अगदी गुदमरल्यासारखे वाटत होते ते पाणी...

कसे त्या पाण्याला तळ्याने चहू बाजूने बंदिस्त केले होते...

त्याला जाणवत होते की कदाचित त्याचीही अवस्था त्या तळ्यातल्या पाण्यासारखीच झाली होती...

तो गोल तळ्याचा बंदिस्त काठ पाहून पुन्हा त्याला झीरोची आठवण आली. तो स्तब्ध बराच वेळ त्या तळ्याकडे निरखून पाहत उभा राहिला. मग शांतपणे वळून हळूच तो अँजेनीजवळ येऊन उभा राहिला. बराच वेळ तसाच शांततेत निघून गेल्यावर त्याने अँजेनीला एक प्रश्न विचारला,

" झीरोचा शोध कुणी लावला हे तुला माहित आहे का?"

या असंबंध अचानक प्रश्नाने अँजेनी गोंधळून म्हणाली " नाही... पण का?"

जॉन परत खिडकीच्या जवळ गेला. विचारात गढून जावून पुन्हा तो खिडकीच्या बाहेर बघू लागला. मग बेचैन होऊन तो खोलीत येरझारा घालू लागला.

अँजेनी त्याच्या डोक्यात काय चालले असावे हे समजण्याचा प्रयत्न करीत त्याच्याकडे पाहू लागली. पण अँजेनीला त्याच्या विचाराचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता.

अचानक थांबून कॉम्प्यूटरकडे निर्देश करीत तो म्हणाला,

"अँजी, जरा तो कॉम्प्यूटर सुरू करतेस का?"

" कॉम्प्यूटर कशाला?" अँजेनीने विचारले.

तो काहीच बोलला नाही. पुन्हा बेचैनीने खोलीत येरझारा घालायला लागला. अँजेनी कॉम्प्यूटरपाशी गेली आणि तिने कॉम्प्यूटर सुरू केला.

जॉन आपल्या येरझारा थांबवून तिच्याजवळ येऊन कॉम्प्यूटरसमोर बसला आणि कॉम्प्यूटर बूट होण्याची वाट पाहू लागला. अँजेनी मॉनिटरकडे पाहत कॉम्प्यूटर बूट होण्याची वाट पाहू लागली.

कॉम्प्यूटर बूट होताच एकदम शांत असलेला जॉन अचानक क्रियाशील झाला. जॉन पटापट कीबोर्डची बटनं आणि माऊसची बटनं दाबू लागला. अँजेनी त्याच्याशी काहीही न बोलता शांत राहणंच योग्य आहे हे समजली. ती कॉम्प्यूटरच्या स्क्रीनवर तो काय करीत आहे हे पहायला लागली.

जॉनने आधी इंटरनेट कनेक्ट केलं. मग ब्राऊजरवर डबल क्लीक केलं.

ब्राऊजर ओपन होताच त्याने ब्राऊजरच्या 'अॅडेस' च्या जागी टाईप केले

"गुगल डॉट कॉम"

गुगल सर्च इंजीनची साईट ओपन झाली.

गुगलला त्याने सर्च स्ट्रींग टाईप केली

"झीरो इन्व्हेन्शन"

अँजेनीला जॉनच्या डोक्यात काय चालले होते त्याची आता पुरेपूर कल्पना यायला लागली होती.

" हं, मलाही वाटते.... शून्याचा शोध कुणी लावला? या प्रश्नातच खुनी कोण आहे? आणि तो खून का करतो आहे? याचं उत्तर दडलं असावं ं " अँजेनी उत्साहानं म्हणाली.

जॉनचं भराभर की बोर्ड आणि माऊसची बटनं दाबणं सुरूच होतं. की बोर्डच्या आणि माऊसच्या बटनांच्या आवाजानं तिला उचंबळून आलं. नेहमी सानी असा कॉम्प्यूटरवर बसून काम करत असला आणि असाच की बोर्डचा आणि माऊसचा आवाज येत असला तर तिचं ऊर प्रेमाने भरून यायचं...

तशाच भावना तिला जॉनबद्दलसुध्दा वाटायला लागल्या होत्या...

चला एक तरी बरं झालं. जॉन नवीन उत्साहानं कामाला लागला...

तिला फार बरं वाटत होतं.

" तू तुझं चालू दे. मी मस्तपैकी गरमागरम कॉफी घेऊन येते" असं म्हणत अँजेनी किचनमध्ये गेली.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network