Ch-47: यस्स (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


अँजेनी कॉफी घेऊन आली. जॉन अजूनही काम्प्यूटरवर गढून गेलेला होता. तिने एक कॉफीचा कप हळूच त्याला डिस्टर्ब न करता त्याच्या पुढ्यात ठेवला.

तिच्या हातातल्या कपातून एक घोट घेत ती म्हणाली , " काय काही मिळतय का? "

तिचा त्याला बोलण्यात दुहेरी उद्देश होता. एक तर त्याच्या पुढ्यात ठेवलेल्या कॉफीच्या कपाकडे त्याचं लक्ष आकर्षित करणे आणि दुसरा खरोखरच त्याला काही मिळालं का हे विचारणे.

जॉनने अँजेनीकडे आणि मग कॉफीच्या कपाकडे एक ओझरता दृष्टीक्षेप टाकला. आणि आजूबाजूला काहीतरी शोधल्यासारखं बघू लागला.

" काय पाहिजे? " अँजेनीने विचारले.

" एखादा कागद, वही किंवा काहीतरी लिहायला आहे का? "

अँजेनी हॉलमध्ये गेली. जॉनने त्याच्या पुढ्यात ठेवलेल्या कॉफीचा एक घोट घेतला आणि कॉफीचा कप पुन्हा तिथेच परत ठेवून दिला. तो पुन्हा आपल्या कामात मग्न झाला. तेवढ्यात अँजेनी एक डायरी घेऊन आली. तिने ती डायरी उघडून जॉनच्या पुढ्यात ठेवली आणि पेन त्याच्या पुढ्यात धरला. डायरी ठेवण्याची चाहूल लागताच तो पुन्हा कामातून भानावर आला. अँजेनीजवळचे पेन घेऊन तो डायरीवर काहीतरी आकडेमोड केल्यासारखी असंबंधित अक्षरं लिहू लागला.

अँजेनी कॉफीचे घोट घेत आश्चर्याने त्याच्या खांद्यावरून वाकून तो काय करतो आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली.

अचानक जॉनने आपल्या उजव्या हाताची मूठ आवळून विजयोद्गार काढले-

"यस्स्"

तो ताडकन खुर्चीवरून उठून उभा राहिला होता. त्याला कदाचित खुनाबद््दल किंवा खुन्याबद्दल काहीतरी माहिती मिळाली असावी.

" काय? काही समजलं?"

अँजेनीचा चेहरा उजळला होता.

" हे बघ, त्या सिरीयल किलरने प्रथम सानीचा खून केला"

सानीचं नाव एकून अँजेनीचा उत्साहाने उजळलेला चेहरा दु:खाने म्लान झाल्यासारखा झाला.

" दुसरा त्यानं खून केला तिचं नाव होतं हुयाना"

अँजेनी त्याला काय म्हणायचे ते समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी कधी तो काय म्हणतो ते ऐकत होती तर कधी त्याच्या समोर ठेवलेल्या डायरीवर काय लिहिले आहे हे वाचायचा प्रयत्न करीत होती.

" तिसरा खून झालेल्या व्यक्तीचं नाव होतं उटीना आणि आता हल्ली चौथा ज्याचा खून झाला त्याचं नाव होतं नियोल "

" मग? " प्रश्नार्थक मुद्रा करीत अँजेनीच्या उघड्या तोंडून निघाले.

" आणि आता पाचवा खून ज्याचा होणार आहे त्याचं नाव 'वाय' (Y) या अक्षराने सुरू होणारं आहे."

" हे तू कसं काय सांगू शकतोस? "

मग जॉन समोरची डायरी आणि इंटरनेटवरची माहिती अँजेनीला दाखवून तिच्यासमोर खुनाचं एक एक रहस्य उलगडायला लागला. जसं जसं एक एक रहस्य उलगडत होतं तसे तसे तिचे डोळे आश्चर्याने विस्फारत होते.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network