Ch-52: ब्रम्ह हे परीपूर्ण (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

हिमालयातील डोंगराच्या पायथ्याशी नदीच्या काठावर असलेल्या गुहेत ध्यानमग्न बसलेला ऋषी, अचानक दचकून उठला. त्याचे डोळे लाल होते आणि चेहऱ्यावर काहीतरी सापडल्याचा गूढ आनंद ओसंडत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय स्मित पसरले. हळू हळू आपसूकच त्याचे डोळे पुन्हा मिटले. पुन्हा त्याच्या जाणीवेच्या कक्षा स्थल, काळ आणि वेळेच्या मर्यादा ओलांडून मुक्तपणे विचरण करू लागल्या.

जंगलात पर्णकुटीच्या जवळ तिघेजण आपाआपसात काहीतरी चर्चा करीत होते. तेवढ्यात त्यांच्यामागून तो ऋषी आला. त्याची चाहूल लागताच ते सर्वजण मागे वळून त्याच्याकडे बघू लागले.

हा तर तोच ऋषी....

जो त्यांना पूर्वी एकदा होता....

त्यांना त्याचे शब्द आठवले-

" काळजी करू नका. मी तुम्हाला तुमच्या विवंचनेतून लवकरच सोडवीन "

ते मोठ्या आशेने त्याच्याकडे पहायला लागले.

ऋषीच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य तरळले.

" तुमची विवंचना संपलीच म्हणून समजा" ऋषी गूढपणे म्हणाला.

" काय ? ... आमची विवंचना संपली?" तिघांच्याही तोंडातून आनंदोद्गार निघाले.

ऋषीने गूढपणे एका संस्कृत श्लोकाचे मोठयाने उच्चारण केले


ॐ पूर्णं अद: पूर्णं इदं, पूर्णात् पूर्णं उदच्यते ।

पूर्णस्य पूर्णं आदाय, पूर्णं एवाव शिष्यते ॥


"अर्थात जेव्हा पूर्ण पूर्णाशी मिळविले असता किंवा पूर्णातून पूर्ण काढले असता शेवटी शिल्लक पूर्णच राहते. ब्रह्म हे परिपूर्ण आहे. म्हणून ब्रह्म बह्मात मिळविले असता किंवा ब्रह्मातून ब्रह्म काढले असता शेवटी शिल्लक ब्रह्मच राहते.

इथे पूर्ण आणि ब्रह्म म्हणजे अगणित असू शकते...जसा दिवस असतो तिथे रात्र ही आलीच, उजेड आला तिथे त्याच्या विरुध्द अंधार आलाच तसं जिथे पूर्ण म्हणजे अगणित असेल तिथे पूर्णाच्या विरुध्द रिक्तता म्हणजे शून्य हा आलाच."

समोरच्या नदीकडे बोट दाखवून ऋषी पुढे म्हणाला, " त्या पाण्यातल्या बुडबुड्यांकडे पहा ते कसे तयार होतात आणि नष्ट होतात "

" अशी एक गोष्ट आहे की ती कधी काहीच नाही आणि कधी कधी ती सर्व काही आहे. ती जिथून सुरू होते तिथेच संपते. ती अशी गोष्ट आहे की जिच्यापासून हे ब्रह्मांड, तुम्ही आणि मी तयार झालो आहोत. ती अशी गोष्ट आहे की ज्यात आपल्या सर्वांंना एक दिवस विलीन व्हायचे आहे"

बोलता बोलता ऋषी त्या तिघांच्या भोवती गोल गोल फिरत होता.

"ऋषीवर, आम्ही गणितावर संशोधन करीत आहोत आणि आम्हाला आमच्या कोड्याचे गणिती उत्तर हवे आहे; आध्यात्मिक नाही" त्यातला एकजण म्हणाला.

" हो, तुमचे संशोधन तुम्हाला अपूर्ण ज्याच्यामुळे वाटत आहे ते तुमच्या कोड्याचे उत्तर गणिती तर आहेच आणि तेवढेच आध्यात्मिकसुध्दा आहे"

मग ऋषीने सगळ्यांना उठवून एका बाजूला यायला सांगितले आणि गोल गोल चालून त्याच्या पावलांच्या ठश्यांमुळे जे वर्तुळ झाले होते त्याकडे निर्देश करीत तो म्हणाला ,

" तुम्हाला तुमचे संशोधन पूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ते आहे शून्य"

तिघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

ऋषी म्हणाला " शून्य हा जिथे सुरू होते तिथेच संपते"

एका जणाने एक वर्तुळ काढले.

ऋषी म्हणाला " कधी शून्य हे काहीच नाही"

एका जणाने 0 अधिक 6 बरोबर 6 असे लिहिले.

ऋषी पुढे म्हणाला " कधी शून्य हे सर्वकाही म्हणजे सर्वसमावेशक आहे"

दुसऱ्याने 0 वेळा 6 बरोबर 0 असे लिहिले.

त्या तिघांच्याही संशोधन कार्याला आता गती लाभली होती. ते तिघेही त्यांच्या कार्यात मग्न झाले. जेव्हा ते भानावर आले तेव्हा त्यांनी आजूबाजूला बघितले. तो ऋषी तिथे नव्हता.

त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते.

कुठे गेला होता ऋषी?...

कदाचित तो शून्यात विलीन झाला होता...

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network