Ch-58: आठवणी (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

रात्रीचा 1 वाजला होता. आज किमान तीनचार दिवस तरी झाले असतील जॉनने स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. वेळेचं, दिवसाचं त्याला काहीच भान राहिलं नव्हतं. आज पण त्याला भान आलं होतं ते त्याच्याजवळचा मद्याचा स्टॉक संपल्यामुळे. जसं भान आलं तशा त्याच्या सर्व संवेदना जागृत व्हायला लागल्या. त्याला अँजनीबरोबरचा एक एक प्रसंग आठवायला लागला.
तिला त्याने कृत्रिम श्वास देऊन जणू तिच्या श्वासांशी जुळलेले त्याचे नाते...
तिच्या भेटीसाठी नेहमी अधीर असलेले त्याचे मन...
कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करूनही आपसूकच तिच्या घराकडे वळणारी त्याची पावले...
तिच्याशी त्याची प्रथम डेट....
त्याचा तिच्याशी तो उत्स्फूर्त, पवित्र प्रथम प्रणय...
तिच्या श्वासांची उब...
तिच्या प्रेमाचा वर्षाव आणि ओलावा...
तिच्यासोबत घालविलेले ते सुटीचे दिवस...
तिच्या चेहऱ्याच्या त्या अवखळ, खट्याळ छटा...
रातोरात एंगेजमेंट रिंग आणून तिला त्याने प्रपोज केले तो क्षण ...
तिचा तो एखाद्या वेलीप्रमाणे बिलगून दिलेला होकार ...
त्याला निराशेच्या गर्तेतून काढणारे तिचे ते प्रोत्साहन...
आणि...
आणि ... तिचा तो निर्घृण खून....
त्याचे डोळे आसवांनी डबडबले...
अश्रू ओघळून गालावरून घरंगळायला लागले...
त्याला स्वत:चीच चीड यायला लागली होती.
जेव्हा खुनाचे रहस्य उलगडले होते, तेव्हाच त्याच्या का लक्षात आले नाही की पाचव्या खुनानंतर सहावा खून त्याच्या आवडत्या अँजीचाच होणार होता....
त्याच्या ते लक्षात यायला हवे होते...
पण पाचवा खून टाळण्याच्या नादात तो पाचव्या खुनाच्या शोधातच एवढा गुरफटून गेला की त्याला सहाव्या खुनाचा विचारसुध्दा शिवला नाही....
त्याने मनगटाने दोन्ही डोळ्यातले अश्रू पुसले. त्याला अजूनही विश्वासच होत नव्हता की ती अशी त्याला एकाकी टाकून गेली आहे. त्याने घरात चहूकडे एक नजर फिरविली.
घर कसं भयाण वाटत होतं....
घर भयाण झालं होतं की त्याचे विचार तसे झाले होते....
त्याने समोरच्या दाराकडे बघितलं. पेपरवाल्याने दाराखालून ढकललेले तीन चार न्यूज पेपर जसेच्या तसे पडले होते. त्याला असं वाटत होतं की ते न्यूजपेपरसुध्दा दाराच्या खालून डोकावून जणू त्याला चिडवित आहेत. तो उठला. दरवाज्याजवळ गेला. एक क्षण त्याला दरवाजा उघडून थोडी बाहेरची मोकळी हवा घ्यावी असं वाटलं. पण नको, आता या एकांतातच बरं वाटायला लागलं होतं. त्याने दरवाज्याखालचे न्यूज पेपर आत ओढले. तिथेच उभं राहून त्याने ते चाळले. सगळीकडे दंगा, जाळपोळ, लाठीमार याच्याच बातम्या होत्या. एवढंच नाही तर भारतातही प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी भारतातही दंगे पेटले होते. म्हणजे वातावरण अजूनही निवळलं नव्हतं. अमेरिकन लोकांनी तर जसा भारतीयच नाही तर जे कुणी इतर दुसऱ्या कोणत्याही देशातील असतील त्यांना हाकलून लावण्याचा चंगच बांधला होता. आणि भारतात भारतीय लोकांनी मल्टीनॅशनल कंपन्या तिथून हाकलून लावण्यासाठी धरणे धरायला सुरवात केली होती. त्याने न राहवून ते न्यूज पेपर कोपऱ्यात एका जागी टाकले आणि पुन्हा जिथून उठून गेला होता तिथे जावून बसला. समोर टी पॉयवर मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा ढीग जमा झाला होता आणि बाजूला त्याचा रिकामा ग्लास निवांत पहुडला होता. त्याने मग समोरच्या टी पॉयवरून रिमोट घेऊन टी. व्ही. सुरू केला. एक एक चॅनल तो समोर जाऊ लागला. कोणत्याही एका चॅनलवर थांबण्याची त्याला इच्छा होईनाशी झाली. सगळीकडे त्याच त्या बातम्या जाळपोळ, दंगे लाठीमार, अश्रूधूर. त्याला कंटाळा आला. त्याने रिमोटचे बटण कचकन दाबून टिव्ही बंद केला. आणि रिमोट बाजूच्या सोफ्यावर फेकून दिला.
त्याला जाणवत होते की आपल्याला या नैराश्यातून आता बाहेर पडायला हवे...
पण कसे ?...
तेच त्याला कळत नव्हते...
जर आपण आपल्याला एखाद्या कामात गुंतवून घेतले तर?...
हो हा यातून निघण्याचा मार्ग चांगला आहे...
पण डिपार्टमेंटनेही त्याच्याकडे पाठ फिरवली होती. अजूनही त्याला कामावर रूजू होण्याची परवानगी नव्हती ...
आणि ती हे सगळं निवळल्याशिवाय मिळण्याची शक्यताही नव्हती...
तो उठून उभा राहिला. आणि हॉलमध्ये येरझारा घालू लागला.
अजूनही जर आपण खुन्याला पकडू शकलो तर?...
कमीत कमी हे बाहेर बिघडलेलं वातावरण निवळण्यास तरी मदत होईल. पण खुनी हा एक नसून एक संघटनाच असण्याची जास्त शक्यता होती. संघटना असली म्हणून काय झालं?...
त्या संघटनेतला एक जरी सदस्य आपल्या हातात आला तर एक महत्वाचा दुवा मिळविल्यासारखे होईल...
नाही, आपल्याला काही तरी केलेच पाहिजे...
तो खिडकीजवळ उभा राहून बाहेर अंधारात पाहू लागला. नुसता शून्यात. त्याच्या मुठी आवळू लागल्या.
अँजेनीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी तरी आपल्याला काहीतरी केलेच पाहिजे...
पण कुठून सुरवात करायची?..
जंगलातलं एखादं झाड जर पेटलं तर ते विझवणं सोपं असतं पण इथं तर हा वणवाच लागलेला आहे...
मग त्याने पुन्हा येरझारा मारत केस पहिल्यापासून पुन्हा आठवणं सुरू केलं.
न जाणो कुठे एखादा मुद्दा सुटला असला तर?...
पहिला खून ...
दुसरा खून ....
तिसरा खून ....
एकदम त्याच्या डोक्यात आले की-
तिसऱ्या खुनाच्या वेळी जे प्रेत आपल्याला बिल्डींगच्या खाली सापडले, त्याचा नक्कीच खुनाशी काहीतरी गहन संबंध असावा...
नंतर आपण ज्याचे प्रेत सापडले त्याच्या घरावर धाड घातली होती... तिथे एकही फिंगरप्रिन्ट आढळू नये!...
तिथल्या कॉम्प्यूटरची हार्ड डिस्कसुध्दा गायब झाली होती...
याचा अर्थ त्याचा खुनाशी नक्कीच काहीतरी दाट संबंध होता...
तो बंगला अजूनही पोलिसांच्या ताब्यात होता. त्याच्यावर कुणीच आपला हक्क सांगितलेला नव्हता.
इथेच आपल्याला काहीतरी साखळीतील एखादी सुटलेली कडी सापडू शकते...
जॉनला एकदम उत्साह वाटू लागला. करण्यासारखे काहीतरी त्याला सापडले होते.
त्या बंगल्याची पुन्हा एकदा व्यवस्थित पाहणी केली तर?...
पण चाव्या तर पोलिसांजवळ होत्या...
चला आता प्रथम इथून बाहेर पडायला पाहिजे...
तिथे गेल्यावर पुढे काय करायचे ते बघू...
त्याने स्वत:चे सर्व निराशायुक्त विचार झटकून टाकले आणि एका मजबूत निश्चयाने तो घराच्या बाहेर पडला.
क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network