Ch-59: आर्यभट्ट (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

कमांड2 निश्चिंत होऊन खुर्चीवर रेलून बसला होता. त्याच्यासमार टीव्ही सुरू होता. पण त्याचे लक्ष टीव्हीकडे कुठे होते? तो तर आपल्याच तंद्रीत होता. बॉसने आत्तापर्यंंत सांगितलेली सर्व कामे त्याने चोख बजावली होती. एकंदरीत बॉसही त्याच्यावर खुष वाटत होता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कमांड1च्या खुनाची शंका बॉसला आली नव्हती. मजा म्हणून अधूून मधून तो टिव्हीवरचे चॅनल्स बदलून बातम्यांचे चॅनल्स बघत होता. त्या जाळपोळीच्या , लाठीमार, दगडफेक दंग्याच्या बातम्या पाहून त्याचे मन मोहरून जात होते. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच स्मित पसरले होते. तो त्याच्या तंद्रीतून बाहेर आला. आणि अचानक तो उठून खुर्चीवर ताठ बसला.

असं सुस्त राहून चालणार नाही...

आपल्याला आता पुढच्या कारवाईच्या मागे लागले पाहिजे...

तो खुर्चीवरून उठला. त्याने तिथेच दोनचार येरझारा घातल्या आणि मग काहीतरी मनाशी निश्चित करून त्या खोलीत कोपऱ्यात ठेवलेल्या कपाटाजवळ गेला. कपाट उघडून त्याने कपाटाचे सगळ्यात खालचे ड्रावर उघडले. ड्रावरचा बॉक्स पूर्णपणे बाहेर काढून खाली त्याच्या पायाशेजारी ठेवला. ड्रावर काढल्यानंतर झालेल्या पोकळीत मग त्याने आतला चोरकप्पा उघडला. त्या कप्प्यातून चाचपडून त्याने काहीतरी काढून आपल्या पॅन्टच्या उजव्या खिशात कोंबले. नंतर त्याने तो चोरकप्पा व्यवस्थित बंद केला. पायाजवळचा ड्रावर उचलून त्याच्या पहिल्या जागी व्यवस्थित ठेवला आणि कपाट बंद करून तो कॉम्प्यूटरजवळ जावून उभा राहिला. कॉम्प्यूटर सुरू केले आणि कॉम्प्यूटर बूट होण्याची वाट पाहत तो खोलीत येरझारा घालू लागला.

पुढची कारवाई करण्याच्या आधी आपल्याला व्यवस्थित पूर्वतयारी केली पाहिजे...

आपलं उद्दिष्ट अजूनही अपूर्ण आहे...

ज्या उद्दिष्टासाठी आपण कमांड1चा खून करण्याची रिस्क घेतली होती, ते अजून तरी आपल्या दृष्टीक्षेपात आलेलं दिसत नव्हतं...

त्याने उजव्या पॅन्टच्या खिशातून आताच कपाटातून काढलेलं पेन ड्राईव्ह काढलं. पेनड्राईव्हकडे पाहत तो विचार करू लागला.

पूर्वतयारी म्हणून आपल्याला बॉसच्या बाबतीत जे मटेरीयल कमांड1च्या कॉम्प्यूटरवर मिळालंं त्याची पुन्हा एकदा व्यवस्थित उजळणी करायला पाहिजे...

अचानक कमांड2 येरझारा घालता घालता थांबला. त्याने कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघितले. कॉम्प्यूटर बूट झाला होता. कॉम्प्यूटरच्या जवळ जावून प्रथम त्याने पेन ड्राईव्ह कॉम्प्यूटरला लावले. खुर्ची ओढून कॉम्प्यूटरच्या समोर बसत एखाद्या जादूगाराने हातसफाई करून जादू करावी तसे तो कॉम्प्यूटरला कीबोर्ड आणि माऊसच्या द्वारे वेगवेगळे कमांड द्यायला लागला. त्याने पूर्वी कमांड1च्या मेलबॉक्समधून जी महत्वाची फाईल आपल्या पेन ड्राईव्हवर कॉपी करून घेतली होती ती उघडली. तो एक रिसर्च पेपर होता. पेपरचं टायटल होतं.

"आर्यभट्ट्ाचे साहित्य".

त्याचा अंदाज होता की या पेपरमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला भविष्यात अशी काही गोष्ट मिळणार होती की ज्याद्वारे त्याचा फायदाच फायदा होणार होता. कमांड2च्या ओठांवर एक स्मित तरळलं. कदाचित त्याला भविष्यामध्ये जो फायदा होणार होता त्याच्या नुसत्या कल्पनेने तो हुरळून गेला असावा. तो त्या पेपरमधले महत्वाचे मुद्दे् वाचू लागला...


...भारतीय गणित आणि खगोलशास्त्राची सुरवात कोणी केली हे सांगणं जरी कठीण असलं तरी भारतीय वेदात गणित आणि खगोलशास्त्राची सर्व माहिती उपलब्ध आहे. अनेक ऋषींनी पंचांगाचे नियम, नक्षत्र विभाजन वैदिक कार्यासाठी आवश्यक तिथी आणि मुहूर्त निर्धारित करणे, ग्रहण, अमावस्या इत्यादि माहिती देण्यासाठी सर्व पध्दती विकसित केल्या होत्या. काळाबरोबर पैतामह सिध्दांत, वासिष्ठ सिध्दांत, रोमक सिध्दांत, पौलिक सिध्दांत इत्यादि विकसित झाले. पण ते हळू हळू जुने होऊन त्यांचे अचूक परिणाम येत नव्हते. त्यामुळे त्याकाळी लोकांचा त्यावरचा विश्वास उडत चालला होता. पण कालांतराने आर्यभट नावाच्या एका विद्वानाने गणित आणि खगोलशास्त्राविषयीच्या ज्ञानातील त्रुटी दूर करून त्या ज्ञानाला नव्याने प्रस्तुत केले.

भारताच्या इतिहासात ज्याला 'गुप्तकाल' किंवा 'सुवर्णयुग' म्हणतात, त्या काळात भारताने साहित्य, कला आणि विज्ञान या क्षेत्रात अभूतपूर्व अशी प्रगती केली. विज्ञानाच्या क्षेत्रात गणित, रसायनशास्त्र आणि जोतिष्यशास्त्र या विषयात विशेष प्रगती झाली. त्या काळात आर्यभट नावाचे एक प्रसिध्द गणितज्ञ आणि जोतिष्यकार होऊन गेले. ते सध्याच्या बिहारराज्याची राजधानी पटना (त्यावेळचे पाटलीपुत्र) च्या जवळ कुसुमपुर या गावी राहत होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल सन् 476 ला आणि मृत्यू सन् 520 ला झाला होता. त्यावेळी बौध्द धर्म आणि जैन धर्म खूप प्रचलित होता. पण ते सनातन धर्माचे अनुयायी होते. त्यांनी गणित आणि जोतिष्य या विषयात बरेच महत्वपूर्ण आणि त्या काळाच्या दृष्टीने विस्मयकारी संशोधन केले. त्यांनी आपले संशोधन ग्रंथरूपात शब्दबध्द करून पुढच्या पिढ्यांना ते प्राप्त व्हावे याची व्यवस्था करून ठेवली होती. त्यावेळी मगध स्थित नालंदा विश्वविद्याल हे ज्ञानदानाचे प्रमुख आणि प्रसिध्द केंद्र होते. तिथे देशातून आणि परदेशातून विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी येत. तिथे खगोलशास्त्राच्या अध्ययनासाठी एक विशेष विभाग होता. एका प्राचीन श्लोकानुसार आर्यभटांनी नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपतीपदसुध्दा भूषविले होते.

आर्यभटांनी लिहिलेल्या तीन ग्रंथाची माहिती सद्य:स्थितीत उपलब्ध आहे. दशगीतिका, आर्यभट्टीय आणि तंत्र. पण जाणकारांच्या मते त्यांनी अजून एक ग्रंथ लिहिलेला आहे. 'आर्यभट्ट सिध्दांत' पण त्याचे फक्त 34च श्लोक सध्या उपलब्ध आहेत. त्यांच्या या ग्रंथाचा सातव्या शतकात जास्त वापर होता. पण हा ग्रंथ बाकीच्या ग्रंथाप्रमाणेच वापरात असतांना त्याचाच फक्त असा का लोप पावावा? हे एक अनाकलनीय कोडे आहे.

आर्यभट हे पहिले आचार्य होते की ज्यांनी ज्योतिष गणितात अंकगणित, बीजगणित आणि रेखागणिताचा सामावेश केला आहे. 'आर्यभट्टीय' ग्रंथात त्यांनी ज्योतिष्यशास्त्राच्या मूलभूत सिध्दांताची ओळख करून दिली आहे. या ग्रंथात 121 श्लोक आहेत जे त्यांनी चार खंडात विभागित केले आहेत.

गीतपादीका नावाच्या पहिल्या खंडात ग्रहांचा परिभ्रमण काळ, राशी , आकाशातील ग्रहांच्या कक्षा या विषयांवर प्रकाश टाकला आहे.

गीतपाद नावाच्या दुसऱ्या खंडात त्यांनी गणिताचे

वर्गमूळ, घनमूळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, ज्या (sine) इत्यादिंचे

विश्लेषन केले आहे.

त्यांनी वृताचे व्यास आणि परिधी यातील संबंध ज्याला आपण

पाई(Pi) म्हणतो त्यांनी तो 3.1416 एवढा, म्हणजे जवळ जवळ बरोबर असा काढला होता.

या ग्रंथात त्यांनी बीजगणितातले

(अ+ब)2 = (अ2+2अब+ब2)

चे सुध्दा विस्तृत विष्लेशण केले आहे.

या ग्रंथाच्या 'कालक्रिया' या तिसऱ्या खंडात

काळाचे वेगवेगळे भाग, ग्रहांचे परिभ्रमण , संवत्सर, अधिक मास, क्षय तिथी, वार ,सप्ताह

यांची गणना याचे विवेचन दिले आहे.

याच ग्रंथाच्या एका जागी त्यांनी संक्षिप्त स्वरूपात संख्या लिहिण्याची पध्दत सांगितलेली आहे.

तिसरा खंड 'गोलपाद' नावाने प्रचलित असून त्यात खगोल विज्ञानाची माहिती आहे.

सूर्य, चंद्र, राहू ,केतू आणि इतर ग्रहांची दृष्यादृष्य परिस्थिती , दिवस आणि रात्रीची कारणे, राशींचा उदय, ग्रहणाची कारणे इत्यादि विवरणही या खंडात आढळते.

आजच्या काळातले मोठमोठे वैज्ञानिक अजूनही अचंब्याने तोंडात बोट घालतात की त्या काळात आर्यभटाने पाई (Pi) ची किंमत, वृत्ताचे क्षेत्रफळ , ज्या (sine) इत्यादिंचे विश्लेषन कसे केले असावे.

आर्यभट हे युगप्रवर्तक होते. त्यांनी आपल्या वेळच्या प्रचलित अंधश्रध्दांना खतपाणी न घालता खोडून काढले. त्यांनी जगाला सांगितले की पृथ्वी चंद्र आणि अन्य ग्रहांना स्वत:चा प्रकाश नसतो आणि ते सूर्यामुळे प्रकाशित होतात. पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्यप्रकाश पडतो तिथे दिवस आणि जिथे सूर्यप्रकाश पडत नाही तिथे रात्र असेही त्यांनी सांगितले होते. पृथ्वीवरील वेगवेगळ्या शहरातील सूर्य उगविण्याची आणि सूर्य मावळण्याची वेळ यात का फरक असतो याच्या कारणांचे विश्लेषनही त्यांनी विस्तृतरित्या केले आहे. त्यांनी हे पण जाहिर केले की पृथ्वी गोल आहे आणि ती स्वत:च्या आसाभोवती फिरते. त्यांनी या मान्यतेला तोडले की पृथ्वी ही ब्रह्मांडाचा केंद्र आहे आणि सूर्य आणि अन्य ग्रह त्याला प्रदक्षिणा घालतात. त्यांनी पृथ्वीचा आकार, गती, आणि परिधीचा अंदाज बांधला होता आणि सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या बाबतीत संशोधन केले होते.

त्यांनी त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षाचे एक महायुग सांगितले आणि एका महायुगाला चार भागात

सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग

असे विभागले. या चारही युगाचा काळ त्यांनी दहा लाख ऐंशी हजार वर्ष एवढा सांगितला आहे.

भविष्यात चंद्र आणि सूर्य ग्रहणे केव्हा केव्हा होतील हे काढण्यासाठी त्यांनी एका सूत्राचा विकास केला आणि त्या सूत्रानुसार त्यांची भविष्यवाणी कधीच चुकीची ठरली नाही.

ज्योतिष्याच्या व्यतिरिक्त गणितशास्त्रातसुध्दा आर्यभटांनी नवीन नवीन सिंध्दांतांचा शोध लावला. भारतात सर्वप्रथम त्यांनी बीजगणिताच्या ज्ञानाचा विस्ताराने प्रचार केला. शून्य सिध्दांत आणि दशमलव संख्याप्रणालीचा आविश्कार भारतात सर्वप्रथम कोणी केला हे सांगणे जरी कठीण असले तरी आर्यभटांनी त्यांचा प्रयोग आपल्या ग्रंथात कुशलतेने केलेला आढळतो. त्यांचे यश भारतातच नव्हे तर बाहेर विदेशातसुध्दा पसरले होते. अरब विद्वानांना त्यांच्या जोतिष्य ज्ञानाचा खूप अभिमान होता आणि ते त्यांना 'अरजभट' नावाने ओळखीत.

तर असे हे आर्यभट ज्यांनी बीजगणिताचा विकास केला होता आणि ज्योतिष गणितात अंकगणित, बीजगणित आणि रेखागणिताचा सामावेश केला आहे, त्यांना भारतीय गणितात आणि जोतिष्यशास्त्रात मैलाचा दगड म्हणून उल्लेखले तर वावगे होवू नये . त्या काळी जवळ जवळ सर्व ग्रंथ श्लोकांच्या स्वरूपात असत आणि त्यांना मुख्यत्वे पाठांतर करून एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सोपविले जात असे. त्यांचा 'आर्यभट्ट सिंध्दांत' हा ग्रंथ सातव्या शतकात मोठया प्रमाणात उपयोगात असूनही तो पुढे लोप पावावा ही गोष्ट त्या ग्रंथातल्या विद्येविषयी एक गूढ कुतूहल जागृत करते. त्यांचा अचूक निकष असलेल्या गणित या विषयाशी आणि त्यांनी जे ज्ञान त्यांच्या ग्रंथात दिले ते अचूक असल्याची ग्वाही पाहता त्यांचा जो ग्रंथ लोप पावला त्यात जोतिष्यविद्येविषयी असे काही ज्ञान असावे की जे गुप्त ठेवण्याचा कुणालाही मोह व्हावा असे वाटते. असेही असू शकते की ते ज्ञान चुकीच्या हातात सापडल्यास विघातक होवू शकले असते...


कमांड2ने जरी हा रिसर्च पेपर आधीही वाचला होता. तरीही कमांड2चं रक्त सळसळायला लागलं. बॉसची शून्याची, वेदकालीन गणिताची आणि जोतिष्याशास्त्राची आवड पाहता आणि त्यांचं अचूक योग्य वेळ ठरविण्याचं कौशल्य पाहता त्याला जवळजवळ खात्रीच झाली होती की बॉसला 'आर्यभट्ट सिंध्दांत' हा ग्रंथ सापडला असला पाहिजे. कमांड2चं आता जवळ जवळ अर्ध , काम झालं होतं पण अर्ध, जे अत्यंत महत्वाचं होतं तेच राहिलं होतं. त्याला सगळ्यात प्रथम बॉसचा पत्ता लागणं फार आवश्यक वाटत होतं. मागे एकदा बॉसचा फोन आला होता तेव्हा त्याचा नंबर त्याच्या फोनवर आला नव्हता. बॉसने ही करामत कशी केली होती कोण जाणे. पण तरीही त्याने बॉसला शोधण्याचा चंगच बांधला होता. त्याने टेलीफोन कंपनीत जावून बॉसला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला होता. टेलिफोन कंपनीवाले त्याला विशेष काही मदत करू शकले नव्हते पण टेलिफोन कंपनीला एक वेगळाच शोध लागला होता. त्यांची फ्रिक्वेन्सी कोणीतरी चोरून वापरीत आहे याचा. त्याच्या व्यतिरिक्त फोन ढोबळमानाने कोणत्या भागातून आला होता ते एवढच सांगू शकले होते. जो एरिया त्यांनी सांगितला होता तो बराच मोठा होता. आणि बॉसचं न नाव न चेहरा कमांड2ला काहीच माहित नसल्याने बॉसला शोधणंं कठीण होऊन बसलं होतं. तरीही जवळपास रोजच कमांड2 त्या एरियात वेड्यासारखा फिरायचा. आणि जेव्हा फिरून फिरून थकून जायचा तेव्हाच घरी परत यायचा. पण बॉसचा पत्ता लागण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. कदाचित इतके वेळा तो त्या एरियात वेड्यासारखा फिरला, न जानो बॉस त्याच्या समोरूनसुध्दा गेला असावा. पण त्याला तो ओळखणार तरी कसा होता?


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments:

 1. hello Sunilji,
  aaj Aaryabhattanbaddal khup chhan mahiti milali tumchya post madhun.ani katha suddha khup chhan veg ghet aahe.
  but still waiting for the next novel.why dont u start posting new novel also? we can read both novels simultaniously.

  ReplyDelete
 2. great excellent sunil sir aaj khup mahit zale aryabhattabaddal. Thanks.

  ReplyDelete
 3. Hello Sunil,
  Farach chan aani informative aahe he novel. Mala kharach Aaryabhattan chya karya chi itaki detail mahiti aaj milali...Kshama aasavi pan chuk durust karu ichhito...ya chapter no. 59 madhe 1 chotishi chuk zali aahe "कमांड1च्या ओठांवर एक स्मित तरळलं. कदाचित त्याला भविष्यामध्ये जो फायदा होणार होता" he je wakya aahe te Command2 sathi have hote aase mala vatate. Karan Command1 tar aadchich mela aahe....
  Dhanyavad!!!

  Amar Joshi.

  ReplyDelete
 4. Tumhi far abhyas purvak he novel lihilet khup kavtuk vatate, mast,kabile tarif!!!!!

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network