सायकल - विनोदी कथाकथन भाग 1/4

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

आपुलकी असणे ओघानेच आले. जवळीक तिही इतकी दीर्घ ... इथे गैरसमज होण्याची शक्यता आहे .. नाहीतर कुणी म्हणेल आधीचेच एवढे प्रकार काय कमी होते की या नविन प्रकाराचा शोध लावण्याची गरज पडली. जीवनातल्या बऱ्याबाईट प्रसंगाना बऱ्याचवेळा माझी सायकल सोबतीण होती.
लहानपणी जेव्हा मी वयात आलो म्हणजे सायकल चालविण्याच्या , तेव्हा लहान सायकली नव्हत्या असं नाही. पण जे असतं त्यात 'ऍडजेस्ट' करणं ही आम्हाला शिकवण होती. त्यामुळे मी डायरेक्ट मोठी सायकल शिकण्याच्या नादाला लागलो.
एकदा आपली शिकवण विसरून मी घरी बूट घेण्यासाठी हट्ट धरला. हट्ट केल्याशिवाय काही एक मिळणार नाही असे आमच्या बालगुरूचे सांगणे. बूट मिळाला... पण पाठीत. त्यामुळे मी छोटया सायकलच्या नादाला न लागता एकदम मोठी सायकल शिकायला लागलो.
आता मोठी सायकल चालवायची कशी? माझ्या वयाची पोरं दांडयाखालून एक पाय घालून सायकल चालवीत. त्याला आम्ही कैची म्हणत असू. प्रथम अर्धे पायडल मारत सायकल चालवायची त्याला हाफ कैची म्हणत आणि पूर्ण पायडल मारले की झाली फुल कैची.
माझ्या प्रयोगशील स्वभावामुळे मी सायकल लवकर शिकलो. हाफ कैचीवरून फुल कैचीवर आलो. माझा प्रयोगशील स्वभाव मला स्वस्थ बसू देईना. इथे प्रयोगशील च्या ऐवजी मी इब्लीस हा शब्द वापरला असता... पण पुढे जिथे इब्लीस शब्द आला आहे तिथे कोणता शब्द वापरावा हा गहन प्रश्न मला पडला असता. आमच्यापेक्षा मोठी मुलं हात सोडून सायकल चालवून प्रौढी मिरवायची. मी पण हात सोडून सायकल चालविण्याच्या प्रयत्नाला लागलो. प्रथम एक हात सोडून सायकल चालवायला शिकलो. पण तेवढयावर समाधान होईना. दोन्ही हात सोडून बघितले. रस्त्याच्या कडेला दगडात जाऊन पडलो. दोन्ही हात सोडून कैची चालवायची नसते हे स्वानुभवारून शिकलो. तसा पडण्याचा एक फायदा पण झाला. माझा समोरचा एक दात किडका होता. सगळे दात पडून गेले. दूसरे आले. पण तो लेकाचा पडतच नव्हता. तो दात सायकलवरून पडल्यामुळे आयताच हातात आला ... तो तर आलाच बाजूच्या दुसऱ्या एका निरपराध दाताला सोबत घेवून आला.

उत्तरोत्तर जसं वय वाढत होतं, तशी प्रगती होत होती...म्हणजे सायकल चालविण्यात. एव्हाना मी दांडयावरून सायकल चालवायला लागलो. सायकल चालविण्यातच नाही तर सायकल सबंधित इतर विषयातही माझी प्रगती होत होती. खडूस मास्तरांच्या सायकलची हवा काढणे , त्यांच्यावरचा राग त्यांच्या सायकलच्या सीटवर ब्लेडने फाडून काढणे. मला तर नेहमी वाटायचं की 'नोबेल प्राइझ' मधल्या नो बेल चा कुठेतरी सायकलच्या बेलशी नक्कीच संबंध असावा. एकदा मी दांडयावरून सायकल चालवीत होतो. तेव्हा बेलबॉटमची फॅशन होती. सायकलची बेल वाजविण्याच्या फंदात बेलबॉटमची बेल सायकलच्या चेनमध्ये अडकली. अशी अडकली की निघता निघत नव्हती. ओढून काढण्याच्या प्रयत्नात प/ट थेट सायकलच्या चेनपासून तर प/टच्या चेनपयर्र्ंत उसवली. ते पाहून आमच्या वर्गातल्या मुली तोंड झाकून नुसत्या फिदीफिदी हसत होत्या. एकदा मी सायकलवर उतारावरून जोरात उतरत होतो. समोरून एक मुलगी चढावरून हळु हळु सायकल चालवत वर चढत होती. ती भसकन मधे आली. कशीतरी टक्कर वाचली. पण ती बेल वाजवून 'डूक्कर ... डूक्कर' अशी ओरडायला लागली. मी पण मागे वळून 'तु डूक्कर तूझा बाप डूक्कर तुझी खानदान डुक्कर' असा ओरडायला लागलो. समोर जेव्हा मी एका डूकराच्या कळपाशी ठोस लागुन खाली पडलो . तेव्हा मला समजले तिला बिचारीला काय म्हणायचे होते ते.

क्रमशः

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments: