Ch-61: कंपाऊंडच्या आत (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

दुसऱ्या हाताने रक्ताळलेला हात धरीत तो उठून उभा राहिला. रक्त जरा जास्तच वाहत होतं म्हणून त्याने खिशातून रुमाल काढून हाताला घट्ट बांधला. दुखऱ्या हाताला सांभाळत मग तो बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ गेला. तिथेही एक मोठ्ठ कुलूप लावलेलं होतं आणि त्या कुलूपालासुध्दा पोलिसांचं सिल लावलेलं होतं. त्याने तिथे उभं राहूनच बंगल्याच्या चहूकडे एक नजर फिरविली. बंगल्याच्या आत जाणं, कमीत कमी इथून तरी, शक्य वाटत नव्हतं. पूर्वी बंगल्याचा तपास करतांना आत तो इतरांच्या सोबतच होता. आणि त्याला माहित होतं की आतली तपासणी त्यांनी फार काळजीपूर्वक केली होती. पण त्याला आठवलं की बाहेरच्या तपासणीला तेवढं महत्व न देता त्याने ती जबाबदारी कुण्या एका नवीन पोलिसावर सोपविली होती. त्याने ठरविलं की प्रथम आपण बंगल्याचा बाहेरचा भाग न्याहाळून पाहू. तसं काही सापडण्याची शक्यता अंधुकच होती कारण बरेच दिवस उलटलेले होते हा बंगला असाच ओसाड पडलेला होता. आणि बंगल्याच्या आतल्या पुराव्यापेक्षा बाहेरचे पुरावे नष्ट होण्याचीच जास्त शक्यता होती.

तरीही एक चान्स घ्यायला काय हरकत आहे....

कदाचित बंगल्याच्या बाजूने किंवा मागून आत जाण्याचा एखादा मार्गसुध्दा मिळू शकतो...

त्याने खिशातून टॉर्च काढला आणि टार्चचा प्रकाश इकडे तिकडे मारत तो बंगल्याच्या उजव्या बाजूने मागे जायला लागला. मधून मधून तो बंगल्यावरही प्रकाशाचा झोत मारून आत जाण्यासाठी एखादी खिडकी दिसते का ते पाहू लागला. खिडक्या होत्या पण खिडक्यांना जाड लोखंडी जाळी लावलेली होती.

तरीही एखाद्या खिडकीची जाळी तुटलेली असू शकते, जसं कंपाऊंडचं कुंपण एका जागी तुटलेलं होतं...

बंगल्याभोवती प्रशस्त मोकळी जागा होती. मोकळ्या जागेत गार्डन होतं. पण त्याची आधीही कधी काळजी घेतलेली दिसत नव्हती. गार्डनमध्ये गवत आणि इतर झुडुपे चांगली कंबरेपर्यंंत उंच दाटीवाटीने वाढलेली होती. जॉन अंधारात टॉर्चच्या सहाय्याने जपूनच त्या गवतातून आणि झुडुपातून रस्ता काढत समोर जात होता. या उंच वाढलेल्या झुडुपांमूळे काही पुरावा जरी असेल तरी सापडणं जरा कठीणच वाटत होतं. पण एक फायदाही होता की जर पुरावा असेलच तर तो नष्ट होण्याचा कालावधी या झुडुपांमूळे वाढण्याची शक्यता होती. इकडे तिकडे टार्चचा झोत मारत आता तो घराच्या मागच्या बाजूला येऊन पोहोचला होता. मागच्या तर दरवाजालाही जाळी लावली होती. त्यामुळे इथूनही आत जाण्याची शक्यता मावळली होती. मग त्याने टार्चच्या प्रकाशात मागची बाजूही पिंजून काढली. काहीही विशेष सापडत नव्हते. हळूहळू गवताच्या आणि झुडपांच्या बुंध्याशी टार्चच्या प्रकाशात शोधत त्याने घराला एक संपूर्ण चक्कर मारली. मोकळ्या जागेत तर काही सापडत नव्हतंच. एकाही खिडकीची जाळी तुटलेली दिसत नव्हती.

चला म्हणजे आता तरी आत जाणं शक्य दिसत नाही...

आत जाण्यासाठी पुन्हा कधीतरी आपल्याला सॅमची मदत घ्यायला पाहिजे...

आणि बाहेरही दिवसाच उजेडात काही सापडते का ते पुन्हा एकदा व्यवस्थित शोधणं योग्य राहिल...

असा विचार करून तो कंपाऊंडच्या बाहेर येण्यासाठी वळला. एवढ्यात त्याच्या डोक्यात एक विचार चमकला. तो एकदम थांबला. वळून घाईघाईने मग तो बंगल्याच्या डाव्या बाजूने मागे जायला लागला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network