Ch-62: बहरलेली वेल (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

बंगल्याच्या डाव्या बाजूला एका जागी एक फुलांची वेल बहरलेली होती. फुलांचा सुगंधही छान येत होता. ती वेल घराच्या भिंतीचा, खिडकीचा आणि पाईपचा आधार घेत घेत वर टेरेसपर्यंंत गेली होती. त्याने टॉर्चचा झोत पाडून त्या वेलीकडे खालून वरपर्यंंत निरखून पाहिले. वेल फुलांनी बहरुन अंगभर झालेली होती. मग पुन्हा त्याने वरून खालपर्यंंत निरखून पाहिले. वेलीच्या बुडाशी बराच कचरा पडलेला होता. प्लास्टीकच्या रिकाम्या पिशव्या, कागदांचे चूरगळलेले बोळे असा बराच कचरा होता. जॉन उकीडवा बसून तो कचरा हुडकायला लागला. त्याने आपल्या खिशातून एक प्लास्टीकची पिशवी काढली आणि त्यात तो तिथला त्याला जो महत्वाचा वाटला असा कचरा भरू लागला. तिथला कचरा हुडकल्यानंतर त्याने वेलीला बुंध्याला धरून जोरजोराने हलविले. त्याच्या अंगावर फुलांची बरसात होवू लागली. आणि अजूनही धप धप असा काहीतरी पडल्याचा आवाज येऊ लागला. त्याने टॉर्च लावून निरखून बघितले. वेलीच्या गुंत्यातून अजून काही कचरा खाली पडला होता. त्यातला पण काही त्याने थेट आपल्या थैलीत भरला. त्याला प्लास्टीकची एक तोंडाला गाठ मारलेली पिशवी सापडली. पिशवी त्याने हलवून बघितली. आत काहीतरी वाजण्याचा आवाज येत होता.

काय आहे ते नंतर बघूया...

असा विचार करून त्याने ती पिशवीसुध्दा आपल्या थैलीत टाकली.

चला आता बास झालं....

आता आपल्याला निघायला पाहिजे...

जॉनने थैली उचलली आणि परत कुंपणाकडे निघाला.

घरी येता येता जॉनला चार वाजले होते. तो पूर्णपणे थकला होता. प्लॅस्टीकची ती कचऱ्याची बॅग खाली ठेवून दुखऱ्या हाताला सांभाळत त्याने त्याच्या क्वार्टरचे दार उघडले. त्याला आठविले एकदा असेच त्याचा अॅक्सीडेंट झाला असतांना त्याला अँजेनीने सांभाळत घरी आणले होते. आणि क्वार्टरचे कुलूप तिनेच उघडले होते. तिची आठवण येताच त्याचे मन पुन्हा दु:खाने भरून गेले. त्याला आत्ता आठवले की-

अरे आपण व्हिस्कीची बॉटल तर आणायची विसरूनच गेलो...

आपल्या बाहेर पडण्यामागे व्हिस्कीच्या बॉटल्स संपणे हे एक कारण होते आणि तेच आपण विसरून गेलो...

दार उघडून खाली ठेवलेल्या प्लॅस्टीकच्या पिशवीकडे पाहून त्याला बरे वाटले.

चला म्हणजे दु:ख विसरण्यासाठी आपल्याजवळ अजून एक काम आहे तर...

या कचऱ्यात काही महत्वाचे सापडते का ते बघणे...

प्लॅस्टीकची पिशवी उचलून तो आत घरात गेला. आतून दार लावून घेतले. आणि सोफ्यावर बसून तो त्या थैलीतला एक एक चुरगाळलेला कागद बाहेर काढून व्यवस्थित करून त्यात काही मिळते का ते बघू लागला.

सगळे कागदाचे चुरगाळलेले बोळे व्यवस्थित करून झाले पण त्याला विशेष असे काहीच मिळाले नाही. मग तो एक एक पॉलीथीनच्या पिशव्या आणि गुंडाळ्या काढू लागला. काही पिशव्यात उरलेले आणि कुजलेले शेंगदाणे होते. काहींचा तर घाण वास येत होता. शेवटी त्याला एक गाठ मारलेली पॉलीथीनची पिशवी सापडली. त्याने त्या पिशवीची व्यवस्थित काळजी पूर्वक गाठ सोडली. आतून वास येईल या अंदाजाने तोंड बाजूला केले. पण आतून कसलाही वास आला नाही. त्याने पिशवीत डोकवून बघितले. आत काचेचे तुकडे दिसत होते.

ग्लासचे असावेत...

तो सोफ्यावरून उठून खाली मॅटवर उकीडवा बसला. त्याने ते तुकडे काळजीपूर्वक पिशवीतून खाली मॅटवर ओतले. दोन तीन तुकड्यांवर त्याला रक्ताचे पुसटसे डाग दिसत होते.

अरे वा हे तर खुन्याचं किंवा त्याच्या साथीदाराचं रक्त दिसतय...

त्याने एक रक्ताने भरलेला तुकडा अलगद उचलून हातात घेतला. आपल्याला आता सुतावरून स्वर्ग गाठायला पाहिजे...

पण या रक्तावरून आपण खुन्याबद्दल काही माहिती मिळवू शकतो का? तो सगळ्या शक्यता पडताळून पाहू लागला. आणि मग त्याचे डोळे अचानक आनंदाने चमकू लागले. त्या काचेच्या तुकड्यावर त्याला रक्ताने माखलेल्या हातांच्या बोटांचे ठसे उमटलेले दिसले.

" यस्स" तो आनंदाने ओरडला.

दुसरे रक्ताने माखलेले तुकडेसुध्दा त्याने अलगद उचलून निरखून बघितले. त्यावरसुध्दा हाताच्या बोटांचे ठसे दिसत होते. तसेच ते काचेचे तुकडे हातात घेऊन उठून तो फोनजवळ गेला. काचेचे तुकडे बाजूला टेबलवर ठेवून त्याने एक नंबर डायल केला.

" सॅम... मी तुझ्याकडे येतोय... आत्ता लगेच... एक महत्वाचा दुवा हाती लागलेला आहे " तो आनंदयुक्त उत्साहाने फोनवर बोलत होता.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network