Ch-64: डॉ. कयूम खान (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

कमांड2ची म्हणजे विनयची बॉसला शोधण्यासाठी या एरियात ही नेहमीची चक्कर होती. तो जवळपास रोजच नेमाने या एरियात येऊन बॉसला शोधण्यासाठी फिरत असे. स्वत: बॉसला ओळखू न येण्याची तो पुरेपूर खबरदारी घेत असे. त्याच्या जवळजवळ शंभरच्या वर या एरियात चकरा झाल्या असतील. पण त्याने प्रयत्न सोडला नव्हता. चिकाटी तसा त्याच्या स्वभावाचा एक पैलू होता. आज दिवसभर फिरून तो थकला होता. संध्याकाळ झाली होती. शहरातलं वातावरण आता बऱ्यापैकी निवळलं होतं. अलीकडेच बॉसचा त्याला इंटरनेटवर मेसेज आला होता. आता खुनी सत्र दुसऱ्या एका शहरात सुरू करायचं होतं. बॉसला वातावरण निवळू द्यायचं नव्हतं. तसा दुसऱ्या शहरात खुनी सत्र सुरू करण्याला अजून वेळ होता. पण विनयला दुसऱ्या खुनी सत्रात बिलकुल रस नव्हता. त्याआधीच त्याला त्याने सुरू केलेल्या खेळाचा पडदा पाडायचा होता. पण अजून एकही धागा दोरा हाती येत नव्हता. तो विचार करीत करीत एका इमारतीचं काम सुरू होतं तिथल्या मोकळ्या जागेत जाऊन थांबला. त्याला थकल्यामुळे कुठेतरी बसावसं वाटत होतं. त्याने आजूबाजूला काही बसण्यासाठी सापडतं का ते बघितलं. एका जागी वाळूचा एक मोठा ढीग होता. कुणी आपल्याला बघेल किंवा कुणी ओळखेल याची पर्वा न करता त्याने स्वत:ला त्या ढिगावर जवळजवळ झोकून दिलं.

जिथे विनय बसला होता तिथून जवळपास 200 मीटरच्या अंतरावर एक काळी कार रस्त्याच्या कडेला उभी होती. गाडीच्या काळ्या काचा चढवलेल्या होत्या. त्यामुळे आतलं काहीच दिसत नव्हतं. पण आतून जॉन आणि सॅम दुर्बिणीतून विनयच्या सगळ्या बारीकसारीक हालचालींचे निरीक्षण करीत होते.

" आज जवळ जवळ 5 दिवस झाले आपण याच्या मागावर आहोत साला या एरियात काय शोधतो काही कळत नाही" सॅम जॉनला म्हणाला.

" मला वाटतं त्यातच या साऱ्या खुनांच रहस्य दडलेलं असावं " जॉन म्हणाला.

" पण असं किती दिवस आपण याच्यावर पाळत ठेवणार? " सॅमने विचारले.

" जोपर्यंंत त्याला जे पाहिजे ते सापडत नाही तोपर्यंंत " जॉन म्हणाला.

" तो आपले पुढचे खुनाचे लक्ष्य तर हेरत नसावा"

" तेच तर आपल्याला शोधायचे आहे पण मला नाही तसे वाटत" जॉन म्हणाला.

विनयचं बसल्या बसल्या समोरच्या बंगल्याकडे लक्ष गेलं. समोर दाराच्या एका खांबावर दगडामध्ये कोरलेलं बंगल्याच्या मालकाचं नाव होतं. आणि तिथे दगडाच्या चारही बाजूने प्रकाश येण्यासाठी बल्बची व्यवस्था केली होती. विनयने सहजच ते नाव वाचले.

'डॉ. कयूम खान'

विनयने ते नाव पुन्हा वाचलं.

'डॉ. कयूम खान'

नाव ओळखीचं वाटत होतं. हे नाव आपण कुठंतरी ऐकलेलं किंवा वाचलेलं आहे. विनय डोक्यावर ताण देत आठविण्याचा प्रयत्न करीत होता. तशी त्याला सगळी मुस्लीम नावं सारखीच वाटत होती. कदाचित त्यामुळे त्याला ते नाव ओळखीचे वाटत असावे. तो विचार करीत होता. अचानक तो बसला होता त्याच्या मागे 'घरऽऽ घरऽऽ' असा जोराने आवाज यायला लागला. विनय अनपेक्षितपणे आलेल्या या आवाजाने दचकून जवळ जवळ उठूनच उभा राहिला. त्याने मागे वळून बघितले. मागे बिल्डींचे बांधकाम सुरू होते आणि रेडीमीक्स काँक्रीट मशीन नुकतीच सुरू झाली होती. तो कसाबसा सावरून तिथून बाजूला जायला लागला. अचानक त्याच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला.

" माय गॉड" त्याच्या तोंडून निघाले.

त्याने एकदा समोरच्या बंगल्याच्या दरवाज्याच्या खांबावरचे नाव वाचले. आणि परत त्या रेडीमीक्स काँक्रीट मशीनकडे बघितले. त्याच्या डोक्यात खडाखड सर्व कोडी उलगडायला लागली होती.

'डॉ. कयूम खान' हा तर आपण वाचलेल्या आर्यभटावरच्या रिसर्च पेपरचा कोऑथर होता...

आणि ही रेडीमीक्स काँक्रीट मशीनची घरघर त्याला एकदा बॉसच्या फोनवरून ऐकायला आली होती....

"म्हणजे डॉ. कयूम खान हाच बॉस आहे !"

त्याच्या शरीरात एकदम स्फूर्ती संचारली. तो डॉ. कयूम खानच्या घराकडे झेपावला. मग तो ब्रेक लागल्यागत थांबला.

नाही आता नको...

आपल्याला योग्य वेळ पाहून आणि योग्य प्लॅनींग करून आत प्रवेश करावा लागेल...

त्याने कसेबसे स्वत:ला आवरले.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. Excellent.............no words.........

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network