Ch- 65: कागदाची पुंगळी (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

विनय पूर्ण तयारीनिशी मध्यरात्र उलटल्यानंतर डॉ. कयूम खानच्या बंगल्याजवळ आला. बंगला बाकीच्या घरापासून अलिप्त असल्यासारखा होता. त्यामुळे बंगल्याच्या मागून आत प्रवेश करणे कदाचित शक्य होते. विनयने अंदाज बांधला. एकदा आजूबाजूला नजर टाकत तो बंगल्याच्या मागच्या बाजूने जाऊ लागला.

विनयची नजर पोहोचणार नाही अशा जागी एक काळी कार पार्क केलेली होती. आत जॉन आणि सॅम दुर्बिणीतून विनयच्या हालचाली बारकाईने टिपत होते.

" मला वाटतं आता त्याला जावून पकडण्यास काहीच हरकत नाही... नाहीतर उशीर झालेला असेल" सॅम म्हणाला.

" नाही अजून नाही... मला पक्की खात्री आहे तो आत खुनाची श्रृंखला पुढे नेण्यासाठी जात नसावा" जॉन म्हणाला.

" मग कशाला जात असावा" सॅमने विचारले.

"तेच तर आपल्याला माहित करायचे आहे" जॉन म्हणाला.

विनय बंगल्याच्या मागच्या बाजूला जाऊ लागताच आत बसलेले जॉन आणि सॅम एकदम अलर्ट झाले. विनय नजरेआड होताच ते कारमधून बाहेर आले.

विनय बंगल्याच्या हॉलमध्ये उभा होता. हॉलमध्ये अंधार होता. समोर एक खोली उघडी दिसत होती आणि त्या खोलीतून धूसर प्रकाश बाहेर येत होता. बंदूक रोखून हळू हळू विनय त्या खोलीच्या दरवाज्याच्या दिशेने चालू लागला. आता त्याच्या दृष्टीपथात एक खुर्चीवर बसलेली पाठमोरी आकृती आली. आकृती अंधारात असल्यामुळे कुणाची आहे हे ओळखणं शक्य नव्हतं. ती आकृती खुर्चीवर रेलून शांतपणे बसली होती. विनय त्या आकृतीच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात अचानक

" हॅन्ड्स अप... थ्रो द गन" असा करडा आवाज हॉलमध्ये घुमला.

जॉन आणि सॅम विनयच्या मागे बंदूक रोखून उभे होते. त्यांच्या दृष्टीपथात ती खुर्चीवर रेलून बसलेली आकृती पण होती. या अनपेक्षित घटनेने विनय घाबरला आणि गोंधळून गेला. त्याने आपली बंदूक जमिनीवर फेकली आणि आपले दोन्ही हात हवेत वर केले. समोर धूसर प्रकाशात बसलेल्या इसमाने आपली चाकाची खुर्ची आवाजाच्या दिशेने वळविली. थोडाफार सावरल्यानंतर विनय हळू हळू मागे वळायला लागला. समोर धूसर प्रकाशात खुर्चीवर बसलेली आकृतीसुध्दा उठून उभे राहण्याचा प्रयत्न करू लागली.

" डोन्ट मूव्ह" जॉनचा करडा आवाज घुमला.

विनय जागच्या जागीच एखाद्या पुतळ्यासारखा स्थिर उभा राहिला. ती खुर्चीवर बसलेली आकृतीसुध्दा जागच्या जागी बसून राहिली.

पण हे काय?...

त्या आकृतीच्या हातात कदाचित बंदूक होती....

त्याच्या हातातली बंदूक दिसता क्षणीच सॅमने बंदुकीच्या गोळ्यांचा भडीमार त्या आकृतीवर सुरू केला.

" नो...." जॉनने सॅमच्या हातातली बंदूक बाजूला सारण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्यासमोर 'धप' 'धप' असे दोन आवाज झाले. एक ती आकृती खाली पडण्याचा आणि दुसरा विनय खाली पडण्याचा. सॅमची बंदूक बाजूला सारण्याच्या प्रयत्नात विनयच्या मस्तकात गोळी घुसली होती.

" व्हॉट हॅपन्ड टू यू" जॉन चिडून सॅमला म्हणाला.

" मी नसती मारली तर त्यानं आपल्याला गोळी मारली असती" सॅम म्हणाला.

सॅम त्या काळ्या आकृतीच्या खाली पडलेल्या शरीराकडे धावला. आणि जॉन विनयच्या खाली पडलेल्या शरीराकडे धावला. सॅमने स्टडी रूममधला मोठा बल्ब लावला. खाली एक वयस्कर पांढरी दाढी ठेवलेला आणि मिशी पूर्णपणे कापलेला माणूस पडलेला होता. डॉ. कयूमचं शरीर एका राखेच्या ढिगाऱ्यावर पडून राख इकडे तिकडे पसरलेली होती. ती राख कदाचित काहीतरी कागदपत्रे किंवा एखादे पुस्तक जाळलेली असावी. डॉ. कयूमच्या हातात कागदाची एक पुंगळी होती. त्या पुंगळीलाच अंधारात बंदूक समजून सॅमने बंदुकीच्या गोळ्या झाडल्या होत्या.

" त्याच्या हातातली कागदाची पुंगळी पाहून स्वत:वर चिडून सॅमच्या तोंडून निघाले, " शिट ... व्हाट अ फूल आय अॅम ... ही तर साधी कागदाची पुंगळी आहे"

सॅमने खाली उकीडवे बसून त्या खाली पडलेल्या माणसाच्या हाताची नाडी तपासली. त्याची नाडी पूर्णपणे थांबली होती.

" हि इज डेड" सॅमच्या तोंडून निघाले.

जॉनने खाली पडलेल्या विनयच्या शरीराकडे बघितले. तो अजूनही वेदनेने विव्हळत होता. त्याने खाली उकीडवे बसून त्याला कुठे गोळी लागली हे बघितले आणि तो त्याची वाचण्याची शक्यता पडताळून पाहू लागला.

" याला काहीही करून आपल्याला वाचवायला पाहिजे" जॉन म्हणाला.

त्याने तसेच उकीडवे बसून खिशातून मोबाईल काढला आणि एक नंबर डायल करायला लागला.

तिकडे सॅमने त्या डॉ. कयूम खानच्या हातातली कागदाची पुंगळी ओढून आपल्या हातात घेतली. तो कागद त्याने उकलून बघितला. त्या कागदावर वेगवेगळ्या तारखा आणि वेळ लिहिलेली होती. कुठे 'लाभदायक काळ' तर कुठे 'अति लाभदायक काळ' असे नमूद केलेले होते. कुठे कुठे 'धोकादायक काळ' असेही नमूद केलेले होते. त्यात डॉ. कयूमची जवळजवळ सर्व कुंडलीच लिहिलेली होती. वाचता वाचता सॅमचे लक्ष कागदाच्या अगदी शेवटी गेले.

" माय गॉड !" सॅमच्या तोंडून निघाले.

" जॉन " सॅम आवाज देत जॉनकडे गेला.

जॉनने नुकताच हॉस्पिटलला फोन लावून इथे ताबडतोब अॅम्बुलन्स घेऊन येण्यास सांगितले होते.

"जॉन हे तर बघ" सॅमने तो कागद जॉनसमोर धरला.

जॉनने त्या कागदाकडे एक नजर फिरविली आणि तो कागद खाली फेकून देत म्हणाला-

" अरे आजकाल ज्योतिष्य ही फॅशनच झालेली आहे"

सॅमने तो कागद उचलला आणि त्या कागदाच्या अगदी शेवटी लिहिलेले दाखवत म्हणाला

" अरे हे बघ ... इथे ... तारीख 17 रात्री बारा ते पुढे 3 दिवस 'धोकादायक काळ' आणि हे बघ इथे रात्री 12 ते 2 'अति धोकादायक काळ' "

जॉनने तो कागद हातात घेऊन व्यवस्थित बघितले. त्याने घड्याळ्याकडे बघितले 1 वाजून 5 मिनिटे झाली होती आणि आज तारीख होती बरोबर 17. जॉन स्तब्ध होऊन त्या कागदाकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढमिश्रीत आश्चर्य पसरलेले होते. जॉन जिथे उभा राहिला होता तिथे खाली जमिनीवर पडून विनय विव्हळत होता. त्याने सॅमने जॉनला वाचून दाखविलेले ऐकले होते. त्याला बॉसजवळ असलेल्या विद्येची अगदी पुरेपूर खात्री पटली होती. शेवटी एक दीर्घ श्वास घेत विनयची मान एका बाजूकडे लटकली. त्याची ती विद्या हस्तगत करण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली होती...

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network