Ch- 66: झीरो मिस्ट्री (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या मथळ्यांखाली वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत बातम्या झळकल्या

'झीरो मिस्ट्री' सॉल्व्ड अॅट लास्ट'

'झीरो मिस्ट्री' ही दुष्मनांची आगळी वेगळी चाल'

'झीरो मिस्ट्री' हे दुष्मनांनी पुकारलेले युध्दच. फक्त प्रकार वेगळा'

'झीरो मिस्ट्री' च्या निमित्ताने पोलिसांतील राजकारण चव्हाट्यावर'

'झीरो मिस्ट्री' ही घटना की फेनॉमेनॉ'

'झीरो मिस्ट्री' ची गुत्थी सोडविण्यात बडतर्फ केलेलाच पोलीस अधिकारी शेवटी सफल'

'झीरो मिस्ट्री' चा जनक डॉ. कयूम खान'

'विनय जोशी आणि डॉ. कयूम खान यांच्यातील संबंध काय?'

टीव्ही चॅनल्सवर सुध्दा आज दिवसभर 'झीरो मिस्ट्री'शी संबंधित बातम्यांशिवाय दुसऱ्या कोणत्याच बातम्या नव्हत्या. एकीकडे 'झीरो मिस्ट्री'ची गुत्थी सोडविल्यामुळे जनतेत समाधान होते तर दुसरीकडे त्या प्रकरणाचे गांभीर्य आणि होवू घातलेले परिणाम लोकांच्या चेहऱ्यांवर वेगवेगळ्या स्वरूपात उमटत होते. या सगळ्या खऱ्या खोट्यांच्या गोंधळात निरनिराळ्या अफवांना ऊत येता होता. अशावेळी लोकांना एका मार्गदर्शनाची आणि 'झीरो मिस्ट्री' या घटनेचे तथ्य जसेच्या तसे त्यांच्यासमोर ठेवण्याची गरज होती.

शहरात दंगे आता मंदावले होते. पण अधूनमधून आत धुमसत असलेली आग घात प्रतिघाताच्या स्वरूपात बाहेर येतच होती. अशावेळी एक स्पेशल प्रेस कॉन्फरंस घेऊन जनतेला 'झीरो मिस्ट्री' आणि त्यामागे असलेल्या खऱ्या उद्देशाची माहिती देणं आवश्यक होतं. 'झीरो मिस्ट्री'चे कोडे उलगडून सत्य बाहेर आणण्याचे संपूर्णपणे श्रेय जॉनला जात होते यात वादच नव्हता. पोलीस डिपार्टमेंटनेही जसे गाजावाजा करून त्याला बडतर्फ केले होते, तसेच गाजावाजा करून अगदी डोक्यावर घेऊनच विजयश्रीची माळ त्याच्या गळ्यात घातली होती. प्रेस कॉन्फरंसमध्ये शहराच्याच नव्हे तर अमेरिकेतल्या आणि जगाच्या पातळीवर बातम्या देणाऱ्या सर्व चॅनल्स आणि वर्तमान पत्रांच्या वार्ताहरांनी गर्दी केली होती. प्रेस कॉन्फरंन्समध्ये जॉनचे आगमन होताच एकच जल्लोष उसळला. जॉनच्या चेहऱ्यावर कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाईटची जणू चढाओढ लागली होती. इतक्या गर्दीतही समोरून पडणाऱ्या फ्लॅशच्या प्रकाशाप्रमाणे एक विचार जॉनच्या मनात चमकून गेला.

अँजेनीला गमावल्यापासून जॉनने स्वत:ला पूर्णपणे या केसमध्ये गुंतवून केस तडीस लावली होती...

पण आता नंतर काय?...

हीच केस थंड पडल्यानंतर ही जी गर्दी त्याच्याभोवती जमली आहे ती राहणार नव्हती...

पुन्हा तो एकटा पडणार होता...

आणि एकटा पडल्यावर पुन्हा ते नैराश्य, पुन्हा ते अँजेनीला गमावल्याचं दु:ख...

विचारांच्या तंद्रीत चालता चालता जिथे मायक्रोफोन्स एखाद्या पुष्पगुच्छाप्रमाणे एकत्र ठेवलेले दिसत होते तिथे जॉन येऊन पोहोचला. तो केस सोडविल्याचा मान आणि अँजनीला गमावल्याचं शल्य घेऊनच सर्व वार्ताहरांसमोर उभा राहिला. आज प्रथमच पूर्ण आत्मविश्वासाने तो वार्ताहरांसमोर उभा होता.

पत्रकारांनी प्रश्नाचा भडिमार सुरू केला

" हा डॉ. कयूम कोण? "

" विनय जोशीचा आणि त्याचा काय संबंध?"

" ते कोणत्या संघटनेचे मेंबर होते?"

" दोघंही कसे काय मारले गेले? एकतरी जिवंत सापडायला पाहिजे होता"

" पोलीस काही लपविण्याचा किंवा दाबण्याचा तर प्रयत्न करीत नाहीत ना?"

" दोंघांना मारून हे प्रकरण संपणार का?"

" हा आतंकवाद आता कोणत्या स्तराला जाणार?"

" हिंदू आतंकवाद हे काय अजून नवीन धूड? "

" वन अॅट अ टाईम प्लीज " जॉनचा आत्मविश्वासपूर्ण आवाज घुमला.

त्याच्या आवाजाने थोडी शांतता पसरली.

" आज माझ्याजवळ या केसशी निगडीत सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत त्यामुळं अगदी सावकाश आणि आता केस संपल्यामुळे मी अगदी रिकामाच आहे... मलाही काही घाई नाही. " आज प्रथमच जॉन पत्रकारांसमोर मोकळा बोलत होता.

पत्रकारांत थोडी खसखस पिकली. वातावरण थोडं मोकळं झालं.

एकजण प्रश्न विचारण्यासाठी समोर आला.

" मला वाटतं हिंदू आतंकवादाला अमेरिका प्रथमच सामोरी जात असावी याला आपण किती गांभीर्याने घेतलं पाहिजे? "

" ही जी 'झीरो मिस्ट्री'ची घटना आहे ती साधीसुधी घटना नसून अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच दुष्मनांनी इतकी विचारपूर्वक आणि चलाखीने रचलेली एक चाल आहे. या घटनेच्या तळाशी जाऊन आम्ही ज्या तथ्यांचा शोध लावला ती सर्व तथ्ये जनतेसमोर मांडल्यानंतर त्यांना ही गोष्ट मनोमनी पटेल.

तथ्य क्रमांक 1 - या 'झीरो मिस्ट्री' शी हिंदू आतंकवाद किंवा हिंदू सनातन धर्माचा किंवा हिंदू पुरातन साहित्याचा दुरूनसुध्दा काही संबंध नसून तसा जाणूनबूजून भास निर्माण करण्यात आलेला आहे.

तथ्य क्रमांक 2 - 'झीरो मिस्ट्री' चा जनक 'डॉ. कयूम खान' हा कोणत्याही हिंदू संघटनेशी संबंधित नसून त्यांचा सरळसरळ संबंध 'लष्करे कायदा' या आतंकवादी संघटनेशी येतो. ही संघटना 'लष्करे तोयबा' किंवा 'अल कायदा' या आतंकवादी आणि बंदी घातलेल्या संघटनेचा आयसोटोप असू शकते किंवा त्यांचे ते हस्तक असू शकतात. त्यांच्या कार्य करण्याच्या पध्दती आणि त्या संघटनेचा उगम पाहता हे लक्षात येते.

तथ्य क्रमांक 3 - 'झीरो मिस्ट्री' हे प्रकरण प्रॉक्सी आतंकवाद या प्रकारात मोडू शकते. त्यांचा उद्देश भारत आणि अमेरिका यांच्यातले सुधारते संबंध, त्यांच्यातला अण्वस्त्र करार, त्यांची एकमेकावर विसंबलेली आर्थिक परिस्थिती पाहता या दोन्ही देशांत फूट निर्माण करून दोन्हीही देशांना आर्थिक हानी पोहोचविण्याचा होता."

जॉन एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा बोलायला लागला

" त्यामुळे मी सर्व जगाला तुमच्या मार्फत पुन्हा एकदा सांगू इच्छितो की 'झीरो मिस्ट्री' हा हिंदू आतंकवाद नसून तसा भास निर्माण केला गेलेला आहे ... आपण कुणीही मग ते अमेरिकन असोत,... भारतीय मूळ असलेले अमेरिकन असोत ..की भारतीय असोत,... या भासास बळी पडता कामा नये... यात नुकसान दोघांचेही आहे... जेवढे अमेरिकेचे ....तेवढेच भारताचेसुध्दा"

" पण ती इंटरनेटवर एक ऑडीओ रिलीज करण्यात आली होती त्याचं काय?... त्यातून तर वेगळाच मेसेज मिळतो" दुसऱ्या वार्ताहराने विचारले.

पुन्हा जॉन बोलू लागला

" तो एक भारतीय लोकांना अमेरिकन लोकांच्या विरुध्द आणि अमेरिकन लोकांना भारतीय लोकांच्या विरुध्द चिथविण्याचा प्रयत्न होता आणि दुर्दैवाने त्यात ते लोक यशस्वी झाले होते"

" पण या 'झीरो मिस्ट्री' ने अमेरिकेला कोणत्या प्रकारचे नुकसान पोहोचणार होते?...मला नाही वाटत अमेरिकेला यातून जीवांची हानी वगळल्यास काही विशेष नुकसान पोहोचू शकते"

" त्या लोकांनी आपल्या शहरात जशी 'झीरो मिस्ट्री' खुनी शृंखला पूर्ण करून सर्व अराजकता माजवली होती.... तशीच अमेरिकेतल्या इतरही मोठया मोठया शहरात 'झीरो मिस्ट्री' खुनी शृंखला राबविण्याचा त्या लोकांचा मनसुबा होता.... सुदैवाने तो आपण हाणून पाडलेला आहे.... या सगळ्या घटनेत वरकरणी पाहता असं वाटत नाही की अमेरिकेचे त्यात काही नुकसान होणार होते.... पण विचारपूर्वक बघितल्यास ....आजच्या परिस्थितीत भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याचे मोठया प्रमाणावर लोक इथे नोकरीसाठी येऊन स्थायी झालेले आहेत.... त्यात बहुतांश लोकांना अमेरिकन नाकरीकत्वसुध्दा लाभलेले आहे..... या लोकांना जर एकाच वेळी चिथावून त्यांना नुकसान पोहोचविले किंवा त्यांना जर साधे निष्क्रीय जरी केले तरी अमेरिकेतील मोठया प्रमाणावर काम बंद पडेल आणि परिणामत: अमेरिकेच्या इकॉनॉमीवर त्याचा निश्चितच वाईट परिणाम होईल.... तसेच आज अमेरिकेच्या पुष्कळ मोठमोठया कंपन्यांनी भारतात विनिवेश केलेला आहे.... तिथे भारतातही जर या कंपन्यांविरुध्द प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा फटका मोठया प्रमाणावर त्या कंपन्यांना ....आणि परीणामत: अमेरिकेच्या इकॉनॉमीला बसणार आहे"

" आणि या 'झीरो मिस्ट्री'ने भारताला कोणत्या प्रकारचे नुकसान होणार होते?" एका भारतीय मूळ असलेल्या पत्रकारने प्रश्न विचारला.

"बऱ्याच लोकांच्या माहितीत किंवा ऐकीवात असेल ....की 90 च्या दशकात एक वेळ अशी आली होती की भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली होती.... परकीय चलनासांठी रिजर्व बॅकेला शेवटचा उपाय म्हणून मोठया प्रमाणावर ठेवणीतलं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं.... पण त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेला जी चालना मिळाली होती ती एनआरआय लोकांच्या भारतातील गुंतवणुकीमुळे.... आणि परिणामत: परकीय चलनाचा जो तुटवडा निर्माण झाला होता तो भरून निघाला....त्यावेळी एक चांगली गोष्टसुध्दा घडली... हळू हळू भारतीय सॉफ्टवेअर इंडस्ट्री भरभराटीला आली.... पुढे पुढे भारत अमेरिका आणि तेथील सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी आऊट सोर्सीग करू लागला.... आजही अशी परिस्थिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था आऊट सोर्सीगवर मोठया प्रमाणावर विसंबून आहे.... हे 'झीरो मिस्ट्री' प्रकरण जर अजून चिघळले तर भारताचे आऊटसोर्सीग आणि विदेशी कंपन्यांचा भारतातील निवेश थांबेल.... परीणामत: भारतीय अर्थव्यवस्था कोलमडल्याशिवाय राहणार नाही..... कुणी कितीही नाकारो ....आज स्थितीला भारत आणि अमेरिकेचे 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' चे नाते आहे..... या नात्याला तडा गेल्यास ....नुकसान दोघांनाही भोगावे लागणार आहे..."

जॉनने एखाद्या अर्थतज्ञाप्रमाणे भारतीय आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेचे मुद्देसूद विश्लेषण केले.

" पण एकट्या डॉ. कयूम किंवा विनय जोशी यासारख्यांना मारून किंवा पकडून समस्येचे समाधान होणार आहे का?"

वार्ताहराने पुढचा प्रश्न विचारला.

"नाही ... दुर्दैवाने याचं उत्तर 'नाही' असं आहे...कारण भारत आणि अमेरिकेत वितुष्ट निर्माण करण्याचा त्या संघटनेचा हा एक प्रयत्न होता ...आणि डॉ. कयूम काय किंवा विनय जोशी काय हे त्यांच्या हातातले फक्त एक बाहुले होते ... भविष्यात असे अजूनही प्रयत्न होवू शकतात... फरक एवढाच राहील की त्यावेळी डॉ. कयूम किंवा विनय जोशीच्या जागी दुसरं कुणीतरी राहील ..."

" मग आता यातून मार्ग काय?" एका वार्ताहराने पुढचा प्रश्न विचारला.

" यातून मार्ग एकच ... की अमेरिकन , भारतीय अमेरिकन आणि भारतीय लोकांनी आपली सद्विवेक बुध्दी शाबुत ठेवून या घटनेतील डाव आणि तीव्रता समजून घ्यावी ...आणि ताबडतोब दंगे थांबवावेत.... जर तसे झाले नाही तर आपले दुश्मन त्यांच्या योजलेल्या कार्यात पूर्णपणे यश्वस्वी होतील.... आपण आपापसात दंगे केले तर ते आपण आपल्याच पायावर दगड पाडून घेतल्यासारखे होईल ....आणि मग मात्र आपल्याला आपल्या अंध:पतनापासून मग कोणीही रोखू शकणार नाही ... आता वेळ आली आहे की जनतेने शहाणं आणि सावध व्हावे... कुणाच्याही चिथावणीला किंवा भडकविण्याला थारा न देता, डोळे उघडे ठेवून सद्विवेक बुध्दीने वागावे "

आता वार्ताहरांचे प्रश्न त्या एका घटनेशी संबंधित न राहता आतंकवाद या जागतिक विषयाकडे वळले. त्यामुळे जॉनने आता आटोपतं घेऊन इथून काढता पाय घेणेच योग्य आहे असे समजले. कारण आतंकवादावर बोलणे हा या पत्रकार परिदषेचा विषय आणि उद्देश नव्हता. आणि त्या विषयावर भाष्य करणे जॉनला तरी योग्य वाटत नव्हते. ज्या घटनेची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावली होती त्याची जवळपास संपूर्ण माहिती जॉनने दिली होती.

"सगळं जनतेवर सोपवून असे पोलीस कसं काय यातून अंग काढून घेवू शकतात?... त्यांचंही काही कर्तव्य असतेच की" एका पत्रकाराने खोचकपणे विचारले.

निघण्याच्या तयारीत असलेला जॉन म्हणाला,

" मी असं कधीच म्हणालो नाही... पोलिसांनाही त्यांचं कर्तव्य आहेच...आणि ते ते पार पाडतीलच...पण आतंकवाद ही एक घटना नसून एक फेनॉमेनॉ आहे... त्यामध्ये जनतेवर जास्त जबाबदारी आणि कर्तव्य असतात...ती त्यांनी पार पाडावीत एवढीच अपेक्षा..."

जॉन थोडा वेळ थांबला आणि म्हणाला,

"आता मला वाटते.... या घटनेशी संबंधित सर्वकाही माहिती मी आपल्याला मुद्देसूद स्वरूपात दिलेली आहे... थँक यू"

जॉन वळून पत्रकार परिषदेतून बाहेर जायला निघाला. जातांनासुध्दा पत्रकारांचा गराडा त्याला सुचू देत नव्हता. त्याच्या सोबतच्या पोलिसांनी त्याला त्या गराड्यातून मार्ग काढून देत त्याला त्याच्या वाहनापर्यंंत पोहोचण्यास मदत केली.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. Sir kadmbari khup awadali
    sir
    manus jagto tr asa jagto ki kadhi marnarch nahi ani marto tr asa marto ki kadhi jaglach navta.W

    SUSHIL

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network