Ch-12:पाठलाग ( Marathi book - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English
वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया


संध्याकाळची वेळ होती. आपली शॉपींगची भरलेली बॅग सांभाळत नॅन्सी फुटपाथवरुन चालली होती. तसं आता घेण्यासारखं विषेश काही उरलं नव्हतं. फक्त एकदोन वस्तूच घ्यायच्या राहिल्या होत्या.

त्या घेतल्या की मग घरी परत जायचं ...

त्या राहिलेल्या एकदोन वस्तू घेवून जेव्हा ती परत जाण्यासाठी निघाली तोपर्यंत जवळ जवळ अंधारायला आलं होतं आणि रस्त्यावरही फारच तुरळक लोक होते. चालता चालता नॅन्सीच्या अचानक लक्षात आले की बऱ्याच वेळेपासून कुणीतरी तिचा पाठलाग करीत आहे. तिची मागे वळून पाहण्याची हिंम्मत होईना. ती तशीच चालत राहाली. तरीही पाठलाग सुरुच असल्याची तिला जाणीव झाली. आता ती पुरती घाबरली होती. मागे वळून न पाहता ती तशीच जोराने चालायला लागली.

तेवढ्यात तिला मागून आवाज आला, '' नॅन्सी ''

ती एक क्षण थबकली आणि पुन्हा चालायला लागली.

मागून पुन्हा आवाज आला, '' नॅन्सी ...''.

आवाजावरुन तरी पाठलाग करणाऱ्याचा काही गैर हेतू वाटत नव्हता. नॅन्सीने चालता चालताच मागे वळून बघितले. मागे जॉनला पाहाताच ती थांबली. तिच्या चेहऱ्यावर त्रासीक भाव उमटले.

हा इथेही....

आता तर कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे...

तो एक मोठा फुलाचा गुच्छ घेवून तिच्या जवळ येत होता. ते पाहून तिला एक क्षण वाटलेही की कपाळावर हात मारुन घ्यावा. ती तो जवळ येईपर्यंत थांबली.

'' का तु माझा सारखा पाठलाग करतो आहेस?'' नॅन्सी त्रासीक चेहऱ्याने आणि रागाने म्हणाली.

'' कृपा कर आणि माझा पाठलाग करणं थांबव '' ती रागाने हात जोडून त्याच्याकडून पिच्छा सोडवून घेण्याच्या अविर्भावात म्हणाली.

रागाने ती गर्रकन वळली आणि पुन्हा पुढे तरातरा चालू लागली. जॉनही थोडं अंतर ठेवून तिच्या मागे मागे चालू लागला.

पुन्हा जॉन पाठलाग करतो आहे हे लक्षात येताच ती रागाने थांबली.

जॉनने आपली हिम्मत एकवटून तो फुलाचा गुच्छ तिच्या समोर धरला आणि म्हणाला, '' आय ऍम सॉरी...''

नॅन्सी रागाने नुसती गुरगुरली. तिला काय बोलावे काही कळत नव्हते. त्यालाही पुढे अजुन काय बोलावे काही सुचत नव्हते.

'' आय स्वीअर, आय मीन इट'' तो गळ्याला हात लावून म्हणाला.

नॅन्सी रागात तर होतीच, तीने झटक्यात आपल्या चेहऱ्यावर येणारी केसाची बट मागे सारली. जॉनला वाटले की ती पुन्हा एक जोरदार चपराक आपल्या गालात ठेवून देणार. भीतीने डोळे बंद करुन पटकन त्याने आपला चेहरा मागे घेतला.

तिच्या ते लक्षात आले आणि ती आपलं हसू आवरु शकली नाही. त्याची ती घाबरलेली आणि गोंधळलेली परीस्थीती पाहून ती एकदम खळखळून हसायला लागली. तिचा राग केव्हाच मावळला होता. जॉनने डोळे उघडून बघितले. तोपर्यंत ती पुन्हा समोर चालू लागली होती. थोडं अंतर चालल्यानंतर एका वळणावर वळण्यापुर्वी नॅन्सी थांबली, तीने मागे वळून जॉनकडे एक दृष्टीक्षेप टाकला. एक खोडकर हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. गोंधळलेल्या स्थीतीत उभा असलेला जॉनही तिच्याकडे पाहून मंद मंद हसला. ती पुन्हा पुढे चालत त्या वळणावर वळून नाहीशी झाली. ती नाहीशी झाली होती तरी जॉन उभा राहून तिकडे मंत्रमुग्ध होवून पाहत होता. त्याला राहून राहून तिचं ते हास्य आठवत होतं.

ती खरोखर हसली की आपल्याला नुसता भास झाला...

नाही नाही भास कसा होणार... ती हसली हे तेवढं खरं...

ती हसली म्हणजे तिने आपल्याला माफ केले असं आपण समजायचं का...

हो तसं समजायला काही हरकत नाही...

पण तीचे ते हसणे म्हणजे साधेसुधे हसणे नव्हते...

तिच्या हसण्यात अजुनही काहीतरी गुढ अर्थ दडलेला होता...

काय होता तो अर्थ?...

जॉन तो अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करु लागला. आणि जसजसा त्याला तो अर्थ उलगडायला लागला त्याच्या चेहऱ्यावरही तेच तसेच हास्य पसरायला लागले होते.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. उत्सुकता वाढायला लागली आहे

    ReplyDelete