Ch-13:प्रेमांकुर ( Marathi books - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

हळू हळू जॉन आणि नॅन्सी जवळ येत गेले. त्यांच्या ह्रदयात त्यांच्या नकळत प्रेमांकुर फुटायला लागले होते. भांडणातूनही प्रेम निर्माण होवू शकतं हे त्यांना पटतच नव्हतं तर ते प्रत्यक्ष अनुभवत होते. कॉलेजात एखादा रिकामा तास असला की ते भेटायचे. कॉलेज संपल्यावर भेटायचे. लायब्रीत अभ्यास करण्याच्या निमित्ताने भेटायचे. भेटण्याच्या एकही मौका ते दवडू इच्छीत नव्हते. पण सगळं लपून लपून चालायचं. त्यांनी त्यांचं प्रेम आत्ता पर्यंत कुणाच्याही लक्षात येवू दिलं नव्हतं. पण प्रेमच ते कधी कुणापासून लपतं का? किंवा एक वेळ अशी येते की ते प्रेमीच कुणाला माहित होईल किंवा कुणाची तमा न बाळगता निर्भीडपणे वागू लागतात. लोकांना आपलं प्रेम माहित व्हावं हीही कदाचित त्यामागे त्यांची सुप्त इच्छा असावी.

बरीच रात्र झाली होती. आपली पोरगी अजून कशी घरी परतली नाही म्हणून नॅन्सीचे वडील बेचैन होवून हॉलमध्ये येरझारा मारत होते. तशी त्यांनी तिला पुर्णपणे मोकळीक दिली होती. पण अशी बेजबाबदारपणे ती कधीही वागली नव्हती. कधी उशीर होणारच असला तर ती फोन करुन घरी सांगायची. पण आज तिने फोन करण्याचीसुद्धा तसदी घेतली नव्हती. तिच्या वडिलांना इतक्या वर्षाच्या अनुभवावरुन कळत होते की प्रकरण काहीतरी गंभीर आहे.

नॅन्सीला कुणाची वाईट संगत तर नाही लागली?...

किंवा ती ड्रग्ज वैगेरे अशा प्रकारात तर नाही अडकली ना?...

नाना प्रकारचे विचार तिच्या वडिलांच्या डोक्यात घोंगावत होते. तेवढ्यात बाहेर त्यांना कसली तरी चाहूल लागली.

एक बाईक येवून नॅन्सीच्या घराच्या कंपाऊंडच्या गेट समोर थांबली. बाईकच्या मागच्या सिटवरुन नॅन्सी उतरली. तिने समोर बसलेल्या जॉनच्या गालाचे चूंबन घेतले आणि ती आपल्या घराच्या गेटकडे निघाली.

घराच्या आतून, खिडकीतून हा सगळा प्रकार नॅन्सीचे वडील पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरुन असे दिसत होते की त्यांचा रागाने तिळपापड होत होता. आपल्या मुलीला कुणी बॉय फ्रेंड असावा हे त्यांना राग येण्याचे कारण नव्हते. तर कारण वेगळेच काहितरी होते.

हॉलमध्ये सोफ्यावर नॅन्सीचे वडील बसलेले होते आणि त्यांच्या समोर खाली मान घालून नॅन्सी उभी होती.

'' या ब्लडी एशीयन लोकांच्या व्यतिरिक्त तुला दुसरा कुणी नाही सापडला का? '' त्यांचा रागीट धीरगंभीर आवाज घुमला.

नॅन्सीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ती तिच्या वडिलांना बोलण्यासाठी हिम्मत एकवटण्याचा प्रयत्न करीत होती. तेवढ्यात नॅन्सीचा भाऊ जॉर्ज कोलीन्स, साधारण तिशीतला, गंभीर व्यक्तीमत्व, नेहमी कुठेतरी विचारात गुरफटलेला, राहाणीमाण गबाळं, घरातून तिथे हॉलमध्ये आला. तो नॅन्सीच्या बाजुला जावून उभा राहाला. नॅन्सीची मान अजूनही खाली होती. तिच्या भाऊ तिच्या शेजारी येवून उभा राहाल्यामुळे तिला हिम्मत आल्यासारखी वाटत होती. ती खालमानेनेच कशीतरी हिम्मत एकवटून एक एक शब्द जुळवित म्हणाली, '' तो एक चांगला मुलगा आहे, ...तुम्ही एकदा त्याला भेटा तर खरं''

'' चूप बस मुर्ख.. मला त्याला भेटायची बिलकुल इच्छा नाही... तुला या घरात राहायचे असल्यास पुन्हा तू मला त्याच्यासोबत दिसली नाही पाहिजेस... समजलं'' तिच्या वडिलाने आपला अंतिम निर्णय सुनावला.

नॅन्सीच्या डोळ्यात एकदम पाणी आलं आणि ती तिथून आपले अश्रू लपवित धावतच आत निघून गेली. जॉर्ज सहानुभूतीने तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात होता.

घरात कुणाचीच वडीलांशी वाद घालण्याची हिम्मत नव्हती.

जॉर्ज हिम्मत करुनच त्याच्या वडिलांना म्हणाला, '' पप्पा... तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही जरा जास्तच कठोरपणे वागता आहात.. तुम्ही कमीत कमी ती काय म्हणते ते ऐकुन घ्यायला पाहिजे.. आणि एकदा वेळ काढून त्या पोराला भेटायला काय हरकत आहे?''

'' मी तीचा वडील आहे.. तिचं भलं बुरं माझ्यापेक्षा जास्त चांगल्या तऱ्हेने कुणाला कळू शकतं?.. आणि तुमचा शहाणपणा तुमच्या जवळच ठेवा... मला तिचे तुझ्यासारखे झालेले हाल पहायचे नाहीत.. तुही एशीयन पोरीशी लग्न केलं होतं ना? .. शेवटी काय झालं?.. तुझी सगळी संपत्ती हडप करुन तुला दिलं तिनं वाऱ्यावर सोडून'' त्याचे वडील भराभर पावलं टाकीत रागाने खोलीतून बाहेर जायला निघाले.

'' पप्पा माणसाचा स्वभाव माणसामाणसात वेगळेपणा आणतो... ना की त्याचा रंग, किंवा त्याचं राष्ट्रीयत्व...'' जॉर्ज त्याच्या वडिलाच्या बाहेर जात असलेल्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून म्हणाला.

त्याचे वडील जाता जाता अचानक दरवाजात थांबले आणि तिकडेच तोंड ठेवून कठोर आवाजात म्हणाले,

'' आणि तु तिचं बिलकुल समर्थन करायचं नाहीस.. की तिला सपोर्ट करायचा नाहीस''

जॉर्ज काही बोलायच्या आतच त्याचे वडील तिथून निघून गेले होते.

इकडे नॅन्सीच्या घराच्या बाहेर अंधारात खिडकीच्या बाजूला उभं राहून एक काळी आकृती आत चाललेला हा सगळा प्रकार पाहात होती आणि ऐकत होती.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. good starting but phude kay

    ReplyDelete
  2. hona mala pan toch prashna padlay...........!!!!!!!!!!!!!!;-)

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network