Marathi Novel - अद्-भूत : Ch-17: गेम

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकांचा लोंढा च्या लोंढा आपआपलं सामान घेवून जात होता. कदाचीत आत्ताच कोणतीतरी ट्रेन आली असावी. तिथेच प्लॅटफार्मवर एका कोपऱ्यात स्टीव्हन, पॉल, रेनॉल्ड आणि क्रिस्तोफर ऍन्डरसन यांचा पत्याचा डाव चांगला रंगला होता. त्या चौघांपैकी क्रिस्तोफर हा, त्याच्या हावभावांवरुन आणि एकूणच त्याचा जो त्या तिघांवर प्रभाव दिसत होता त्यावरुन, त्यांचा म्होरक्या वाटत होता. क्रिस्तोफर म्हणजे एक साधारण पंचविशीतला, कसलेलं शरीर, मजबुत बांधा, उंचपुर्ण तरुण होता.

" हे बघ आपली गाडी यायला अजून खुप वेळ आहे अजून कमीत कमी तीन तरी डाव होवू शकतात" क्रिस्तोफर पत्ते वाटतावाटता म्हणाला.

" पॉल तु या कागदावर पॉइंट लिही " रोनॉल्डने एका हातानी पत्ते पकडीत आणि दुसऱ्या हाताने खिशातला एक कागदाचा तूकडा काढून पॉलच्या हातात देत म्हटले .

" अन, लालटेन जास्त हुशारी नाही करायची" पॉलने ने स्टीव्हनला बजावले. ते स्टीव्हनला त्याच्या चश्म्यामुळे लालटेन म्हणायचे . क्रिस्तोफरचं लक्ष पत्त्ते खेळताखेळता सहजच गर्दीच्या लोंढ्याकडे गेलं .

गर्दीत नॅन्सी आणि जॉन एकमेकांचा हात धरुन एखाद्या नवख्यासारखे चालत होते.

त्याने नॅन्सीकडे नुसतं बघितलं आणि तो आ वासुन बघतच राहाला.

" बाप, क्या माल है " त्याच्या उघडया तोंडातून अनायास निघाले. पॉल, रेनॉल्ड आणि स्टीव्हनसुध्दा आपले पत्ते सोडून बघायला लागले. त्यांचसुद्धा बघतांना उघडलेलं तोंड बंद व्हायला तयार नव्हतं.

" कबूतरी कबूतराबरोबर पळून आलेली दिसते" क्रिस्तोफरचे अशा बाबतीत अनुभवी डोळे सांगत होते.

' त्या कबुतरापेक्षा मी तिच्यासोबत असायला पाहिजे होतो' पॉल म्हणाला.

क्रिस्तोफरने सगळयांजवळचे पत्ते हिसकुन घेत म्हटले, " हे बघा, आता हा गेम बंद करा... आपण दुसराच एक गेम खेळूया"

सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. त्यांच्या लक्षात क्रिस्तोफरच्या बोलण्यातला गुढ अर्थ आला होता. तसे ते तो गेम पहिल्यांदाच खेळत नव्हते. सगळेजण उत्साहाने एकदम उठून उभे राहाले.

" अरे, बघा लक्ष ठेवा ... साले कुठं घुसतील तर मग सापडणार नाहीत " रेनॉल्ड उठता उठता म्हणाला.

मग ते त्यांच्या लक्षात येणार नाही एवढं अंतर ठेवून त्यांच्या मागे मागे जावू लागले.

" ऐ , लालटेन तु जरा समोर जा पहिलेच साल्या तुला चश्म्यातून कमी दिसते ." क्रिस्तोफरने स्टीव्हनला ढकलत म्हटले. स्टीव्हन नॅन्सी आणि जॉनच्या लक्षात येणार नाही असा धावतच समोर गेला.

दिवसभर इकडेतिकडे भटकण्यात कसा वेळ निघून गेला हे जॉन आणि नॅन्सीला कळलेच नाही. शेवटी संध्याकाळ झाली. जॉन आणि नॅन्सी हातात हात घालून फुटपाथवर मजेत चालत होते. समोर एकाजागी त्यांना रस्त्यावर हार्ट च्या आकाराचे हायड्रोजन भरलेले फुगे विकणारा फेरीवाला दिसला. ते त्याच्याजवळ गेले. जॉनने फुग्यांचा एक मोठा गुच्छ खरेदी करुन नॅन्सीला दिला. पकडण्याच्या धागाच्या मानाने तो गुच्छ मोठा असल्यामुळे धागा तुटला आणि तो गुच्छ आकाशाकडे झेपावला. जॉनने धावत जावून, उंच उंच उड्या मारुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो धागा त्याच्या हातात सापडला नाही. ते लाल फुगे जसे एकमेकांना ढकलत वर आकाशात जात होते. नॅन्सी ती जॉनची धावपळ आणि धडपड पाहून खळवळून हसत होती.

आणि त्यांच्या बरंच मागे क्रिस्तोफर , रोनॉल्ड, स्टीव्हन आणि पॉल त्यांच्यावर कुणाच्या लक्षात येणार नाही याची खबरदारी धेत पाळत ठेवून होते.

नॅन्सी आणि जॉन एकाजागी आईसक्रीम खाण्यासाठी थांबले. त्यांनी एक कोन घेतला आणि त्यातचे ते दोघेही खावू लागले. आईसक्रीम खाता खाता नॅन्सीचं लक्ष जॉनच्या चेहऱ्याकडे गेलं आणि ती खळखळून हसायला लागली.

'' काय झालं?'' जॉनने विचारले.

'' आरश्यात बघ'' नॅन्सी जवळच्या एका आरश्याकडे इशारा करुन म्हणाली.

जॉनने आरश्यात बघीतले तर त्याच्या नाकाच्या शेंड्याला आइस्क्रीम लागलं होतं. त्यालाही त्याचं हसू येत होतं. त्याने ते पुसलं आणि एक प्रेमळ दृष्टीक्षेप नॅन्सीकडे टाकला.

'' खरंच आपल्या दोघांच्याही आवडी निवडी एकदम सारख्या आहेत '' नॅन्सी म्हणाली.

'' मग ... राहणारच... कारण... वुई आर द परफेक्ट मॅच"' जॉन अभिमानाने म्हणाला.

आईस्क्रीम खाता खाता अचानक नॅन्सीचं लक्ष दुरवर क्रिस्तोफरकडे गेलं. त्यानं पटकन आपलं लक्ष दुसरीकडे वळवलं. तिला त्याच्या नजरेत एक विचित्र भाव जाणवला होता. आणि त्याच्या वागण्यातही.

'' जॉन मला वाटतं आता आपण इथून निघायला पाहिजे '' नॅन्सी म्हणाली आणि ती पुढे चालायला लागली. जॉन गोंधळलेल्या स्थितीत तिच्या मागे मागे जावू लागला.

तिथून पुढे बराच वेळ चालल्यानंतर ते एका कपड्याच्या दुकानात घुसले. आता चांगली रात्र झाली होती. नन्सीला शंका होतीच की कदाचीत मघाचा तो तरुण त्यांचा पिछा करीत असावा. म्हणून तिने दुकानात गेल्यावर एका फटीतून बाहेर डोकावून बघितले. बाहेर क्रिस्तोफर त्याच्या अजून दोन मित्रांसोबत इकडे तिकडे पाहत चर्चा करीत असतांना दिसला. जॉन त्या लोकांच्या नजरेच्या टप्प्यात होता.

'' जॉन मागे वळून पाहू नको .. मला वाटते ती पोरं आपला पाठलाग करीत आहेत.'' नॅन्सी दबक्या आवाजात जॉनला म्हणाली.

'' कोण? .. कुठाय? '' जॉन गोंधळून म्हणाला.

'' चल लवकर इथून निघून जावू... आपण त्यांना सापडता कामा नये'' नॅन्सीने त्याला तिथून बाहेर काढले.

ते दोघंही भराभरा पावले टाकीत फुटपाथवर असलेल्या लोकांच्या गर्दीतून मार्ग काढीत पुढे जावू लागले.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. Fine pan Aaj 26la kahich patavale nahi.Lovekar lovkar pathava ho. Farach utsukta lagali aahe.

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network