Marathi Novel - अद्-भूत : Ch-18: त्या चौघांकडून पाठलाग

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

आपला पाठलाग होतो आहे याची आता नॅन्सी आणि जॉनला पूरेपर खात्री पटली होती. ते दोघंही घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शहर त्यांना नविन होतं. ते जिकडे रस्ता मिळेल तिकडे चालत होते. चालता चालता ते एका अश्या ठिकाणी आले की जिथे लोक जवळ जवळ नव्हतेच. तशी रात्रही बरीच झाली असल्यामुळेही कदाचित लोक नसावेत. तिने मागे वळून पाहाले. क्रिस्तोफर आणि त्याचे मित्र अजूनही त्यांचा पाठलाग करीत होते. नॅन्सीचं हृदय धडधडायला लागलं. जॉनही गोंधळून गेला होता. काय करावं काही त्यांना सुचत नव्हतं. नुसते ते भराभर चालत त्यांच्यापासून जेवढं शक्य होईल तेवढं दूर जाण्याचा प्रयत्न करीत होते. पुढे रस्ता अजूनच अंधारलेला आणि निर्मणूष्य होता. ते दोघे आणि त्यांच्यामागे पाठलाग करणारी ती पोरं यांच्याव्यतिरिक्त त्यांना अजून दूसरं कुणीच दिसत नव्हतं.

''त्यांच्या लक्षात आलेलं दिसतं की आपण त्यांचा पाठलाग करीत आहोत'' स्टीव्हन त्याच्या साथीदारांना म्हणाला.

'' येवू देकी... ते केव्हा ना केव्हा येणारंच होतं '' क्रिस्तोफर म्हणाला.

'' ते खुप भ्यायलेलेसुध्दा दिसत आहेत '' पॉल म्हणाला.

'' भ्यायलाच तर पाहिजेत... आता भितीमुळेच आपलं काम होणार आहे... कधी कधी भितीच माणसाला अधू बनविते'' रेनॉल्ड म्हणाला.

जॉननं मागे वळून पहालं तर ते लोक भराभर त्यांच्याजवळ पोहोचत होते.

'' नॅन्सी ... चल पळ...'' जॉन तिचा हात पकडत म्हणाला.

एकमेकांचा हात पकडून आता ते जोरात धावायला लागले.

'' आपण पोलीसात जायला पाहिजे का?'' नॅन्सीने पळता पळता विचारले.

'' आता इथे कुठं आहेत पोलीस... आणि जर आपण शोधून गेलोही .. तर तेही आपल्याला शोधत असतील... आतापर्यंत तुझ्या घरच्यांनी पोलिसात रिपोर्ट दिली असेल...'' जॉन धावता धावता कसातरी बोलत होता.

धावता धावता मग ते एका अंधाऱ्या अरुंद गल्लीत शिरले. क्रिस्तोफर आणि त्याचे मित्रसुध्दा त्यांच्या मागेच होते. ते जेव्हा त्या गल्लीत घुसणार एवढ्यात एक मोठा ट्रक रस्त्यावरुन त्यांच्या आणि गल्लीच्या तोंडाच्या मधून गेला. ते ट्रक पास होईपर्यंत थांबले. आणि जेव्हा ट्रक पास झाला होता तेव्हा त्यांना गल्ली रिकामी दिसत होती. ते गल्लीत घुलले. गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत धावत गेले. गल्लीच्या दुसऱ्या तोंडावर थांबले. आजूबाजूला बघितलं पण नॅन्सी आणि जॉनचा कुठेच पत्ता नव्हता.

क्रिस्तोफर आणि त्याचे मित्र इकडे तिकडे पाहात एका छोट्या चौकाच्या मधे उभे राहाले. त्यांना नॅन्सी आणि जॉन कुठेही दिसत नव्हते.

'' आपण सगळेजण इकडे तिकडे विखरुन त्यांना शोधू... ते आपल्या तावडीतून सुटता कामा नये'' क्रिस्तोफर म्हणाला.

चौघं चार बाजूंना, चौकाच्या चार रस्त्याने जावून विखूरले आणि त्यांना शोधू लागले.

नॅन्सी आणि जॉन एका रस्त्याचा बाजूला पडलेल्या ड्रेनेज पाईपमध्ये लपले होते. कदाचित ड्रेनेज पाईप्स नवे टाकण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तिथे आणून टाकले असावेत. तेवढ्यात अचानक त्यांना त्यांच्याकडे धावत येणारा पावलांचा आवाज आला. ते आता तिथून हलूही शकत नव्हते. ते जर सापडले तर पुर्णपणे त्यांच्या तावडीत आयतेच सापडणार होते. त्यांनी मांजरासारखे घट्ट डोळे मिटून जेवढं शक्य होईल तेवढं बारीक होण्याचा प्रयत्न केला. त्याव्यतिरिक्त ते काय करु शकणार होते?

अचानक त्यांच्या लक्षात आलं की त्या पाठलाग करणाऱ्यांपैकीच एक जण धावत येवून अगदी पाईप जवळ पोहोचला होता. तो जवळ येताच जॉन आणि नॅन्सी अगदी शांत जवळ जवळ श्वास रोखून काहीही हालचाल न तसेच बसून लपून राहाले. तो आता अगदी पाईपजवळ पोहोचला होता.

तो त्या चौघांपैकी स्टीव्हन होता. त्याने आजूबाजूला बघितले.

'' साले कुठं गायब झालेत?'' तो स्वत:शीच चिडून म्हणाला.

तेवढ्यात स्टीव्हनचं पाईपकडे लक्ष गेलं.

नक्कीच साले त्या पाईपमध्ये लपले असतील...

त्याने विचार केला. तो पाईपच्या अजून जवळ गेला. तो आता वाकुन पाईपमध्ये पाहणार तेवढ्यात...

'' स्टीव... लवकर इकडे ये'' तिकडून क्रिस्तोफरने त्याला आवाज दिला.

स्टीव्हन पाईपमध्ये वाकुन पाहता पाहता थांबला, त्याने आवाज आला त्या दिशेला बघितले आणि वळून तो धावतच त्या दिशेला निघाला.

जाणाऱ्या पावलांचा आवाज येताच नॅन्सी आणि जॉनने सुटकेचा श्वास सोडला.


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. interesting novel....waiting for next post...

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network