Marathi Kadambari - Novel - Madhurani - CH-10 व्हिल्स
वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया
गणेशची पुर्ण दुपार खराडे साहेबांची बडबड ऐकण्यात आणि ऑफिसात सगळ्या फाईल्स चाळ्ण्यातच गेली. अपेक्षेप्रमाणे आज पूर्ण चार्ज हँडओव्हर झालं नव्हतं. कदाचित अजून एक दिवस लागणार होता. आणि खराडे साहेबांची बडबड जर अशीच सुरु राहाली तर कदाचित दोन दिवसही लागतील. खराडे साहेबांच्या एकूण बडबडीवरून गणेशच्या लक्षात आले होते की त्यांची या गावात राहण्याची अजून इच्छा होती. कारण त्यांच्या गावापासून हे गाव जवळ असल्यामुळे इथे नोकरी करणं त्यांना फार सोईचे होते. तिकडे आपल्या गावातल्या शेतीकडेही लक्ष देणं होत होतं. त्यांच्या बोलण्यावरून त्याच्या हेही लक्षात आले होते की त्यांची बदली करण्यात गावकऱ्यांचाच हात होता. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात गावाबद्दल एकूण रोषच दिसत होता. संध्याकाळी थकून भागून खोलीवर आल्यावर गणेशने विचार केला की थोडं पडावं आणि मग आहेच सरपंचाकडे जाणं रात्री जेवायला. त्याने खोलीचं कुलूप उघडलं. आत गेल्यावर दारामागचं इलेक्ट्रीक बल्बचं बटण दाबलं. लाईट लागला पण डीम.
साली खेड्यात ही आहेच इलेक्ट्रीकची पंचाईत...
डीम का असेना...लाईट तर आहेना...
तेच खूप झालं...
सरपंचाच्या गडयाने गादी अंथरून पांघरून टाकून संपूर्णपणे तयार केलेली पाहून त्याला हायसं वाटलं. खोलीत येतांना मुद्दामच त्याने समोरच्या मधुराणीच्या दूकानाकडे पाहणं टाळलं होतं. आत आल्याबरोबर त्याने समोरचं दार आतून लावून घेतलं आणि स्वतःला जवळजवळ गादीवर झोकूनच दिलं. तो गादीवर निपचित पडला. तो गादीवर निपचित पडला होता खरा पण त्याचे विचार थांबायला तयार नव्हते. शरीर थकले होते पण मेंदू थकायला तयार नव्हता. तो विचार करू लागला...
आज संपूर्ण दिवस सरपंचासोबत फिरण्यात आणि आफिसचे काम बघण्यात आणि खराडे साहेबांची बडबड ऐकण्यात गेला होता. पण एकही क्षण असा नव्हता की जेव्हा त्याला मधुराणीचा विचार आला नसेल. ती त्याच्या मनचक्षूसमोरून हटायला तयार नव्हती. तिचे ते आर्त डोळे आणि खोडकर हसू राहून राहून त्याच्या डोळ्यासमोर येत राहाले होते. आणि अजूनही तेच. त्याने डोक्यातून तिला झटकून टाकण्याच्या प्रयत्नात अस्वस्थतेने कड बदलला. पण त्याने विचार थोडीच बदलणार होते. त्याने विचार केला एखादी सिगारेट ओढली तर बरे वाटेल. त्याला दिवसातून किमान एक दोन तरी सिगारेट ओढण्याची सवय होती. आज एकही सिगारेट ओढली नव्हती. पण सिगारेट ओढायची म्हणजे दुकानावर जाणे आलेच. मग त्याला काय वाटले कुणास ठाऊक तो ताडकन उठला.
आपण तिला असे किती दिवस टाळणार आहोत....
एखादया प्राब्लेमपासून पळून जाण्यापेक्षा त्याला सामोरे गेलेले केव्हाही योग्य....
तो उठून उभा राहिला. बाथरूमध्ये गेला. माठातले थंडगार पाणी ओंजळीने घेऊन त्याने आपल्या चेहऱ्यावर शिंपडले. बाजूला पितळीचा लोटा ठेवला होता. त्या लोटयाने माठातले पाणी काढून त्याने आपल्या हातापायावर ओतले. मग तसाच परत येऊन आपल्या बॅगजवळ गेला. बॅग उघडली. बॅगमध्ये वरच व्यवस्थित घडी करून ठेवलेला टॉवेल होता. त्याने तो काढला. तोंड पुसले. तोंड पुसता पुसता टावेलच्या येणाऱ्या वाशींग पावडरच्या सुगंधी वासाने त्याचे मन मोहरून गेले. काही क्षणाकरता का होईना त्याला आपल्या बायकोची आठवण आली. त्याने बॅगमधील सगळे कपडे उचलून बॅगच्या बुडात पाहिले. बॅगच्या बुडात त्याचा त्याच्या बायकोचा अणि मुलाचा फॅमीली फोटो ठेवलेला होता.
दूर गेल्यावरच आपल्या माणसाचं महत्व कळतं....
त्याच्या डोक्यात विचार चमकून गेला. त्याने पुन्हा बॅगमधील सामान व्यवस्थित ठेवले. आता तो उभा राहून हातपाय पुसू लागला. हातपाय पुसल्यानंतर त्या ओल्या टावेलला कुठे वाळू घालावे यासाठी तो इकडे तिकडे बघत जागा शोधू लागला. भींतीवर एका जागी खिडकीच्या शेजारी एक खुंटी दिसली. त्याने तो टॉवेल खुंटीवर टांगून ठेवला. टॉवेल खुंटीवर अडकवीता अडकवीता त्याने शेजारच्या उघडया खिडकीतून बाहेर डोकावून बघितले. दुकानात आता बरीच गर्दी होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे कदाचित. ओटयावरसुध्दा लोकांचे थवे च्या थवे बसावे तसे लोक कुणी विडया ओढत कुणी चिलीम भरत कुणी तंबाखु चोळत तर कुणी चकाटया पिटत बसले होते. त्याने दरवाज्याजवळ जाऊन पायात चप्पल चढवली. दार उघडून बाहेर पडत त्याने दुकानाकडे एक नजर टाकली. ओटयावरच्या बऱ्याच चिकीत्सक नजरा त्याच्याकडे वळल्या होत्या. बाहेरून कुलूप लावून तो दुकानाच्या बाजूला एक ग्रुप बसला होता त्याच्या शेजारी जाऊन ओट्यावर एकटाच बसला. गृप तरण्या ताठया लग्नाला आलेल्या पोरांचा होता. पोरं चोरून चोरून गल्ल्याकडे बघण्यात मग्न होती. गणेश त्या पोरांकडे त्याचं काहीच लक्ष नाही अशा अविर्भावात बसला.
" इला शेतात नेऊन नागड्डीत घोळसायला पायजे " त्या गृपमधला एकजण बोलला.
" टोंगळे फुटेस्तो " दुसऱ्याने जोडले.
मग संपूर्ण गृपच्या गृप जोराने हसायला लागला.
' शीशी .... या पोरांच काय खरं नाही' गणेशने मनाशीच विचार केला.
आणि तो तिथून उठला आणि कधी दुकानासमोर जाऊन मधुराणीसमोर उभा राहिला त्याला कळलेच नाही.
मधुराणीने त्याच्याकडे पाहून त्याला एक गोड स्मित दिले. दिवसभर गल्ल्यावर बसूनसुध्दा ना तिच्या हालचालीत ना अविर्भावात थकवा जाणवत होता. अजूनही अगदी उमललेल्या कळीसारखी ती टवटवीत आणि प्रफुल्ल दिसत होती.
" बोला सायेब काय देऊ बोला" ती म्हणाली.
" जरा एक व्हील्स द्या "
" जरा कावून... पूर्णच घ्या की' तिने कोटी केली आणि ती खळखळून हसू लागली.
गणेशही तिच्यासोबत हसायला लागला.
" ए एक व्हील दे रे " तिने दूकानातल्या नोकर पोराला आदेश दिला.
तो पोरगा एकेका गिऱ्हाईकाचं ओळीने सामान देण्यात मग्न होता.
म्हणजे अजून वेळ लागणार होता....
गणेशने आजूबाजूला एक नजर टाकली. त्याच्या आजूबाजूला अजून काही गिऱ्हाईक उभे होते. त्याला लागूनच एक 7-8 वर्षाची सुती मळकट, जागोजागी ठिगळं लावलेला फ्रॉक घातलेली एक गोंडस मुलगी उभी होती. डोक्याला चिपीचीपी तेल लावलेले होते. आणि तिच्या छोटया छोटया दोन वेण्या मळक्या लाल रिबनने बांधलेल्या होत्या. तिच्या हाताच्या बोटात एक दोरीने गळा बांधलेली छोटीशी काचेची बाटली अडकवलेली होती.
" ताई... एक छताक गोडतेल " ती मुलगी मधुराणीकडे बघून म्हणाली.
मधुराणीलाही तिचा लाड आल्यावाचून राहला नाही.
" देते हं बाळ... जरा थांब " मधुराणी तिचा गालगुच्चा घेत म्हणाली.
" लर्फईर्फी दिर्फवसार्फानंर्फ आर्फलीर्फी " मधुराणी एवढ्या गडबडीत त्या पोरीला काहीतरी म्हणाली.
" मार्ल्फमाच्यार्ल्फा गार्ल्फवलार्ल्फा गेर्ल्फलीर्ल्फी होर्ल्फोतीर्ल्फी " ती पोरगी ही हसत हसत तोतऱ्या बोलात काहीतरी म्हणाली.
गणेश गंमतीने गालातल्या गालात हसत ते सर्व ऐकत होता. पण ते काय बोलले गणेशला काहीएक समजले नाही.
" काय ... काय? " गणेशने उत्सुकतेपोटी विचारले.
" काय नाय ... आमची खास भाषा हाय ती " मधुराणी खोडकरपणे हसत पुन्हा त्या पोरीचा गालगुच्चा घेत त्याला म्हणाली.
कदाचित ती त्यांची कोड भाषा होती. त्याला आठवलं लहाणपणी त्याच्या बहिणी अश्याच काहीतरी त्याच्यासमोर बोलत असत. आणि त्याने विचारले तर त्याला काही एक सांगत नसत. त्याने खूप प्रयत्न केला होता पण त्याच्या बहिणींनी त्याला ती भाषा शेवटपर्यंत कळू दिली नव्हती.
त्या मुलीच्या पलिकडे एक नऊवारी पातळ नेसलेली म्हातारी ऊभी होती. आणि तिला लागूनच एक साडीसारखे ठेवण असलेलं जूणं सूती पातळ घातलेली मजूरासारखी दिसणारी एक स्त्री ऊभी होती.
आजूबाजूला बघता बघता गणेशची नजर वर आकाशाकडे गेली. चांगलं अंधारून आलं होतं. तेवढयात रस्त्यावरच्या सिमेंटच्या विजेच्या खांबावरचे विजेचे दिवे लागले. गणेशने पाहिले ओटयावर बसलेल्या बऱ्याच जणांनी एका हाताने का होईना दिव्यांना नमस्कार केला होता.
गणेश पुन्हा अंतर्मुख होऊन आपल्या विचारात गढून गेला. त्याला जाणवत होते की आता आपण मधुराणीच्या समोर उभे असून तिच्याकडे पाहत नव्हतो तरी त्याच्या मनातली तिच्याबद्दलची ओढ आणि हुरहूर शमल्यासारखी जाणवत होती.
" हे घ्या सायेब "
तिच्या त्या मंजुळ आवाजाने तो भानावर आला.
तिने त्याच्यासमोर लाकडाच्या पेटीवर ठेवलेली व्हील साबन पाहून गणेशला हसू आवरेना. तो खळखळून हसायला लागला.
" काय झालं ? " ती सुध्दा हसत म्हणाली.
" व्हील साबन नाही... व्हील्स सिगारेट मागीतली होती मी"
" असं होय ... सायेब ... इथं ब्रिस्टॉल अन् चारमीनारच मिळते... व्हील ... का व्हील्स म्हणता ती इथं कोणी वढत नाय " ती म्हणाली
" बरं मग ब्रिस्टॉल दया ... अन् एक काडीपेटीसुध्दा दया"
" ए सायबांना ब्रिस्टाल अन् एक काडीपेटी दे" तिने नोकराला सांगितले.
ती एक एक सामान सांगायची अन् तो नोकर फक्त ऐकून घ्यायचा. 'हो' म्हणायचा नाही की 'नाही' म्हणायचा नाही. पण त्याचं बरोबर लक्ष असायचं. त्यानं तिचं ऐकलं पण तो आता त्या छोटया मुलीजवळील शीशी घेऊन तीत तेल टाकण्यासाठी तेलाच्या डबकीजवळ गेला.
" ए यांना आंधी दे... किती वेळचे ताटकळत उभे हायत ते " तिने त्याला हटकले.
त्या नोकराने नुसते तिच्याकडे पाहिले आणि ती शीशी तशीच हातात घेऊन त्याने एक ब्रिस्टॉलचे पाकीट आणि एक काडीपेटी काढून गणेशच्या हातात दिली.
क्रमश:...
The trouble with the rat race is that even if you win, youe still a rat.
ily Tomlin
aata kahanila maja yayla lagli kadhi wachate aase zalay
ReplyDeleteHo kharch chan ahe
Delete