Marathi literature - Novel - Madhurani - CH-9 खराडे साहेब

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi literature - Novel - Madhurani - CH-9 खराडे साहेब
 Read Novel - मधुराणी - Hony -  on Google Play Books Store
वाचा काही निवडक प्रतिक्रिया -  प्रतिक्रिया 
गणेश ऑफिसमध्ये बसून आधीच्या ग्रामसेवकाची वाट पाहू लागला. सरकारने ग्रामपंचायतव्दारे ग्रॅन्ट देऊन जिथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो तिथे मैदानात एका कोपऱ्यात छान टुमदार ऑफीस बांधून दिले होते. आधीच्या ग्रामसेवकाकडून चार्ज घेतल्याशिवाय गणेशला काम सुरु करता येणार नव्हते. तेवढ्यात त्याला दारात कुणाचीतरी चाहूल लागली. त्याने तिकडे पाहिले.
आले वाटतं आधीचे ग्रामसेवक...
तो त्यांची आत येण्याची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला तरी कुणीच आलं नाही म्हणून गणेश पुन्हा ऑफिसच्या भिंतीवर एक नजर फिरवीत ग्रामसेवकाची वाट पाहू लागला. पुन्हा त्याला कुणाची तरी सावली हलल्यासारखी दिसली.
कुणीतरी खेडूत कामानिमित्त आला असावा...
साला अजून चार्जच घेतला नाही अन् लोकही येणं सुरु झाले....
" कोण आहे?" गणेश जाग्यावर बसूनच ओरडला.
मळलेल्या कपड्यात एक माणूस आत आला.
" मी सायेब... पांडू"
" हे बघा मी आजच इथे जॉईन झालो आहे ...अजून चार्जसुध्दा घेतला नाही... तुम्ही उद्या या..."
" नाई सायेब ... मी इथला चपराशी"
" चपराशी ... पण चार्ज घेतांना मला तर इथे दुसरे कुणीच नसल्याचे सांगितले गेले होते"
" म्हंजे तसा नाय ... "
कुत्रं जसं शेपूट हलवत आपल्या मालकाजवळ जातं तसा तो जवळ आला.
" अच्छा अच्छा ..." गणेशच्या लगेच लक्षात आलं.
" अरे अजून... खराडे साहेब कसे आले नाहीत..." गणेशने त्याला विचारले.
" आता येतीनचं... ते त्येंच्या गावावरून येतातना ... म्हून कव्हा कव्हा उशीर होतो..."
" उशीर?... सकाळी यायला पाहिजे होते ... अजून दूपार होऊन गेली तरी आले नाहीत अजून..."
" येतील सायेब ... कव्हा कव्हा होते आसं"
" अन् तू कुठं राहत असतो..." गणेशने विचारले.
" हे इथंच पल्याड... इथं हाफिसात चाहूल लागली मलं वाटलं खराडे सायेब आले... तर सरपंच रस्त्यात भेटले... त्यास्नी सांगतलं की नईन सायेब आलेत म्हून..."
स्पष्ट होतं आधीच्या ग्रामसेवकाची यायची अशी काही फिक्स वेळ नसावी. गणेश काहीच बोलला नाही. त्याने पुन्हा अस्वस्थतेने आपल्या घड्याळाकडे पाहिले.
" च्या पाणी ... काही आणू का सायेब"
" चहा? ... इथं कुठं हॉटेल आहे की काय?"
" नाय सायेब..."
" मग चहा कुठून आणणार? "
" आनीन शेजारुन... कोणाच्यातरी इथून"
" अन् पैसे..."
" अवो सायब मनल्यावर ... पैसे घ्यायची कोणाची हिम्मत हाय"
" पण असं कसं ... काही फुकट कुणाच्या इथून कसं आणायचं..."
" सायेब ... इथली पब्लीक लय येडी हाय ... जबरदस्ती दिलं तरी पैसे घेणार नाय... मंग आपलबी काय जाते ... फुकट त फुकट " तो गणेशसमोर टाळी घेण्यासाठी हात पुढं करीत म्हणाला.
गणेशने त्याच्या मळक्या कपड्याकडे पाहून अन् घामेजलेल्या शरीराकडे पाहून आपला टाळी घेण्यासाठी पुढे जाणारा हात रोखला. स्पष्ट होतं तो गणेशला खुलवून मोकळं करण्याचा प्रयत्न करीत होता.
पुन्हा दारात हालचाल झाली. गणेशने आणि पांडूने तिकडे पाहिले. शेवटी एकदाचे खराडे साहेब आले होते. खराडे साहेब म्हणजे पांढरा पायजामा आणि वर रेशमी रंगाचा सदरा, तोंडात पान, काळा रंग, तेलकट चेहरा, डोक्यावरचे विरळ झालेले तरी अजून काळे कुळकुळीत बटबटीत तेल लावलेले केस असा अवतार होता.
चला म्हणजे आले एकदाचे खराडे साहेब...
" नमस्कार सायेब..." पांडूने नमस्कार केला.
पांडूच्या नमस्काराकडे दुर्लक्ष करीत आल्या आल्या त्यांनी तिथेच कोपऱ्यात एका जागी पानाची पिचकारी मारली.
" आवो काय करणार ... घरुन निघालो होतो सकाळीच पण बगा कसं दुपारी पोहोचलो इथं..." खुर्चीवर बसता बसता ते गणेशकडे पाहत म्हणाले.
गणेशने नुसते त्यांना स्माईल दिले. त्याला माहित होतं की आता त्यांच्याशी त्यांच्या उशीरा येण्याच्या विषयावर बोलण्यापेक्षा एकदम चार्ज हॅड ओवर करण्याच्या कामाला हात घातला तर लवकर तरी होईल. नाहीतर अजून एखादा दिवस लागायचा.
" किती वेळ लागेल चार्ज घ्यायला..."
" त्याचं काय गणेशराव ... मला द्यायला काही वेळ लागनार नाय ... पाच मिनीटाचं काम हाय... पण तुमाला घ्यायला किती वेळ लागतो ते तुमी बगा..." खराडे साहेब जणू स्वत:च्याच कोटीवर हसत टेबलाखाली पाय लांब करीत म्हणाले.
पांडू समोर आला आणि त्यांनी आपली बॅग पांडूच्या हातात दिली. पांडूने ती बॅग बाजूला भिंतीत असलेल्या बिनदरवाजाच्या कपाटात ठेवली. तिथे कपाटात अजूनही बरेच धूळ खात पडलेले कागदपत्र होते. कोपऱ्यात एक लोखंडी आलमारी होती.
त्यात सर्व फाईल असाव्यात ....
गणेशने विचार केला. अजूनही खराडे साहेब काही घाई करीत नाहीत हे पाहून गणेश म्हणाला.
" मग करायची सुरवात..."
" थांबा हो सायेब ... काय गडबड हाय... पहले चहा बिहा घेऊ ... अन् मंग करु कामाला सुरवात... सरकारी कामं अशी पटापट व्हायला लागली तर कसं व्हायचं... तुमी नविन हायनं म्हणून ... होईल हळू हळू सवय... मीबी नविन नविन असाच होतो...पण तुमाला खरं सांगू का ... लई राग यायचा आंधी ...सरकारी लोकांचा ... मी तर पूर्ण सिस्टीम बदलवायचं ठरवलं होतं ... पण बगा आता... निघालो सिस्टीमला बदलवायला ... अन् सिस्टीमनंच आम्हाला बदलवलं..." खराडे साहेबांची बडबड सुरु झाली.
गणेश नुसता ऐकत होता. त्याला माहित होतं बोलून काही उपयोग होणार नव्हता. उलटा अजून उशीरच झाला असता.
" ए पांड्या ... जा बरं आन बर त्या शांताबाईच्या इथून चहा" खराडे साहेबांनी हूकुम सोडला.
पांडू लगबगीने घावतच बाहेर पळाला तशी खराडे साहेबांनी बसल्या बसल्याच खुर्ची मागे सरकवली.
" मंग ... इथंच राहणार की अपडाऊन करणार?" खराडे साहेबांनी गणेशला विचारले.
" इथंच एक खोली दिली आहे सरपंचानी"
" असं... सरपंच लई चांगला माणूस हाय बगा"
खराडे साहेबांनी इकडे तिकडे कोणी नाहीना असे पाहत गणेशजवळ शक्य होईल तेवढे आपले तोंड नेत म्हटले,
" तुमाला एक पर्सनल ... सल्ला म्हणून देतो..."
गणेश खराडे साहेब काय सांगतात याची वाट पाहू लागला.
" इथले लोक म्हणजे ... लई खराब... कुणाच्या भानगडीत पडू नका... इथं आपण भलं अन् आपलं काम भलं असं रहावं लागते... एकाला सल्ला दिला तर दुसरा अंगावर येतो... दुसऱ्याला जवळ केलं तर तिसऱ्याला राग येतो... आवो लई खराब गाव हाय ... म्हणजे माझ्या नोकरीच्या हयातीत एवढ खराब गाव मी पाह्यलंच नाय" खराडे साहेब सांगत होते.
गणेशला खराडे साहेबांची बडबड ऐकण्याची बिलकुल इच्छा नव्हती. त्याला केव्हा एकदा चार्ज घेतो असं झालं होतं.
" सगळ्या फाईल आलमारीत असतील नाही ..." गणेश पुन्हा मूळ मुद्द्यावर येत म्हणाला.
खराडे साहेब काहीच बोलले नाही. पुन्हा एकदा उठून ते कोपऱ्यात पाणाची अन् तंबाखाची पिचकारी थुंकून आले.
" आलमारीची चाबी तुमच्याजवळच असेल नाही ... " गणेश पुन्हा घाई करण्याच्या उद्देशाने म्हणाला.
" काय राव .... तुमी लयच गडबड करता राव... अशी सिन्सीयारीटी गव्हर्मेंटमध्ये काही कामाची नाय बरकां... अशी सिन्सीयारीटी आपल्याच अंगाशी येते... म्हणजे हे माझे अनुभवाचे बोल हायत बगा... पायजे तर लिहून घ्या.."
गणेशला आता या माणसाला कसे हॅन्डल करावे काही सुचत नव्हते. त्याला चिडही येत होती आणि हसूही येत होतं. पण चिडून जमणार नव्हते आणि हसून तर बिलकुलच जमणार नव्हतं. उलट ते अजूनच बिघडले असते. गणेशने शेवटी ठरवून टाकले की दोन दिवस लागले तरी चालतील आता खराडे साहेबांच्या कला कलानेच घ्यायचे. नाहीतरी त्याच्याजवळ दुसरा कोणता पर्याय होता?. तिकडे खराडे साहेबांची बडबड चालू होती आणि इकडे गणेश एका वेगळ्याच विश्वात रमला होता की ज्यात त्याला खराडे साहेबांची बडबड तर ऐकू येत होती पण चिडही येत नव्हती आणि हसूही येत नव्हतं.
Imagination was given to man to compensate him for what he is not, and a sense of humor was provided to console him for what he is.
scar Wilde
क्रमश:

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

  1. kharach sarkari kam itke halu astat.
    He badlayla pahije, pan he badaltana badlanarech badaltat he vinodi padhtine janavl yat....

    ReplyDelete
  2. sarkari kaam aani saha mahine thamb....
    aajun kahi gavat aashich khedval padhat aahe ti badlayala pahije.

    ReplyDelete