वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया
Online Novels - Madhurani - CH - 3 ओळखगणेशराव आणि विनय समोरच्या त्या भल्यामोठ्या कंपाऊंडमध्ये शिरु लागले. कंपाऊंडच्या दरवाज्यावर त्यांना तेथील सेक्यूरीटी गार्डने हटकले. जेव्हा त्यांनी आपली ओळख दाखवून त्यांचा आत जाण्याचा उद्देश सांगितला तेव्हाच त्यांना आत जाण्यास परवानगी देण्यात आली. ते कंपाऊंडच्या दरवाज्यातून दुतर्फा शोभेची झाडे असलेल्या एका रूंद रस्त्यावरून आत जाऊ लागले. रस्त्याच्या कडेला उंचच्या उंच गगनचूंबी अशोकाची आणि निलगीरीची झाडे सुद्धा होती. जसे जसे ते आत जात होते तसा बंगल्याचा थोडा थोडा भाग त्यांच्या दृष्टीपथात पडू लागला. जेव्हा ते बंगल्याच्या अगदी जवळ गेले तेव्हा पूर्ण बंगला त्यांच्या दृष्टीपथात आला. बंगला कसला तो ! तो तर अक्षरशः राजवाडाच होता. चारही बाजूने भलेमोठे कंपाऊंड होते. आणि त्या कंपाऊंडमध्ये मोठमोठी झाडे वाढलेली होती. बाहेरून जर बघितले तर दृष्टीपथात ती झाडेच येत. बाहेरून आत झाडांच्या गर्दीत कुठेतरी बंगला असेल असे न माहित असणाऱ्यांना वाटणेच शक्य नाही. जेव्हा ते बंगल्याजवळ पोहोचले, त्यांनी बघितले की तिथे अक्षरशः लोकांची जत्रा भरली होती. बंगल्याच्या आजूबाजूला झाडांच्या सावलीत लोकांचे झुंडच्या झुंड बसले होते. धोतर घातलेले, पायजामा घातलेले, पँट शर्ट घातलेले, सगळ्या प्रकारची लोक होती. धोतर घातलेली खेड्यावरची मंडळी जास्त प्रमाणात दिसत होती. त्यातच काही काही खादीचा सदरा आणि पायजामा किंवा धोतर घातलेली लिडर मंडळी किंवा स्वत:ला लिडर समजत असलेली मंडळी मिरवत होती. गांधी टोपी आणि त्यातल्या त्यात ती जर तिरपी घातलेली असेल तर तो माणूस लिडर असला पाहिजे अशी गणेशरावांच्या मनात कुठेतरी खुणगाठ बांधलेली होती. अशा लोकांची नेहमीच गणेशरावांच्या मनात भीती राहीलेली होती. त्यामुळे गणेशराव होता होईस्तोवर अश्या लोकांच्या सानिध्यात येण्याचे टाळत असत. पण आज... पण आज वेळच तशी आली होती, त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता.
लोक बाहेर आपला नंबर कधी येतो याची वाट पाहत बंगल्याबाहेर ताटकळत थांबले होते.
पण आपल्याला असं थांबण्याची गरज पडणार नाही...
आपली तर श्रेंष्ठींशी फार जवळची ओळख आहे...
विचार करीत गणेशरावांनी त्या आजुबाजूला ताटकळत उभ्या असलेल्या लोकांवरून एक नजर फिरविली. त्या नजरेत प्रयत्न करूनही थोडा का होईना एक तुच्छतेचा भाव चमकून गेला.
' विनू चल आपण सरळ आत जाऊ ' गणेशरावांनी विन्याला आपली तितकी ओळख असल्याच्या अभिमानाने म्हटले.
दोघंही बंगल्याच्या आत गेले. बंगल्याच्या अग्रभागी लोकांना थांबण्यासाठी एक मोठा हॉल होता. त्यात लोकांना बसण्याची व्यवस्था होती. गणेशराव विनयला घेऊन त्या हॉलमध्ये शिरले. हॉल लोकांनी अगदी तुडूंब भरला होता. गणेशरावांनी एकदा त्या सर्व ताटकळत बसलेल्या लोकांवरून आपली नजर फिरविली. काही लोक राजकारण्यासारखे कडक इस्तरीचे कपडे घालून मोठया थाटात तिथे बसले होते. काही जण दिनवाण्या नजरेने दरवाज्याकडे डोळे लावून आपला नंबर कधी लागतो याची वाट पाहत बसले होते. इतके सगळे लोक आणि त्यातले काही आपल्यापेक्षा हौदयाने आणि प्रतिष्ठेने नक्कीच मोठे असलेले लोक पाहून गणेशरावांचा आत्मविश्वास डगमगू लागला. पण नाही आपली इतकी ओळख असतांना आपण घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी आपल्या डोक्यात आलेला हीनतेचा भाव झटकला. त्यांनी इकडे तिकडे पाहून चार पाच दरवाजांपैकी श्रेष्ठींना भेटण्यासाठी जाण्याचा दरवाजा कोणता हे नक्की केलं आणि ते सरळ दरवाज्यातून आत जायला लागले.
एक बलदंड माणून त्यांना आडवा आला आणि त्याने इशारानेच 'काय काम आहे?' असे उद्दामपणे विचारले.
" भेटायचं आहे? "
" ही सगळी लोक सुध्दा भेटण्यासाठीच बसलेली आहेत "
तो माणूस तिरसटपणे म्हणाला.
" नाही माझी श्रेष्ठींशी फार जवळची ओळख आहे " गणेशराव अभिमानाने म्हणाले.
त्याने गणेशरावकडे वरून खालपर्यंत पाहिले आणि तो कुत्सितपणे हसत म्हणाला,
" अहो असं सगळेच जणं म्हणतात ... ते तिथे बाजूला त्या काऊंटरवर जा ... नाव गाव पत्ता आणि काय काम आहे असं व्यवस्थित चिठ्ठीवर लिहून ती चिठ्ठी तिथे जमा करा...अन् मग तुमचं जेव्हा नाव पुकारण्यात येईल तेव्हा आत जा "
"पण.."
" अहो जर तुमची खरंच जवळची ओळख असेल तर तुम्हाला लवकर बोलावण्यात येईल" तो येड्याची समजूत पेढ्याने काढावी तसं लाडावत म्हणाला.
तरीही गणेशराव तिथून हटण्यास तयार नव्हते असं पाहून तिथे असलेल्या दुसऱ्या एका माणसाने त्यांना व्यवस्थित सगळे समजावून सांगितले. आपला झालेला अपमान गणेशरावांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आपला अपमान गिळून विन्याची नजर चूकवत मुकाटयाने ते त्या काऊंटरपाशी गेले. तिथेही रांग लागलेली होती. मुकाटयाने जाऊन त्या रांगेत उभे राहाले. विन्याही मुद्दाम उद्दामपणे त्यांच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करीत आहे असे गणेशरावला जाणवले.
ही अशी का तुमची जवळची ओळख...
या अपमानापेक्षा ओळख नसलेली परवडली असती...
कमीत कमी अपमान तर झाला नसता...
असं कदाचित विन्याला म्हणायचे असेल असे गणेशरावांना तिरप्या नजरेने विन्याकडे पाहत असतांना जाणवले.
रांगेत आपला नंबर आल्यानंतर काऊंटरवर आपले नाव पत्ता आणि भेटण्याचा उद्देश लिहिलेली चिठ्ठी देऊन गणेशराव हॉलमध्ये बसण्यासाठी रिकामी खुर्ची शोधू लागले. प्रथम हॉलमध्ये एक नजर फिरविली नंतर हॉलमध्ये एक चक्कर मारली. हॉलमध्ये एकही रिकामी खुर्ची नव्हती. विन्या दरवाच्यातच आपल्या वडीलांकडे चिडलेल्या नजरेने पाहत उभा राहिला. शेवटी गणेशराव आपल्या मुलाकडे त्याची चिडलेली आणि रागावलेली दृष्टी टाळत जायला लागले.
" गणेशराव सायेब... " अचानक मागून आवाज आला.
गणेशरावांनी आश्चर्याने वळून पाहिले.
चला आपल्याला इथे कुणी ओळखतो तर...
त्यांना हायसं वाटलं होतं. त्यांनी मागे पहायच्या आधी अभिमानाने एक दृष्टी आपल्या मुलाकडे टाकली. त्याच्या चेहऱ्यावरच्या अविर्भावात काहीच फरक नव्हता. त्यांनी मागे वळून पाहिले तर एक खेडूत त्यांना आवाज देत खुर्चीवरून उठून उभा राहिला होता. ते त्या खेडूताला ओळखत नव्हते पण कदाचित तो त्यांना ओळखत असावा. आता नोकरीच्या निमित्ताने हजारो लोकांचा संबंध येतो. सगळयांची ओळख ठेवणं जरा कठीणच होतं आणि त्यातच त्यांच उतरतं वय. स्मरणशक्तीही पहिल्यासारखी तल्लख राहिली नव्हती आता.
त्यांनी त्याला स्माईल दिलं.
" या सायेब ... इथं बसा"
त्या खेडूताने त्यांना खुर्ची ऑफर करीत म्हटले.
ते खुशीत चालत त्या खेडूताजवळ गेले. त्यांना खरोखरच गहिवरून आलं होतं. त्या खेडूताच्या पाठीवर एक प्रेमाची थाप मारीत म्हणाले,
" अरे ... राहूदे... तू बसकी ... आम्ही बाहेर जाऊन उभे राहतो... "
" नाय सायेब ... आसं कसं ... आमी बसायचं अन् तुमी उभं राहायचं ... बसा बसा" तो नम्रतेने म्हणाला.
त्यांना तिथे त्याला उठवून बसणं ही योग्य वाटत नव्हतं आणि त्याच्या आग्रहाचा मानही तोडवत नव्हता. शेवटी त्याच्या आग्रहाचा मान राखून ते तिथे खुर्चीवर बसले. खुर्चीवर बसून त्यांनी दरवाजाकडे बघितले. त्यांचा मुलगा तिथे दिसत नव्हता.
कदाचित बाहेर उभा राहिला असावा मोकळ्या हवेत...
" मी भायेर हाय सायेब.. " म्हणत तो खेडूतसुध्दा हॉलमधून बाहेर पडला.
तो इतका भराभरा तिथून निघून गेला की गणेशरावांना त्याने 'धन्यवाद' म्हणण्याचीसुध्दा संधी दिली नाही.
क्रमश:...
When a person can no longer laugh at himself, it is time for others to laugh at him.
-- homas Szasz
just awesome.......adbhut is realy adbhut.....and zero is completely zero.....just amazing..... waiting for your next thriller novel......
ReplyDelete