Marathi Books - Madhurani- CH-17 ऑफीस

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

marathi_jokes_vinod

Marathi Books - Madhurani- CH-17 ऑफीस

Advice is what we ask for when we already know the answer but wish we didn.

…Erica Jong

गणेश गावातल्या ऑफीसमध्ये बसला होता. ऑफीसमध्ये गावकऱ्यांची गर्दी झाली होती होती. ऑफीसमध्ये काम असणाऱ्यांपेक्षा रिकामटेकडेच जास्त जमा झाले होते. कुणी ओट्यावर बसून तंबाखूचा बार भरत होते तर कुणी चिलीम फुकत होते. ऑफीसमध्ये ग्रामपंचायतच्या खर्चाने एक मोठा रेडिओ घेतला होता. आणि तो रेडिओ सुरु करून लोक अधेमधे बातम्या किंवा गाणे ऐकत असत. बुधवारी संध्याकाळी आठचा टाईम हा गावातल्या नवीन जोमाच्या पोरांसाठी राखून ठेवलेला असे. राखून ठेवलेला असे म्हणजे त्यावेळी ते बिनाका गीतमाला ऐवजी कुणालाच दुसरं काहीही लावू देत नसत. तर रिकामटेकड्यांपैकी काही लोक ओट्यावर बसून रेडिओवर बातम्या ऐकत होते. गणेशचे ऑफीस म्हणजे तिथेच हॉलमध्ये एका कोपऱ्यात एकाला लागून एक असे तीन टेबल टाकले होते आणि त्या टेबलच्या मागे दोन खुर्च्या टाकलेल्या होत्या. त्यातल्या एकदम कोपऱ्यातल्या खुर्चीवर गणेश बसला होता. गणेशच्या टेबलसमोर दोनजण उभे होते. त्यातला एक ठार अडाणी वयस्कर खेडूत होता. त्याला गणेशने विचारले-

" बोला काय पाहिजे?"

" सायेब... ते 7-11 का काय म्हणत्यात ते..." तो खेडूत म्हणाला.

" 7-12" गणेशने त्याची चूक दूरुस्त केली.

" व्हय ... तेच ...तेच ... " तो खेडूत हसून उत्साहाने म्हणाला.

" जुना 7-12 किंवा त्याची कॉपी आहे का? "

त्या खेडूताने प्रश्नार्थक नजरेने प्रथम गणेशकडे आणि मग त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या 20-21 वर्ष वय असलेल्या पोराकडे पाहिले.

" तुमचं नाव सांगा " गणेशने त्याला विचारले.

" गणपत सदोबा खोत" त्या खेडूताने आपलं नाव सांगितलं.

गणेशने टेबलवर त्याच्या समोर ठेवलेल्या एका रजिस्टरवर ते लिहून घेतलं.

" सर्वे नंबर माहित आहे का?"

पुन्हा त्या खेडूताने प्रश्नार्थक नजरेने प्रथम गणेशकडे आणि मग त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या पोराकडे पाहिले.

" तुमच्या लोकांचं हेच फार तापदायक आहे ... जुना 7-12 नाही... सर्वे नंबर .. माहित नाही... तुमचं नाव तुम्हाला माहित आहे हे आमचं नशीब... फक्त नावावरून रेकॉर्ड शोधणं म्हणजे वेळ लागेल... पुढच्या सोमवारी या..." गणेश चिडून म्हणाला.

" बिगीनं होत आसल तर बगा सायेब" तो अती हीन दीन होऊन विनवणी करु लागला.

" बरं ... बरं ... गुरुवारी येऊन बघा... " गणेश त्याला कटवल्यासारखे करीत म्हणाला.

तो खेडूत हात जोडून निघून गेला.

" हं तुला काय पाहिजे? " तिथे दुसऱ्या उभ्या असलेल्या पोराला गणेश म्हणाला.

" आमची अन् चूलत्याची हिस्सेवारीची भानगड हाय ... तर ती कशी मीटवायची ते इचाराया आलो होतो "

" त्या पोराला गणेशने बऱ्याचदा मधुराणीच्या दूकानात येतांना पाहिले होते. गणेश ऑफीसचं काम करीत होता खरा पण त्याच्या डोक्यात कायम मधुराणीच्या विचाराचं चक्र चाललेलं होतं - एखादी मधमाशी कानाजवळ इकडून हाकललं तर तिकडून, तिकडून हाकललं तर इकडून कायम आवाज करावा तसं.

" बस " गणेशने समोरच्या एका खुर्चीवर इशारा करून त्याला बसायला सांगितले.

तेवढ्यात तो पूर्वी येऊन गेलेला खेडूत पून्हा परत आला.

" आता काय आहे ?" गणेश कससं तोंड करून म्हणाला.

" नाय ते आपल्या कामाला खर्च किती येईन?" तो खेडूत खालच्या आवाजात म्हणाला.

" का तुम्हाला माहित नाही का? "

त्या खेडूताने नकारार्थी मान हलविली.

" बाहेर ओट्यावर पांडू बसला आहे त्याला विचारा" गणेश त्या खेडूताकडे दुर्लक्ष केल्यागत त्याच्याकडे न पाहताच म्हणाला.

" जी " तो खेडूत म्हणाला.

साहेंबांनी खुर्चीवर बसायला सांगितलं खरं. पण आपण काही चूकीचं तर नाहीना ऐकलं? या अविर्भावात तो पोरगा कधी खुर्चीकडे तर कधी गणेशकडे पाहत खुर्चीजवळ घूटमळत होता.

" अरे बसकी..." गणेशने त्याला पुन्हा बसायला सांगितले.

तो लाजत लाजत खुर्चीवर बसला.

तो खेडूत आश्चर्याने कधी त्या खुर्चीवर बसलेल्या पोराकडे तर कधी गणेशकडे पाहत बाहेर पडला.

गणेशने डोळ्याच्या कोपऱ्यातून त्या खेडूताला बाहेर गेलेले पाहताच सरळ मुद्यालाच हात घातला.

" तुला मधुराणीच्या दूकानात बऱ्याच वेळा बघितलं आहे मी "

" हो ... सामानसूमान घ्यायला ... ते दूकान नजदीक पडते ना" तो लाजून म्हणाला.

" खूप पोरं जमा होतात तिथं संध्याकाळी ... काय भानगड काय आहे?" गणेश आजूबाजूला चाचपडल्यासारखे करत होता. पण त्याचा मूळ उद्देश मधुराणीबद्द्ल माहिती काढणे हा होता.

" काय नाय सायेब ... बिड्या फुकायला जमा होतात... रिकामटेकडे .. दुसरं काय करतात लेकाचे " तो म्हणाला.

" खोटं बोलू नको... " गणेश गालातल्या गालात हसत त्याला म्हणाला.

" त्याचं काय हाय सायेब... गुळ आसल तितं माशा गोळा व्हायच्याच" तो एक डोळा बारीक करीत म्हणाला.

" अच्छा म्हणजे तू सुध्दा..."

" नाय सायेब... मी आपलं बाकीचे पोरं जात्यात म्हूण जातो आपला"

" अस्सं" गणेश हसून त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला.

तो लाजून इकडे तिकडे बघू लागला. तेवढ्यात एक गावंढळ पोरगा आत आला.

गणेशने त्याच्याकडे नापसंतीनेच पाहिले. त्याला समोर खुर्चीवर बसलेल्या पोराला मधुराणीबद्दल अजून प्रश्न विचारायचे होते. आणि तिथे त्याला अजून दुसरे कुणी नको होते. पण तो पोरगा बेशरमासारखा तिथेच उभा राहिला.

" पण तिच्या घरात दुसरं कुणी नाही का? ... नेहमी मला तर तीच गल्ल्यावर बसलेली दिसते"

गणेशला वाटलं नाव न घेता मधुराणीबद्दल विचारलं तर त्याच्या काय लक्षात येणार आह?े.

" सासरा हाय ना ... पर त्यो दारु पिऊन लोळत असतो उकंड्यावर " तो पोरगा म्हणाला.

" मग नवरा? " गणेशने त्याच्या परीने अगदी महत्वाचा प्रश्न विचारला.

" नवरा मेला सायेब... बिचारीचा ... लगीन झाल्यावर एका वर्साच्या आतच मेला बिचारा"

" कोण म्हन्ते मेला ... मारलं तेला पाटलानं" दुसरा पोरगा जो येऊन गणेशच्या टेबलशेजारी उभा राहिला होता तो म्हणाला.

" ए ढेकळ्या... कोर्टामंदी साबीत केलं हाय पाटलानं..." खुर्चीवर बसलेला पोरगा आता आवेशाने उठून उभा राहत म्हणाला.

" कोर्टात लई वशीला हाय पाटलाचा ... तिथं तो पैसे देऊन मेलेल्यालं जीतं करील ... काम पडलंतं "

" ए फोकणीच्या तोंडात येईल ते बोलू नको"

दोघांची आता चांगलीच जूंपण्याच्या मार्गावर होती. गणेश मध्ये पडला.

" ए तू बाहेर जा बघू आधी .. याचं काम होवू दे ... मग तू आत ये... "

गणेशने जो पोरगा मागावून आत आला होता त्याला बाहेर हाकललं.

तो घाणेरड्या शिव्या देत मध्ये मध्ये वळून बघत बाहेर गेला.

मग गणेशने त्या पोराकडून मधुराणीची शक्य होईल तेवढी माहिती काढून घेतली.

बिचारी मधुराणी ...

नवरा लग्न होऊन एका वर्षाच्या आत वारला...

बिचारीचं नशिबच खोटं....

तिच्या जीवाची काय घालमेल होत असेल....

गणेशला तिच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागली होती.

क्रमश:...

Advice is what we ask for when we already know the answer but wish we didn.

..Erica Jong

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network