Marathi books - Madhurani - CH-19 अष्टावधानी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

universal-joke

Marathi books - Madhurani - CH-19 अष्टावधानी

Will you love me in December as you do in May,

Will you love me in the good old fashioned way?

When my hair has all turned gray,

Will you kiss me then and say,

That you love me in December as you do in May?

--- BaylorBound James Walker

बाहेर गणेशने बघितले की एक 21-22 वर्षाचा तरुण मुलगा आणि 18-19 बर्षाची तरुण मुलगी एकमेकांशी भांडत होते. ते ज्यातऱ्हेने भांडत होते त्यावरून असे दिसत होते की ते दोघंही मुके असावेत. त्यांचे भांडण बघून क्षणभर गणेशसुध्दा गालातल्या गालात हसला. त्याने मधुराणीच्या दूकानाकडे बघितले. ती अजूनही त्या मुक्यांच्या भांडणाकडे बघून हसत होती. ते पाहून आपसूकच गणेश तिच्या दूकानाकडे गेला. " गणेशराव ... बगा मुके कसे भांडताहेत... दोन मुके भांडतांना पाहिले का कधी तुमी?" गणेशला पाहताच ती म्हणाली.

" नाही बा ... पहिल्यांदाच पाहतो आहे " गणेशने हसतच तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

" तुमाला माहितेय ते काउन भांडत हायत ?"

गणेशने तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

" हे बगा हे मुकं चाललं होतं टमरेल घेऊन .. इकडं माणसाच्या गोदरीत... अन् मुकी चालली होती तिकडं बायांच्या गोदरीत... अंधारात दोघांची टक्कर झाली... अन्् दोघांचीही टमरेलं सांडली " मधुराणी गणेशची टाळी घेत पुन्हा जोराने हसायला लागली.

गणेशही जोरात हसायला लागला.

आज बरेच उशीरापर्यंत गणेश आणि मधुराणी गप्पा करीत बसले होते. तेवढ्यात एक माणूस घाई घाईने मधुराणीजवळ आला. त्याला श्वास लागला होता. तो बोलायला लागला.

" जरा दमानं ... आंधी जरा श्वास घ्या मंग बोला... मी इथंच हाय मी काय कुठं पळून चालली? " मधुराणी त्या माणसाला गमतीनं म्हणाली.

त्याने थांबून गणेशकडे पाहत आपला श्वास जरा व्यवस्थीत केला आणि खिशातली चाबी काढून मधुराणीकडे देत तो म्हणाला, " हे घ्या ... पंधरा पोते झाले ... तुमच्या गोदामात ठेवले"

तो चाबी मधुराणीच्या हातावर ठेवत होता. मधुराणी काही तरी कामाचं निमित्त करून तिकडे वळून काहीतरी शोधायला लागली. तीकडेच तोंड ठेवून ती म्हणाली, " ठेवा तिथं पेटीवर"

त्या माणसाने ओशाळल्या चेहऱ्याने ती चाबी मधुराणीच्या समोर ठेवलेल्या लाकडाच्या पेटीवर ठेवली. मधुराणीने तिच्या मागून शोधून वही आणि पेन काढला. मग समोर त्या माणसाकडे वळत म्हणाली,

" फक्त पंधरा पोते... मागच्या येळीपेक्षा कमी झाले की हो या येळी"

" काय गोष्टी करता? ... मागच्या येळी फक्त बारा पोतेच झाले होते की"

" मंग मागच्या येळी पेरलं बी कमीच होतं की"

" हो ते बराबर हाय पर ... उतार जवळपास बरोबरच आला असला पायजे"

मधुराणी वही अन्् पेन गणेशजवळ देत म्हणाली,

" गणेशराव काढा बरं उतार ... हं सांगा तुमी"

तो माणूस म्हणाला, " मागच्या बारी ... जवळपास अडीच एकराला बारा पोते झाले होते गहू ... अन् या बारी तीन एकराला पंधरा पोते ..."

गणेश वहीवर आकडेमोड करु लागला.

" नाही मधुराणी यावेळीच उतार चांगला आला ... यावेळी पाचचा अन्् मागच्या वेळी चार पॉइंट आठ चा"

" आवो मला माहित होतं... संभाजीरावर भरोसा हाय माझा... मी उगीच आपली त्यांची गंमत केली... काय हो की नाय संभाजीराव? " मधुराणी संभाजीरावकडे हसत पाहत म्हणाली.

संभाजीराव आपला लाजल्यासारखा हसला.

" बरं येतो मंग ..." तो म्हणाला.

मधुराणी त्याच्याकडे पाहत पुन्हा हसली जशी हसण्याच्या भाषेत म्हणत असावी " या आता"

तो निघून गेला.

तो नजरेआड होताच मधुराणी म्हणाली " मुडदा मेला... काम चांगलं करतो ... मेहनती हाय... पण उगीच लगट करतो... आता पाहिलं ना तुमी कसा चाबी माझ्या हातात देण्याचा प्रयत्न करत होता?... तेवढाच हाताला हात घासणार... घरी मायबहिणीला कर म्हणावं तसं"

हे बोललेलं गणेशलासुध्दा लागू होत होतं त्यामुळे तो गोरामोरा झाला.

चटकन मधुराणी गणेशच्या मांडीवर चापटी मारीत म्हणाली, " म्हंजी तशी लायकीबी लागते का नाय"

गणेशचा चेहरा पुन्हा खुलाला. त्याने विचार केला

चला म्हणजे आपल्याला नाही म्हटले मधुराणीने ...

आपण अपवादात मोडतो ...

पण हे असं एखाद्या विधवा स्रीच्या मजबुरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करने काही बरोबर नाही लोकांचं...

" गणेशराव तुमचा हिशेब लई भारी दिसतो... लई पटकन् हिशेब केला तुमी... मला माहिती नव्हतं तुमी गणीतात बी एवढं हूशार हाय म्हणून ... "

" मधुराणी तुम्ही आता फारचं स्तूती करता आहात .." गणेश लाजून म्हणाला.

तीथं दूकानात किंवा आजबाजूला अजून कुणीच नव्हतं. या एकांताचा फायदा घेऊन मधुराणी लाडीवाळपणे म्हणाली,

" गणेशराव तुमी मला ... आवो जावो नका करत जाऊ... "

गणेशने चमकून तिच्या डोळयात पाहिले. तिच्या डोळ्यात त्याला मादक भाव दिसायला लागले होते. गणेशचे कानशीलं गरम व्हायला लागले.

" अन्् फक्त मधू म्हणत जा ... किंवा राणी म्हणत जा... हं राणीच म्हणत जा"

गणेशचा घसा कोरडा पडायला लागला. त्याच्या हातापायात आता कंप सुटायला लागला होता.

त्याने लाजेने आपली दृष्टी मधुराणीच्या चेहऱ्यावरून हटवली. तरी त्याला जाणवत होते की अजूनही मधुराणीची दृष्टी त्याच्या चेहऱ्यावरच रोखलेली होती. ती जणू त्याला तिच्या डोळ्याने पिऊन घेत होती.

" तुमचा दूकानाचा हिशेब कोण ठेवतो" तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.

" मीच ठेवते ... का? ... तुमी काय मला अडाणी समजता की काय?" मधुराणी जोराने हसत म्हणाली.

" नाही तसं नाही ... " तो गोंधळून म्हणाला.

" तो शेजारचा विलास करतो मला मदत कधी कधी..."

" नाही ... मी म्हटलं मीही करीत जाईन की मदत तुम्हाला कधी कधी."

" तुमाला..." तिने हटकले

" नाही म्हणजे तुला" असं म्हणतांना गणेशचा चेहरा लाजून लाल लाल झाला होता.

" तशी मदतीची मला गरज नाय ... पण मदतीचा जर दुसरा काही उद्देश आसल तर चालल" पुन्हा मधुराणी त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाली.

त्याने पुन्हा लाजेने आपली नजर हटवली. तो आता तिच्या पुढे ठेवलेल्या लाकडाच्या पेटीकडे पाहू लागला. पेटीवर मधुराणीचा उगीच चाळे केल्यासारखा हात लाकडाच्या पेटीशी खेळू लागला होता. तिच्या हाताच्या हालचालीवरून तिच्या मनाची अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती.

गणेश आता आपली हिम्मत बांधण्याचा प्रयत्न करु लागला. त्याची तिच्या डोळ्याला डोळा देण्याची तर हिम्मत होत नव्हती.

पण नाही ती आपल्याला सिग्नल देत होती ...

तिच्या सिग्नलला प्रतिसाद देणे आवश्यक आहे ...

नाही तर ती आपल्याला काय समजेल... नंपूसक ...

नाही ... काही तरी प्रत्यूतर द्यायलाच पाहिजे....

त्याच्या डोक्यात विचारचक्र घूमू लागलं. तो त्याच्या प्रत्येक हालचालीच्या परिणामाचा विचार करायला लागला.

साली आपल्या गळ्यात पडली तर? ...

पंचाईत होऊन जाईल ...

नुसती मजा करण्यापर्यंत गोष्ट ठीक आहे...

जाऊ दे ते नंतरचं नंतर बघू ...

आधीे ... तिच्या सिग्नलचे उत्तर तर देऊ...

त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिची नजर अजूनही त्याला पिऊन घेत होती. त्याने पुन्हा लाजेने मान खाली घातली. त्याला आता स्वत:चा राग येऊ लागला.

'मुर्खा ती एवढी सिग्नलवर सिग्नल देत आहे ..

अन् तू असा ठोंब्यासारखा बसला आहेस नुसता ...

हातपाय गाळून...

नाही काहीतरी करायलाच पाहीजे...

लोखंड तापून लाल लाल झालं आहे...

हीच योग्य वेळ आहे घाव घालण्याची...

त्याने शेवटी ठरविले....

तिच्याकडे पाहणं तर शक्यच नाही ...

तिच्या डोळ्याकडे पाहिले की सुर्याकडे पाहावे तसे त्याला होत होते. ...

कमीत कमी ... खाली मान घालून का होईना ...

आपण तीचा हात तरी हातात घ्यायला पाहिजे...

तो हळू हळू हिम्मत करून आपला हात तिच्या पेटीवर ठेवलेल्या हाताकडे सरकवू लागला. त्याच्या हाताला कंप सुटला होता. पायाला सुध्दा कंप सुटला होता. तो आपल्या थरथरत्या हाताला कसा तरी आवर घालून तिच्या हाताजवळ सरकवू लागला. बाहेर एवढी थंड हवा वाहत असतांना त्याच्या सर्वांगाला घाम फूटला होता. शेवटी त्याने मनाचा हिय्या करून शेवटी आपल्या थरथरत्या हाताची झडप तिच्या हातावर घातली. पण हे काय तत्पूर्वीच तिने तिथून आपला हात उचलून घेतला होता. त्याला मेल्यावरून मेल्यासारखे झाले. त्याला आपला घोर अपमान झाल्यासारखे वाटले. पण तेवढयात तिचा आवाज आला

" बापू ... जरा जपून ... जरा कमी घ्या नायतर ... कालच्यासारखं त्या गटारात लोळाल"

गणेशने खाली घातलेली मान उचलून बघितलं. मधुराणीच्या समोर दाढीचे खुनटं वाढलेला एक वयस्कर खेडूत उभा होता. त्याने मधुराणीच्या समोर हात पसरला होता. आणि मधुराणीने एक एकचे दोन कल्दार त्याच्या हातावर ठेवले होते. त्या माणसाने आपल्या पसरलेल्या हाताची मूठ वळून ते पैसे आपल्या हातात घेतले आणि काहीही न बोलता तो तिथून निघून गेला.

अच्छा म्हणजे मधुराणीने तो माणूस आला म्हणून आपला हात बाजूला सारला होता ...

नाहीतर फार बिकट प्रसंग आला असता...

मधुराणीने अष्टावधानी राहून तो बिकट प्रसंग टाळला होता...

गणेशने विचार केला. त्याला तिचं खरोखर अप्रुप वाटत होतं.

खरंच आपल्या डोळ्यात पाहत असतांनासुध्दा तिचं सगळीकडं लक्ष होतं...

आणि आपण...

खरोखर अष्टावधानीच म्हटलं पाहिजे तिला...

आता त्याच्या चेहऱ्यावरचे अपमानाचे भाव विरले होते. त्याने मधुराणीकडे बघितले. ती त्याच्याकडे खट्याळपणे बघत उठली.

" कोण होता ?" तो आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपविण्यासाठी काहीतरी बोलायचे म्हणून बोलला.

" सासरा" ती म्हणाली.

" चला आता खूप येळ झाली ... दूकान बंद करायला पायजे... नायतर लोक..." वाक्य अर्धवट सोडत ती आवरा आवर करायला लागली.

" ठिक आहे मीही निघतो आता..." तो उभा राहत तिचा निरोप घेत म्हणाला.

ती पुन्हा त्याच्याकडे खट्याळपणे पाहत हसली आणि आपल्या आवरा आवरीच्या कामात पुन्हा मग्न झाली. जसे काही झालेच नाही. खरंच तिच्या एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात चपळपणे शिरण्याचे कसब वाखाणण्यासारखे होते.

तो तिच्या विजेसारख्या चपळ आणि चलाख हालचालीकडे बघत आपल्या खोलीकडे वळला. तो जड पावलांनी आपल्या खोलीकडे जात होता. दरवाजाजवळ उभं राहून त्याने एकदा वळून मधुराणीकडे पाहिलं. तिनेही त्याच्याकडे एक नेत्रकटाक्ष टाकला. अजूनही ते खट्याळ हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं होतं.

क्रमश:...

Will you love me in December as you do in May,

Will you love me in the good old fashioned way?

When my hair has all turned gray,

Will you kiss me then and say,

That you love me in December as you do in May?

--- BaylorBound James Walker

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network