Marathi Kadambari - Madhurani CH-22 गोची

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Kadambari - Madhurani CH-22 गोची


Confrontation simply means meeting the truth head-on.

--- anonymous


पोटपूजा झाल्यावर गणेशने बाजाराच्या मैदानाच्या एका कोपऱ्यात असलेल्या महादेवाच्या मंदीरात जाण्याचे ठरविले. ते महादेवाचे मंदीर जुने असले तरी बरेच मोठे होते. मंदीराच्या आजूबाजूलासुध्दा बराच मोकळा आणि फुलांचे, फळांची झाडं लावलेला परिसर होता. एक मोठं लिंबाचं झाडं सुध्दा होतं. उन्हाळ्यात सावलीसाठी त्या झाडाचा फार उपयोग व्हायचा.

आणि आज तर बाजार आणि त्यातल्या त्या उन्हाळ्याचे रणरणते ऊन, लोकांनी त्या झाडाखाली बरीच गर्दी केली होती. काही जणांनी थकून भागून तानुन सुध्दा दिली होती. मंदीराच्या अगदी प्रवेशद्वाराच्या समोर एक सार्वजनिक विहिर होती. गावातले बरेच लोक तिथे पाणी शेंदत असत. मंदीरात जाता जाता गणेशला कोपऱ्यावर एक पानपट्टीवाला दिसला. तो तिथे पानपट्टीवाल्याजवळ थांबला. त्याला एक बनारसी पान बनविण्याची ऑर्डर दिली. पानपट्टीवाल्यासमोर बरीच गर्दी होती. कुणी विड्या मागत होते तर कुणी सिगारेट. कुणाला तंबाखाचा छोटा पुडा - तोटा पाहिजे होता. पानपट्टीवाला ती गिऱ्हाइकं आटोपून गणेशचे बनारसी पान बनवण्यासाठी घेईपर्यंत गणेश तिथेच त्याच्या समोर उभा राहिला. तोपर्यंत काय करावं हा विचार करीत गणेशने सभोवार पाहिले. पानपट्टीवाल्याच्या बाजूलाच मंदिराच्या चिऱ्याच्या भिंतीला लागून पोरांचा काचेच्या गोळ्याचा डाव रंगला होता. गणेश तिकडे गेला. जाता जाता त्याने पानट्टीवाल्याला पान तयार झाल्यानंतर आवाज देण्यास खुणावले.

कंच्या खेळणारी चारपाच पोरं होती. त्यातलं एक पोर भिंतीपासून साधारणत: दहा अकरा फूटावर असलेल्या दगडाजवळ गेलं. त्याच्या हातात 15-20 तरी कंच्या असाव्यात. त्याने त्या दगडाजवळ उभं राहून त्या कंच्या भिंतीच्या दिशेने अलगद फेकल्या. भिंतीच्या जवळ एक जमीनीत पाडलेला एका कंचीच्याच आकाराचा गड्डा - भक्का होता. त्या गोळ्या जश्या त्या भक्याच्या दिशेने घरंगळू लागल्या डावातल्या बाकीच्या पोरांचा जीव खालीवर होत होता. कारण एखादी गोळी जरी त्या भक्यात गेली तर तो पोरगा सगळ्याच्या सगळ्या कंच्या जिंकणार होता. बऱ्याच कंच्या त्या भक्याच्या अगदी जवळून घरंगळल्या पण एकही त्या भक्यात गेली नाही. मग त्यातल्याच एका पोराने कोणत्या गोळीला मारायचे ते त्या गोळ्या फेकणाऱ्या पोराला सांगितले. त्या पोराने हातात एक गोळी धरुन एक डोळा किंचित मीटून त्या गोळीचा नेम धरला आणि त्या गोळीला त्याच्या हातातली गोळी फेकून मारली. एकदम सगळे जण "बल्लू .. बल्लू" म्हणून ओरडले. त्याने मारलेली गोळी दुसऱ्याच गोळीला लागली होती. गोळी मारणाऱ्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली.

त्याने निराश चेहऱ्याने आपल्या चड्डीच्या खिशात हात घालून कंच्या काढल्या त्यातल्या तीन कंच्या मोजून डावात टाकल्या आणि मग पुढचा पोरगा डाव खेळण्यास तयार झाला.

गणेशला हे सगळं पाहून मजा वाटत होती. त्याला त्याचे लहानपणीचे दिवस आठवत होते. लहानपणी तो त्याच्या चाळीतल्या पोरांशी अशाच कंच्या खेळत असे. अचानक मागून आलेल्या आवाजाने गणेश भानावर आला.

" पान झालं सायेब" पानवाला ओरडला होता.

त्याने त्याच्याजवळून पान घेतले. पैसे दिले आणि ते पान तोंडात कोंबून त्याने त्याला एक सिगारेट द्यायला सांगितले. सिगारेट पेटवून गणेश पान खात खात, हळू हळू, पोट भरल्याच्या समाधानाने चालत त्या मंदीरात शिरला. मंदीराला दोनच दारं होती. मुख्य दरवाज्यातून आत शिरल्यावर मोठा हॉल लागत होता. हॉलमधून गाभाऱ्याकडे गेल्यास, गाभाऱ्याच्या बाहेर एक दगडाचा मोठा नंदी ठेवलेला होता. गावातली लहान लहान इब्लीस पोरं त्या नंदीच्या अंगाखांद्यावरून चढून खेळत असत. मंदीराला दोनच दारे असल्यामुळे हॉलमध्ये बराच आडोसा होता. मंदीराच्या हॉलच्या कोपऱ्यात आडोशाला नेहमीच पत्यांचे एकदोन डाव रंगलेले असत. आणि बाजाराच्या दिवशी तर खेळता खेळता सोबत बंडूच्या हॉटेलमधल्या गरमगरम मीरचीच्या भज्यांचा मोठ्या चवीने आस्वाद घेतला जाई. तसे पत्याचे डाव रोजच रंगलेले असत. गणेशला पत्ते खेळण्यात कधीच रस नव्हता. पण करमत नसेल तेव्हा गणेश नेहमीच आपल्या ऑफीसमधून उठून इथे मंदीरात येत असे. तिथे उभं राहून तो पत्यांचा डाव पाहण्यात गणेशला मजा वाटत असे. कधी कधी तर गणेशला नवल वाटायचं की ही खेडूत पोरं हा एवढा किचकट रमीचा डाव इतक्या सहजासहजी खेळू तरी कसा शकतात. म्हणजे या खेड्यातल्या पोरांनासुध्दा चारचौघांसारखं डोकं असतं पण कदाचित त्याचा वापर बहुधा बऱ्याच वेळा चूकीच्या किंवा निरर्थक मार्गाने होत असावा.

गणेश मंदीरात पत्त्यांचा डाव बघण्यात मग्न होता. तेवढ्यात कुणीतरी धावत आलं.

" ए चलारे ... तिकडं बजारात गोची झाली हाय.."

पत्त्यांचा डाव अर्ध्यातच बंद पडला. सगळ्यांनी डावात टाकलेले आपापले पैसे वाटून परत घेतले. एकाजणाने पत्त्याचं बंडल खिशात कोंबलं.

" काय झालं?" कुणीतरी काळजीच्या सुरात म्हणालं.

" अबे बिगीनं चाल .. तिथं जाऊनशन्यान बग की ... इथं काय बोंबलतो .. अन् इथं येळ कोणालं हाय " तो म्हणाला आणि जसा वाऱ्यासारखा आला तसा वाऱ्यासारखा मंदीराच्या दारातून बाहेर पडला. सगळे जण त्याच्यामागे धावत सुटले. गणेशचीही उत्सुकता चाळवली गेली.

काय झालं असेल?...

तो ही त्यांच्यामागे धावत नाही ... पण जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जाऊ लागला.

बाजारात एका जागी खूप गर्दी जमली होती. मंदीरातले पत्याचा डाव खेळणारे सगळे जण तिथे येऊन पोहोचले. गणेशही गर्दीत घुसून, होईल तेवढे आपले पाय उंचावून काय झालं ते बघू लागला. गर्दीच्या मध्यभागी जे चाललं होतं ते बघून गणेशला आपला धीर खचल्यासारखं झालं. त्याचे हातपाय गळून गेले. चेहरा एकदम पांढरा पडला. तिथे मधुराणी एका खेडूत इसमाला आपल्या अस्सल कोल्हापुरी चपलेने बदडत होती. तो माणूस आपल्या दोन्ही हाताने तिचा मार वाचविण्याचा प्रयत्न करीत होता आणि त्याला जी लाज वाटत होती तीही लपविण्याचा प्रयत्न करीत होता. जो मार खात होता तो कदाचित या पत्ते खेळणाऱ्या मंडळीपैकीच कुणाचा तरी मित्र असावा. कारण त्यातला एकजण मधे पडला.

'' काय झालं?" तो म्हणाला.

मधुराणी चांगल्याच आवेशात आणि रागात होती. त्या आवेशाच्या भरात तिने जो मधे पडला त्यालाही दोन तीन चपला लगावून दिल्या.

" नवराबायकोच्या झगड्यात अन् रस्त्यावरच्या झगड्यात पडू नाय ... मनतात ते काय खोटं नाय" एक वयस्कर बघ्या बाजूच्याला म्हणाला.

" मधूबाई..." तो बोलण्याचा प्रयत्न करु लागला.

" मधूबाई ... काय झालं ते तर सांगसाल?" मधे पडलेल्याने खाल्लेला मार पचवून काकुळतेने विचारले.

" मेला, मुडदा ... काय समजतो?... गर्दीतून जाताजाता चिमटा घेतला मेल्यानं ... घरी जाऊन त्याच्या मायबहिणीला चिमटा घे म्हणाव चांडाळाला.."

मधे पडणारा काय बोलावं हे न समजून म्हणाला

" कुठं घेतला चिमटा मधूबाई"

" मेल्या .. आता काय तुला उघडून दाखवू ... अन् हे मधूबाई मधूबाई काय चालवल... मी काय तुले तमाशात नाचनारी नाचीन वाटली का काय?"

" तसं नाय मधुबा ... मधू... ताई" तो म्हणालां.

'ताई' त्याच्या तोंडातून बळेच निघाल्यासारखं निघालं होतं.

गणेशने असा मधुराणीचा देवी चंडीचा अवतार पूर्वी कधीच बघितला नव्हता. त्याने मनातल्या मनात जे मधुराणीबद्द्ल मांडे ठरवीले होते ते तिथेच विरुन गेले. तो अगदी अवसान गळाल्या सारखा दिसत होता.


क्रमश:...


Confrontation simply means meeting the truth head-on.

--- anonymous


Marathi stories, marathi katha, marathi songs download, marathi free material to download, marathi kavita, marathi gosti, marathi vachanalaya, marathi hints, marathi quotes

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network