Marathi Online Novel - Madhurani CH-23 गेसींग

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Online Novel - Madhurani CH-23 गेसींग

चार पाच दिवसांपासून गणेश मधुराणीच्या दुकानाकडे फिरकलासुध्दा नाही. तशी त्याची हिंम्मतच झाली नाही. एक दोनदा खिडकीतून त्याची मधुराणीशी नजरानजर झाली होती तेवढीच. तेव्हा ती त्याला मोठमोठे डोळे करून त्याच्याकडेच पाहत असलेली आढळली. कधी त्याला त्या डोळ्यांत 'तो असा वागतो आहे' याचा राग दिसायचा. कधी विरहाचे दु:ख दिसायचे तर कधी ' माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर' असा आर्जव दिसायचा. त्याला कधी कधी नवल वाटायचे की मधुराणी डोळ्यांच्या भाषेने एवढं कसं बोलू शकते. की हे सगळे त्याने स्वत:च स्वत:च्या सोईने लावलेले अर्थ होते?

बाहेर काहीतरी गोंधळ ऐकू येत होता म्हणून गणेशने खिडकीच्या बाहेर डोकावून बघितले.

" ए पांड्या ... बिगीनं ये... तिकडं एक गेसींग गवसलं हाय मने" खिडकीच्या बाहेर एका पोराने आरोळी ठोकली आणि तो ओढ्याच्या दिशेने धावायला लागला.

त्याच्या मागे अजून दोनचार पोरं धावली. आणि ओट्यावर बसलेली वयस्कर मंड्ळी कावरी बावरी होऊन असमंजसपणे इकडे तिकडे बघू लागली. गणेशचं लक्ष मधुराणीकडे गेलं. ती आपल्या गल्ल्यावर बसून एका पोरासोबत चर्चा करत होती. तो पोरगा ओढ्याच्या दिशेने हात दाखवीत घाईघाईने हातवारे करीत तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता. एव्हाना त्या पोरानेही ओढ्याच्या दिशेने धूम ठोकली. एवढ्यात गणेशची आणि मधुराणीची नजरानजर झाली. तिने त्याला एक गोड स्माईल दिले. गणेशच्याही चेहऱ्यावर स्माईल येऊ लागले होते पण एकदम त्याला मधुराणीचा बाजारातला चंडीचा अवतार आठवला. तो पटकन खिडकीतून बाजूला झाला.

संध्याकाळच्या क्षितीजावर लाल छटा पसरलेल्या दिसत होत्या. ओढ्याच्या अलिकडे गावाच्या शेजारी एक ऊसाचे शेत होते. तिथे एका जागी गणेशला लोकांनी गर्दी केलेली दिसली. गणेश घाईघाईने त्या गर्दीकडे निघाला. अजूनही बरेच ग्रामस्थ त्या गर्दीकडे धावत जात होते. गणेशही आता झपाट्याने चालू लागला. एव्हाना अंधारायला लागलं होतं त्यामुळे काही जण कंदील घेऊन येत होते. गणेश जेव्हा गर्दीजवळ पोहोचला तेव्हा सर्वजण एकदम शांत झाले. काही जण गणेशकडे रोखून पाहू लागले. तर काही जण गर्दीच्या मध्ये पाहू लागले. गर्दीच्या मध्ये तो मुका आणि मुकी मान खाली घालून उभे होते. तेवढ्यात गणेशने पाहिले की एकजण घाईघाईने गर्दीत घुसला आणि त्या मुकीला बदडायला लागला.

" रांड ... आमच्याच पोटी याची व्हती ... "

तो त्या मुकीला बेदम मारायला लागला. मुकी जोरजोराने ओरडत होती. ती ओरडत होती की रडत होती काही कळायला मार्ग नव्हता आणि कुणाला त्याची काही फिकीरही दिसत नव्हती. त्यातच तो मुका रागाने ओरडून त्या माणसाच्या अंगावर धावून जायला लागला. त्याला गर्दीतल्या दोनचार आडदांड पोरांनी पकडून ठेवले.

" ... गावात तोंड दावायला जागा नाय ठूयली तुह्या ... आता तुले मी मरस्तोर मारणार हाय... मारता मारता मेली तर लय चांगलं हूईल... तुह्या केलेलं काळं तोंड घेऊन गावात फिरण्यापर जेलात जाणं कव्हाबी चांगलं. "

गणेशच्या आता प्रकरण बऱ्यापैकी लक्षात यायला लागलं होतं. मुक्यानं अन् मुकीनं इथं ऊसाच्या शेतात काहीतरी प्रेमप्रताप केला असणार. अन् तो मारणारा तिचा बाप असावा.

मुकीच्या बापाचा इकडे तोंडाचा पट्टा अन् तिकडं तिला लाथा बुक्याचा मार चालूच होता. आता मुकी जमिनीवर खाली आडवी पडली होती अन् तीचा बाप तिला लाथाबुक्याचा मार देत होता. प्रथम गणेशच्या मनाला जो तिचा बाप करत होता ते बरोबर वाटत होतं. किंबहुना प्रत्येक लाथाबुक्कीबरोबर एक अघोरी आनंद त्याच्या मनाला होत होता.

खरोखरच तिच्या बापाला तिनं समाजात तोंड दाखवायलासुध्दा जागा ठेवली नव्हती...

मी जर तिच्या बापाच्या जागी असतो तर तिचा जीवच घेतला असता...

मुकीच मुकी लेकाची पण भलती गुणी दिसते...

दुसरं कुणी सापडलं नाही तर तिनं बरोबर एक मुकाच शोधला....

आता तिच्या बापाला तिच्या लग्नाचं किती कठीण जाणार....

हो एखादा म्हातारा, दारुडा करेल की तिच्याशी लग्न आणि वर भरपूर हूंडा घेणार...

काही क्षण गणेशला आपण त्या मुकीचा बापच असल्याची जाणीव होत होती.

पण लवकरच त्याच्या मनाला जे होत होतं ते खटकायला लागलं. जे होत आहे ते काही बरोबर होत नाही आहे असं वाटायला लागलं. गणेश आता एका माणूसकीच्या नात्याने विचार करायला लागला.

पडली असेल बिचारी त्या मुक्याच्या प्रेमात...

त्याचेही कदाचित तिच्यावर प्रेम असेल...

चांगल्या लोकांनीच का प्रेम करावे? ...

मुक्यांनी करु नये असे कुठे काही लिहून ठेवलेले आहे का?...

तेही चारचौघांसारखेच..

त्यांनाही चारचौघांसारख्याच भावना...

त्यांच्याही आपल्या चारचौघांसारख्याच गरजा...

फक्त ते मुके...

आणि ते मुके होते ते काही त्यांची निवड नव्हती...

बिचाऱ्यांच्या नशिबाचा भाग होता...

अचानक गणेशला स्फूरण चढल्यासारखे व्हायला लागले. त्याला त्या मुकीचा बाप जो झोडत होता आणि ती मुक्याची तडफड पाहवल्या जात नव्हती. त्या मुकीच्या किंकाळ्या आणि त्या मुक्याची ती कर्कश्य रागयुक्त ओरड त्याला असह्य होवू लागली.

" थांबा ... हे काय करता आहात तुम्ही? ... बिचारीला काय आता जीवे मारणार?..."

एक आवाज आसमंतात घुमला. मुकीचा बापसुध्दा दचकला. सगळे जण काही क्षण स्तब्ध झाले. गणेशला स्वत:च स्वत:चा विश्वास होत नव्हता की तो आवाज त्याच्याच तोंडातून निघाला होता. मुकीचा बाप गणेशला न जुमानता तिला पुन्हा बदडायला लागला.

" अहो ... असं काय करता ... मरुन जाईल बिचारी"

" बिचारी?" तिच्या बापाने थांबून गणेशकडे पाहत तोंड वेंगाडून म्हटले.

तिचा बाप पुन्हा तिला बदडायला लागला.

आता गणेश मध्ये पडण्यासाठी पुढे सरसावला.

" गणेशराव... तुमी या भानगडीत पडणार नाय ... नायतर तोट्यात राहान... "

" तुमी गुमान इथं चाकरी करा ... अन् या गावाच्या भानगडीत पडू नगा"

" हे काय तुमचं तालूक्याचं ठिकाण नाय... तिथं चालत आसतील असे थेरं.... इथं चालायचे नाय..."

" अशी घटना आमच्या गावात कदी घडत नाय... ही पयलीच येळ आसल..."

" आमी लहान होत्यो तवा गावच्या पाटलाच्या पोरीला चंभाराच्या पोरासंग पकडलं होतं... पाटलानं तीचे तुकडे तुकडे करून कुत्र्यास्नी खाया घातले... " एक म्हातारा म्हणाला.

" इंग्रज पोलीस आले होत्ये तवा गावात.... चौकशी कराया..."

गणेशने त्या म्हाताऱ्याकडे पाहिले. जणू तो त्याच्या मुक नजरेने त्या म्हाताऱ्याला विचारत होता ' मग? .. मग पुढे काय झालं? '

" पोलीस इचारुन इचारुन थकले ...पर ते त्या पाटलाला पोरगी होती हेच साबूत करु नाय शकले.... खुनाची गोस तर लई दूर राह्यली"

गणेश आश्चर्याने त्या म्हाताऱ्याकडे बघायला लागला.

खरंच असं झालं असेल का?....

" पण आजोबा ती खूप जुनी गोष्ट होती .... आता जग खूप पुढे गेलं आहे..." गणेश त्या म्हाताऱ्याला समजावण्याच्या सुरात म्हणाला.

" अवो जग पुढं गेलं म्हूण काय एकमेकांच्या ऊरावर बसायचं..." एक तिरक्या टोपीवाला माणूस म्हणाला.

त्या गंभीर परिस्थितीतही थोडी खसखस पिकल्यासारखी झाली. कुत्सित हसणारी मुख्यत्वे जवान पोरं होती.

मुकीचा बाप अजूनच चिडला. त्याने रागाच्या भरात जवळच पडलेला एक मोठा दगड दोन्ही हाताने जोर लावून वर उचलला. दगड बराच मोठा आणि जड असल्यामुळे त्याला दगड उचलतांना बरेच कष्ट पडत होते. आता मुकीच्या बापाने तो दगड त्याच्या डोक्याच्या वरपर्यंत उचलला आणि निर्दयतेने तो मुकीच्या डोक्यावर आदळणार तेवढ्यात ...

क्रमश...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. Hi,

    Please update next chap ASAP.

    waitting for .........

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network