Marathi Book vishwa - Madhurani CH-36 दाराची कडी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

sponsered link - मराठी कथा

Marathi Book vishwa - Madhurani CH-36 दाराची कडी

त्याने हळूच मधुराणीच्या उघड्या घराच्या दाराची कडी वाजवली.

आतून काहीच कसा आवाज नाही...

मधुराणी आहे नं घरात?...

गणेशने पुन्हा दाराची कडी वाजवली.

" कोण हाय?" आतून मंजुळ आवाज आला.

गणेशच्या कंठातून आवाज फुटेनासा झाला.

इथे आवाजच निघत नाही तोंडातून...

इथेच अशी फसगत झाली तर पुढे कसं होईल?...

चला असंच पटकण परत वळू या...

पण नाही असं ऐन वेळी पळ काढणं योग्य नाही...

पळ काढणे हे काही हिमतीचं लक्षण नव्हे...

आणि मर्दानगीचं तर नाहीच नाही...

आता आपल्याला हिम्मत दाखवायलाच पाहिजे...

आपल्याला पुरुषार्थ दाखवायला पाहिजे...

स्त्री कितीही हिम्मतवान असली तरी पुढाकार हा पुरुषानेच घ्यावा लागतो...

" कोण हाय?" आतून पुन्हा आवाज आला. यावेळचा आवाज थोडा वैतागलेला वाटत होता.

" मी ...गणेश" गणेश कसाबसा बोलला.

चला आपल्या कंठातून आवाज तर फुटला...

त्याला त्याचाच आनंद झाला. आणि अजून धीर आला.

असंच आपल्याला धीरानं घ्यावं लागेल...

" गणेश ... मंग या की आत... मी इकडं कपडे बदलत आहे" आतून आवाज आला.

मधुराणीचे कपडे बदलण्याच्या आधीचे एक चित्र गणेशच्या डोळ्यासमोरुन तरळून गेलं.

तिच्या शरीराची आजपर्यंत आपण नुसती कल्पना करत होतो. आज कदाचित ते प्रत्यक्ष पाहण्याचा योग दिसतो...

त्याच्या श्वासांची गती अजूनच वाढू लागली.

तिनं कपडे बदलत आहे हे सांगण्याची काही गरज नव्हती...

म्हणजे मुद्दामच तिने आपण कपडे बदलत आहोत हे सांगितले...

हा एक निमंत्रणाचाच भाग समजायला पाहिजे का...

अर्थातच... किंबहुना इतक्या दिवसापासनं ती सिग्नल वर सिग्नल देत होती...

अजून यापेक्षा किती स्पष्ट सिग्नल तिने द्यायला हवा...

गणेश हळू हळू घरात गेला. जातांना न विसरता त्याने समोरच्या दाराला लावून आतून कडी घातली. त्याला कडी घालतांना जाणवले की आपले हात थरथरताहेत. आणि पायसुध्दा गळून गेल्यासारखे होत आहेत. कडी लावून तो आत वळला. एक मोठा दीर्घ श्वास घेऊन त्याने पुन्हा आपली हिम्मत एकवटण्याचा प्रयत्न केला.

" तिथं वसरीत बसा ....बाजंवर" आतून पुन्हा आवाज आला.

ती फक्त ओसरीत बसा एवढंसुध्दा म्हणू शकली असती...

बाजंवर म्हणण्याचा तिचा काहीतरी गुपीत उद्देश असावा...

नक्कीच हाही एक निमंत्रणाचाच प्रकार...

आता असंच सरळ आत जावं ...

पुन्हा मधुराणीची विवस्त्र आकृती त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेली.

हं आताच गेलं पाहिजे...

हाच सगळ्यात चांगला चान्स आहे...

तो ओसरीतल्या बाजेपर्यंत चालत आला. आता तो तिथून सरळ आत जिथे मधुराणी कपडे बदलत असावी तिथे जाण्याचा मनाचा हिय्या करु लागला. पण हे काय. त्याचं मन जाण्यास तयार होतं पण पाय साथ देत नव्हते. ते एकदम गळून गेले होते. सर्व अंगाला दरदरुन घाम आला होता. अश्या अवस्थेत मधुराणी आपल्याला पाहिल तर ती काय विचार करील. तो मटकन तिथे ओसरीत ठेवलेल्या बाजेवर जाऊन बसला. बसल्यावर त्याला जरा बरे वाटले. त्याने आपल्या सदऱ्याच्या खिशातून रुमाल काढला आणि तो आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसु लागला.

" मधुराणी मला पाणी हवं होतं... फार तहान लागली अन्... आज गड्यानं पाणीसुध्दा भरलं नाही" तो केव्हा बोलला त्याला कळलंच नाही.

एकदम गप राहणं ही योग्य नाही ...

बोलून थोडं वातावरण मोकळं ठेवणंही आवश्यक आहे...

त्याने त्याच्या मनाची समजूत काढली.

" पाणीच पायजे नं ... मंग एवढं स्पस्टीकरन कशापाई... तुमाला कधी ना हाय का माझ्या घरी येण्यासाठी" आतून मधुराणीने गणेशची फिरकी घेतली.

तुमाला कधी ना हाय का माझ्या घरी येण्यासाठी...

मधुराणीचे हे वाक्य त्याच्या डोक्यात राहून राहून फिरु लागले.

म्हणजे हेही निमंत्रण...

आणि तेही अगदी स्पष्ट...

आता काही तरी करायलाच पाहिजे...

" नाही तसं नाही ... " गणेश बाजेवरून ताडकन उभा राहत आपला काहीतरी बोलला.

तो हळू हळू मधुराणीचा आवाज जिकडून येत होता तिकडे जाऊ लागला.

एवढ्यात...

" देतेच हं एवढी वेणी घातली की देतेच ... " म्हणत मधुराणीच आतून बाहेर आली.

गणेश पटकण मागे सरकून बाजेवर जाऊन बसला.

पुन्हा वेळ चुकली ...

अश्या बाबतीत टायमींगला फार महत्व असतं...

असं कितीदा मी वेळ चूकविणार?...

असं जर नेहमी होत गेलं ...

तर एक दिवस ती आपल्याला अव्हेरनार...

अन् वर म्हणणार... वेंधळाच आहे...

काही कामाचा नाही हा माणूस...

गणेशने तिच्याकडे पाहले. मधुराणीने हिरवी साडी नेसली होती. हिरव्या साडीत ती अजूनच खुलून दिसत होती. त्याची नजर आपसूकच तिच्या डोळ्याला जाऊन भिडली. तिच्या डोळ्यात एक खोडकरपणा गणेशला दिसला. गणेशला अजूनच हूरुप आला. मनात आलेली वैफल्यावस्था पूर्णपणे नाहीशी झाली होती.

गणेश जिथे बसला होता तिथे बाजेच्या मागे एक देवळी होती. तिथे मधुराणी आपल्या दातात केसांची पीन आणि हातात विंचरलेले केस धरीत गेली. तिथून वाकून देवळीत बघण्यासाठी बरीच जागा होती. पण मधुराणी आपल्या मांडीचा स्पर्श गणेशच्या मांडीला होत वाकली आणि देवळीत काहीतरी शोधू लागली. गणेशला ते अजून एक खात्रीलायक निमंत्रणच होते. त्याच्या मनातल्या भावनांचे आता निश्चयात रुपांतर झाले. गणेशचे हात तिच्या कमरेला विळखा घालण्यास शिवशिवू लागले. गणेशने मनाचा हिय्या करून आपले हात पुढे सरसावले. तो तिच्या कमरेला विळखा घालणार एवढ्यात ती मागे सरकून पुन्हा आत जायला लागली. कदाचित ती जे शोधत होती ते तिला देवळीत सापडले असावे.

अजून एक चांगली संधी हूकल्याचा मन:स्ताप गणेशच्या चेहऱ्यावर दिसू लागला. गणेशने आत जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघितले. मोठ्या गळ्याच्या ब्लाऊजमधून तीची गोरी मान आणि खांदा जणू गणेशला खुणावत होता. आत जाण्याच्या आधी दरवाज्यात ती थांबली आणि तिने फिरुन एक भेदक नजर गणेशवर टाकली. ती आत गेली होती आणि गणेश घायाळ अवस्थेत बाजेवर बसलेला होता. तो खाडकन् उभा राहिला.

आता आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे...

याच्यापेक्षा चांगला मौका पुन्हा पुन्हा येणे नाही ...

तो मधुराणी ज्या खोलीत गेली होती तिकडे चालू लागला. त्याच्या श्वासांची गती वाढत होती. त्याने मनातली भीती सगळी झटकून टाकली. त्याच्या अंगात आता जोम संचारला होता. तो त्या खोलीच्या उघड्या दारात येऊन उभा राहाला. मधुराणी पाठमोरी उभी राहून आपली वेणी विंचरत होती. तो आत गेल्यामुळे खोलीतला उजेड अडला होता. म्हणजे तो आल्याची तिला नक्कीच चाहूल लागली असावी. पण ती आपली वेणी विंचरण्यात अजूनही मग्न होती. म्हणजे मुद्दाम ती तसे दाखवीत असावी. तो तिच्या जवळ जायला लागला. त्याच्या श्वासांची गती आणि उष्णता त्याला जाणवू लागली. त्याच्या कनपट्या गरम व्हायला लागल्या होत्या. त्याला आता सगळं असह्य झालं होतं.

एक ... दोन... तीन....त्याने आता श्वास रोखून वाघाने आपल्या सावजावर झेप मारावी तसे तीचा हात एकदम आपल्या हातात पकडला. जे आपण ठरविलं होतं ते करून दाखविल्याचा आनंद त्याला झाला होता.

आता त्याला मधुराणीच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा होती.

मधुराणी आपला हात सोडवत एकदम मागे सरसावली. हे म्हणजे त्याला अगदी अनपेक्षित होते. तिने आपल्या डोळ्याचा एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला. त्या डोळ्यातल्या भावना तो समजण्याचा प्रयत्न करु लागला. पण काही केल्या त्याला त्या भावना कळत नव्हत्या.

तिला आपल्या या कृत्याचा राग आला होता का?...

ती आपल्याला अजून प्रोत्साहीत करीत होती की अजून काही...

त्याला काही समजत नव्हते. त्याने मनाचा हिय्या करून पुन्हा तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला.

" आवो असं काय करता?" त्याच्या कानावर मधुराणीचे शब्द घणाणले.

मधुराणी पुन्हा त्याच्याकडे एक सरळ कटाक्ष टाकत फिरुन खोलीतून बाहेर पडू लागली.

पुन्हा त्याच्या श्वासांची गती वाढली... गरम श्वास जाणवायला लागले... कनपटी गरम झाली ... पण यावेळी त्याची फजीती झाल्याच्या शरमेच्या भावनेने.

म्हणजे हिने आपल्या प्रेमाचा अव्हेर केला आहे...

गणेशला ते खरेच वाटत नव्हते.

आपण हिच्या मनातल्या भावना ओळखण्यात एवढं कसं चुकलो...

त्याचं अवसान पूर्णपणे गळलं होतं... मटकन खालीच बसावं असं झालं होतं.

जाता जाता मधुराणी दारात वळून उभी राहाली. तिच्या नजरेत त्याला राग, प्रेम, द्वेश, पश्चाताप, तिरस्कार या सगळ्या भावनांचे दर्शन घडले.

आपण काहीही सहन करु पण तिचा राग आणि तिरस्कार सहन नाही करु शकणार...

आपण उगेचच या फंदात पडलो...

एका स्त्रीचं ह्रदय ब्रम्हदेवालाही कळू शकलेलं नाही म्हणतात ते काय खोटं नाही...

त्याला स्वत:चाच राग येत होता. त्याला मधुराणीचाही राग येत होता. त्याने स्वत:ला सावरले आणि झपाझप पावले टाकत तो बाहेर पडला. बाहेर मधुराणीकडे पाहण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. पण त्याचे तिरपे डोळे तिच्याकडेच होते. तसंच झपाझप चालत तो समोरच्या घराच्या बंद दरवाजाजवळ गेला. दाराची कडी उघडली. बाहेर जाण्याच्या आधी तिरप्या डोळ्याने मधुराणीकडे बघितले.

त्याला तिच्या डोळ्यात ' थांब .. असा ... मध्यावर टाकून मला एकटं सोडून जाऊ नकोस' अशा भावना दिसल्या.

पण नाही नको...

आतापर्यंत आपण हिला समजण्यात कदाचित चूकत गेलो...

ती चूक आता पुन्हा नको...

खाडकन त्याने दार बाजूला सारले आणि तो बाहेर पडला. त्याने मागे वळून पाहण्याचीसुद्धा तसदी घेतली नाही.

बाहेर येऊन उन्हातही त्याला आता बरे वाटत होते. त्याच्या घामेजलेल्या शरीराला शिवून एक वाऱ्याची झूळक गेली. त्याला छानपैकी थंडगार वाटत होते.

चला एक घाव दोन तुकडे झाले...

हे असं किती दिवस भिजत घोंगडं ठेवायचं होतं...

तो मधुराणीच्या घरातून बाहेर येऊन त्याच्या खोलीसमोर आला. बराच वेळ तिथे घूटमळला.

आता कुठं जावं?...

खोलीवर जावं?...

की लग्नाच्या तिथं?...

खोलीवर एकदमचं एकटं वाटलं असतं. तेवढा एकांतही त्याला नकोसा वाटत होता. म्हणजे तेवढ्या एकांताची त्याला भीती वाटत होती. लग्नाच्या तिथं जावं तर ... तिथे बिलकुलच एकांत नव्हता. तेवढा गलबलाही त्याला नको होता. मग तो त्याची खोली सोडून आणि लग्नाचं ठिकाण सोडून जिकडे त्याला त्याचे पाय नेतील तिकडे चालू लागला. तो लग्नाच्या ठिकाणाच्या अगदी विरुध्द दिशेने बाजाराकडे चालू लागला. चालताना त्याचं कुठेही लक्ष नव्हतं.

आज गुरुवार नसल्यामुळे बाजाराचं मैदान एकदम रिकामं होतं. बाजाराच्या मोकळ्या मैदानात तो एका जागी येऊन उभा राहिला. त्या मैदानात त्याने चहुकडे नजर फिरविली. एवढ्या मोठ्या मैदानात तो एकटाच उभा होता.

कसं एकदम भकास वाटतं...

मग बराच वेळ वेड्यासारखं गावात तो इकडे तिकडे फिरला. जवळजवळ सगळेच लोक लग्नाच्या घरी गेले असल्यामुळे गाव कसं रिकामं रिकामं वाटत होतं. जसं एखाद्या डाकुच्या टोळीने आत्ताच लूटून न्यावं तसं. फिरता फिरता एका जागी दूर कुठेतरी त्याला मानवी उपस्थितीची जाणीव झाली. कुणाचा तरी आवाज येत होता. तो तिकडे वळला. जेव्हा तो जवळ जाऊन पोहोचला तेव्हा त्याला कळले की आपण मुकीच्या घरासमोर येऊन थांबलो आहोत. मुकीच्या घराला बाहेरुन कुलूप होते.

मुकीच्या घरचे लोक नक्कीच लग्नाच्या घरी गेले नसावेत...

मग ते कुठे गेले असावेत....घराला कुलूप लावून...

शेतात वैगेरे गेले असावेत...

पण घराच्या आतून आवाज येत होता. ह्रदयाला भिडणारा... माणसाच्या सगळ्या जाणीवा एकदम शिथील करणारा... दगडालाही पाझर फोडणारा... मुकीचा चित्कार... ते तिच्या तुटलेल्या ह्रदयाचे चित्कार येत होते. कदाचित त्याचे ह्रदयही असेच चित्कार करित होते. पण ते त्याच्याशिवाय कदाचित कुणालाही ऐकू येत नव्हते.

क्रमश:

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. Where is next post? waiting desperately

    ReplyDelete
  2. kupach durdaivi mulgi muki..........Vinay

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network