Marathi story - Madhurani CH-42 मासे पकडण्याचा वाफा

Next Chapter Previous Chapter

This Novel in EnglishMarathi story - Madhurani CH-42 मासे पकडण्याचा वाफाचालता चालता गणेश ओढ्याच्या काठाकाठाने बराच दूर निघून आला होता. त्याने मागे वळून पाहिले. आता मागे मधुराणी किंवा दुसऱ्या बाया कुणीच दिसत नव्हते. मधे ओढ्याच्या वळणा वळणावर येणारे मोठमोठे वृक्ष येत होते. गणेशने एका जागी बाजूला टमरेलातले पाणी ओतून सांडले.
आपण ही किती मूर्ख हे ओझं घेऊन कुठे चाललो पुढे...
हे ओझं बऱ्याच आधी रिकामं करता आलं असतं....
ओढ्याच्या खळखळत्या मंजुळ आवाज करणाऱ्या पाण्याचा आनंद घेत मधून मधून आजूबाजूच्या हिरव्यागार शेतांवर नजर फिरवीत गणेश पुढे पुढे चालू लागला.
बस झालं आता...
जास्त दूर नको जायला ...
आता परतायला पाहिजे...
तसा बराच वेळ निघून गेला आहे...
त्यामुळे आपण संडाससाठी न येता मुद्दाम आलो अशी कुणाला शंका येणार नाही...
गणेश परत वळण्याच्या विचारात असतांना त्याला समोर दूरवर ओढ्याच्या वाहत्या उथळ पाण्यात दोनजण काहीतरी करतांना दिसले.
काय करीत असावेत?...
चला जाऊन बघूया तर खरं...
येरवी तरी ऑफिसमध्ये आता परत जाऊन काय करायचे हा प्रश्न आहेच...
तो परत न वळता सरळ त्या लोकांकडे चालायला लागला. थोडं जवळ जाताच त्याच्या लक्षात आले की ...
अरे त्यातलं एक तर आपल्यासोबत क्रिकेट खेळणाराच आहे...
महाद्या ...
अन् दुसरा कोण?...
ओळखीचा तर दिसतो...
बरोबर....पोरगा नेहमी मधुराणीच्या दुकानाकडे येरझारा घालतो..
पण नाव माहित नाही....
खाली बसून ओढ्याच्या रेतीत ती पोरं काहीतरी करत होती.
काय करीत असावेत? ...
या पोरांचा काही नेम नाही काय करतील ते...
एव्हाना गणेश त्यांच्याजवळ जाऊन पोहोचला. महाद्याला चाहूल लागताच तो उठून म्हणाला, "गणेशराव ... इकडं कोणीकडं..."
गणेशच्या हातातलं टमरेल पाहून तो पुढे म्हणाला,"परसाकडं ... अन् इतक्या लांब..."
" तुम्ही लोक काय करत आहात इथं?..." गणेशने ते खाली बसून रेतीत दगडात काय करत आहेत हे समजून घेण्याच्या प्रयत्न करीत म्हटले.
" मासोळ्या धरतो... दुसरं काय..." तो म्हणाला.
" मासोळ्या?... कश्या ?" गणेशने खाली रेतीत पाण्याला दुसरीकडे वळवले होते तिकडे पाहत म्हटले.
" हे बगा...हे इकडं आमी वाफा केला हाय... त्यात पाण्यासंग मासोळ्याबी वाहत येतात... मंग एकदा का बक्कम मासोळ्या आल्या की ह्यो वाफा तिकडून बंद करायचा... म्हंजी ह्या मासोळ्या या वाफ्यात आटकतील..."
गणेशने त्यांनी पाणी एकीकडे वळवून जो वाफा केला होता त्याच्याकडे लक्ष देऊन बघितले. खरंच त्यात काही मासे पाण्या बरोबर आलेले होते. पण ते परत जात नव्हते. कदाचित त्यांना पाणी इथे अडवलं आहे असं कळत नसावं.
" पण मग यांना तुम्ही पकडणार कसे ?.." गणेशने उत्सुकतेने विचारले.
" अवो एकदा का वाफा तिकडून बंद केला की ह्यो पाणी इकडं रेतीत पाझरुन जाईल... अन् मंग बिनपाण्याच्या मासोळ्या तडपून तडपून मरतील..."
" अरे वा .. .चांगली आयडीया आहे..." गणेशला त्या मासे पकडण्याच्या प्रकाराची मजा वाटत होती.
गणेश आता तिथे वाफ्याच्या जवळच एका खडकावर बसून त्या माश्यांची गंमत बघू लागला.
थोड्या वेळाने गणेशचं लक्ष थोडं समोर ओढ्याच्या काठावर दोन जण काहीतरी करीत होते तिकडे गेलं.
गणेशने महादाला विचारलं " ते लोक काय करीत आहेत?"
"त्योना ... ताग काढत हायत" महादा वाफ्याचं येणारं पाणी अडवत म्हणाला.
" ताग?" गणेश उत्सुकतेने उठून उभं राहत म्हणाला.
गणेश आता त्या लोकांकडे चालायला लागला. महादाही वाफ्याचं पाणी पूर्णपणे अडवून गणेश सोबत चालायला लागला. तो दुसरा पोरगा तिथेच वाफ्याजवळ थांबला.
" ताग असा काढतात?" गणेशला नवल वाटत होते.
" मंग तुमास्नी काय वाटलं..." महादा म्हणाला.
गणेशने त्या लोकांजवळ जाऊन बघितले. ते तेथील ओढ्याच्या संथ साचलेल्या पाण्यातून कोणत्या तरी झाडाच्या काड्या काढत होते.
" कशाच्या काड्या आहेत त्या?" गणेशने विचारले.
" कशाच्या म्हंजी... तागाच्या झाडाच्या"
आणि त्या काड्याची साल हाताने काढून ती पाण्याने साफ करून घेत होते. आणि साफ केल्यानंतर ती साल म्हणजेच ताग होता.
" पण त्याची साल तर फारच लवकर निघत आहे" गणेशने विचारले.
" मंग त्या काड्या आठ दिसापासून पाण्यात ठूयलेल्या हायत..."
" अच्छा म्हणजे त्या पाण्यात सडण्यासाठी ठेवलेल्या असतील.."
" नायतर मंग कसं काढतील ते ताग" महादा म्हणाला.
साल पाण्याने साफ केल्यानंतर रेशमासारखे तागाचे धागे त्यांच्या हातात दिसत होते आणि मग ते दोघेजण तो ताग बाजूलाच उन्हात रेतीत वाळू घालत होते. गणेशला ती सगळी क्रिया बघून खूप मजा वाटत होती. त्याला शिकतांना पुस्तकात एवढेच वाचलेले आठवत होते की पश्चिम बंगालमध्ये ताग जास्त होतो. पण त्याला माहित नव्हते किंवा आधी कधी त्याने विचारच केला नव्हता की ताग कसा तयार करीत असतील.
गणेश ती ताग काढण्याची प्रक्रीया आणि मासे पकडण्याची पध्दत पाहण्यात एवढा गुंगला होता की त्याला आपण इकडे कशाला आलो याचे भानच राहाले नाही. मग अचानक त्याला आठवले की आपण इकडे कशाला आलो होतो.
अरे आपल्याला आता परत निघायला पाहिजे...
इथे कसा वेळ गेला आपल्याला तर कळलेच नाही...
चला अजून मधुराणी परत गेली नसेल...
तो घाईघाईने परत निघाला.
मधुराणी जिथे धुणं धुत होती तो ओढ्याचा काठ दृष्टीकक्षेत येताच गणेश तिकडे मोठ्या आशेने पाहू लागला.
अरेरे...
आपल्याला वेळ झाला...
तिथे मधुराणी नव्हती. गणेशच्या चालण्याची गती आता कमी झाली.
चला जाऊद्या ...
इथे नाही तर थोड्या वेळाने दुकानावर तर भेटेल च...
पण अशा मदहोश करणाऱ्या अवस्थेत नाही...
एव्हाना मधुराणी जिथे धुणं धुत होती त्या दगडाजवळ गणेश येऊन पोहोचला.
हाच तो दगड जिथे मधुराणी धुणं धुत होती ...
त्या दगडाकडे आपसूकच त्याची प्रेमळ दृष्टी गेली. त्या दगडाच्या आजूबाजूला मधुराणीच्या पायचे ठसे उमटलेले होते. तो ते ठसे न्याहाळू लागला.
मधुराणीच्या पावलांचा आकारही किती सुंदर आहे...
सालं ज्यानं कोणी इला बनवलं मोठ्या फुरसतीने बनवलेलं दिसते...
अचानक गणेशच्या लक्षात आले की तिथेच तिच्या पायाच्या ठश्यांच्या बाजूला ओल्या रेतीत काहीतरी रेखाटलेले होते.
नक्की तिनेच रेखाटलेले असावे...
तो ते निरखून बघू लागला.
ते एका स्रीचं चित्र दिसत होतं. गालावर हात ठेवून कदाचित ती कुणाची तरी वाट पाहत रस्त्याकडे डोळे लावून बसलेली भासत होती.
अच्छा म्हणजे मधुराणीने बराच वेळ आपल्या येण्याची वाट पाहली होती तर...

क्रमश:...This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network