New Novel - Mrugjal - Ch 19

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

New Novel - Mrugjal - Ch 19

विजय, राजेश आणि प्रिया कसून आपापल्या अभ्यासाला लागले कारण परिक्षा अवघ्या आठ दिवसांवर आली होती. या आठ दिवसांत एक शेवटची रिवीजन आणि तीही व्यवस्थीतपणे करणं आवश्यक होतं. झाले... आठ दिवसही उलटले आणि परिक्षा सुरु झाली. रोज एक पेपर. आता एकका क्षणाला महत्व होतं त्यामुळे ते तिघेही आता आपापल्या घरीच अभ्यास करु लागले. रोज सकाळी 10 वाजता पेपर असे. आणि 1 वाजता तो पेपर संपला की परत घरी येवून जेवण करुन दुसऱ्या दिवसाच्या पेपरची तयारी. पेपर संपला की '' कसा गेला ? ... कसा गेला?'' एवढं विचारण्यापुरती त्या तिघांची भेट होत असे आणि घरी जाईपर्यंतची सायकलवरची सोबत एवढंच.


रोज एक याप्रमाणे जवळपास सगळे पेपर झाले होते. आज परिक्षेचा शेवटचा दिवस होता. तसे पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने सगळे महत्वाचे पेपर्स आधीच आटोपले होते. आज भाषेचा पेपर होता. परिक्षा संपण्याच्या दृष्टीने केवळ एक औपचारीकता शिल्लक राहालेली होती. पेपर आटोपला आणि सगळे विद्यार्थी परिक्षा हॉलच्या बाहेर पडले. सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता. इतक्या दिवसांपासून कोमेजलेले चेहरे जणू आज अचानक टवटवीत झाले होते. हॉलच्या बाहेर विद्यार्थ्यांची एकच गर्दी जमली. प्रत्येकाला बोलायचे होते. प्रत्येक जण बोलणारा आणि ऐकणारा कुणीच नाही असा नजारा होता - आणि तेही ऐकाच वेळी. सगळे जण आपापल्या सायकली तशाच हातात घेवून बोलत बोलत घरी निघाले. खरं तर दुपारची जेवणाची वेळ झालेली होती पण आज ना कुणाला भूकेचं भान होतं ना जेवायचं. कुणाचे कोणते पेपर्स कसे गेले ह्या चर्चा आटोपल्यानंतर विषय आता संपलेली परिक्षा कशी सेलीब्रेट करायची यावर आला. सगळ्या ग्रुप्सचा जास्त वादविवाद न करता दुपारचं जेवण आटोपल्यानंतर सिनेमाला जायचा प्रस्ताव एकमताने पास झाला. गप्पांच्या ओघात अडीच वाजून गेले होते त्यामुळे 3 च्या शोला जाणं शक्य नव्हतं. म्हणून 6 च्या शोला संदिप टॉकीजवर जमण्याचा प्रस्ताव पास झाला आणि सगळे जण आपापल्या घराकडे पांगले.


पाच वाजता पासूनच सिनेमा हॉलच्या प्रांगणामधे बारावीच्या मुलां-मुलींचे थवेच्या थवे जमायला सुरवात झाली. सिनेमाला अजुन बराच अवधी होता. पण तिकीटासाठी रांग आतापासूनच सुरु झालेली होती, कारण सिनेमा नविनच होता. सगळ्या ग्रुप्सनी आपापल्या ग्रुप्सचा म्होरक्या नेमला आणि पैसे जमा करुन त्याला तिकिटाच्या रांगेत उभं केलं की जेणेकरुन बाकीचे गप्पा मारण्यास मोकळे राहावेत.

गप्पाच्या ओघात एकजण आपल्या वर्गातल्या मुलीच्या ग्रुप्सकडे चोरुन पाहत म्हणाला, '' बापरे, आपल्या वर्गातल्या पोरी किती मोठ्या दिसताहेत नाही''

'' मोठ्या म्हणजे?'' दुसरा मुद्दाम त्याला घेरण्याचा प्रयत्न करीत त्याच्याकडे बघत अथपुर्णपणे गालातल्या गालात हसत म्हणाला.

'' अरे मोठ्या म्हणजे... कालपर्यंत या पोरी कशा एकदम छोट्या छोट्या पोलक्यात छोट्या छोट्या फ्रॉक्समधे कशा एकदम छोट्या छोट्या वाटत होत्या.... आणि आज तर बघ '' तो स्वत:ची बाजु सांभाळण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

'' अरे त्यांचे छोटे छोटे पोलके आणि फ़ॉक्स केव्हाचेच सुटले ... कुठे लक्ष असतं तुझं'' तिसरा.

'' अरे त्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला इतके दिवस पुस्तकांकडून कुठे फुरसत होती... '' चौथा.

'' अन आज एकदम फुरसत भेटली तर साला बावरल्यासारखा करतोय... बघ तर कसा खाऊ का गिळू केल्यासारखा बघतो त्यांच्याकडे'' तिसरा.

'' ए...'' तो गालातल्या गालात हसत गमतीने हात उगारत म्हणाला.


राजेश, विजय आणि प्रियांसोबत अजुन दोन तिन पोरं असा त्यांचा ग्रुप तयार होवून तेही एका कोपऱ्यात गप्पा करीत उभे होते. त्यांच्या ग्रुपकडे पाहत अजुन एका ग्रुपची चर्चा सुरु झाली.

'' ही पोरगी सारखी काय त्या विज्यासोबत लगट करत असते रे... चांगला तिकडे पोरींचा ग्रुप आहे त्यात का मिसळत नाही'' एकजण.

'' अरे ती मुंबईची पोरगी आहे'' दुसरा.

'' मुंबईची असली म्हणून काय झालं... सगळ्या मुंबईच्या पोरी काय असंच करतात.'' तिसरा.

'' विज्या पण चालूच निघाला... अभ्यास म्हणत म्हणत तिच्या घरात घुसला अन आता...'' एकजण एक डोळा बारीक करीत म्हणाला.

'' अन आता... म्हणजे '' त्यातल्या एकाने विचारले.

'' म्हणजे ... तुला माहित नाही?''

'' नाही बा''

'' आता नाही... सांगीन तुला एखाद्या वेळी... ''


तिकडे या ग्रुपच्या कमेंटपासून अनभिज्ञ विजयच्या ग्रुपमधे चर्चा चालली होती -

'' पोस्टरवरुन तर सिनेमा चांगला दिसतोय'' प्रिया तिथे इकडेतिकडे लावलेल्या पोस्टर्सकडे बघत म्हणाली.

'' पोस्टर्सवरुन काही एक सांगता येत नसतं... '' विजय.

'' सिनेमा कालच लागला म्हणे... नाहीतर आत्तापर्यंत कळलं असतं कसा आहे तो''

'' आमच्या शेजारचा राम्या सांगत होता... काही विशेष नाही आहे म्हणे... पण त्या सुभाष टॉकिजमधे लागलेल्यापेक्षा बरा आहे म्हणत होता '' त्यांच्याच ग्रुपमधील एकजण बोलला.

'' म्हणजे आपल्याजवळ काही पर्याय नव्हता '' राजेश

'' नव्हता का ... अजुनही एक पर्याय आहे आपल्याकडे '' विजय.

'' कोणता?'' प्रिया.

'' की आज सिनेमा न बघता ... जेव्हा चांगला लागेल तेव्हा बघायचा'' विजय.

'' आज परिक्षा संपली आणि आज सिनेमा नाही बघायचा ... असं कधी होईल का?'' राजेश.

'' तेच तर आपल्या लोकांच चुकतं'' विजय.

तेवढ्यात पहिली घंटा वाजली.
सिनेमा हॉलमधे जायच्या दरवाजासमोर पुन्हा एक लांबच्या लांब रांग लागली. तोपर्यंत सगळ्या ग्रुप्सचे तिकिट काढायला गेलेले म्होरके तिकिटं घेवून आले. त्यांनी ज्याचे त्याचे तिकिटं ज्यांच्या त्यांच्या जवळ दिले आणि तेही पुन्हा दुसऱ्या रांगेत लागले.


बरोबर साडेनऊ वाजता सिनेमा संपला आणि सगळे भांबावलेले चेहरे सिनेमा हॉलमधून बाहेर पडू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरुनच सिनेमा काही विशेष नसावा याचा अंदाज येत होता.

'' एवढा चांगला वेळ फुकट वाया गेला '' राजेश बाहेर पडल्या पडल्या वैतागुन म्हणाला.

'' वाया कसा गेला म्हणतोस... यातूनही आपण काहीतरी धडा घेतलाच की'' विजय.

'' वा वा ... धन्य आहे तुमची ... फिलॉसाफर साहेब.'' राजेश विजयला हात जोडून म्हणाला.

'' एक जोक आठवला...'' आणि मग मागुन येणाऱ्या प्रियाकडे तिरप्या डोळ्याने बघत म्हणाला, '' पण आता नाही नंतर सांगीन केव्हातरी''

'' आता का नाही?'' राजेश म्हणाला.

'' अरे तो जोक जरा असा आहे'' विजय एक डोळा बारीक करीत म्हणाला.


सिनेमावरुन घरी परततांना पुन्हा पोरांच्या गप्पांना उत आला होता. फरक एवढाच की आता गप्पांचा विषय वेग़ळा होता.

'' काय बंडल पिक्चर होता''

'' स्टोरी नावाचा तर प्रकारच नव्हता''

'' पण हिरोईलला मस्त दाखवलं साल्यानं''

'' हे बघा यांच्यासारख्या महाभागामुळे... असले पांचट आणि अंगप्रदर्शन असलेले पिक्चर चालतात बघ''

'' पांचट काय आहे त्याच्यात... आणि अंगप्रदर्शन म्हणजे एक आर्ट असतं... ''

'' आर्ट काय आहे त्याच्यात डोंबलं''

'' सांगतो नां... बघ ... पुर्ण झाकलेलं शरीर आणि पुर्ण नग्न शरीर... याचा बरोबर मध्य साधनं काही सोपं नसतं... कारण... शरीर जास्त झाकल्या जायला लागलं की ते निरस वाटायला लागतं... आणि शरीर एका सिमेपेक्षा जास्त दिसायला लागलं की ते ओंगळ वाटतं... आणि ते निरसही वाटायला नको आणि ओंगळही वाटायला नको... हे साधनं म्हणजे एक आर्टच झालं की''

'' वा वा काय विश्लेषन केलसं.. मानावं लागेल.. तु एक चांगला विश्लेषक होवू शकतोस बघ''

'' अरे त्याला विश्लेषन चांगलं जमतं... पण अशा पांचट गोष्टीचच''

सिनेमा हॉलपासून काही अंतर कापल्यानंतर तो मोठा ग्रुप पांगल्या जावून छोट्या छोट्या ग्रुप्समधे परिवर्तीत होवून आपापल्या घराकडे जायला लागलां.


काळाच्या ओघात केव्हा परिक्षा आली आणि केव्हा संपली काही कळलंच नाही. परिक्षा संपल्यानंतर सगळेजण आपापल्या नातेवाईकांकडे जावून जणू इकडे तिकडे विखुरले होते. परिक्षा संपलेला दिवस कसा आनंदाचा होता, म्हणजे खरोखर स्वातंत्र्य अनुभवन्याचा होता. त्या दिवशी सगळ्यांना जणू बंधमुक्त झाल्याप्रमाणे वाटत होतं. ना कशाचं टेन्शन ना चिंता. काहीही करा, अर्थात अभ्यास सोडून. त्या अभ्यासापासूनच तर स्वातंत्र्य मिळालं होतं आणि परिक्षा संपल्यावरही जर कुणी अभ्यास करीत असेल तर तो मुर्खच समजायचा. पण माणसाचं कसं विचित्र असतं. परिक्षा संपल्यानंतर सर्वजणांनी कुणी सिनेमा, हॉटेलींग, इकडे तिकडे फिरणे, गप्पा सगळे प्रकार करुन बघितले आणि एक दिवस ते प्रकार पैशाअभावी संपले तर काही त्यांचे मनोरंजन करण्यास तोकडे पडू लागले. कधी कधी तर असही वाटत होतं की तो अभ्यास होता तो आपला बरा होता. कमीत कमी तेव्हा काय करायचं हा भेडसावणारा प्रश्न तर नाही सतावायचा. आता अभ्यासात नेहमी गुंतण्याची सवय लागलेल्या मनाला मोकळं मोकळं आणि उदास वाटायला लागलं होतं. एकदा बंधनात राहण्याची सवय झाली की स्वातंत्र्य माणसाला काही क्षणापुरतं आवडेलही पण नंतर काहीतरी खटकल्यासारखी सारखी हुरहुर वाटत राहाते. मग हळू हळू सगळे जण, कुणी बहिणीकडे, तर कुणी मामाकडे, आजोबाकडे, एखाद्या लग्नाला, अक्षरश: गाव सोडून पळून जात होते. प्रियाही आपल्या आजोबाकडे गेली, राजेश आपल्या बहिणीकडे गेला. विजयला तसं जाण्यासारखं कुठेही नव्हतं, शिवाय पैशाच्या प्रश्न होताच. तो घरीच थांबला. लायब्ररीत जावून वेळ घालवू लागला. या दिवसांतच त्याचं वाचन वाढलं. त्याने मोठमोठ्या लोकांची आत्मचरित्र वाचली, साने गुरुजीच्या कादंबऱ्या, गोष्टी वाचल्या. शामची आई वाचतांना त्याच्या डोळ्यात कित्येकदा पाणी आलं. नंतर त्याने प्र.के अत्रे, पुलंच विनोदी साहित्यही वाचुन काढलं. पुस्तकाचा सहवास त्याला हळू हळू आवडायला लागला होता आणि विषेश म्हणजे त्याला गुंतवण्यात समर्थ ठरु लागला होता.


पण जसजसा रिझल्ट जवळ येवू लागला तसे जे बाहेर गावी गेले होते ते हळू हळू आपापल्या घरी परतू लागले. स्वत:ला गुंतविण्याचा प्रश्न आता कुणालाही भेडसाविनासा झाला. कारण रिझल्टचा वाट पाहण्यात आणि आपले काय होणार याबद्दल विचार करण्यातच वेळ जावू लागला. आणि शेवटी सगळ्यांच्या भविष्याची दिशा ठरविणारा तो दिवस एकदाचा उजाडला.


प्रिया विजय आणि राजेश आपापल्या मार्कशिट्सकडे पाहत कॉलेजेमधे पायऱ्यांवर बसले होते.

'' आता आपल्याला मेडीकलला एकाच कॉलेजला ऍडमिशन मिळायला हवी ... आणि ती मिळायला मलातरी काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे '' प्रिया उत्साहाने म्हणाली.

'' तुम्ही लेकहो मेडिकलला जा पण मी कुठे जावू?'' राजेश चिडून उभा राहात म्हणाला.

'' अरे मिळेल... तुलाही कुठंतरी चांगल्या जागी ऍडमिशन मिळेल'' विजय त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाला.

'' शेवटी तेचना... मास्तरकीच करणं आलं'' राजेश म्हणाला आणि रागाने पाय आपटत निघून जावू म्हणाला.

'' अरे थांब... कुठे जातोयस..'' प्रिया उठून त्याच्या मागे मागे जात म्हणाली.

विजयने तिला त्याला जावू देण्यास खुनावले. प्रिया थांबली. पण जसा राजेश तिथून निघून गेला तशी विजयला म्हणाली,

'' विजय .. आपला मित्र आहे तो... त्याला अश्यावेळी आपली आवश्यकता आहे'' प्रिया म्हणाली.

'' नाही ... सध्या त्याला आपली नाही ... एकटेपणाची आवश्यकता आहे... आणि काही प्रॉब्लेम्सना काही उपाय नसतो... त्यावेळी वेळ हेच सगळ्यात उपयोगी औषध ठरतं'' विजय म्हणाला.

क्रमश:...


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. PLz ... POST NEXT CHPT AS EARLY AS POSIBLE

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network