New Novel - Mrugajal - Ch-28

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


New Novel - Mrugajal - Ch-28

जेव्हा प्रियाची इच्छा होती तेव्हा तिला तिच्या शहरात, म्हणजे जिथे तिचे वडील आणि विजय राहत होते तिथे येवून काम करण्याची संधी मिळाली नव्हती. पण आता जेव्हा विजय तिचा राहालेला नव्हता, आणि तिथे परत येण्याची तिची तळमळ राहाली नव्हती, तेव्हा अनायसेच तिच्या वडीलांच्या प्रयत्नामुळे तिला पुन्हा आपल्या शहरात येवून काम करण्याची संधी मिळाली होती. ती जेवढं शक्य होईल तेवढं विजयपासून दूर राहू इच्छीत होती. पण वडीलांच्या आग्रहासमोर तिचे काही चालू शकले नाही. आणि हल्ली वयोमानाप्रमाणे तिच्या वडीलांची प्रकृतीही साथ देत नव्हती. अशा वेळी तिच तिच्या वडीलांची एकुलता एक आधार होती. वडीलांना तिने बदली बद्दलही बोलून बघितले होते. पण तिचे वडील आता त्याच शहरात रुळले होते आणि तिथेच स्थाई होवू इच्छीत होते. म्हणजे प्रियानेही तिथेच आपली प्रॅक्टीस करुन स्थाई व्हावे हे ओघानेच आले. आणि प्रियाही आपल्या वडीलांशी तिच्या मनस्थीतीबद्दल मनमोकळेपणाने चर्चा करु शकत नव्हती. शेवटी सगळ्या गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे होत नसतात हेच खरं. काही गोष्टी आपल्याला नियतीच्या इच्छेप्रमाणेच कराव्या लागतात. कधी कधी तर वाटतं की आपण या नियतीच्या हातचे एक खेळणे तर नाही!. कदाचित यालाच लोक नशिब म्हणत असतील. जेव्हा लोक नशिबाबद्दल बोलत किंवा एखादी गोष्ट त्यांच्या इच्छेप्रमाणे झाली नाही तर सरळ नशिबाला दोष देवून मोकळे होत. त्या लोकांचा पुर्वी प्रियाला खुप तिटकारा आणि राग येत असे. पण आता हळू हळू कदाचित तिला नशिबाची महती कळू लागली होती. आजकाल तर तिला कशाचाच राग येईनासा झाला होता. कुणी कसंही वागलं तरी त्याचा राग येण्यापेक्षा ती 'कदाचित ते आपल्या जागी बरोबर असतील' असा विचार करुन ती गोष्ट सोडून द्यायची. किंवा त्यात नियतीची इच्छा बघायची.

प्रथम जम बसेपर्यंत तिने आपली प्रॅक्टीस डॉ. नाडकर्णींच्या पॉलीक्लीनिकमधे सुरु केली होती. तिथे दूर राहून डोक्यात विजयचे विचार यायचे पण दूर असल्यामुळे ते तेवढे सतावायचे नाहीत. पण इथे विजयही इथेच असल्यामुळे तिला कठिण जात होते. मधे विजयला भेटण्याची तिची तिव्र इच्छा झाली होती पण तिने हृदयावर दगड ठेवून ते कसे तरी टाळले. या सगळ्यांवर तिला आता एकच उपाय दिसत होता. स्वत:ला कामात झोकून देवून पुर्णपणे गुंतवून घेणे. म्हणून तिने स्वत:ला कामात इतके गुंतवून घेतले होते की काळ जणू तिच्यासाठी पुर्णपणे थांबला होता. मागे किती दिवस गेले आणि पुढे कोणते आणि किती दिवस येणार आहेत याचा विचारच नव्हता. बस काम... काम आणि काम.

कितीतरी दिवस असेच निघून गेले. मध्यंतरी, बरेच दिवसांपासून तिची विजयशी भेट नव्हती की त्याची काही खबरबात नव्हती. म्हणजे तिने तसा प्रयत्नच केला नव्हता. तिच्या मनात विजयबद्दल राग किंवा तक्रार मुळीच नव्हती. पण ती कोणत्याही प्रकारे विजय आणि नयनाच्या मधे येवू इच्छीत नव्हती. न जाणो त्याला भेटायला जावे आणि त्याला पाहून आपल्या भावना आपल्या इच्छेविरुध्द व्यक्त व्हाव्यात. त्याला याचीच भीती वाटत होती. कारण जेव्हा त्याने बगिच्यात त्याचं मन तिच्यासमोर मोकळं केलं. तेव्हा तिलाही एक क्षण इच्छा झाली होती की भडाभड आपल्या मनातलंही त्याला सांगून मोकळं व्हावं. पण तिलाच माहीत होते की तिने तिच्या मनावर कसे नियंत्रण ठेवले होते. तसं पाहालं तर विजयने तिला एका मित्रापेक्षा जास्त कधीही मानलं नव्हतं. आणि त्या मैत्रीत त्याचा नक्कीच काही स्वार्थही नव्हता. त्यामुळे त्याला दोष देण्यात अर्थ नव्हता.
मग तिचे काय चुकले?...
तिच्या मनात एक दिवस विचारांचे काहूर उठलेच....
तिने त्याच्याबद्दलच्या प्रेमाची त्याला स्पष्ट आणि उघड कबूली आधीच द्यायला पाहिजे होती?
पण ती तर त्याला कल्पना येईल अशी नेहमीच तर वागत होती?
तिने अजुन किती स्पष्ट आणि उघड कबूली द्यायला हवी होती?
का ती प्रेमात कुठे कमी पडली होती?
पण त्यातही काही सत्य दिसत नव्हतं....
शेवटी नशिब. तिला सगळा दोष नशिबाला देवून मोकळे होण्यातच सोपा मार्ग वाटत होता. पण नशिबाला दोष देवून, म्हणायला ती मोकळी झाली होती. पण विजयविषयीच्या प्रेमाच्या सावल्या अजुनही तिला सोडायला तयार नव्हत्या. बरं तिने तिच्या परीने सर्व प्रयत्न करुन झाले होते. जुन्या मित्रांशी सबंध तोडला होता. कारण त्यांच्याशी भेट झाली की विजयचा विषय अनायसेच यायचा. तरीही काही उपयोग होत नव्हता. कदाचित मधे काही काळ गेल्यानंतर सगळं सुरळीत होईल. तिने विचार केला. पण जेवढा जास्त काळ जात होता तेवढ्या तिव्रतेने तिला त्या सावल्या जास्तच सतावीत होत्या.

बऱ्याच कालावधीनंतर एक दिवस अचानक प्रियाची राजेशशी भेट झाली. तोही मुद्दाम तिला भेटायला आला नव्हता. तो आपल्या बायकोला घेवून प्रियाच्या क्लिनिकवर चेकअप साठी आला होता.

'' अरे राजेश... कमल... या ... बरेच दिवसानंतर येणं केलत'' प्रिया त्यांच स्वागत करीत म्हणाली.

'' नाही म्हणजे.. याहीपेक्षा आधी तुझ्या क्लिनिकवर येणं शक्य नव्हतं'' राजेश म्हणाला.

'' म्हणजे?''

'' म्हणजे ... त्यासाठी आम्हाला लग्न अजून लवकर करावं लागलं असतं'' राजेश आपल्या बायकोच्या डोळ्यात खट्याळपणे पाहत म्हणाला.

त्याच्या बायकोने बिचारीने लाजून मान खाली घातली.

'' ओ हो... म्हणजे मामला गंभीर दिसतो... अभिनंदन'' प्रियाने दोघांसाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

एव्हाना राजेश आणि त्याची बायको प्रियाच्या टेबलसमोर ठेवलेल्या दोन खुर्च्यांवर विराजमान झाले होते.

'' बाकी कसं काय आहे?'' प्रिया.

'' आमचा तर आनंदी आनंद आहे... तू कशी आहेस?'' राजेशने प्रियाची चौकशी करीत विचारले.

'' बरी आहे... म्हणजे चांगली आहे... एकदम मस्त आहे... आपल्या कामात एवढी बिझी असते की ... काय सांगू'' प्रिया आनंदी असल्याचा आव आणित म्हणाली.

'' आणि काय गं ... लग्नानंतर कुणीच भेटलं नाही मला... लग्न माझं झालं... आणि गायब तुम्ही लोक झालात...'' राजेश तिला खोटं खोटं रागावत म्हणाला.

'' अरे तसं नाही... नविन दाम्पत्यांना डिस्टर्ब करायचं नसतं.. हे का कुणाला सांगावं लागतं?'' प्रिया आपला स्टेथेस्कोप घेवून खुर्चीवरुन उठून उभी राहत म्हणाली.

राजेशच्या बायकोला आत चेकींग पार्टीशनच्या मागे येण्याचा इशारा करीत पुढे म्हणाली, ''  कमल... ये इकडे... अशी''

राजेशची बायकोही खुर्चीवरुन उठून तिच्या मागे मागे जावू लागली. राजेशही एवढ्यात तिच्या बाबतीत फार केअरींग वाटत होता. बायको प्रग्नंट असल्याचा त्याला एवढा आनंद होता की तिला इथे ठेवू की तिथे ठेवू असं त्याला होत होतं. ती उठून आत चालली तसा अनायसेच तोही उठून तिच्या मागे मागे चालू लागला. त्याच्या बायकोने मागे वळून डोळे मोठे करुन त्याला इशाराही केला पण तो त्याच्या लक्षात नाही आला. तेव्हा प्रियाच त्याला हसून म्हणाली, '' तू इथेच थांब...''.
तेव्हाकुठे तो ओशाळल्यागत काहीतरी बोलायचं म्हणून बोलला '' अरे हो... माझं तिथे काय काम'' आणि पुन्हा आपल्या खुर्चीवर बसला.

'' काय ... काही त्रास वैगेरे तर नाही ना'' आत जाता जाता प्रियाने राजेशच्या बायकोला विचारले.

राजेशची बायको काही न बोलता प्रियाच्या मागे मागे आत जावू लागली. प्रियाने ताडले की तिला काही सांगायचे असावे, पण ती राजेशसमोर लाजत असावी. तपासनीच्या दरम्यान पार्टीशनच्या पलीकडून राजेशला बराच कुजबुजल्यासारखा आवाज येत होता पण त्या बायका काय बोलत होत्या काही स्पष्ट ऐकू येत नव्हतं. त्याला बराच वेळ ताटकळत बसावं लागलं होतं.

तपासणी झाल्यानंतर प्रिया राजेशच्या बायकोला पार्टीशनच्या बाहेर घेवून आली.

'' काळजी करण्याचं काही कारण नाही.. ते कसं असतं बघ... आता साधा एखादा पाहुणा आपल्या घरी येणार असला की आपली कशी त्या पाहूण्यासाठी तयारी करण्याची तारांबळ उडते ... तसं यावेळी बायकांच्या शरीराचं असतं... एक नविन जिव येणार... आणि तो जिव इथेच वाढणार ... या तयारीस बायकांच शरीर लागलेलं असतं... तो नविन जिव म्हणजे तिच्या शरीरासाठी एक पाहूणाच तर असतो... त्यामुळे तिच्या शरीराला लागणाऱ्या सर्व घटकांमधे तो जिव पोटात असेपर्यंत वाढ होणार असते.. म्हणून अशावेळी गरोदर बायकांच्या शरीरात अगदी अमुलाग्र हार्मोनल बदल होत असतात... आणि त्यामुळे हे छोटे मोठे त्रास होणं साहजिक आणि कधी कधी अपरिहार्य असतं... '' प्रिया त्या दोघांना सगळं व्यवस्थित आणि सविस्तर समजावून सांगता सांगता आपल्या खुर्चीवर येवून बसली.

राजेश सगळं कसं लक्ष देवून ऐकत होता.
खरंच आपली ती एकेकाळची अल्लड मैत्रींण पाहता पाहता कशी एक मोठी डॉक्टर झाली आहे...
आणि किती व्यवस्थित समजावून सांगत आहे...
त्याने अभिमानाने तिच्याकडे पाहाले.

राजेशची बायकोही राजेशच्या शेजारी असलेल्या रिकाम्या खुर्चीवर जावून बसली होती.

'' नाही म्हणजे... आम्ही तर खुपच घाबरुन गेलो होतो... आणि हीसुध्दा एवढ्यात खुपच भावनात्मक आणि कधी कधी खुपच घाबरुन गेल्यासारखी वागते'' राजेश म्हणाला.

'' या दिवसांत नुसते शारीरीकच नाही तर भावनात्मक चेंजेससुध्दा येतात... त्यामुळे एवढी काळजी करण्याचं काही कारण नाही'' प्रिया म्हणाली.

'' बघ बरं... मी नाही म्हणालो होतो की काही नसावं... '' राजेश आपल्या बायकोकडे बघत म्हणाला. '' आणि मी हिला हेही म्हणालो होतो की माझी मैत्रीण म्हणजे अशी तशी डॉक्टर नको समजू ... ती एक मोठो डॉक्टर आहे'' तो प्रियाकडे पाहत म्हणाला.

''अरे मोठी डॉक्टर वैगेरे काही नाही... '' मग मुळ मुद्द्यावर येत प्रिया म्हणाली, '' नाही पण तुम्ही आलात ते एका दृष्टीने बरंच झालं... या गोष्टी जरी काळजी करण्यासारख्या नसल्या ...तरी पण त्या पहिल्या वेळी स्रियांना अनपेक्षीत असतात... म्हणून त्या त्यांना माहित असणं फार महत्वाचं असतं'' प्रिया.

'' मी काही... व्हिटामीन आणि आयर्न कॅलशियमच्या गोळ्या लिहून देते... त्या जरा रेगूलर घेत जा.'' प्रिस्क्रिपशन पॅड उघडत प्रिया म्हणाली.

क्रमश:...


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network