Today's Novel - Mrigajal - Ch-35

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Today's Quotes -
Relationships are like glass.Sometimes it's better to leave them broken than try to hurt yourself putting it back together.
... Author Unknown
Love is like a puzzle.When you're in love, all the pieces fit but when your heart gets broken, it takes a while to get everything back together.
... Author Unknown
Maybe part of loving is learning to let go.
... From the television showThe Wonder Years

फाटकातून बंगल्याच्या आवारात शिरल्यावर प्रिया सरळ बंगल्याच्या प्रमुख दरवाजाजवळ गेली. दरवाजा अजुनही आतून बंदच होता. तिला ते जरा खटकल्या सारखे झाले. कारण तिची अपेक्षा होती की 'विजयची मैत्रीण' म्हटल्यावर नयना कदाचित दार उघडून तिची वाट पाहत उभी असेल. पण तसे काही झाले नाही. तिथे बंद दरवाजाजवळ ती थोडावेळ थांबली.

कदाचित नयना आत काही कामात बिझी असेल...

त्यामुळे तिला समोर येण्यास कदाचित वेळ होत असावा...

पण ती बराच वेळ थांबल्यानंतरही जेव्हा दरवाजा उघडला नाही तेव्हा प्रियाने नाईलाजाने बंगल्याच्या दाराची बेल दाबली आणि ती दार उघडण्याची वाट पाहू लागली. दार उघडेपर्यंत तिने बंगल्याच्या आजुबाजूचा परिसर, व्हरंड्यात ठेवलेलं उंची फर्निचर, इत्यादीवरुन एक नजर फिरवली. सगळा कसा एका कंपनीच्या मॅनेजरला शोभेल असा थाट होता. थोड्या वेळाने दार उघडलं. दारात एक सुंदर मुलगी उभी होती. नयनाच असावी!. कुणीही तिच्या प्रेमात पडावं अशी तिची सुंदरता होती. प्रियाला तिचा हेवा वाटल्या वाचून राहाला नाही. तशी प्रियाही कमी सुंदर नव्हती, पण नयनाचं राहाणीमान तिच्या सुंदरतेला अधिकच खुलवत होतं. प्रिया तिच्या कामाच्या व्यापामुळे कदाचित स्वत:च्या राहाणीमानाकडे तेवढे लक्ष देवू शकत नसावी.

'' मी प्रिया... विजयची मैत्रिण...'' प्रियाने स्वत:ची ओळख करुन दिली.

नंतर प्रश्नार्थक मुद्रा करुन विचारले, '' तू नयनाच ना?''

'' हो मीच नयना'' ती म्हणाली.

'' ये आत ये ना'' तिच्या शब्दात मृदुता आणि आदर जाणवत होता.

प्रिया तिच्या मागे मागे आत ड्राईंगरुममधे गेली. ड्राईंगरुमच्या ठेवणीवरुन सुद्धा त्यांची आर्थीक सुबत्ता आणि संपन्नता जाणवत होती. ड्राईंगरुममधे एक मध्यमवयीन व्यक्ती पेपर वाचण्यात मग्न होती.

तिचे वडील असावेत ...

नयनाने प्रियाला इशाऱ्यानेच बसायला सांगितले. प्रिया त्या व्यक्तीकडे पाहून बसण्यास अवघडल्यासारखी करु लागली तेव्हा नयना तिच्या जवळ जावून हळूच म्हणाली, '' माझे वडील आहेत..''

नयनाच्या चेहऱ्यावर त्यांचा धाक, दडपण स्पष्ट जाणवत होतं, त्यांची चाहूल लागताच तिच्या वडीलांनी वर्तमान पत्रातून डोकं वर काढून त्यांच्यावर एक नजर टाकली आणि काहीही न बोलता उठून ते तेथून आत निघून गेले. एव्हाना प्रिया सोफ्यावर बसली होती आणि तिच्या शेजारीच नयनाही बसली.

प्रियाला सुरवात कशी करावी काही कळेना, '' कशी आहेस?'' प्रियाने एकदमच सुरवात कशी करावी या हिशोबाने विचारले.

'' चांगली आहे... '' ती हसून जणू काही घडलंच नाही या अविर्भावात म्हणाली.

'' मी आत्ता विजयकडूनच आले '' ती कशीबशी पुढे बोलली.

नयना नूसती ऐक़त होती.

प्रियाला अपेक्षा होती की ती विचारेल 'कसा आहे विजय?' वैगेरे. पण तसे काहीच झाले नाही. आणि तिच्या वागण्यातही एवढा 'प्रोफेशनलपणा' होता की तिला एक क्षण शंका वाटून गेली की -

हीच ती नयना आहेका? की जिच्याविषयी विजयने तिला सांगीतले?...

हीच ती नयना का जिच्यावर विजय प्रेम करतो?...

आणि हीच ती नयना की जिही विजयवर तेवढंच प्रेम करते?...

ज्या गोष्टी नयनाकडून व्हायला पाहिजे होत्या त्या तिच्या अपेक्षेप्रमाणे होत नव्हत्या.

मी चुकीच्या घरात तर नाही आले?...
एक क्षण तिला वाटून गेले.

मोठे लोक आहेत ना...

म्हणून कदाचित आपल्या भावनांचं उघड प्रदर्शन करत नसावेत...

हो तसेच असावे... ते म्हणतात ना की मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी...

तिने स्वत:ची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तिला आता थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. तेव्हा तिने आता सगळं आटोपतं घेवून सरळ मुद्द्यालाच हात घालायचे ठरविले.

'' तुला एक गोष्ट विचारु?'' प्रियाने तिचा अंदाज घेत प्रश्न विचारला.

'' विचार '' तिच्या चेहऱ्यावर काहीही अविर्भाव नव्हता.

'' म्हणजे स्पष्टच विचारते ?'' प्रियाने हिंम्मत एकवटून, सोफ्यावर सरळ ताठ बसत, तिच्याकडे नेत्रकटाक्ष टाकीत विचारले.

ती काहीच बोलली नाही. उलट प्रियाच्या विचारण्याची वाट पाहू लागली.

'' तू विजयवर प्रेम करतेस का?'' प्रियाने सरळ सरळ विचारले.

बोलायच्या आधी ती एक क्षण थांबली. जणू तिने काय बोलायचे याचा आधी व्यवस्थित विचार केला. आणि सोफ्यावर निट बसत, जणू योग्य शब्दांची जुळवाजुळव करीत म्हणाली, '' हे बघ... तो एक चांगला मुलगा आहे... हूशार आहे... होतकरु आहे... तो आणि मी एका प्रोजेक्टवर सोबत काम करीत होतो... मी त्याला एका चांगल्या मित्राप्रमाणे मानत होते... म्हणजे अजूनही मानते... पण त्याचा त्याने गैरसमज करुन घेतलेला दिसतो...''

प्रियासाठी हा एक मोठा आघात होता. जणू तिच्याद्वारे विजयच हे सगळं ऐकत होता. पुढे काय बोलावे तिला काही कळेना. तरीही आपण जे ऐकलं ते कदाचित बरोबर ऐकलं नसावं किंवा तिने जे सांगितलं ते तिला बरोबर कळले नसावे या अविर्भावात ती पुढे म्हणाली.

'' म्हणजे तू त्याच्यावर प्रेम करीत नाहीस'' प्रियाने पुन्हा अजुन स्पष्टपणे विचारले.

'' स्पष्टच सांगायचे झाल्यास मी त्याच्यावर प्रेम वैगेरे काही करीत नाही ... किंबहुना प्रेम वैगेरे अशा फालतू आणि चिप गोष्टींवर माझा विश्वास नाहीये...'' ती आता मोकळी बोलायला लागली होती.

आतामात्र प्रियाला काहीएक कळत नव्हते. कारण इथे यायच्या आधी तिने वेगळेच गृहीत धरले होते. की कदाचित त्यांच्यात काहीतरी गैरसमज झाला असावा. आणि तो कदाचित आपल्याला दुर करावा लागेल. पण इथे तर गोष्टी अगदी स्पष्टपणे बोलल्या जात होत्या. तरीही तीने आशा सोडली नव्हती.

'' पण विजयतर म्हणतो की तु सुध्दा त्याच्यावर प्रेम करतेस म्हणून ... म्हणजे त्याने तु असं मैत्रिणीजवळ बोलत असतांना ऐकलं आहे ... असं तो म्हणत होता ... आणि तुझ्या वडीलांना सुद्धा या गोष्टीची जाणिव आहे असं तो म्हणत होता.'' प्रिया विजयची बाजू मांडत म्हणाली.

नयनाने एक क्षण शुन्यात बघितले आणि ती दृढतेने म्हणाली, '' तो खोटं बोलतो आहे..''

विजय आणि खोटं?...

हे कसं शक्य आहे?...

विजयला ती पुरेपुर ओळखत होती...

जो गमतीतही खोटं बोलणं टाळतो ... तो एवढी मोठी गोष्ट खोटं कसा बोलेल...

'' पण तो खोटं का बोलेल?'' प्रियाने जणू स्वत:लाच प्रश्न विचारला.

प्रियाला आता नयनाला पुढे अजून काही विचारण्यात स्वारस्य वाटत नव्हते. पण तिला राहून राहून वाटत होतं की पाणी कुठंतरी मुरतय खरं. विजय खोटं बोलणार नाही याची तिला शाश्वतीच नाही तर पुर्णपणे खात्री होती. उलट नयनावर दडपण जाणवत होतं. तिच्या वडीलांचा धाक तिच्यावर स्पष्टपणे दिसत होता. कदाचित त्यामुळेच ती दबावाखाली आणि दडपणाखाली येवून बदलली असावी. किंवा तिच्या मनात जे आहे ते स्पष्ट बोलू शकत नसावी. कदाचित तिच्यावर आता तिच्या वडीलांनी दबाव आणला असावा. पण तसे म्हणावे तर विजयच्या म्हणण्यानूसार तिच्या वडीलांनाही त्यांचे प्रेम मान्य होते. मग अश्या परिस्थितीत हे सगळं काय होत आहे तिला काहीएक कळत नव्हतं. किंवा हे सगळं तिच्या आकलनाच्या पलिकडचे होते.

'' पण विजयच्या खोटे बोलण्यामागे त्याचा काय स्वार्थ असू शकतो?'' प्रियाने पुन्हा खोदून तिला विचारण्याचा प्रयत्न केला.

'' ते मी कसे सांगू शकेन?'' ती बेफिकीरपणे खांदे उचकुन म्हणाली.

आतामात्र प्रिया नयनाची प्रत्येक गोष्टीत एवढी सहज आणि बेफिकीर भूमीका बघून ती चिडली होती. तिला तिचा सहजपणा आणि बेफिकीरपणा आता उर्मटपणा वाटायला लागला होता. तिला वाटत होतं की नयनाला तिचे केस पकडून चांगला जाब विचारावा की ' तुझा प्रेमावर विश्वास नाही आहे ना... मग त्याला तुझ्या प्रेमात पडायच्या आधीच का स्पष्ट बोलली नाहीस... किंवा त्याला तुझ्या प्रेमात पडायच्या आधीच सावध का केले नाहीस... किंवा स्पष्टच बोलायचे झाल्यास त्याला का नादी लावलंस... की तुझ्या प्रेमात पाडून तुला त्याची असाय्य झालेली दशा पाहाण्यात येणारा अघोरी आनंद लूटायचा होता. ' पण लगेच तिने स्वत:ला सावरले. तिला तिच्यामुळे प्रकरण चिघळवायचं नव्हतं. किंवा त्यांच नात तूटण्यास तिला कारणीभूत व्हायचं नव्हतं.

शेवटी बोलण्यासाठी काही शिल्लक राहाले नाही असे जाणवताच प्रिया निघण्यासाठी उठत म्हणाली, '' बरं येते मग...''

नयनाही उठून तिला दारापर्यंत पोहोचवायला आली. अजुनही प्रियाने हार मानली नव्हती. जाता अचानक ती दारात थांबली आणि मागे वळून नयनाच्या अगदी डोळ्यात डोळे टाकीत म्हणाली , '' हे बघ नयना .. विजय एक चांगला मुलगा आहे हे तूही कबूल केलं आहेस... तेव्हा गोष्टी एवढ्या टोकाला का जावू देतेस... त्याच्यासारखा चांगला मुलगा तुला शोधून सापडणार नाही... ''

तिच्या प्रतिक्रियेसाठी मधे एक क्षण ती थांबली. पण तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती.

तेव्हा ती पुढे म्हणाली, '' तू काहीतरी चुक करीत आहेस... असं तुला नाही वाटत?''

नयना काहीच बोलली नाही. तिचा चेहरा अगदी निर्विकार होता.

क्रमश:...

Today's Quotes -
Relationships are like glass.Sometimes it's better to leave them broken than try to hurt yourself putting it back together.
... Author Unknown
Love is like a puzzle.When you're in love, all the pieces fit but when your heart gets broken, it takes a while to get everything back together.
... Author Unknown
Maybe part of loving is learning to let go.
... From the television showThe Wonder Years

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network