Recent Novel - Mrugajal - Ch-48

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

There are no tragedies, just facts not recognized in time.
... William D. Montapert
Tragedy is like strong acid -- it dissolves away all but the very gold of truth.
... D. H. Lawrence

विजयच्या आईचा सामना तिच्या मुलाच्या ऍक्सीडेंट झालेल्या पुर्णपणे चेपलेल्या देहाशी झाला होता या गोष्टीला आता दोन - तिन महिने होवून गेले असतील. तेव्हा पासून ती अगदी शांत शांतच राहत असे. विजयच्या बहिणीला तर कोण गेलं आणि कोण जिवंत आहे याचं काही भानच राहत नसे आणि त्याच्या वडिलांना कोण गेलं आणि कोण आहे याचं काही देणं घेणं नव्हतं. तो गेल्यापासून त्या विषयावर घरात एकदाही चर्चा झाली नव्हती. तशी त्या घरात कोणत्या गोष्टीवर चर्चा विजय असतांनाच होत असे. आणि आता तोही गेला. सगळे जण आपण आपल्या ठरवून दिलेल्या विश्वात जगत होते. आणि त्या प्रत्येकाच्या विश्वात संयूक्त असं काहिच नव्हतं. जणू कुणी घराची जमिन, कुणी भिंती तर कुणी छत. जे की एकत्र कधीही येवू शकत नव्हते तरीही त्यांच्यापासून ते घर तयार झालं होतं. विजयची आई तिच्यावर जे बितलं होतं ती एकटीच सहन करीत होती आणि पेलत होती. आणि नुसतं ते दु:ख घेवून होणार नव्हतं. तिला घरातल्या सर्व जबाबदाऱ्या जसं स्वयंपाक करणे, घरचं सामान आणणे हे अजूनही पुर्वीसारखंच सुरु ठेवायचं होतं. विजय निघून गेल्यापासून जिवन जणू तिच्यासाठी थांबलं होतं. पण तिला चालत राहण्यावाचून पर्याय नव्हता. तिला थांबता येण्यासारखं नव्हतं. तिने आता स्वत:ला घरातल्या कामात गुंतवून घेण्यास सुरवात केली. कामं संपले तरी ती काहीतरी काम उकरुन काढायची आणि त्यात गुंतून रहायची किंवा तेच तेच काम पुन्हा पुन्हा करुन स्वत:ला गुंतवून ठेवायची. थोडसं का रिकामं झालं की डोक्यात पुन्हा तेच जिवघेणे विचार, त्या विचाराला ना अंत ना सुरवात.

प्रिया आजोळवरुन परत आली होती. आली तेव्हापासून तिची आपली विजयच्या घरी जायची सारखी ओढ चाललेली होती. पण तिला विजयच्या घरीच काय पण बाहेर कुठेही जाण्यास मनाई झालेली होती. तशी ती आता बऱ्यापैकी बरी झाली होती आणि बाहेर जावू शकत होती. तसे तिने बाहेर जाणे, फिरणे वैगेरे आजोळी असतांनाच सुरु केले होते. पण इथे आल्यावर तिच्यावर ही विचित्र बंधनं का लादली जात आहेत हे तिला काही कळत नव्हतं. एवढेच काय तिला तिच्या वडीलांच्या वागण्यात खुप फरक पडलेला जाणवत होता. सारखे त्यांचे आपले ' लग्नासाठी यांचा मुलगा सांगुन गेला... आणि त्यांचा मुलगा सांगुन गेला असे चाललेले असायचे' आणि प्रॅक्टीससाठी क्लिनीकवर जायची गोष्ट काढली तर ते म्हणायचे, '' मला वाटते तु आता तुझी प्रॅक्टीस तुझं लग्न झाल्यावरच सुरु करावीस''. विजयही तिला भेटावयास का आला नाही ही ही गोष्ट तिला सारखी खटकायची आणि वडीलांजवळ विजयचा विषय काढताच ते काहीतरी निमित्त करुन विषय बदलायचे. शेवटी एक दिवस ती वडीलांना न कळवता राजेशकडे जावून आली आणि तिला ती जिवघेणी बातमी मिळाली - विजय ऍक्सीडेंटमधे गेल्याची. राजेश सांगत होता पण तिची सर्व इंद्रीये जणू बधिर झाली होती.

हे कसं शक्य आहे?...

तिला विश्वासच बसत नव्हता...

तिच्याबाबतीत एवढं दुर्दैवी का घडावं?

देवाने माझ्याच नशिबी एवढं दुर्दैवं का द्यावं?

आता तिला देवाचा, नव्हे या सगळ्या जगाचाच राग यायला लागला होता. तिला जगण्याचा मरण्याचा, खाण्याचा पिण्याचा सगळ्याच गोष्टीचा जणू तिटकारा निर्माण झालां होता. तिच्यात झालेला हा बदल तिच्या वडीलांनीही ताडला होता. त्यांनी जाणले होते की विजयची बातमी तिला कळली असावी. कारण त्यांना माहित होते की तिच ती बातमी तिच्यात एवढं परिवर्तन घडवू शकते.

ती बातमी तिला केव्हा ना केव्हा तरी कळणारच होती...

एक बरे झाले की ती बातमी त्यांना तिला सांगावी न लागता कळली...

पण म्हणतात ना की काळ हा प्रत्येक जखमेवर औषध असतं....

काही काळ मधे गेल्यानंतर ती पुन्हा पुर्ववत होऊन जाईल...

त्या काळाचीच ते जाण्याची आता वाट पाहत होते. त्यांनी ठरविले होते की ती आता पुन्हा नॉर्मल होईपर्यंत तिच्याजवळ तिच्या लग्नाचा विषय काढायचा नाही. म्हणून तेही तिला पुन्हा पुर्ववत होण्याची वाट पाहत शांतच होते.

पण काळ जात होता तरी पोरीच्या जखमा काही भरायला तयार नव्हत्या. ती अजुनही शांत शांत आणि नेहमी कशाच्या तरी विचारात असायची. त्यामुळे प्रियाच्या वडीलांना तिची काळजी लागुन राहाली होती. एक दिवस ती तयारी वैगेरे करुन बाहेर जायला निघाली. आज बऱ्याच दिवसानंतर पोरगी घराच्या बाहेर पडते आहे हे पाहून तिच्या वडीलांना बरे वाटले.

'' बेटा कुठे चाललीस?'' तिच्या वडीलांनी सहज विचारले.

'' विजयकडे'' ती म्हणाली.

'पण तो तर आता गेला आहे' अगदी त्यांच्या तोंडात आले. पण तिचे वडील काहीच बोलले नाही. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आता काळजीच्या छटा उमटल्या होत्या.

या पोरीचं कसं होणार ... देव जाणे...

त्यानी विचार केला.

आज नेहमीप्रमाणे घरातली सगळी कामे आटोपून विजयची आई अंगणात बसली होती. कुठेतरी शुन्यात आपली नजर खिळवून. सगळी कामे पुन्हा पुन्हा करुनही संपली असावीत. फाटक उघडून प्रिया आत अंगणात आल्याचं भान सुध्दा तिला नव्हतं. आत येताच प्रिया गंभीर चेहऱ्याने विजयच्या आईजवळ उभी राहाली. विजय गेल्यानंतर कितीतरी दिवसानंतर प्रथमच ती त्याच्या आईला सामोरी जात होती. तरीही विजयच्या आईचं लक्ष नव्हतं. प्रियाला कशी सुरवात करावी काही कळेना. आणि काहीतरी सुरवात केलीही तरी त्याची आई कशी रिऍक्ट करेल याची तिला काही कल्पना येत नव्हती. हळूच तिने आपले दोन्ही हात विजयच्या आईच्या खांद्यावर ठेवले. विजयच्या आईने काहीही अविर्भाव न दाखवता वळून प्रियाकडे बघितले. कितीतरी दिवसानंतर एक आधाराचा हात तिला तिच्या खांद्यावर विसावलेला जाणवत होता. ती उठून उभी राहाली. प्रियाजवळ गेली आणि मग दोघीही अनावर होवून एकमेकांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडत होत्या. त्यांच्या दोघींच्याही साठलेल्या भावनांना जणू आज वाट मिळाली होती.

क्रमश:...

There are no tragedies, just facts not recognized in time.
... William D. Montapert
Tragedy is like strong acid -- it dissolves away all but the very gold of truth.
... D. H. Lawrence

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network