Marathi kadambari - Madhurani CH-16 पुनर्मीलन

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi kadambari - Madhurani CH-16 पुनर्मीलन

समोरचा भिंतीचा कोपरा जसा गणेशला दिसायला लागला त्याच्या हृदयाची स्पंदनं वाढू लागली. तो कोपरा ओलांडला की बस मधुराणी आपल्या नजरेस पडणार. तो झपाझप पावले टाकीत चालू लागला. त्याच्या मागून अजूनही सदा येत होता. पण गणेशला ना सदाचे भान होते ना रस्त्यात दिसणाऱ्या लोकांचे. गणेश मधुराणीच्या भेटीसाठी अगदी अधीर झाला होता.

एकदाचा तो क्षण आला. कोपरा पार करताच गणेशला गल्ल्यावर बसलेली मधुराणी दिसू लागली. ती आपल्या कामात गुंग होती. कधी एकदा ती आपल्याकडे पाहते आणि कधी आपण तिच्या त्या आर्त नजरेत बुडून जातो असे त्याला झाले होते. तो मधुराणीच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला.

" बोला गणेशराव ... काय देऊ ? .. सिगारेट?" मधुराणीने अगदी सहज गणेशकडे पाहत विचारले.

गणेशला आपल्या मनातले मांडे मनातच विरत असल्यासारखे जाणवत होते. ती अगदी तिऱ्हाईतासारखी गणेशशी बोलत होती. त्या दिवशी ज्या तऱ्हेने मधुराणीने त्याला जाता जाता निरोप दिला त्यावरूनतरी आज तिचे असे तिऱ्हाईतासारखे बोलणे अपेक्षित नव्हते. गणेशला आश्चर्याचा धक्का बसला होता. जे होत होते ते सगळे गणेशला अनपेेक्षित होते. त्याला असे वाटत होते की आपल्या पायाखालची जमीन दुभंगावी आणि तिने आपल्याला त्यात सामावून घ्यावे. गणेशचा चेहरा खर्रकन् पडला. त्याला काय बोलावे काही सुचत नव्हते.

" नाही एक लक्स साबन पाहिजे होती " तो काहीतरी बोलायचे म्हणून बोलला. खोलीवर दोन लक्स साबन पडून होत्या. पण आता परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की काहीतरी विकत घ्यावेच लागणार होते.

" का व्हील देऊ" मधुराणी आधीच्या एका गमतीवरून कोटी करीत खळखळून हसली.

गणेश कसाबसा हसला. त्याला उगीच वाटत होते की मधुराणी कदाचित त्याच्या पडलेल्या चेहेऱ्याकडे पाहून आपली खिल्ली उडवल्यासारखी तर हसली नसावी?

मधुराणीने एक लक्स साबन काढून त्याच्या हातावर ठेवली. त्याच्या हातात शिरशीरी भरल्यासारखे झाले. त्याची अपेक्षा होती की मधुराणी त्याच्या हाताला स्पर्श करेल. पण यावेळी जणू जाणून बुजून तिने ती साबन वरूनच त्याच्या हातावर ठेवली. त्याचा घोर अपेक्षाभंग झाला होता. त्याने खिशातून पैसे काढून दिले आणि निराश चेहऱ्याने तो जाऊ लागला.

मागून मधुराणीचा मंजुळ आवाज आला-

'' दोन दिस काय गावाला गेले होते की काय? ... लई चूकचूकल्यासारखं वाटत होतं "

गणेशने वळून मधुराणीकडे पाहिले. त्याचा चेहरा आता उजळला होता. मधुराणीच्या नजरेत पुन्हा ते आर्त भाव दिसू लागले होते. त्याला वाटले पुन्हा तिच्याकडे परत जावे.

पण नको...

बरे दिसणार नाही...

तो पुन्हा वळून आता उत्साहाने त्याच्या खोलीकडे चालायला लागला. तो विचार करु लागला.

आपणही किती वेडे आहोत....

इथे असलेल्या सगळ्या लोकांसमोर कशीकाय मधुराणी आपल्या मनातले भाव व्यक्त करणार होती....

पण तिने आपल्या हाताला एक नाजूकसा का होईना स्पर्श करायला काय हरकत होती....

पण जातांना तिने पुन्हा इशारा दिला होताच की...

ज्या अर्थी तिला दोन दिवस आपण नसल्याची जाणीव झाली होती...

त्याअर्थी तिच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी आहे हे नक्की...

क्रमश:

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. melya ganesh gharat gondas bayko astana kshala hvi ti madhurani

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network