Marathi new book- Novel - Madhurani - CH-13 घर

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

 

The cure for boredom is curiosity. There is no cure for curiosity.

... Ellen Parr

आज शुक्रवार. गणेशला इथे गावात येऊन पाच दिवस झाले होते. सकाळी अंघोळ करून भराभर तो आपलं सामान आवरु लागला. त्याच्या हालचालीत एक उत्साह होता. आज तो तालूक्याच्या ठिकाणी आपल्या घरी परत जाणार होता. घरी परत जाऊन बायकोला आणि मुलाला भेटण्याच्या नुसत्या कल्पनेने सुध्दा त्याच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. दुसरे आनंदाचे कारण म्हणजे मागच्या तीन दिवसात मधुराणीच्या बाबतीत विचलित होणाऱ्या मनाला आवर घालण्यात तो पूर्णपणे यशस्वी राहिला होता. मागच्या तीन दिवसात मधुराणीच्या समोरासमोर येण्याचा कित्येक वेळी प्रसंग आला होता. पण एकदासुद्धा चूकूनही त्याची मधुराणीच्या नजरेला नजर मिळालेली नव्हती. त्याला त्याचाच सार्थ अभिमान वाटत होता. त्याला हेही जाणवत होते की मागच्या तीन दिवसापासून त्याच्या मनाची जी बेचैन अवस्था झाली होती ती शमल्यासारखी जाणवत होती.

गणेश जवळजवळ कपडे घालून तयार झाला होता. तेवढ्यात समोरचं दार वाजलं. त्याने समोर जाऊन दार उघडलं. समोर डोक्याला कापड गुंडाळलेला एक खेडूत उभा होता. त्याने खाली धोतर आणि वर कापडाची बनियन घातली होती. गणेशने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले.

" मालकानं सामान पोचवाया पाठवलं " तो खेडूत म्हणाला.

" कुणी ?... सरपंचांनी? "

'' जी.." तो म्हणाला.

गणेश दारातून बाजूला झाला तसा तो खेडूत आत शिरला. गणेशने कोपऱ्यात ठेवलेल्या त्याच्या बॅगकडे इशारा करीत म्हटले -

'' ती तेवढी एकच बॅग आहे.... ती घेऊन तू समोर हो... मी आलोच मागनं "

" जी "

त्याने डोक्याचे कापड सोडले. त्याची गोल गोल गुंडाळी करून चुंबळ केली आणि डोक्यावर ठेवली. मग बॅग उचलून त्याने डोक्यावर त्या गुंडाळीच्या वर ठेवली. तो बॅग घेऊन दारातून बाहेर जाऊ लागला. '' सांभाळ रे बाबा... वर लागेल " गणेश म्हणाला.

तो दारातून थोडं वाकून बाहेर पडला. त्याच्या बॅग डोक्यावर घेऊन जात असलेल्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत गणेशने दार बंद केले.

गणेशने बाहेर येऊन दाराला कुलूप लावले. त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या प्रत्येक हालचालीत प्रचंड उत्साह ओसंडून वाहत होता. चला आता एकदा बस स्टॉपवर जाण्याच्या आधी झकासपैकी एक सिगारेट पिवूया. त्याने विचार केला. तो कुलूप लावून मधुराणीच्या दुकानात गेला. आता त्याला मधुराणीची नजर टाळण्याची जवळ जवळ सवयच झाली होती.

" एक ब्रिस्टॉल " त्याने एक रुपयाचे नाणे मधुराणीच्या समोर लाकडाच्या पेटीवर ठेवीत म्हटले.

आज मधुराणी काहीच बोलली नाही. नेहमी ती काही ना काही चांगली मोकळी चाकळी गणेशशी बोलायची.

गणेशला उगीच हुरहूर लागून गेली.

आपलं काही चुकलं तर नाही ना?...

मग आज ती का नाही बोलली...

आपल्यावर रागावली तर नसेल ना?...

की कदाचित आपण गावाला चाललो याचं तर तिला दु:ख होत नसावं?....

छे छे असं काही नसावं....

आपण उगीच सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करतो आहोत....

तिने बोलायलाच पाहिजे असं काही आहे का?....

आज नसेल बिचारीचा मूड....

ही तर आपली उगीच जबरदस्ती झाली...

त्याने आपल्या डोक्यातले विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. मधुराणीने चुपचाप आपल्या मागे ठेवलेल्या रॅकमधले ब्रिस्टॉलचे पाकिट काढले आणि त्यातली एक सिगारेट काढून गणेशच्या हातावर ठेवली. अचानक गणेशने चमकून तिच्याकडे पाहिले. सिगारेटच्या व्यतिरीक्त अजून काहीतरी गणेशच्या हाताला जाणवले होते. चक्क मधुराणीने गणेशचा हात सिगारेट देता देता अलगद दाबला होता. का चूकून दाबल्या गेला होता? हे जाणण्यासाठी त्याने तिच्याकडे चमकून पाहिले होते. तिच्या चेहऱ्यावर एक मादक, घायाळ करणारे, रहस्यमय आणि तेवढेच अर्थपूर्ण स्मित पसरले होते. गणेश तिच्या आर्त नजरेत पुन्हा अडकून पडला होता. त्याचा तिच्या डोळ्यात न बघण्याचा निर्धार केव्हाच विरुन गेला होता. त्याचे हृदय धडधडायला लागले. त्याच्या अंगाला दरदरुन घाम फ़ूटला होता. गोंधळून त्याने ती सिगारेट घेतली आणि तो बस स्टॉपच्या दिशेने चालू लागला. त्याला पावले टाकनंसुध्दा जड जात होतं. त्याचे एक मन म्हणत होते की घरी जाणे रहित करावे. पण नको सरपंचाच्या गड्याने सामान समोर बस स्टॉपवर नेले होते. आता जर जाणे रहित करावे तर कुणाला शंका यायची. तसाच जड पावलाने तो कोपऱ्यापर्यंत चालत राहिला. कोपऱ्यावरून कितीही मनाचा निग्रह केला तरी तो वळून मधुराणीकडे पाहण्याचे टाळू शकला नाही. तीही आमंत्रित करणाऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत विरहाचे दु:ख होते, आणि एक अदृष्य आकर्षित करणारी शक्ती होती. जड मनाने तो बस स्टॉपकडे निघाला. आता वळून बघितले तरी ती दिसत नव्हती. ती नजरेआड झाली होती. तरीही त्याला जाणवत होते की ती त्याच्याबरोबरच येत होती. हो अगदी त्याच्या सोबत - हृदयाच्या एका कप्प्यात कुठेतरी घर करून!

क्रमश:

The cure for boredom is curiosity. There is no cure for curiosity.

... Ellen Parr

 

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network