Marathi sahitya - Novel - Madhurani CH-12 नजरेचे तिर

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

 Read Novel - मधुराणी - Hony -  on Google Play Books Store
वाचा काही निवडक प्रतिक्रिया -  प्रतिक्रिया 
सकाळी बऱ्याच उशीरा गणेशला जाग आली. आज गणेशला इथे येऊन पुरते दोन दिवस झाले होते. त्याने डोळे किलकीले करून बघितले तर उन्हाची तिरीप खिडकितून आत आली होती. बाहेरुनसुध्दा लोकांचा गलबला ऐकू येत होता. रात्री बऱ्याच उशीरापर्यंत गणेशला झोप आली नव्हती. काल रात्रीही तीच परिस्थिती होती. रात्री राहून राहून मधुराणीचे आर्त डोळे त्याच्या मन:चक्षूसमोर येत होते. तो ताडकन् उठून उभा राहाला आणि घाईघाईने खिडकीजवळ गेला. खिडकीतून गल्ल्यावर बसलेल्या मधुराणीची एक झलक दिसल्यावर कुठे त्याला बरे वाटले. तिचं इकडे लक्ष नव्हतं. ती आपल्या कामात गुंग होती.
हे आपल्याला काय होत आहे?....
गणेश विचार करु लागला.
पूर्वी कधी आपल्याला असं झालं नव्हतं....
एखाद्या स्त्रीची एवढी ओढ!...
हे काही योग्य नाही...
कदाचित बायकोच्या विरहामुळे आपल्याला असं होत असावं....
पण विरह तरी कसला?...
आपल्याला इथे येऊन जेमतेम दोन तर दिवस झाले आहेत ....
असू शकते.... कदाचित आपल्या प्रिय व्यक्तीचे उणेपण तिच्यापासून दूर गेल्यावरच कळते...
तो हळू हळू चालत आपल्या बॅगजवळ जाऊ लागला. त्याचं मन खिडकीतून हटायला तयार होत नव्हतं. जड पावलांनी मोठ्या मुश्कीलीने तो आपल्या बॅगजवळ गेला. बॅग उघडली. बॅगमधलं वरचं सामान उचलून बुडात हात घातला. बुडातून त्याने त्याचा, बायकोचा आणि मुलाचा फॅमिली फोटो बाहेर काढला. मग कितीतरी वेळ तो त्या फोटोकडे न्याहाळून पाहू लागला.
ही एवढी गोंडस बायको असतांना आपलं मन विचलित का व्हावं?...
नाही. आपण आपल्या मनाला आवर घातलीच पाहिजे....
त्याने मनाचा पक्का निर्धार केला.
गणेश अंघोळ करीत होता. मनाचा निर्धार केल्यापासून त्याला बरं वाटत होतं. पण हा आपला निर्धार टिकला पाहीजे. अंघोळ करता करता त्याच्या डोक्यात एक कल्पना येऊन गेली.
सगळी किमया ही मधुराणीच्या भेदक नजरेत आहे....
आपण तिच्या नजरेला नजरच देण्याचे टाळले तर?...
तर आपला निर्धार टिकविणं कदाचित शक्य आहे...
कदाचित नाही आपल्याला आपला निर्धार टिकवलाच पाहीजे...
इतका वेळ संथपणे अंधोळ करणाऱ्या गणेशला आता घाई झाली होती. आता अंघोळ आटोपून आपण तिच्या दूकानात जाऊया. नाहीतरी त्याला काही घरात लागणाऱ्या चिल्हर वस्तू खरेदी करायच्या होत्या. त्याने ठरविलं की तिच्या दूकानात जायचं. सामान खरेदी करायचं. कदाचित तिच्याशी - ती बोलली तर बोलायचं सुध्दा. पण काहीही झालं तरी तिच्या नजरेला नजर द्यायची नाही.
झालं तर मग ठरलं....
अंघोळ आटोपून गणेशने पटापट कपडे घातले. खुंटीला लटकविलेली थैली काढली आणि तो घाईघाईने निघाला - मधुराणीच्या दूकानात. त्याच्या मनात एक विचार डोकावून गेल्यावाचून राहिला नाही.
ही कसली घाई...
ही कसली ओढ !...
तिच्याकडे बघण्याचीसुध्दा ओढ आणि आता तिच्या नजरेला टाळण्याचीसुध्दा ओढ....
सगळं कसं अजबच वाटत होतं.
रिकामी थैली एका हातात घेऊन गणेश तिच्या नजरेला नजर देण्याचे कटाक्षाने टाळीत मधुराणीच्या गल्ल्यासमोर उभा राहाला. त्याने त्याच्या हातातली रिकामी थैली नोकराकडे दिली.
" बोला सायेब ... काय पायजे " मधुराणी गणेशच्या डोळ्यात डोळे घुसवून म्हणाली.
गणेश तिच्या नजरेला नजर देण्याचे टाळीत तिच्या डोक्यावरून मागे बघत म्हणाला, " ही लीस्ट आहे "
त्याने सामानाची यादी मधुराणीच्या हातात दिली.
" सायेब .. आमच्या दूकानात यादी घेऊन येणारं कदाचित तुमीच पहिलं गिऱ्हाईक असान " तिनं यादी हातात घेऊन आलटून पालटून पाहत म्हटले.
मग यादी त्याला परत करीत ती म्हणाली, " मंग वाचाकी जोरानं यादी ... मी वाचली काय अन्् तुमी वाचली काय एकच "
तो यादी परत घेऊन वाचू लागला.
" लक्स एक .. रिन एक... चहापत्ती सव्वाशे ग्रॅमचा एक पूडा... साखर एक किलो...अगरबत्ती एक पूडा ... चांगला द्या जरा सुवासिक... "
नोकर पटापट सामान काढत होता.
" आवो जरा ... दमानं ... त्याला सामान काढू द्या की एक एक ... नायतर होईल त्या दिवशीसाखी गडबड.."
मधुराणी गोड हसली. गणेशही तिच्या मोत्यासारख्या चमकणाऱ्या दाताकडे पाहत हसला. पण तिच्या नजरेला मात्र तो कटाक्षाने टाळीत होता.
नोकराने सर्व सामान पिशवीत भरुन ती पिशवी गणेशच्या हातात दिली. तेवढ्यात तिथे सदा आला. गणेशने सदाकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. परवाच्या शिव्या तो अजून विसरला नव्हता. सदा आपण होऊन गणेशजवळ गेला.
" नमस्कार गणेशराव " सदाने त्याला आदबीनं नमस्कार केला.
गणेशने सदाकडे दुर्लक्ष केलं. सदाचं त्या रात्रीचं रुप आणि आताचं रुप यात जमीन आसमानचा फरक होता. त्यामुळे या माणसाशी कसं वागावं गणेशला काहीच कळत नव्हतं.
गणेश आपली सामानाची पिशवी घेऊन जायला निघाला.
" आणा इकडं ... मी घेतो झोऱ्या '' सदा गणेशच्या हातातली थैली घेत म्हणाला.
'' नाही ... नको '' जवळ जवळ त्याच्या हातातली थैली हिसकावून घेतच गणेश म्हणाला
मधुराणी पोट धरून हसूं लागली.
गणेश जसा आपल्या खोलीकडे जाऊ लागला तशी मधुराणी म्हणाली-
" पुर्फुन्हार्फा कर्फधीर्फी येर्फेतार्फा "
" काय... काय?" गणेश वळून पण तिच्या डोळ्यात न बघता म्हणाला.
" काय नाय .... तुमालाबी ही भाषा शिकवावी लागेन असं दिसतं... " मधुराणी लाघवीपणे म्हणाली.
गणेशला तिच्या या लाघवी बोलण्याने तिच्याकडे बघण्याचा एकदम मोह झाल्यासारखे झाले.
पण नको...
नजरेचे तीर निष्प्रभ होतात हे पाहून शत्रूपक्षाने हे दुसरे अस्त्र टाकलेले दिसते...
गणेश मोठ्या मुश्किलीने स्वत:वर नियंत्रण करीत सदाला टाळत आपल्या खोलीकडे निघाला.
सामानाची थैली घेऊन घरात आल्यावर प्रथम गणेशने समोरचं दार लावून घेतलं. खिडकीतून त्यानं पाहिलं. सदा गेला होता. त्यानं सुटकेचा श्वास टाकला. त्याचं लक्ष मधुराणीकडे गेलं. मधुराणी आपल्या कामात मग्न गल्ल्यावर बसलेली होती. गणेशने खिडकीतून बाजूला होत थैली कोपऱ्यात ठेवली; शर्टच्या वरच्या खिशातून सिगारेटचे पाकिट काढले. त्यातली सिगारेट काढून त्याने ती देवळीत ठेवलेल्या माचीसने पेटवली. तो आता सिगारेटचे लांब लांब झुरके घेऊ लागला. त्याला या गोष्टीचे समाधान वाटत होते की त्याने मघाशी दूकानात एकही वेळ मधुराणीच्या नजरेला नजर भिडविली नव्हती. त्याच्या मनातली घालमेलही आता कमी झाल्यासारखी वाटत होती. त्याला तिच्या नजरेचे सर्व भेदक तीर निष्प्रभ केल्याचा विजयी आनंद होत होता.
क्रमश: ...
Some people like my advice so much that they frame it upon the wall instead of using it.
.. Gordon R. Dickson

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments: