Maharastriyan Literature - Madhurani - CH-25 सिग्नल

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Maharastriyan Literature - Madhurani - CH-25 सिग्नलगणेश जेवढं शक्य होईल तेवढं मधुराणीच्या दूकानावर जाण्याचं टाळत होता. पण आज त्याचा नाईलाज झाला. काही किराणा सामान घ्यायचं होतं आणि गावातलं दुसरं दुकान सुध्दा बंद होतं. दुसरं दुकान दर शुक्रवारी बंद असायचं. दर शुक्रवारी त्या दुकानदाराच्या अंगात गजानन महाराज येत असे म्हणे.

पण गजानन महाराजाचा दिवस तर गुरुवार....

मग गुरुवारी अंगात येण्याच्या ऐवजी...

शुक्रवारी कसा काय येतो गजानन महाराज त्याच्या अंगात....

गणेशने त्यावर बराच रिसर्च करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांना या प्रश्नाचं उत्तर विचारण्याचा प्रयत्न केला. पण समाधानकारक उत्तर कुणाकडूनच मिळाले नाही. पण एक दिवस विचार करता करता गणेशला त्याचे उत्तर मिळाले. गुरुवार हा बाजाराचा दिवस. त्या दिवशी खरेदीसाठी शेजारच्या खेड्यावरचे लोक सुध्दा उजनीत येत. त्याच्या हप्त्यात होणाऱ्या इतर दिवसाच्या विक्री मिळून जेवढी विक्री होत असे त्यापेक्षा एकट्या बाजाराच्या दिवशी एका दुकानाची विक्री होत असे. म्हणजे गुरुवारला दुकान बंद ठेवणं परवडणारं नव्हतं. म्हणून कदाचित एड्जेस्टमेंट म्हणून त्या दुकानदाराच्या अंगात गजानन महाराज गुरुवारच्या ऐवजी शुक्रवारी येत असावे. गणेश मनातल्या मनात हसला.

किराणा घेण्यासाठी थैली हातात घेऊन बाहेर येत गणेशने आपल्या दरवाज्याला कुलूप लावले. मधुराणीची शक्य तेवढी नजर चूकवत गणेश मधुराणीच्या दूकानात गेला. तो काय द्यायचे ते सांगणार तेवढ्यात एक एक 3-4 वर्षाचा मुलगा धावतच दूकानात आला.

" मावशी एक चॉकलेत दे..." एक रुपयाचं नाणं मधुराणीच्या समोर असलेल्या लाकडाच्या पेटीवर ठेवत तो आपल्या बोबड्या बोलात म्हणाला.

मधुराणीने त्याला लाडाने उचलून जवळ घेतले.

" मावशीच्या बछड्या....किती दिसांनं आलास... कुठं होता इतके दिस..." मधुराणीने त्याला जवळ घेत तिरक्या नजरेने गणेशकडे पाहत म्हटले.

" जा बॉ मी एकाजणाची कट्टी घेणारहे.... मी एकाजणाशी बोलणार नाय.... " मधुराणीने लाडे लाडे त्या छोट्या मुलाशी राग आल्याचा अविर्भाव करीत म्हटले. मधूनच मधुराणी तिरक्या नजरेने गणेशकडे पाहत होती.

" मावशी चॉकलेत ..." ते छोटं मूल पुन्हा म्हणालं.

" देते रे माझ्या वासरा... " मधुराणीने तिरक्या नजरेने गणेशकडे पाहत पटापट त्या मुलाचे दोन तीन पापे घेतले.

मधुराणीने त्या मुलाला सोडले आणि चॉकलेट काढून त्याच्या हातावर ठेवले. चॉकलेट हातात पडताच त्या मुलाने धूम ठोकली.

" असाच येत जारे माझ्या पिल्ल्या... " मधुराणी मोठ्याने म्हणाली.

ते मूल पळता पळता वळून पाहत मधुराणीकडे पाहत नुसतं हसलं.

" लई गोड लेकरु हाय" मधुराणी गणेशला म्हणाली.

मधुराणी गणेशलाच उद्देशून बोलल्यामुळे गणेशला काय बोलावे काही सुचत नव्हते.

" हो ना... मूलं म्हणजे देवाघरची फुलं" गणेश कसाबसा बोलला.

" तुमचा देवावर विश्वास हाय?" मधुराणीने गणेशला विचारलं.

" तसा आहे ही ... आणि नाही ही" गणेश म्हणाला.

" माणसानं एका येळी दोन्ही काठावर राहण्याचा प्रयत्न करु नाय... कोणता तरी एक काठ धराव ... नाय तर तरास होतो" मधुराणी गणेशच्या डोळ्याला डोळे भिडवून म्हणाली.

तिच्या बोलण्यात किंचित नाराजीचा सुरही होता. गणेश तिच्या बोलण्यातला गूढार्थ शोधण्याचा प्रयत्न करु लागला.

" सोडा ते जाऊ द्या... लई दिसानं दिसले... काही घेण्यासाठी आले का आसंच" मधुराणी एकदम आपला मूड बदलून उपरोधाने बोलल्यासारखी बोलली.

" तसं नाही ... म्हणजे थोडं सामान घ्यायचं होतं... " गणेश अवघडल्यासारखा बोलला.

" तरी म्हटलं आज सूर्य कसा पश्चिमेकडून उगवला" मधुराणीने टोमणा मारला.

" नाही तसं नाही ..." गणेश आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करु लागला.

" अन् तेबी आज शुक्रवारचं तिकडचं दूकान बंद आसल म्हून आले असाल" मधुराणी नाराजीच्या सुरात म्हणाली.

गणेशला काय बोलावे काही समजत नव्हते.

गणेशचा पडलेला चेहरा पाहून मधुराणी खळखळून हसली.

" तुमी तर एकदम नाराज झाले... मी आपली आशीच थट्टा केली" मधुराणी हसत म्हणाली.

मधुराणी इतक्या पटापट आपले भाव कसे बदलू शकत होती याचं गणेशला आश्चर्य वाटलं. कदाचित तीही गोंधळात पडली असेल की कोणती प्रतिक्रिया व्यक्त करावी.

पण एक नक्की होतं की आपलं तुटक वागणं मधुराणीला आवडलेलं दिसत नव्हतं...

गणेशला एकदम उचंबळून आल्यासारख झालं. अचानक त्याला मधुराणी एखाद्या प्रेमवीराने अव्हेरलेल्या बिच्याऱ्या प्रेमीकेसारखी जाणवायला लागली. त्याला तिच्या मनाची तडफड जाणवत होती. ती तडफड लपविण्यासाठीच कदाचित तिचे भाव इतके पटापट बदलत होते. त्याला वाटत होते पटकन समोर जाऊन तिला बाहूपाशात घेऊन कुरवाळावे आणि तिची समजूत काढावी.

आपण कदाचित तिच्याशी फारच निष्ठूरतेने वागलो...

आपल्याला असं एकदम तोडून वागायला नको होतं....

तिचा जीवाभावाचा साथीदार तिचा नवरा राहिला नव्हता ...

म्हणून कदाचित ती आपल्यात ती तिचा जीवाभावाचा साथीदार शोधत असावी....

पण आपण कसेकाय तिच्या जीवाभावाच्या साथीदाराची जागा घेऊ शकतो...

आपल्याही काही मर्यादा आहेत...

तरी पण आपल्या मर्यादेत राहून आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण तिच्यासाठी करायला काय हरकत आहे...

तो पर्यंत मधुराणीने गणेशचं सामान काढून त्याच्या समोर ठेवलं.

" हे घ्या तुमचं सामान" मधुराणीने म्हटलं.

" पण मी तर सामानाची यादी नव्हती सांगितली"

" गणेशराव ... मी काय तुमाला एकदोन दिसाची ओळखते... तुमाला कव्हा काय लागतं... म्हणजे कोणतं सामान लागतं हे मला सगळ ठावूक झालं हाय आता... "

खरंच आपल्याला जे पाहिजे होतं बरोबर तेच सामान मधुराणीने काढलं होतं...

किती बारकाईने लक्ष असतं तिचं आपल्यावर...

अगदी साबन कोणती लागते...

चहापत्ती कोणती ...

आणि किती लागते...

खरंच तिचा जीव तर नाही ना बसला आपल्यावर...

नक्कीच बसला असणार ...

नाहीतर इतक्या बारकाईने आपल्याकडे लक्ष देण्याचं काय कारण असावं तिचं...

विचारांच्या तंद्रीत गणेश त्याच्या थैलीत सामान भरू लागला. एका हाताने थैली धरून दुसऱ्या हाताने सामान भरणे त्याला जड जात होते.

" आणा मी धरते थैली " म्हणत मधुराणीने तिच्या दोन्ही हाताने थैली धरली.

थैलीचा एकीकडचा भाग गणेशने आधीच धरलेला होता. त्या भागाला मधुराणीने अश्या तऱ्हेने धरले की गणेशचा हातही तिच्या हातात येईल. अनपेक्षितपणे मधुराणीने त्याचा हात तिच्या हातात घेतल्याबरोबर गणेश गोंधळला. त्याने गोंधळून पटकन आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला. पण दुसऱ्या क्षणीच पश्चातापाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर आले.

आपण उगीच आपला हात मागे घेतला...

किती चांगला चांन्स आपल्याला मधुराणीने दिला होता...

दैव देते आणि कर्म नेते हे काही खोटे नाही...

आपण थैलीचा दुसरा भाग पुन्हा पकडायला पाहिजे...

तो थैलीचा मधुराणीचा हात असलेला भाग पकडण्यासाठी मनाचा निश्चय करू लागला. पण त्याची हिंम्मत होईना.

गणेशचा तो गोंधळ पाहून गालातल्या गालात हसत मधुराणी म्हणाली , " वेंधळेच हात पण ... पक्के वेंधळे हात... तुमच्या बायकोचं कस होत आसल कोण जाणे"

अरे काय करतोस? ...

ती तर सरळ तुझ्या पुरूषत्वावर घाव घालीत आहे...

गणेशने पक्का निर्धार करून मधुराणीचा हात असलेला थैलीचा भाग पकडण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत सामान भरणं झालं होतं.

" आता अजून काही टाकायचं हाय का थैलीत" गणेशने तिच्या हातासकट थैली पकडलेली पाहून मधुराणी त्याची गंमत करीत म्हणाली.

" नाही .. बस एवढंच " म्हणून गणेशने पुन्हा आपला हात मागे ओढून घेतला.

मधुराणी खोडकरपणे पाहून गालातल्या गालात हसायला लागली.

गणेश लाजून आणि गोंधळून लाल लाल झाला होता. त्याला स्वत:चा रागही येत होता. की तो परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकत नव्हता म्हणून. त्यामुळे त्याचा चेहरा अजूनच लाल झाला. त्याने तश्या अवस्थेत पटकन थैली घेतली आणि तरातरा त्याच्या खोलीकडे चालू लागला.

खोलीचे कुलूप उघडून आत जाण्याच्या आधी त्याने एकदा वळून मधुराणीकडे पाहिले. ती अजूनही त्याच्याकडे पाहून हसत होती. उगीचच त्याला वाटून गेले की तिच्या डोळ्यात ' किती कच्चा आहे हा ... याचे कसे होणार' असे भाव तरळल्याचे वाटून गेले. तो पटकन खोलीत घुसला. दरवाजा लावण्यासाठी वळण्याची सुध्दा त्याला हिम्मत झाली नाही. खोलीत आल्यावर सरळ तो बाथरुममध्ये गेला. लोट्याने माठातले थंडगार पाणी काढून त्याने ते थंडगार पाणी आपल्या चेहऱ्यावर शिंपडले.

काय करतोस तू ...

वेंधळ्यासारखा...

ती सिग्नलवर सिग्नल देत आहे ....

आणि तू आहेस की नुसता ठोंब्यासारखा वागतो आहे....

नाही काहीतरी केलेच पाहीजे...

गणेशचा जबडा निर्धाराने आवळला गेला.

मी माझ्यापरीने माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला...

पण मधुराणी तुच माझ्या प्रयत्नांना यश येऊ दिले नाही...

आता मी हरलो आहे ...

मी पूर्णपणे हरलो आहे...

आता येथून पुढे जे ही होईल त्याला मी जबाबदार राहणार नाही ...

त्याला मधुराणी तुच पूर्णपणे जबाबदार राहणार आहेस...

असा विचार करताच गणेशला बरे वाटू लागले. त्याच्यातले अपराधीपणाचे भाव पूर्णपणे नाहीसे झाले होते.


क्रमश:....


Marathi maharastriyan sahitya literature, Marathi kavita, Marathi kavya, Marathi vinod, me mi marathi, e Marathi, zee marathi, i marathi, v marathi, episode original literature

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

 1. Signal seems a quitw interesting book for youths.youths and the person who wants to to be loved that person can imagine him self as Ganesh.. good book, i would like to read the book.
  Regards-
  sanket Kurumbhatte
  9823418688

  ReplyDelete
 2. Signal seems a quitw interesting book for youths.youths and the person who wants to to be loved that person can imagine him self as Ganesh.. good book, i would like to read the book.
  Regards-

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network