Marathi webnovel - Madhurani - CH-26 पाटलाचा वाडा

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi webnovel - Madhurani - CH-26 पाटलाचा वाडा

पाटलाच्या वाड्यावर नेहमीच वर्दळ राहत असे. पाटलाचा वाडा म्हणजे जुनी पुरातन गढी होती. वाडा वर उंचावर होता. आणि त्या गढीला सभोवताली तटरक्षक भिंत होती. भिंतीवर संरक्षणासाठी चारपाच जागी शिपायांना पहारा देण्यासाठी पोस्ट सारख्या जागा होत्या. आता त्या जागा रिकाम्याच होत्या कारण आता तशी जरुरत कधी भासत नसे. आज पाटलांच्या वाड्यावर एक खास मिटींग होती. एक एक गावातली मंडळी यायला लागली. पाटलाच्या घरी मिटींगला बोलावणे असणे हे एक मानाचे द्योतक समजल्या जात असे. मिटींगला मोजकेच गावकरी बोलावले होते. पण बाहेर मिटींगमध्ये काय झाले हे ऐकण्यास उत्सुक हौशी मंडळी पाटलाच्या वाड्याभोवती जिथे जागा मिळेल तिथे बसत असत. मिटींगसाठी आत जाणारा त्या जमलेल्या लोकाकडे तुच्छतेने पाहून अभिमानाने आपली छाती फुगवून आत जात असे. मिटींग चालू असतांना मधूनच कुणीतरी काहीतरी निमित्त करून बाहेर येत असे तेव्हा त्या ऐकण्यास उत्सुक मंडळीचा त्याच्या भोवती गराडा पडत असे. आणि तो बाहेर आलेला तेवढाच भाव खावून आढेवेढे घेत त्या मंडळींना आतली बातमी देत असे.

गणेशने पाटलाचा वाडा दृष्टीपथात येताच आपल्याला वेळ तर झाला नाही ना याची खात्री करीत आपल्या हाताच्या घड्याळीकडे पाहिले. सांगितलेल्या वेळेस अजून 5 मिनीट बाकी होते. त्याचे लक्ष पाटलाच्या वाड्याच्या आजूबाजूला जमलेल्या मंडळीकडे जाताच त्याच्या हृदयाचा ठोका चुकला.

आपण इथे यायच्या आधीच तर काही गडबड झाली नाही ना....

पण मिटींगला तर अजून वेळ आहे...

की मिटींग व्हायच्या आधीच काही गडबड झाली ...

गणेशने एक गोंधळलेली नजर त्या लोकांवरून फिरविली. सगळे उत्सुक डोळे त्याच्याकडेच पाहत होते.

आत गेल्यावर कळेलच काय झाले ते...

गणेश घाईघाईने पाटलाच्या वाडयात घुसला. वाड्यात तर घुसला पण पुढे आत जाण्यास दोन तीन मार्ग होते.

यापैकी नेमक्या कोणत्या मार्गाने आत जायचे?

तो गोंधळलेल्या स्थितीत इकडे तिकडे बघू लागला. तेवढ्यात पाटलाचा एक गडी तिथे त्याच्या दिमतीला आला.

" आसं इकडं यावा ... " तो गडी एकीकडे हात दाखवून गणेशला त्याच्या मागे यायचे सुचवून म्हणाला.

गणेशने नुसते त्याच्याकडे पाहून एक स्मित केले. गणेशची पाटलाच्या वाड्यात येण्याची ही पहिलीच वेळ होती. तशी त्याची आणि पाटलाची भेट पूर्वी बरेच वेळा झाली होती. पण ती मुख्यत: ऑफीसमध्ये आणि गावातल्या वेगवेगळ्या सभारंभात. त्या गड्याने वेडेवाकडे वळणे घेत गणेशला गढीच्या वरच्या भागात नेले. वर एक ऐसपैस बैठक होती. बैठकीत गावातली प्रतिष्ठीत दोनचार मंडळी बसलेली होती. गणेशला पाहताच त्यांच्यात नमस्कार चमत्काराचे आदान प्रदान झाले. पाटील, सरपंच वैगेरे अजून यायचेच होते.

गणेश बैठकीच्या एका कोपऱ्यात जाऊन बसला. बाकीच्या मंडळीच्या विड्या, पान, चिलमा, तंबाखुचे बार सुरु होते आणि सोबत शेतातल्या गावातल्या गप्पा सुरु होत्या. गणेशला कुणात मिसळावेसे वाटले नाही म्हणून तो एकटाच बसून राहिला. त्याच्या शेजारीच बैठकीच्या कोपऱ्यात एक म्हातारा खेडूत बसला होता. त्या खेडूताने आपल्या शर्टच्या खाली हात घालून आतील कापडाच्या बनियनला पोटावर असलेल्या खिशातून त्याची चंची काढली. चंची खाकी रंगाच्या कापडापासून बनवलेली होती. त्या खेडूताने हळूच त्या चंचीची गाठ सोडली. त्याच्या सगळ्या हालचाली कशा संथ होत्या. चंची उघडल्यावर त्याने चंचीतून त्याची चिलीम काढली. चिलीम व्यवस्थित स्वच्छ केली. चिलिमीच्या बुडात एक बारीक गोळीसारखे काहीतरी होते. ते बाहेर काढले. तेही स्वच्छ केले आणि पुन्हा चिलीमीच्या बुडात टाकले. कदाचित ते चिलीम ओढतांना तोंडात तंबाखू जाऊ नये म्हणून बुडात टाकत असावेत. मग त्याने चंचीतून छोटसं अजून एक कापडाचं बोचकं काढलं. गणेश त्या म्हाताऱ्याच्या हालचालींचे बारकाईने निरिक्षण करीत होता. त्याने ते बोचकं सोडलं. त्यातला तंबाखु काढून चिलीमीत व्यवस्थित दाबून भरला. आता तो पुन्हा त्याची चंची धुंडाळू लागला. त्याने चंचीतून एक छोटा पांढरा दगड काढला. त्या दगडाला ती लोक गार म्हणत असत आणि तो तसा दगड शेतात किंवा ओढ्याच्या काठी वाळूत बऱ्याच प्रमाणात सापडत असे. तो दगड तसाच हातात धरुन त्याने चंचीतून एक कीचेन सारखी काहीतरी वस्तू काढली. ती वस्तू म्हणजे एका बाजूला लोखंडाची छोटीशी जाड पट्टी होती आणि दुसऱ्या बाजूला त्या पट्टीला बांधलेला रेशमाचा कोसला होता. त्याने तो कोसला उघडला. त्या कोसल्याला बरोबर मधे कापून त्याची डबी बनवलेली होती. त्या कोसल्याच्या डबीत कापुस ठेवलेला होता. गणेशने एकदा एका जणाला विचारले होते. तो कापसाच्या झाडाचा कापूस नसून काटशेवरीच्या झाडाचा कापूस होता. त्याला ते लोक कफ म्हणत असत. तर त्या म्हाताऱ्याने त्या कोसल्याच्या डबीतला थोडासा कफ काढून त्याच्या हातातल्या पांढऱ्या दगडाच्या काठाला लावला आणि मग तो त्या लोखंडाच्या पट्टीने त्या दगडाला जोरात घासून तो कफ पेटविण्यासाठी ठिणगी पाडू लागला. दोन तीनदा असफल प्रयत्न केल्यावर चवथ्यांदा तो कफ पेटला. त्याने तो कफ चिलीमीच्या तोंडावर ठेवला आणि मग चिलीमीच्या बुडात एक छोटंस कापड लावून तो त्या चिलमीचे जोरजोरत झुरके मारू लागला. जसा तो जोरात ओढत असे चिलमीच्या तोंडावर लाल विस्तवासारखा तंबाखू पेटतांना दिसत असे. दोन तीन झुरके मारल्यानंतर तो म्हातारा त्याच्या तोंडातला धूर मोठ्या ऐटीत सोडत असे.

गणेश इतक्या वेळचा त्या म्हाताऱ्याकडे पाहत असल्याचे त्याच्या लक्षात आले असावे. दुसऱ्यांना दोन तीन झुरके घेऊन तोंडातून धूर सोडत तो म्हातारा गणेशकडे चिलीम असलेला हात पुढे करीत म्हणाला, " घेऊन बगता .."

गणेशने कससं तोंड करून हाताच्या इशाऱ्यानेच नाही म्हटले.

" नाय?... अवो लय मजा हाय याच्यात... ते बिडी अन् सिगरेटमंदी काय दम नाय... एकडाव घेऊन त बगा..."

त्या म्हाताऱ्याने पुन्हा आग्रह केला.

" नाही ... खरंच नको" असं म्हणून गणेश आता त्या म्हाताऱ्याकडचं आपलं लक्ष हटवून इकडे तिकडे बघू लागला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network