Marathi online Library - Madhurani - CH-27 मिटींग

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi online Library - Madhurani - CH-27 मिटींगत्याचं लक्ष बैठकीच्या गॅलरीत गेलं. तो उठून गॅलरीत गेला. गॅलरीतून त्याने सभोवार नजर फिरविली. हा गावातला सगळ्यात उंच भाग म्हणून गावातली सगळी घरं छोट्या छोट्या आकारात खेळण्यातल्या घरांसारखी दिसत होती. त्या घरांना वेढलेली शेतांची हिरवळ फारच नयनरम्य वाटत होती आणि त्या हिरवळीतून नागमोडी वळणे घेत वाहणारा ओढा एखाद्या चित्रात एखाद्या चित्रकाराने सुरेख रेघोटी ओढावी असा भासत होता. त्या हिरवळीला चहुबाजूने उंच उंच डोंगरांनी वेढलेले होते. जणू ते डोंगर तटरक्षकाची भूमीका पार पाडत असावेत. गणेश बराच वेळ ते सौंदर्य आपल्या डोळ्यांनी पिऊन घेत होता. बैठकीतल्या कुजबूजीने तो भानावर आला. त्याने वळून मागे बैठकीत बघितले. बरीच गर्दी जमा झाली होती. पण अजून पाटील आणि सरपंच दिसत नव्हते. तो परत बैठकीत आला. तो पूर्वी जिथे बसला होता ती कोपऱ्यातली जागा अजूनही रिकामी होती. तो पुन्हा तिथे जाऊन बसला. तेवढ्यात गावच्या शाळेचे हेडमास्तर मते गुरुजी आले. त्यांना लोकांनी नमस्कार चमत्कार केला. त्यांनी बसण्यापूर्वी आपली नजर बैठकीत सभोवार फिरविली. माणसाचं कसं मजेदार असतं. जेव्हा तो अशा गर्दीच्या ठिकाणी जातो. आपला कंफर्टेबल झोन निवडतो. जिथे त्याला सोईस्कर वाटते आणि मग तिथे जाऊन बसतो. त्यांनी कोपऱ्यात बसलेल्या गणेशला हेरले. तो ही सरकारी नोकर आणि आपणही सरकारी नौकर. आपलं सूत चांगलं जमणार. म्हणजे बऱ्याच बाबतीत गोष्टी करायला आपला कॉमन इंटरेस्ट राहणार. त्यांनी गणेशला नमस्कार केला आणि ते त्याच्या शेजारी जाऊन बसले.

" काय गणेशराव ... बऱ्याच दिवसांनी दिसले?" त्यांनी बसता बसता त्याच्या मांडीवर थाप देऊन म्हटले.

" हो ना... काय करणार... आम्हाला तुमच्या शाळेत काम नसते आणि तुम्हाला आमच्या ऑफीसात नसते ... मग अशी अमावस्ये पौर्णिमेलाच आपली भेट होणार " गणेश म्हणाला.

" हे मात्र तुमचं बरोबर आहे.'' गुरुजी म्हणाले.

तेवढ्यात सरपंच आले. पुन्हा नमस्कार चमत्काराचा एक गोंधळ उडाला. काही लोक लगबगीनं उठून त्यांच्याजवळ गेले.

" आली का सगळी मंडळी?" सरपंचाने सगळ्यांना संबोधून प्रश्न विचारल्यासारखा विचारला.

त्यात त्यांनी दोन उद्देश साध्य केले होते. एकतर बैठकीतल्या सगळ्या लोकांशी संवाद साधला होता. आणि ज्यांचं कुणाचं लक्ष नव्हतं किंवा जे कोणी आपलं लक्ष नाही असं भासवत होते त्यांना आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली होती.

" जवळ जवळ आले की सगळे लोकं... फकस्त पाटील राह्यले...हे मी असा गेलो अन् त्यानला घेऊन आलो." उठून उभा राहून सरपंचाजवळ आलेला एकजण म्हणाला.

त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत सरपंच बैठकीच्या अगदी मधे काही इतर प्रतिष्ठीत मंडळीसोबत बसले.

" काय शामराव.. काय म्हणते तुमचं सीड?'' सरपंचाने शामरावच्या शेजारी बसत म्हटले.

" काय म्हणणार हाय ?... केली यावर्सी हिम्मत... गुऱ्हाळात मुंडकं टाकलं ... आता बगू गोड लागते का जळते ते." शामराव म्हणाले.

" आवो जळणार कसं... तुमी चांगली हिम्मत केली... तुमाला तर इनाम द्यायला पायजे... बगू सरकार खाती एखादी योजना हाय का ते... " सरपंचाने शामरावला तस्सली देत गणेशकडे हात करीत म्हटले, " काय गणेशराव ... हाय का एखादी योजना?"

" हो आहेत ना ... याबाबतीत मी एक बैठक घ्यावी म्हणतो ... त्यात तुम्हा लोकांना सगळी सविस्तर माहिती मिळेल..."

गणेशने माहिती पुरवली.

" मंग घ्याकी लौकरात लौकर.... कव्हा घेता ... सांगा...'' सरपंचाने गणेशला हातोहाती विचारून घेतले.

" तुम्ही म्हणाल तेव्हा" गणेश म्हणाला.

" मंग... घेता या शुक्रवारी ... काय शामराव कसं"

" हो चालल की..." शामराव म्हणाले.

" हो शुक्रवारी चालेल ... तशी नोटीस काढून मी शिपायाकरवी सगळ्यांकडे फिरवतो..." गणेश म्हणाला.

" आवो शिपायासोबत कशाला ... इथं हायतच की सगळे... तुमी फकस्त आता वेळ सांगा..." सरपंच म्हणाले.

" सकाळी दहा वाजता चालेल?" गणेशने सरपंचाला विचारले.

" चाललं की ... काय गावकरी मंडळी" सरपंचाने बैठकीतल्या इतर लोकांना विचारले.

" हो ... हो... " बैठकीत दोनचार आवाज घुमले.

" हं गणेशराव ... मंग फिक्स ... शुक्रवारी सकाळी दहा वाजता" सरपंचानी शिक्कामोर्तब केला.

गणेशने सहमतीदर्शक मान हलविली. गणेशला सरपंचाची तिथल्या तिथं प्रकरण निकालात काढण्याची ही पद्धत फार आवडायची. पण गणेशला काय जाण होती की सरपंचाच्या या गोष्टीमुळेच गावातल्या बऱ्याच लोकांची मनं दुखावल्या जायची. त्यांचं म्हणनं असायचं की सरपंच आपल मत कधीच घेत नाहीत. ते आपल्याला कस्पटाप्रमाणे किंमत देतात. आणि स्वत:च हेकेखोरपणे वागून सर्व निर्णय स्वत:च घेतात.


क्रमश:...


Marathi katha, Marathi online library publication, Marathi free books, Marathi sahitya books online, Marathi bana, Marathi gosti, Marathi movies songs download free

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network