Marathi Novel Book - Madhurani- CH-28 पाटील कसे नाही आले अजून?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Novel Book - Madhurani- CH-28 पाटील कसे नाही आले अजून?

अचानक गणेशला जाणवले की बैठकीतली कुजबूज एकदम शांत झाली. तो त्याच्या बाजूला बसलेल्या गुरुजीसोबत बोलत होता. त्याने एकदम सगळी बैठक शांत का झाली हे बघण्यासाठी वळून बघितले. बैठकीतले जवळपास सगळे चेहरे आ वासून बैठकीच्या दाराकडे पाहत असल्याचं त्याला आढळलं. त्यानेही दाराकडे वळून बघितले. त्याचही तोंड उघडं ते उघडंच राहालं. दारात मधुराणी उभी होती. ती आज छानपैकी नटून थटून आली होती.

ती इथं कशाला आली असावी?....

ती त्याच्याकडेच पाहत होती.

ही बया आपल्या मागे तर इथे नाही ना आली?...

हा विचार येताच गणेशच्या पोटात गोळाच उठला.

मग तिने तिथेच दारात उभे राहून बैठकीत सभोवार नजर फिरविली. सरपंचाशी तीची नजरानजर होताच तिने सरपंचाला नमस्कार केला.

मग पुन्हा तीची नजर बैठकीत सगळीकडे फिरून गणेशवर येऊन स्थिरावली. गणेशला तिने एक गोड स्मित दिले. ती गणेशकडे हळू हळू चालत येऊ लागली. ती जशी जशी गणेशजवळ येऊ लागली तसे गणेशच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. त्याला घाम फुटायला लागला होता.

" इकडं मधे ये की मधुराणी" सरपंचाने तिला त्यांच्याजवळ येऊन बसण्यास खुणावले.

" नाय नको ... इकडं कोपऱ्यातच बरं हाय" ती म्हणाली.

आता कुठे गणेशच्या जिवात जीव आला.

म्हणजे ती ही मिटींगलाच आली होती...

मी तर आपला वेगळाच विचार करत होतो...

नाही तिच्याजवळ तसं काहीही करण्याची हिम्मत आहे...

गणेशच्या डोळ्यासमोरुन एकदम तो माणूस येऊन गेला ज्याला मधुराणीने चिमटा काढला म्हणून चक्क चपलीने झोडपले होते. एव्हाना मधुराणी गणेशच्या जवळ येऊन चांगली त्याच्या मांडीला मांडी लावून बसली.

तशी इथे जागाही कमी आहे म्हणून कदाचित तिची मांडी आपल्या मांडीला लागत असावी...

नाही तसं ती तिला जागा करण्यासाठी आजूबाजूच्यांना सरकायला सुध्दा सांगू शकली असती...

तशी तीची दुसरी मांडी पलिकडून बसलेल्या गुरूजींच्या मांडीला सुध्दा लागत होती...

पण नाही गुरूजींना तिची मांडी फक्त पुसटशी लागत होती आणि आपल्या मांडीला तर ती चांगली चिकटून बसली होती...

गणेशला तिच्या मांडीचा गुबगुबीत स्पर्श सुखावह वाटू लागला होता. गणेशनेही पलिकडे सरकून तिला व्यवस्थित बसण्यास जागा देण्याची तसदी घेतली नाही. गणेशने एकदा चोरून आजूबाजूला बसलेल्या माणसांवर आपली नजर फिरवून घेतली.

नाही म्हणजे आजूबाजूचे लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहत आहेत...

पण मधुराणी आपला चेहरा हसरा ठेवत आजूबाजूच्या लोकांकडे बघत अशी बसली होती की कुणाला गणेशची काहीही शंका येत नव्हती. त्याला हायसं वाटलं. त्याला अजून एक गोष्ट जाणवली की आजूबाजूचे लोक कुणी चोरून तर कुणी उघड उघड तिच्याकडेच पाहत होते.

आता मात्र सरपंचांना अस्वस्थ वाटायला लागले होते. इतका वेळ झाला सगळे लोक येऊन बसले पण अजून पाटलांचा काही पत्ता नव्हता. आपल्याला बोलावून इथे पाटलांनी असं ताटकळत ठेवनं आता सरपंचांना अपमानास्पद वाटायला लागलं होतं.

" पाटील नाय आले का अजून?" सरपंचांनी चेहऱ्यावरचे भाव लपवीत इकडे तिकडे पाहत म्हटलं.

" पाटील पुजेत हायतं" पाटलांचा एक चमचा बोलला.

" इतका वेळ पुजा... आशी कोणती पुजा करताहेत बॉ" सरपंचानी गमतीचा आधार घेत म्हटले.

आजूबाजूला थोडी खसखस पिकली.

" जा बरं एकदा त्यांना सांगून ये... म्हणावं सगळे लोक येऊन खूप वेळ झाला आहे... जरा आटपतं घ्या म्हणावं...'' सरपंचांनी त्याच चमचाला आदेश दिला.

तो खेडूत आपली टोपी सांभाळत उठला आणि लगबगीनं बैठकीच्या दारातून बाहेर पडला.

बराच वेळ झाला तो खेडूत पाटलांना बोलावण्यासाठी गेला तो अजूनही परत आला नाही. सरपंचाची अस्वस्थता पाहून अजून एकजण पाटलांना बोलावण्यासाठी गेला तोही तीकडेच गुल. आता लोकांतली कुजबूज थंडावली. काही जण बैठकीतून उठून जाऊन बाहेर येरझारा घालू लागले. काही लोकांनी विड्या चिलमा पेटविल्या. काही जण तंबाखुचे बार चोळू लागले. सरपंच अस्वस्थ होऊन गॅलरीत गेले. तरीही अजून बरीच मंडळी बैठकीत बसून होती. बैठकीतले काही जण तिथेच लवंडले. गणेशमात्र तिथून उठण्यास तयार नव्हता. तो अजूनही मधुराणीच्या मांडीच्या स्पर्शातच अडकून पडला होता.

सगळे जण एक एक जण बाहेर जात आहेत...

आपणही थोडं बाहेर जाऊन यावं नाहीतर उगीच कुणाला शंका...

गणेश उठण्यासाठी उकड झाला.

" आवो बसाकी गणेशराव कुठं निघाले.... का तुमालाबी शीगारेटची हूक्की आली" मधुराणी गणेशला म्हणाली.

गणेश जावं की बसावं या संभ्रमात मुकाट्याने खाली बसला. तेवढ्यात बाहेर गेलेल्या लोकांचा एक लोंढा बैठकीत आला.

" आले वाटतं पाटील..." गणेश म्हणाला.

" हो ना बाई इतका वेळ नुसतं ताटकळत बसायचं ... उगीच आले मिटींगला" मधुराणी कुरकुरत म्हणाली.

मग गणेशकडे पाहून आपल्या चेहऱ्यावरचे कुरकुरण्याचे भाव बदलून हसत मधुराणी म्हणाली, " पण हे एक बरं झालं तुमी इथं भेटले... नायतर मी कव्हाचीच निघून गेले असते"

गणेश नुसता तिच्याकडे पाहून लाजून हसला.

बाहेर गेलेले सगळे लोक आत बैठकीत येऊन जेव्हा स्थिरावले तेव्हा सर्वात शेवटी दारातून पाटील आत आले. आत येताच त्यांनी बैठकीत एक नजर फिरवून सर्वांना नमस्कार केला. मग बैठकीत मधे येऊन बसत गॅलरीत पाठमोऱ्या सरपंचाला आवाज देत म्हणाले,"नमस्कार हो सरपंच ... आत या ... चला आता मिटींग लवकर लवकर उरकून घेऊ"

सरपंचांनी मागे वळून पाटलांना नमस्कार केला आणि थोडे नाराजीनेच ते पाटलाजवळ येऊन बसले.

" मंग करायची मिटींगची सुरवात? ... " पाटलांनी सरपंचाची जशी परवानगी घेतली.

सरपंचांनी पाटलाकडे नुसते संमतीदर्शक पाहिले.

सभोवार पाहता पाहता पाटलाचे लक्ष कोपऱ्यात बसलेल्या मधुराणीकडे गेले.

" मधुराणी इकडं समोर ये की अशी..." पाटलांनी तिला समोर बोलावले.

" मी तर आल्याआल्याच तिला इकडं बसायला सांगितलं होतं.... पण..." सरपंचांनी वाक्य अर्धवट सोडत मधुराणीकडे पाहत म्हटले.

मधुराणीने तिथून कोपऱ्यात बसूनच हाताने 'तुमचं चालू द्या मी इथेच बरी आहे' असा इशारा केला.

मग काहीतरी आठवल्यागत पाटलांनी सभोवार एक नजर फिरवीत म्हटले,

"अरे हो ... मंडळी ... या बारीनं इलेक्शनला लेडीज रिजर्वेशनच्या दोन सीट हायत... मंग एकतरी तयार कराया नको?... म्हून मुद्दाम मीच मधुराणीला मिटींगला बलवलं ... तिला सय व्हायला नको?" पाटील म्हणाले.

गणेशला पाटलांच्या बोलण्यात व्यवहार चातुर्य आणि एका राजकारण्याचा कसलेला मुरब्बीपणा दिसून येत होता. कारण गणेश पूर्वी पाटलांशी बोलला होता तेव्हा ते चांगले शुध्द मराठी बोलू शकत होते. आणि बोलण्यातून तरी चांगले सुशिक्षीत जाणवत होते. मग त्यांनी यावेळी असे अडाणी का बोलावे?. कदाचित लोकांमध्ये मी तुमच्यातलाच एक आहे ही भावना बिंबवावी म्हणून.

क्रमश:...

Marathi sahitya, meeting, Patil, sarpanch, village Story, Reservation, Election, Marathi literature online on net, read kadambari on net

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network