Marathi wangmay - Madhurani CH 29 मंग मिटींग करायची सुरु?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi wangmay - Madhurani CH 29 मंग मिटींग करायची सुरु?


" मंग मिटींग करायची सुरु? " पाटलांनी सभोवार एक नजर फिरविली.

" मुकीच्या बाप कुठाय ... अन् मुक्याचा बाप?" बैठकीत एक शोधक नजर फिरवीत पाटील म्हणाले," आरे तुमी लोक तिकडं कोपऱ्यात काय बसले ... अन् तेबी एकजण या कोपऱ्यात अन् दुसऱ्या त्या कोपऱ्यात..." पाटलांनी गंमत केली.

बैठकीत सौम्य खसखस पिकली.

" आरं ... इकडं या की म्होरं.... " पाटलांनी त्यांना समोर बोलावले.

मग पुन्हा पाटलांनी सभोवार एक नजर फिरविली अन् गणेश बसला होता त्या कोपऱ्यात पाहत म्हटले," अन् गुरुजी, गणेशराव ... तुमी या जरा इकडं समोर.. अन् भटजी तुमी जरा म्होरं सरका "

गुरुजी उठले. आता गणेशचा नाईलाज झाला. त्याने उठता उठता मधुराणीकडे बघितले. तिच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य होते. गणेश समोर जाऊन पाटलाच्या शेजारी जाऊन बसला.

" हं सरपंच सर्वात आंधी काय करायचं?" पाटलांनी मिटींगची सर्व सुत्र हाती घेत म्हटले.

" आता काय .. मुक्याचा बाप अन् मुकीचा बाप दोघही लग्नाला तयार हायत ... काय पांडूरंग, रघू ... "

दोघांनीही मुकाट्यानं आपापल्या माना हलविल्या.

" मंग पुढची गोष्ट म्हणजे लग्नाचा मुहुर्त काढायला पायजे..." सरपंच म्हणाले.

" अन् देण्याघेण्याचं ..." एकाजणाने तोंड विचकलं.

" आवो होईल की तेही ... आंधीे मुहुर्त तर काढा" सरपंच म्हणाले.

" काय भटजी ... येथुन पुढं पहला मुहुर्त कव्हा निघतो?" पाटलांनी भटजीला विचारले .

भटजीने पुढे सरकत आपलं जुनाट तांबूस झालेलं पंचांग उघडलं.

दोन तीन पानं चाळून तो म्हणाला " तुळशीचं लगीन झाल्याबरोबर पहला मुहुर्त पुढच्या महिन्याच्या सत्तावीस तारखेला येतो"

" कोणवार येतो? " सरपंचाने विचारले.

" गुरुवार " भटजी म्हणाला.

" म्हंजे बजाराचा दिस" एकजण बोलला.

" भटजी अजून पुढचा मुहुर्त पहा" सरपंच म्हणाले.

गावात बाजाराच्या दिवशी दिवसभर सगळे जण कशात ना कशात गुंतलेले असल्यामुळे शक्यतो लोक लग्नप्रसंग घ्यायचं टाळत.

भटजीने अजून त्याच्या हातातले पंचांग चाळल्यासारखे करीत म्हटले " मंग एकोणतीस हाय... शनिवार ...''

" ठीक हाय मंग एकोणतीस करून टाका फिक्स... काय कसं पांडूरंग, रघू "

मुक्याच्या वडीलाने आणि मुकीच्या वडीलाने नुसत्या माना डोलवल्या.

पुढे पाटील म्हणाले, "तर मंग एकोणतीस फिक्स... आता पुढचा मुद्दा घ्या"

पाटलाने उगीच पुन्हा फाटे फुटू नये म्हणून त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

" आता देण्याघेण्याचं ठरवा" मुक्याच्या बापाजवळचा एकजण घाई करीत म्हणाला.

त्याला आधीच मुक्याच्या बापाने पढवून ठेवलेले दिसत होते.

पाटलाने एक नजर मुक्याच्या बापावर टाकत म्हटले, " काय पांडूरंग ....काय अपेक्षा हायत तुझ्या"

मुक्याच्या बापाने चुळबुळ करीत आजूबाजूला पाहिले.

तेवढ्यात गणेशच्या लक्षात आले की पाटलाने गावातल्या डॉक्टरला खुणावले होते. ते त्याच्या व्यतिरिक्त कदाचित कुणाच्याच लक्षात आले नसावे. पण गणेश पाटलाच्या अगदी जवळ बसल्यामुळे ते गणेशच्या नजरेतून सुटले नव्हते.

" एक मिनीट ... देण्याघेण्याच्या मुद्याच्या आधी माझा एक मुद्दा हाय... '' डॉक्टरांनी हस्तक्षेप केला.

आता सर्व नजरा डॉक्टरांकडे वळल्या. डॉक्टर तसे स्वभावाने शांतच. ते कधी अशा मिटींगमध्ये बोलत नसत. त्यांचा काय मुद्दा असावा सगळे जण त्यांच्याकडे उत्सुकतेने बघू लागले.

" हे बगा ... मुक्याचं अन् मुकीचं जर लगीन लावलं तर एक प्राब्लेम होऊ शकतो" डॉक्टर गूढतेने म्हणाले.

" प्राब्लेम? ... कोणता?" चार पाच जणांच्या तोडातून आश्चर्याने निघाले.

डॉक्टरने बैठकीत झालेलं गंभीर वातावरण अजून गंभीर बनविण्यासाठी एक पॉज घेतला. मुकीच्या वडीलाच्या चेहऱ्यावर भीतीचं अन् काळजीचं सावट पसरलं.

" कोणता प्राब्लेम? ... डॉक्टर जरा बोलाकी" सरपंच अस्वस्थतेने म्हणाले.

" आवो डॉक्टर ... बोलाकी असं दातखीळी बसल्यागत काय उभा राहलासा" पाटील म्हणाले.

" नाय म्हणजे मी सांगावं की नाय हा विचार करतोय" डॉक्टर म्हणाले.

" ए डॉक्टर.... तू आता पुढं बोलतं का हानू एक तुह्या कानशिलात" मुकीच्या जवळ बसलेला मुकीचा बलदंड मामा चिडून उठत म्हणाला.

त्याला मुकीच्या बापाने समजावून खाली बसविले. डॉक्टरला घाम फुटला होता. त्याने एकदा पाटलाकडे पाहिलं.

" सांग ... सांग ... मी हाय तू काळजी करु नको" पाटील त्याला धीर देत म्हटले.

" मुक्याचं अन् मुकीच जर लगीन झालं तर त्यांची होणारी संतानंसुध्दा मुकीच होवू शकतात... म्हणजे तशी जास्तीत जास्त शक्यता हाय" डॉक्टर म्हणाले.

बैठकीत स्मशानवत शांतता पसरली.

" मंग त्यानं काय होणार हाय?" एकजण बोलला.

" असं कसं ... काय होणार हाय म्हन्ता..." मुक्याच्या बापाच्या जवळ बसलेला एकजण उठला अन् म्हणाला "अरे आदीच एका मुक्याला वागवता वागवता नाकी नऊ येतात... आता जर लगीन झालं तर झाले दोन... अन् पोरंबी मुकी निघाली तर त्यो तर मुक्याचा कळपच होईल... मंग त्यास्नी कुणी संभाळायचं... "

" त्यास्नी आमी संबाळू ... त्याची तुमी नगा काळजी करु" मुकीचा मामा जोशात येऊन म्हणाला.

" अन् आमच्या वंशाच्या दिव्याचं काय ... त्यो बी मुकाच ... ते आमाला चालायचं नाय..." दुसरा एकजण मुक्याच्या वडीलाच्या बाजूचा म्हणाला.

" हे बगा ... दोन्हीकडचे लोकहो जरा शांत व्हा" सरपंचानी हस्तक्षेप केला.

" असं कसं म्हंता सरपंच ... ते मुकी पोरं काय तुमी संबाळणार हाय का?" मुक्याचा मामा अतापर्यंत जो शांत बसला होता तो म्हणाला.

" त्यातूनही आपण काहीतरी मार्ग काढू ... मी एकटा नाय पण आमचं गाव काहीतरी व्यवस्था करील."

" म्हंजे तेच की पोरं दारोदारी भीक मागतील ... अन् तुमचे गाववाले त्यानला भीक वाढतील.." मुक्याच्या मामा तावातावान म्हणाला.

" पांडूरंगराव ... उठा... हे बैठक मोडली ... आपल्या मुक्याला लागल तेवढे लोक पोरी द्यायला तयार हायत ... अन् त्याबी चांगल्या... मुक्या भहीऱ्या नाय... " मुक्याच्या मामाने मुक्याच्या बापाला उठवले.

" असं नका करु ... त्या मुक्याच्या मनाचा तरी विचार करा" गणेशराव मिटींगचा बिघडलेला रागरंग बघून प्रथमच बोलले.

" तुमी कोण? ... " मुक्याचा मामा तावातावानं गणेशला म्हणाला.

" आमच्या गावचे ग्रामसेवक हायत..." कुणीतरी माहिती पुरवली.

" तुमी आम्हास्नी जास्ती शहानपणा शिकवू नका... सरकारनं देलेलं काम मुकाट करत जा अन् पगार घेत जा... या अस्ल्या भानगडीत जास्त लूडबूड करु नका... " मुक्याचा मामा चिडून गणेशला म्हणाला.

गणेशला बाकीच्या कुणीही साथ न दिल्यामुळे त्याला नाईलाजाने चूप बसावे लागले.

" चला पांडूरंगराव... इथं आता एक मिनटं बी थांबून उप्योग नाय... मुक्याच्या लग्नाची तुमी काळजी नगा करु ... त्याची मी जीम्मेदारी घेतो..." मुक्याच्या मामाने मुक्याच्या वडीलाला हाताला धरून जवळ जवळ ओढण्यास सुरवात केली.

" अन् तुमच्या पोरानं आमच्या पोरीचं आयुष्य बरबाद केलं त्याचं काय ... " इतका वेळ मुकीच्या वडीलाने समजावून समजावून खाली बसलेला मुकीचा मामा उठला.

" आर त्याच्यात आमचा काय दोष ... तुमाला तुमची पोरगी आवरता आली नाय ... ही तुमची चूकी ... आमच्या पोरानं काई जबरदस्ती नाय केली ... तुमच्या पोरीनच घेतलं त्यालं ऊरावर..." मुक्याचा मामा मुक्याच्या वडीलाला दरवाजाकडे घेऊन जात बोलला.

" ये फोकनीच्या ... तोंड संभाळून बोल" मुकीच्या बापाकडील एक जण उठून शिव्या देऊ लागला.

मुकीच्या मामाच्याने आता राहवले गेली नाही.

" तुह्या मायचा ... तू थांब तुला दावतो ... ए सुदामा धर रे त्याला...." मुकीचा मामा आता मुक्याच्या मामाच्या अंगावर धावून जात म्हणाला.

त्याच्या मागे मुकीच्या बापाकडचे काही जण धावले. आता मुक्याच्या बापाच्या पार्टीचेसुध्दा काही लोक सरसावले.

त्यांच्यात चांगलीच जुंपली होती. बैठकीत सगळीकडे गोंधळ माजला होता. तेवढ्यात एक धीरगंभीर करडा आवाज बैठकीत घुमला.

" ये भोसडीचेहो ... इथून निगा आधी बाहेर... तिकडं बाहेर जाऊन ... एकमेकांच्या ऊरावर बसा.. की एकमेकांची डोस्की फोडा ..." पाटीलांनी चिडून त्यांना बाहेर हाकलून लावले.

थोडावेळ बैठकीतले वातावरण स्तब्ध झाले.

" राम्या लाव रे हाकलून लेकांना" पाटलांनी त्याच्या एका नोकराला आदेश दिला.

राम्या आणि त्याचे दोन तीन साथीदार पुढे सरसावून एकेकांना त्यांच्या दंडाला धरुन बाहेर काढू लागले. ते लोक आपल्या पकडलेल्या दंडाला हिसडा देऊन बाहेर निघू लागले.

गणेश मधुराणी आणि इतर प्रतिष्ठीत मंडळी गोंधळ पाहून उठून उभी राहाली होती. बैठकीत एकदम शांतता पसरली होती. फक्त बाहेर जाणाऱ्या लोकांच्या चपला बुटांचा आवाज येत होता. आणि मधे मधे पाटलांच्या नोकराचा आणि त्या लोकांमधील तुरळक वाद ऐकायला येत होता.

" मंडळी बसा ... हे म्हंजे असं झालं ... एखाद्याचं कराया जावं भलं ... अन् ते म्हंतात आमचंच खरं... " पाटील म्हणाले.

सरपंच खाली न बसता जाण्यासाठी दाराकडे जाऊ लागले.

"आवो सरपंच ... दोन मिनीट बसा की ... चहा घेऊ अन् मंग मिटींग बरखास्त करु... तशी बरखास्त व्हायची कोन्ती राह्यली मिटींग..." पाटील म्हणाले.

सरपंच जावं की थांबाव या विवंचनेत पुन्हा आपल्या जाग्यावर बसले.

" बाकीची मंडळीबी बसा... जरा..." पाटील म्हणाले.

काही लोक बसावं की नाही या संभ्रमात उभेच राहाले.

" आवो बसा बसा ... नायतर तुमीच उद्या मनसाल पाटलानं बिनच्याचच वापस पाठवलं" पाटील गंमत केल्यासारखे बोलले.

पाटलाच्या या गमतीवर बरेच जण जबरदस्ती हसल्या सारखे हसले आणि खाली बसले.

आतापर्यंत भांडणारे दोन्ही पार्टीचे लोक बाहेर जाऊन पोहोचले असतील. कारण आता खालून मोठमोठ्यांनी भांडण्याचा आवाज येत होता.

क्रमश:....

Marathi village story, Gram panchayat, Gram sevaks, illliteracy in the villages, Sarpanch, Patil, Marathi elibrary

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. dear aata rahwala jat nahi lavkar lavkar posts pathwa plz.....

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network